चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा
जलदकथा
एकदा पहावे मरून
भाग ४
©® सौ.हेमा पाटील.
भाग ४
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, भागूने चहा प्यायला ही नकार दिला. सारजा आपला डबा घेऊन शेतात गेली आहे. आता पुढे...
विलास घरी आला तर म्हातारी दारातच बसली होती.
"का गं आई? जेवली का तू?" त्याने सहजच विचारले. आकड्याच्या नादात काल आई जेवली नाही हे त्याच्या डोक्यातून पार निघून गेले होते.
"न्हाय जेवले, आन् मला जेवायचं बी न्हाई." आईने झटक्याने दिलेले उत्तर ऐकून त्याला वाटले, बहुतेक सासवासुनांचे काहीतरी जोरात वाजले आहे. तो म्हणाला,
"अगं, तुला कितींदा सांगिटलंया त्या सारजीच्या नादाला लागू नगंस. तिला डोकं नावाची चीज न्हाय."
"तिचं अन् माझं काय बी झाल्यालं न्हाय. मला जेवायचं न्हाय. मला कुनी बी दोन घास तरी खा असं दिकून म्हनायचं न्हाय. नायतर मी हाय अन् तुमी हायसा." भागू करवादली.
"आगं पर, जेवाय नगं व्हय? आजारी पडचील की अशानं."
"तू जा इथनं." असे म्हातारीने कावल्यावर विलास तेथून दूर झाला.
लेकाचे हे शब्द ऐकून म्हातारीच्या डोक्यात प्रकाश पडला. 'मला जेवायचे नाही असे टुमणे लावण्यापेक्षा मला आन् खावंना असे म्हणू या. म्हणजे सर्वांचा दोन घास तरी खा असा आग्रह मावळेल.'
विलास तेथून गेला आणि सावीला घेऊन आला.
"आई, काकी आलेत, बग काय म्हणतेत?"
"काय गं सावे?"
"जेवलासा का तुमी?" सावीने विचारले.
"मला कसंतरीच हुतयां. उमचळतंया. त्वांड कडूझार झालंया. मला काय हाऊस आली न्हाय बया. आता आन् खावंना तर काय करू?"
"तसंच दोन घास खायाचं. खाल्लंच नाय तर पोटात पित्त वाढंल. त्या खालच्या आळीच्या म्हातारीनं आसंच केलं हुतं. दोन दिस आन् सोडलं आन् गेली की म्हतारी."
"मी यवड्यात जात न्हाय. काळजी करु नगंस." भागू म्हणाली. निरुपाय झाला म्हणून सावी तेथून निघाली आणि थेट वाड्यात शिरली.
"व्हय तुमास्नी समाजलं का काय?"
"न्हाय, काय झालं?"
"भागूआक्कांनी जेवान बंद केलं हाय. कालपास्नं काय बी खाल्यालं नाय."
मग वाड्यातला सगळा लवाजमा भागूला बघायला आला. त्या सर्वांना एकसाथ आपल्या घरी आलेले पाहून म्हातारीचा जीव सुपाएवढा झाला.
"व्हंय गं काय आयकलं ते खरं हाय का? तू जेवान टाकलंस म्हने?"
यावर तिने मान डोलावली.
"पर का आसं? सुख रूततंया जनू! सोन्यासारख्या गुनाची सून हाय. काळजी घेनारा ल्योक हाय. मंग का आसं? भांडली व्हय सून?"
"कोन बी भांडलं न्हाय. मला आन् खावना. उमचळतंया."
"माज्याकडं सांडगा बनिवलाय, दिऊ का थोडासा?"
"अहं, मला काय बी नगं."
खूप आग्रह करूनही भागू अन्नाचा घास तोंडात घ्यायला तयार नाही ही बातमी सगळ्या गावात पसरली. आधीच गावात एवढे असले तर एssवढे होते. मग काय, भागूला बघायला गावातील बायकांची रीघ लागली. ते पाहून भागूला आनंद झाला. आपला उद्देश सफल होतोय याचे तिला समाधान वाटले.
"बया ! आत्या, कसं दिसतंया त्वांड! दोन घास खावा बगू." संगी म्हणाली.
"न्हाय, मला खावंना." भागू एकच पालुपद आळवत होती.
"ही घ्या सफरचंदाची फोड. खावा जरा चव यील, त्वांड दोन दिस जेवान नसल्यानं कसनुसं झालं असंल."
"नगं मला." भागूचे पालुपद सुरूच होते.
क्रमशः ©® सौ.हेमा पाटील.
आता गावातील सगळेजण भागूला भेटायला येऊ लागले आहेत. एवढ्यावर भागूचे समाधान होते का? हे पाहूया पुढील भागात...
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा