Login

एकत्र कुटुंबपद्धती गरजेची भाग -३

Debate About Joint Family And Nuclear Family
एकत्र कुटुंबपद्धती गरजेची भाग -३
विषय - ( पहिला संघ )एकत्र कुटुंब -३
उपविषय - राज्यस्तरीय करंडक वादविवाद
टीम - अमरावती .


दुनियेत स्वार्थापुरती लोकं जुळतात,
स्वार्थ संपला की नातं संपतं….!
कुटुंबाचं मात्र तसं नसतं ,
कुटुंब आयुष्यभर सोबत असतं….!!


कुटुंब म्हणजे रणरणत्या उन्हात जणू
गार गार वारा असते . माणूस म्हटलं की कुटुंब
आलं . माणूस तिथे कुटुंब हे समिकरण अगदी पक्कं असते . फरक इतकाच की कुणाचं कुटुंब मातृसत्ताक कुटुंब असते तर कुणाचं पितृसत्ताक कुटुंब असते . सर्वश्रुत असलेले दोन कुटुंबाचे मुख्य प्रकार म्हणजे

१) एकत्र कुटुंब
२) विभक्त कुटुंब

कुटुंबात माणसाला सुरक्षित वाटतं . सूर्य मावळतीला गेला की, पाऊलं घराकडे ओढतात .
अतिशय सुरक्षित, सुखावह ठिकाण म्हणजे कुटुंब असतं . सायंकाळी कामावरून घरी येणाऱ्याची घरी वाट पाहणारी आपली जिव्हाळ्याची माणसं असतील तर दिवसभराचा थकवा निघून जातो .

" वसुधैव कुटुम्बकम् " भारतीय संसदेच्या प्रवेश कक्षासमोर हे वाक्य कोरलेलं आहे . वसुधा म्हणजे पृथ्वी , इव म्हणजे ही. कुटुम्बकम् म्हणजे कुटुंब . अर्थात संपूर्ण पृथ्वी ही एक कुटुंब आहे ह्या उदारवादी विचाराचे बोट धरून मार्गक्रमण करणारी आपली भारतीय संस्कृती आहे.

"एकत्र कुटुंब पद्धती " ह्याच विचारांची देण
आहे ..

एकत्र कुटुंब आणि विभक्त कुटुंब म्हणजे काय ? हे जाणून घेण्यासाठी मानवी समाज रचनेचा पाया असणारं कुटुंब म्हणजे काय प्रथम हे समजून घेवूया .

कुटुंब : " परस्परांशी नाती असलेला माणसांचा समूह म्हणजे कुटुंब ."

ही झाली मानवाने आपल्या सामाजिक गरजा भागविण्यासाठी अनेक सामाजिक संस्थांची निर्मीती केली त्यापैकी एका अतिशय महत्त्वपूर्ण सामाजिक संस्था म्हणजे कुटुंब संस्थेची म्हणजेच कुटुंबाची व्याख्या.
समाजरचनेचा पाया म्हणजे कुटुंब " कुटुंब " मजबूत असेल तर समाचरचना ढासळणार नाही. कुटुंब सशक्त तर समाज सशक्त राहिल. जीवनात आनंदाचा मळा फुलवायला हक्काची माणसं हवीत. तसचं मन रितं करायला आपली माणसं अवतीभोवती हवीत.ती एकत्र कुटुंबात सहज मिळतात. "माणसं जोडा जग जोडलं जाईल ", हा संदेश देत एकत्र कुटुंब व्यक्तीच्या व्यक्तीमत्वातील श्रीमंती वाढवतं.

एकत्र कुटुंब कशाला म्हणावं ?

एकत्र कुटुंब : " ज्या कुटुंबामधे एकाहून जास्त पिढ्या किंवा एकाच पिढीतील अनेक भावंडे एकाच घरात राहतात त्या कुटुंब प्रकाराला एकत्र कुटुंब म्हणतात. जन्म, विवाह व दत्तकविधानाद्वारा ही नाती जुळतात ."

त्याचप्रमाणे आपण विभक्त कुटुंब म्हणजे
काय ? बघूया….

विभक्त कुटुंब : " पती- पत्नी आणि त्यांची अविवाहित मुलगे आणि मुली एकाच घरात राहतात त्या कुटुंबाला विभक्त कुटुंब म्हणतात ."

एकंदरित काय तर आप्तसंबंधावर आधारित कुटुंबाचे हे मुख्य दोन प्रचलित प्रकार आहेत.

एकत्र कुटुंब की विभक्त कुटुंब ?हा नेहमीच वादविवादाचा विषय ठरतो.

समाजातील एक गट एकत्र कुटुंबाचे समर्थन करतो तर दुसरा एक गट विभक्त कुटुंबाचे समर्थन करतो . तसंच ईरा व्यासपिठावर हा विषय वादविवादासाठी देण्यात आलेला.
अमरावती संघ क्र-१ X नाशिक संघ क्र - २
यांच्यांत हा वादविवाद रंगतोय तर नाशिक संघाच्या लेख क्र-२ ला प्रतिउत्तर देण्याचा हा प्रयत्न चला तर मग सुरुवात करुया…..
नाशिक संघानी टाकलेल्या आठही मुद्यांना प्रतिउत्तर देवूया….

१) एकत्र कुटुंबामुळे घटस्फोटाचे प्रमाण
वाढले -

एकत्र कुटुंबाचा विरोध करण्यासाठी काही ठोस कारणं समर्थकांकडे नसल्या कारणानी अशी तकलादू कारणं सांगणं म्हणजे केवळ " विरोधासाठी विरोध " करणं.

सत्य तर हे आहे की आज विभक्त कुटुंबाचे प्रमाण वाढले आणि एकत्र कुटुंबाचे प्रमाण कमी झाले म्हणूनच घटस्फोटाची वाढती आकडेवारी विवाह संस्थेला मोडकळीस आणण्ययास कारणीभूत ठरत
आहे .पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती होती ...जसंजसे कुटुंब विभक्त होत गेले तसतसे घटस्फोटाचे प्रमाण वाढत गेले . हे वास्तव सर्वांनाच ठाऊक आहे.

वाढत्या घटस्फोटाचे आणखी बरेच कारणे आहेत
जसे की -

• कुटुंबापासून नोकरी वा व्यवसायाच्या निमीत्ताने दूर राहावे लागणे. नातेवाईक तर सोडाच तर नवरा बायकोतील संवाद खुंटत चाललाय. जिथे संवादच नाही तिथे नातं तरी कसं जीवंत राहिल ? विभक्त कुटुंबात इतर नातेवाईक मंडळी पण नसतात संवाद
साधायला. घरात इतर आप्त असतील तर एकटेपणा जाणवत नाही . मानसिकता बिघडत नाही. त्यामुळे वाद टळतो घटस्फोटापर्यत गोष्टच जात नाही.


• मोबाईल सुद्धा घटस्फोटास कारक ठरतोय. शेजारी-शेजारी बसले असतांना नवरा बायको एकमेकांशी न बोलता दुरच्या व्यक्तीशी चाटींग करत असतात. आलेल्या- केलेल्या मेसेजचे गैरअर्थ काढून पती पत्नीतील वाढलेले गैरसमज घटस्फोटाला कारणीभूत ठरतात.


• विवाहबाह्य संबंध हे सुद्धा वाढत्या घटस्फोटाचे एक कारण आहे.

वरिल कारणांवर चिंतन - मनन केले असता प्रत्येक कारणाच्या मुळाशी विभक्त कुटुंब पद्धतीच असल्याचं दिसून येतं. एकत्र कुटुंबात मोठ्यांचा धाक असतो . धाकामुळे वाकडे पाऊल टाकायला कुणी धजावत नाही.

खरं तर " विवाहपूर्व समुपदेशन " झालं तर व्यक्ती वैवाहीक जीवनात तडजोड करावी लागते हे जाणतं. विवाह म्हणजे केवळ मुला-मुलीचं लग्न नसून दोन कुटुंबाचं नातं असतं.प्रत्येक नातं टिकविण्यासाठी त्या नात्याला त्याग, समर्पण, संयम व जिव्हाळ्याचं खतपाणी दयावं लागतं. हे विचार एकत्र कुटुंबात नकळत वडिधाऱ्या मंडळीकडून मुलांमध्ये रुजविली जातात. ही घरातील जेष्ठ मंडळी एका तज्ञ समुपदेशकाची भूमिका पार पाडत अविवाहीत मुलामुलींना विवाहपूर्व समुपदेशन करत असतात.

घरात अनेक विवाहीत जोडपी असतात त्यांच्या वर्तनातूनही अनौपचारिकपणे मुलांवर स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे. एकमेकांसाठी जगणं. तडजोड करणं इत्यादी गोष्टी घरातील मूलं शिकत असतात त्यामुळे दुसऱ्यासाठी जगणं ही संकल्पना घेवून एकत्र कुटुंबातील मुलं वैवाहिक जीवनात प्रवेश करतात त्यात " मी " आडवा येत नाही ." मी " आडवा आला की वाद होणारच एकत्र कुटुंबात "मी" नव्हे 
"आम्ही "असतो .त्यामुळे एकत्र कुटुंब कधिही घटस्फोटाचे प्रमाण वाढण्यात कारणीभूत असूच शकत नाही.

नाशिक संघानी विभक्त कुटुंबाचे समर्थन करतांना सासू , ननंद त्रास देत होत्या म्हणून घटस्फोट झाल्याची उदाहरणे दिलीत . त्यावर मला सांगावसं वाटतं की ,मुळातच मनात अढी घेऊनच काही मुली सासरी आल्या असतात. त्यांना माहेर ते आपलं आणि चांगलं वाटतं. मग सासरच्या छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा मनाला लावून घेतात. आईने रागावले तर चालेल. सासूने रागावले तर कहर होतो. भावाची बोलणी ऐकतील तर जेठ, दीराचे बोलणे...अस्मितेचा प्रश्न होतो. नणंद जर काही उणीव दाखवेल तर मग मनातील तेढं विकराल रुप घेतं तेच बहीण दुषण देत काही म्हणेल तर ती "प्रेमाची थाप" समजून...हसून पुन्हा गळ्यात पडतील. एकंदरीत मनातील विचारांचे विकराल रुप आहे जे "विभक्त" कुटुंबाला प्राधान्य देतात. माहेरी आईवडीलांचा सांभाळ भावांनी करायलाच हवा. पण सासरी आपण एकत्र कुटुंबात राहीलो तर, आपले टॅलेंट उभारुन येणार नाहीत. मुलं वाया जातात वगैरे हास्यास्पद आहे.

विभक्त कुटुंबात विवाहपूर्व समुपदेशनाचा अभाव असतो . तडजोड करण्याची मानसिकता तयार केली जात नाही . ह्या बाबी घटस्फोटाचे प्रमाण वाढण्यास कारणीभूत असून एकत्र कुटुंब पद्धती घटस्फोटाला कारणीभूत नाही .

मुद्दा क्र-२ एकत्र कुटुंबात नात्यात एकमेकांना स्पेस दिला जात नाही :-

नाशिक संघाच्या ह्या मुद्द्याला खोडतांना अमरावती संघ सांगू इच्छीतो की, काळाच्या ओघात आपोआपच, एकत्र कुटुंब हे छोटं झालेलं आहे. आई वडील, दीर, नणंद. असलेच तर आजी आजोबांपैकी एखादं दुसरं..!
त्यातही जर "एकत्र कुटुंबाची" आपल्याला अडचण वाटत असेल...तर, मला वाटतं,"लग्नपद्धतीच" बंद करावी लागेल .पुढे चालून एखाद्या संस्थेकडे कार्यभार सोपवून...एखाद्या,"मेडीकलच्या डबड्यात" बीज पेरुन, मुला मुलींची उत्पत्ती होईल. आणि मग सगळेच.... विभक्त....कुणासाठी मग काहीच करणे नाही...कि, तुमचे "टॅलेंट" वाया जाणार नाही...."स्पेसच स्पेस" जियो मेरे लाल...येणारी पिढी अशा विचारसरणीची असेल. त्याही पुढे कुटुंब म्हणजे काय...हे ही समजावून सांगावे लागेल पुढील पिढीला…!

नाशिक संघाने या मुद्याला अनुसरून उदाहरण दिलं की , दिपाली व मदन दोघेही जॉब करतात तरी दिपालीला घरचं सर्व करून जावं लागतं. ती सून नव्हे मोलकरीन झाली . तिला कामाच्या व्यापामुळे स्पेस मिळत नाही . हेही हास्यापद आहे कारण एकत्र कुटुंबात श्रमविभागणी होते. होत नसेल श्रमविभागणी तर कमावती दिपाली कामवाली लावून स्वतः च्या पर्सनल लाईफसाठी वेळ काढू शकत नाही का?उगीच एकत्र कुटुंबात एकमेकांना स्पेस मिळत नाही ही ओरड चुकीची वाटते. कारण…

          " एकत्र कुटुंब असते
            एक सुगंधी गुलदस्ता,
          जिथे कुण्या एकाला खाव्या,
             लागत नाहीत खस्ता…"

मुद्दा क्र-३
आजकालचे आजी आजोबा मुले सांभाळण्यास असमर्थ आहेत :-

असे सांगून नाशिक संघ विभक्त कुटुंबाचे समर्थन करतोय . पटतं का मनाला ? कारण आजी आजोबांसाठी नातवंडे दुधावरची साय असतात. आजीआजोबा आजचे असो की कालचे असोत . अनुभवाची खाण, संस्कारपीठ असतात . तळहातावरील फोडाप्रमाणे नातवंडांना सांभाळत ते नक्कीच त्यांचावर संस्काराचं शिंपणही करतात .

        "आजी-आजोबा म्हणजे एक,
             संस्कारपीठ असते…
        अनुभवरूपी ज्ञानाची शिदोरी,
             त्यांच्या ठायी वसते…."

शारीरिक दृष्ट्या आजी-आजोबां नातवंडांचे संगोपन करण्यासाठी असमर्थ असले तरी मुलांना सांभाळणाऱ्या नोकर किंवा केअरटेकर वरती ते चांगल्या प्रकारे लक्ष ठेवू शकतात. त्यांचा अभ्यास घेणे किंवा इतर गोष्टी करण्यासाठी बसल्या जागेवरून मार्गदर्शन करणे, धार्मिक सांस्कृतिक गोष्टींची माहिती
देणे .आजी आजोबांपेक्षा हे उत्तम रीतीने कोणीच करू शकत नाही . कारण….

       " संस्कार वर्गात मिळणारे
      संस्कार कायम टिकत नसतात
      कारण ते कृतीतून नव्हे तर
        बोलण्यातून केलेले असतात ."

पाळणाघर किंवा डे केअर सेंटर किंवा संस्कार वर्गामध्ये जाणीवपूर्वक या गोष्टी केल्या जात नाहीत. त्यामुळे आजकालचे आजी आजोबा मुले सांभाळण्यास असमर्थ आहेत हे चुकीचे आहे.

मुद्दा क्र :-४
एकत्र कुटुंबात स्वावलंबन शिकल्या जात नाही :-

हा मुद्दा शंभर टक्के चूक आहे . व्यवहारी जीवनाचे खाचखळगे एकत्र कुटुंबात आपोआप आत्मसात केले जातात . श्रमविभागणी एकत्र कुटुंबाचे वैशिष्टये आहे त्यामुळे प्रत्येकजण आपआपल्या वाट्याला आलेले काम जबाबदारीने पार पाडत असते .विभक्त कुटुंब स्वावलंबन शिकवते पण बरेचदा त्याचे रूपांतर अहंकारात होत जाते मला कुणाची गरज नाही, माझा मी समर्थ आहे ह्या भावनेतून हेकेखोरपणा वाढतो. तडजोड करण्याची मानसिकता नसते .एकत्र कुटुंबात तडजोड असते .त्यातूनच खरे स्वावलंबन.... स्वतःसोबत दुसऱ्यांच्या मताचा आदर, सहकार्य, नम्रता....गुणवत्तापूर्ण आयुष्य..... ह्या सकारात्मक गुणांची पेरणी एकत्र कुटुंबातच होते . विभक्त कुटुंबात स्वावलंबनाला अहंकाराची कीड लागते.

मुद्दा क्र : - ५
एकत्र कुटुंबात आर्थिक नियोजन कोलमडते:-

खरं तर एकत्र कुटुंबपद्धती निर्मीती मागचा हेतूच हाच होता की, कुटुंब आर्थिकदृष्टया सक्षम व्हावं. कुटुंबाची अर्थव्यवस्था सुरळीत चालावी .पूर्वी शेती हा व्यवसाय होता .. आर्थिक नियोजनाचा ताळमेळ जुळावा यासाठी एकाहून जास्त पिढ्या एकत्र राहायच्या. शेतात मजूर लावण्याची गरज पडत नव्हती. सर्वांचा मदतीने शेतात विहीर खोदणे, लग्नसमारंभ पार पाडणे चालायचे त्यामुळे आर्थिक नियोजन न कोलमडता कुटुंबाची अर्थव्यवस्था सुरळीत चालायची.

एकत्र कुटुंब पद्धतीत खर्च वाटल्या जातो. दैनंदिन व्यवहाराच्या वस्तू ठोक व मोठ्या प्रमाणात खरेदी केल्यामुळे पैशाची बचत होते. अचानक उद्भवलेल्या आर्थिक संकटावर सगळे मिळून मात करतात. आजारपण बेरोजगारी सारख्या समस्या एकत्र कुटुंब पद्धतीत योग्य रीतीने हाताळल्या जातात. कोरोना काळात हा कित्येकांना चांगला अनुभव आला आहे. अवतीभोवती अनेक कुटुंबाचे उदाहरणे आहेत परंतु लेखाची शब्दसंख्या अतिहोईल म्हणून टाळते .

