चॅम्पियन्स ट्रॉफी - २०२५
जलदकथा
जलदकथा
एकदा पहावे मरून
भाग ५
©® सौ.हेमा पाटील.
भाग ५
©® सौ.हेमा पाटील.
मागील भागात आपण पाहिले, भागूने अन्नत्याग केला आहे ही बातमी गावात पसरली आणि गावातील बायकांची तिला पहायला रीघ लागली.
सारजा वैतागून गेली. शेतातली कामं बगू, घरातलं आवरू का या म्हातारीच्या मागं लागू? बगाय येनाऱ्या बाया सैपाकघरात यिऊन सल्ला दिल्याबिगार जात नवत्या. कोन म्हणायचं,
"कोऱ्या च्यात लिंबू पिळून दे त्यास्नी. बग लगीच चव यील तोंडाला."
"उलीसं बोटवं ( शेवया) उकळ अन् त्याचं गरम पानी गाळून दे प्यायला. बग म्हातारी सोत्ताच्या तोंडानं भाकरी मागतीया का न्हाई." आलकीने अभिनव उपाय सांगितला.
"जरा थांबा तुमीच. मी देते लगीच पानी उकळून बोटव्याचं. तुमीच पाजा दोन चमचं." आलकी फुशारक्या मारत पाणी घेऊन गेली पण म्हातारीने काही तोंड उघडले नाही. तिला अन्नच खायचे नव्हते मग ती बोटव्याचे पाणी कुठून पिणार?
विलास रात्री आईजवळ बसला आणि रडू लागला. त्याचे रडणे पाहून भागूचे मन द्रवले.
"तू का रडतूयास बाईवानी?"
"तू काय खाईनास तर काय करु? आता तू जर काय खाल्लं न्हाय तर म्या बी जेवनार न्हाय."
ते ऐकून भागूचे मन पाघळले. मुलाची आपल्यावर किती माया आहे हे पाहून तिचा जीव सुखावला, पण अजून तिचे इप्सित कुठे साध्य झाले होते? तिने तडजोड केली.
"जा, मला कोरा च्या आन. घोटभर घीन, पर तू जेवान सोडू नगंस." लेकाने आनंदाच्या भरात कोरा चहा आणून दिला. तेव्हापासून म्हातारी दोन वेळा अर्धा कप कोरा चहा पिऊ लागली.
लग्नपत्रिका देण्यासाठी घरी आलेल्या पाहुण्याने म्हातारीची अवस्था बघितली आणि पत्रिका वाटप करण्यासोबत म्हातारीच्या अवस्थेबाबत प्रत्येक पाहुण्या गावात बित्तंबातमी पोहोचवली. दुसऱ्याकडून ऐकल्यामुळे सगळ्यांनी विलासला फोन करायचा सपाटा लावला. फोनवर विलास काय सांगणार? तो नुसता हो हो करत होता. मग जे पाहुण्यांची लाईन लागली म्हणता...रोज दोन गावातली तरी पाहुणी म्हातारीला बघायला येतच होती. म्हातारीच्या माहेरची तर गाडीभरुन माणसे आली होती.
त्या पत्रिका द्यायला आलेल्या पाव्हण्याच्या नावानं सारजेनं बोटं कडाकडा मोडली. येणाऱ्या पाहुण्यांची उठाठेव करता करता तिच्या नाकी नऊ आले होते.
हे पाहून भागू मात्र सुखावली. आपल्याला पहायला इतकी माणसे येतील अशी तिने अपेक्षा केली नव्हती. आपण खूप श्रीमंत झालो आहोत अशी भावना तिच्या मनात आली.
चार दिवसांनी तिचे माणसे बघून पोट भरले. तिने सारजाला हाक मारली,
"सारजा, मला उलीसं बोटवं बनवतीस का?"
"काय?" सारजाला आश्चर्याचा धक्का बसला होता. आता म्हातारी काय अंथरुण सोडत नाही अशी तिची खात्री पटली होती. स्वतःला सावरत ती म्हणाली,
"लगीच आनते आत्या." असे म्हणत तिने शेवया बनवल्या. त्यावर तुपाची धार धरली. दूध घातले, गूळ घातला आणि ती ताटली म्हातारीच्या पुढ्यात ठेवली. चमच्याने शेवया उचलून म्हातारी गुटूगुटू खाऊ लागली. तिचे मिशन आज पूर्ण झाले होते. इतक्या दिवसांचा उपवास ती आज सोडत होती.
समाप्त.©® सौ.हेमा पाटील.
समाप्त.©® सौ.हेमा पाटील.
कथा आवडली तर नक्की लाईक कमेंट करा ही विनंती.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा