Login

एकदा पहावे मरून भाग ३

Fantasy
चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा

एकदा पहावे मरून
भाग ३
©® सौ.हेमा पाटील.

मागील भागात आपण पाहिले, भागू दिवसा पण जेवली नाही व रात्री ही माझे जेवण बनवू नका असे तिने सांगितले होते. तरीही सुनबाई सासूची जेवणासाठी वाट पहात आहे. आता पुढे..


नवऱ्याचे जेवण झाल्यावर तिने नवऱ्याला सासूला जेवायला पाठवा असे सांगून बाहेर पिटाळले. बाहेर गेलेली भागू परस्पर तशीच पारायणाला गेली आहे असा निरोप नवऱ्याने पाठवला. हे सांगण्यासाठी घरापर्यंत येण्याची तोशीस त्याने घेतली नाही. पोराजवळ परस्पर निरोप पाठवून दिला. सारजाची चिडचिड झाली. तिने जेवायला घेतले. तिला रानातल्या कामामुळे कडकडून भूक लागली होती.

जेवण झाल्यावर सगळी आवराआवर, भांडीकुंडी करून झाले आणि मग भागू घरी अवतरली.

"आत्या भाताचं तरी चार घास खावा की."
यावर भागू म्हणाली,

"तुला येकडाव सांगितल्यालं समजत न्हाई का? मला जेवायचं न्हाई."

"बरं नगा खाऊ, काय माज्या पोटाला खानार हायसा का?"

"मग कशापायी यवडी मागं लागतीयास. जा की जाऊन झोप जा. मी बी निगालेय." सारजा झाकापाक करुन झोपायला गेली.

इकडे दिवसभर उपाशी राहिल्याने भागूच्या पोटात आग पडली होती. पण सांगणार कुणाला? ग्लासभर पाणी घटाघटा पिऊन ती अंथरूणावर जाऊन तर पडली, पण झोप कुठली यायला? अख्खी रात्र तिने भुकेने तळमळत काढली.

सकाळी सारजाने चहाची कपबशी सासूच्या पुढ्यात सरकवली.

"नगं मला." सासू म्हणाली.

"नगं? आता च्यानं काय बिघडवलं हाय तुमचं ?"

"लै पुढचं बोलू नगंस. वतून ठीव तो पातेल्यात."

सुनेची सकाळची कामाची गडबड सुरू होती. त्यामुळे सासूच्या तोंडाला न लागता तिने चहाच्या पातेल्यात तो चहा परत ओतला व ती तिच्या कामाकडे वळली. ते पाहून सासूच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

"हितं माजी कुनाला काळजी हाय का? कोन ढुंकून पन
माज्याकडं बगत न्हाई." सुनेला तिच्या बडबडीकडे लक्ष द्यायला वेळ नव्हता. ती पटापट हात हलवत होती. आज तिला लवकर रानात जायचे होते. आज बायका सुशीच्या रानात भांगलायला होत्या. काल जरा उशीर झाला तरी चालून गेले होते कारण बायका तिच्या शेतात होत्या. पयरा केला होता तर तो पार पाडावा लागणार होता.( पयरा करणे- बायकांच्या ग्रुपने मिळून सगळ्या ग्रुपच्या शेतातील भांगलण मिळून करणे.)

बुट्टीतली भाकरी डब्यात भरुन ठेवत तिने सासूला सांगितले,

"भूक लागली की जिऊन घ्या."

यावर सासू काहीच बोलली नाही. नवऱ्याचा पत्ताच नव्हता, तो गेला तिकडच्याच गावचा झाला होता. आता आकडा लावूनच तो परतणार होता हे सारजाला माहित होते. तिनं आपला जेवणाचा डबा उचलला आणि सरळ शेताचा रस्ता धरला. चालताना तिची चिडचिड होत होती.
ती मनातल्या मनात म्हणत होती,

'या म्हातारीला कशाचं खूळ आलंया! आजपत्तुर येळंवर जेवान, च्या पानी पित व्हती. आता माझ्या मागं का बिलामत लावली आसंल?

क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.

काय होते पुढे? म्हातारीचे स्वप्न पूर्ण होते का? येतात का पै-पाव्हणे तिला भेटायला? पाहूया पुढील भागात...

0

🎭 Series Post

View all