एकंदरीत एकत्र कुटुंब पद्धतीत आर्थिक नियोजन कोळमडते हे म्हणणे साफ चुकीचे आहे.

मुद्दा क्र :-६
एकत्र कुटुंबात एकमेकांना समजून घेत पुरेसा वेळ दिला जात नाही :-

वरिल विधान अविवेकानी केलेलं दिसतयं .एकमेकांना समजून घेण्यासाठी जीव्हाळा,ओलावा ,विश्वास लागतो त्यासाठी भरपूर वेळ देण्याची काही एक गरज
नसते .उलट क्वालिटी टाईम देणे गरजेचे असते. कितीही वेळ दिला आणि एकमेकांवर विश्वासच नसेल. मनात प्रेम नसेल तर एकमेकांना समजून घेणे कठीणच. नाही का ?

दिलेल्या वेळेत कुणी कुणाला पूर्णपणे समजून घेणं शक्य नसतं . त्यातून इगो दुखावतो ..वाद वाढतात, संवाद होत नाही.एकत्र कुटुंबात वडिलधाऱ्यांचा धाक असतो, आदर असतो त्यामुळे दोघांत टोकाचे वाद होत नाहीत, एकेकांना समजून घेण्याची भावना एकत्र कुटुंबातच वाढते.

        " एकत्र कुटुंबातील प्रत्येक नातं
         आपलं सुरक्षा कवच असतं….
      आयुष्यात कोणतेही संकट येवो
        पाठीशी भक्कपणे उभं राहतं.."

मुद्दा क्र :- ७
एकत्र कुटुंबात जुन्या चालीरितींना झुगारून आधुनिकतेकडे वाटचाल करता येत नाही :-

एकत्र कुटुंबावर केलेला हा आरोपच म्हणावा . माझी एक मैत्रीण एकत्र कुटुंबात राहते . कोणताही सणवार असो, तिला कसली चिंता वा धावपळ नसते . घरातील इतर स्रिया सण सभारंभाची तयारी करतात ती वेळेवर येवून पुजेत , सणसमारंभात सहभागी होते .
विभक्त कुटुंबात नोकरदार स्त्री सणवारांसाठी वेळ देवू शकत नाही त्यामुळे विभक्त कुटुंबातील मुलांना आपली संस्कृती कळत नाही .आपल्या संस्कृतीला आधुनिकतेचा टच देवून. आधुनिकता व चांगल्या जुन्या चालीरीतींची सांगड घालून आधुनिकतेसोबत संस्कृती संवर्धनही एकत्र कुटुंबात होते. संस्कृतीने एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाचक रुढी सोडून चांगल्या चालीरितींचे वहन एकत्र कुटुंबच करू शकते .

नक्कीच जुन्या ज्या "जाचक" रुढी असतील त्याला "बाद" करुन नवीन रुढींचे स्वागत तर वाडवडीलही करतील. कारण तुम्हाला एवढे बोलण्याची हिंमत, विचारकरण्याची शक्ती, ही वाडवडीलांच्या प्रोत्साहनानेच मिळाली आहे. हाताची पाचही बोटे जसे एकसारखे नसतात. त्यांचे कार्यही वेगवेगळे असतात. तसेच "एकत्र कुटुंबा" मध्ये असतं. कडू गोड आंबट खारट, तुरट माफक प्रमाणात जो पर्यंत पदार्थात मिसळत नाही. तोपर्यंत तो पदार्थ...चवदार बनत नाही.
"गोपालकाला" आवडतो नां आपल्याला…!
तसे एकत्र कुटुंब म्हणजे एक गोपालकालाच असते . नव्या जुन्याची सांगड तिथे घालणं कठिण नसते .

