Login

एकता (भाग-१)

गैरसमज निर्माण झाले तरी एकता टिकून राहते हे सांगणारी कथा
कौटुंबिक कथा

शीर्षक:- एकता

भाग- १

"धनू, उठ बरं लवकर. बाबा रागावतील हं." आई सावित्री खिडकीचे पडदे सरकावत धनंजयला म्हणाली.

"ये आई, झोपू दे, ना गं. एकच तर दिवस मिळतो मला आणि काय गं ते बाबांचा धाक मला नको दाखवूस." वैतागलेल्या आवाजात म्हणत धनंजय तोंडावर चादर ओढत पुन्हा झोपी गेला.

याच काही होऊ शकत नाही असा विचार करत ती परत एकदा म्हणाली,"बघ बाबा, माझं काम मी केलं, ते जर ओरडले ना तर मला नको म्हणूस मग आई मला उठवायला काय झालतं म्हणून."

तरीही तो उठला नाही म्हणून ती वैतागत बडबडत तिथून निघून गेली. किचनमध्ये तिची मोठी सून रीना नुकतीच उठून आली होती. जांभळ्या देत ती डायनिंग टेबलावर बसत तोंड वाकडे तिकडे करत  म्हणाली,"आई, चहा झाला असेल तर मला देण्याचं कष्ट कराल का?"

सावित्रीने मधली सून मीनाला तिला चहा देण्याचा इशारा केला तेव्हा ती चिडचिड करत म्हणाली, "हो, देते ना. त्यासाठी तर जन्म झालाय ना आमचा. का तर आम्ही घरात रिकामं टेकडे? काय काम असतं ना आम्हाला दिवसभर? "

"ये तुला नाही म्हटलं मी चहा दे म्हणून, एक तर ते ऑफिसमध्ये राबा. घरात थोडी शांतता मिळेल म्हटलं तर ते पण नाही. सकाळ सकाळ नुसती कटकट आहे." रीना रागाने एक कटाक्ष मीनावर टाकत म्हणाली.

"रीना, तू मोठी आहेस तर थोडंसं समजून घे ना जरा, बाई. का सकाळ सकाळ घरातील शांतता भंग करतेस? " सावित्री चहाचा कप तिच्या हातात देत म्हणाली.

"हा, सासूबाई तुम्ही मलाच बोला. मीच वाईट ना. ती काय बोलली ते तुम्हाला नाही ऐकू आलं आणि मी थोडसं काही बोललं तर लगेच तुमच्या नाकाला मिरच्या झोंबल्या काय? राहू नको दे चहा, द्या तुमच्या लाडक्या सूनेला. हु.." रीना तनतन करत पदराला झटका देत तेथून निघून गेली.

"जाऊ द्या, सासूबाई. त्यांच हे नेहमीच आहे. जेव्हापासून त्या जाॅब करू लागल्यात ना. तेव्हापासून त्याचे पाय जमिनीवर नाहीत. सारखं माझा पान उतारा करत असतात." मीना पण मुसमुसत तिथून निघून गेली.

"देवा, काय करू मी आता. दोघीही किती जीवाभावाने अगदी एकमेकांना जावा असूनही बहिणीसारख्या राहायच्या. कोणाची दृष्ट लागली यांच्या नात्याला काय माहिती? " त्या चहाचा कप तसाच टेबलावर ठेवत हताश होत डोक्याला हात लावत बसत स्वतःशीच म्हणाल्या.

"काय झालं, सावू? अशी का बसली आहेस?" सकाळी लवकर उठून फिरायला गेलेले श्यामराव आलेले तिला कळलं नाही तेव्हा ते तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले.

ती दचकून त्यांच्याकडे पाहू लागल्या आणि म्हणाली, "तुऽऽ तुम्ही कधी आलात? थांबा, बसा. तुम्हाला चहा आणते." लगबगीने उठून गोंधळून व उदास होत बोलत होत्या. तिच्या मनात नक्कीच चालू हे त्यांच्या लक्षात यायला वेळ लागला नाही. ती उठून जाऊ लागली तसं त्यांनी तिचा हात धरून तिला डायनिंग टेबलजवळच्या खुर्चीवर बसवलं. त्यांचा हात हातात घेत ते म्हणाले,"सांग काय झालं, बरं? एवढा कशाचा विचार करत होतीस? बरेच दिवस झाले तुला पाहतोय, काय झालं सांगशीलस?"

"अहो, हल्ली पाहता ना तुम्ही, घरात काय चाललंय ते? रीना आणि मीना किती गुण्यागोविंदाने राहत होत्या. एकमेकींशिवाय त्यांच पान हालत नसायचे मग आता पाहा ना, दोघीही एकमेकांचं म्हणणं तर सोडा एकमेकांचे तोंड बघितली तरी तोंडसुख घेत असतात. कोणीही मागे हटायला जराही तयार नसतं. सांगा आता काय करायचे? " सावित्री डोळ्यात पाणी आणतं म्हणाली.

"बसं एवढंच ना, अगं त्याच काय एवढं टेन्शन घेतेस. होईल गं सगळं ठीक. एक काम करं, दोन फक्कड चहा करं मस्त अद्रक टाकून." ते हसत म्हणाले.

"काय हो, तुम्ही? मी काय बोलतेय आणि तुम्हाला चहाचं पडलयं." ती थोडी रागावल्यागत तोंड वाकडं करत म्हणाली.

"अगं, सावू, चहा तर उपाय आहे यावर, त्याचं काय आहे ना, चहा पिल्याशिवाय माझं डोकं चालत नाही.  म्हणालो ना मी सगळं ठीक होईल. जा बरं पटकन चहा घेऊन ये. नाही तर तू थांब. बस इथेच मीच करून आणतो फक्कड चहा. रोज तू करतेस ना, आज माझ्या हातचा चहा पी. बघ कसं रिलॅक्स होशील." ती उठत होती तर तिला बसवत ते हसत म्हणाले.

"अहो, काहीही काय? मी असताना तुम्ही का करणार. बरं नाही दिसत ते." ती थोडी लाजत म्हणाली.

"हाय, किती गोड लाजतेस गं तू! अगदी जूने दिवस आठवले मला आणि राहिलं चहा करण्याचं तर आधीपण करतं होतोच की. हा, आता सूना आल्या तर राणीसरकारची फरमाईश मागे राहिली." ते मुद्दाम त्यांच लक्ष विचलित करण्यासाठी म्हणाले.

क्रमशः

काय असेल रीना आणि मीना यांच्यात? श्यामराव काय उपाय काढतील?

©️ जयश्री शिंदे