मुद्दा क्र:- ८
एकत्र कुटुंबात घरामध्ये विविध आधुनिक प्रयोग करता येत नाहीत :-

खरं तर नाशिक संघाच्या ह्याही मुद्दयाचे उत्तर मुद्दा
क्र .८ मध्ये दिल्या गेलेले आहे तरी नाशिक संघाचं हे म्हणणं नक्कीच चुकीचं आहे की,आजही एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये मसाला वाटायला पाटा वरवंटा मोठ्या प्रमाणात वापरतात . वापरतही असतील म्हणून त्यांच्याकडे आजच्या काळात मिक्सर ग्राईंडर नसेल असे असू शकत नाही . ग्रामिण भागांतही आज मिक्सर, कुकर, गॅस एकत्र कुटुंबात वापरल्या जात नाही ह्यावर कुणाचाही विश्वास बसणार नाही. अपवाद प्रत्येक बाबींना असतात एखाद्या एकत्र कुटुंबात जुन्या पिढीतील एखादं सदस्य असेलही पाटा वरंवंटा सोयीचं वाटणारं. एखादया विभक्त कुटुंबातही कुणी आवडीनी अपवादात्मक पाटावरवंटा वापरत असेल . पाटा वरवंटा आपल्या संस्कृतीचा भाग आहे.लग्नकार्यात आजही त्याचा विधीमध्ये मान
आहे .पाचवीलाही त्याचा मान आहे. तो प्रत्येक कुटुंबात असतोच ठेवणीत. म्हणून याचा अर्थ असा होत नाही की एकत्र कुटुंबात विविध आधुनिक प्रयोग करता येत नाहीत.

जुन्यांना सोबत घेऊन समजावून आपण त्यांना सुद्धा प्रवाहात घेऊ शकतो. हा विभक्त रहाणार्‍यांचा गैरसमज आहे,"जुने लोक बदलत नाहीत." प्रयत्न करा, द्या पटवून त्यांना...शेवटी ते तुमचेच जवळचे आहेत. सोबत घेऊन चालणे आलेच…!

( लग्न ठरवायला किंवा आपला मनपसंत जोडीदार निवडायला मदत करणाऱ्या " शादी डॉट कॉम " वेबसाईटने एक वेगळाच निष्कर्ष समोर आणला
आहे . त्यांच्या मते या साइटवर मनपसंत जोडीदार निवडण्यासाठी येणाऱ्या ५४ टक्के मुला - मुलींनी एकत्र कुटुंबात राहणाऱ्या जोडीदाराला पसंती दर्शवली आहे .यात मुलींची संख्या लक्षणीय आहे .कारण काहीही असो पण एकीकडे विभक्त कुटुंबात जन्मलेल्या आणि नात्यांना मुकलेल्या मुला मुलींना आता माणसं हवीशी वाटत आहेत . लहानपणापासून घरात एकटेच वाढलेले किंवा विभक्त कुटुंबात वाढलेले मुलं - मुली आपल्या संसाराचा जेव्हा विचार करू लागली आहेत तेव्हा त्यांना एकत्र कुटुंब असावं असं वाटत आहे . म्हणजे भारतीय संस्कृतीचा जो पाया आहे तो अजूनही भक्कम आहे असं म्हणायला हरकत नाही . गुगल वरून कंसातील भाग साभार . )

एकंदरीत काय तर एकत्र कुटुंब पद्धती ही आपल्या भारतीय संस्कृतीचा पाया आहे . ती माणसे जोडणारी आहे "विश्वची माझे घर " संत ज्ञानेश्वरांच्या विचारांनुसार वाटचाल करणारी आहे . माणूस हा समाजशील प्राणी आहे . तो एकटा राहूच शकत
नाही .

एकत्र कुटुंबात राहण्याचे फायदे तोटे बघणंच चुकीचे आहे . खरं तर फायदा तोटा व्यवहारात असतो नात्यात नाही . नात्यात असावा केवळ विश्वास आणि एकत्र बांधून ठेवणारा प्रेमाचा धागा . मग एकत्र कुटुंबापासून विभक्त होण्याचा विचारच कुणाच्या डोक्याला शिवणार नाही.

राज्यस्तरिय करंडक स्पर्धेत भाग घेणारे प्रत्येक जिल्हयाचे संघ एकत्र कुटुंबाच्या वैशिष्ट्यांप्रमाणे काम करत आहेत . कामाची वाटणी, कामात एक शिस्त, सुसुत्रता, कुटुंबाचा कर्ता असतो तसाच एक टीमचा कप्तान इथे आहे . टीमचा कप्तान सर्वांच्या मताचा आदर करून स्पर्धेतील फेऱ्या पूर्ण करतोय. आजचा हा लेख सुद्धा टीममधील सर्व सदस्यांच्या विचाराचा सार आहे. त्यामुळे या लेखाची विश्वसनियता जास्त वाढली हे निश्चित .सांगायचा मुद्दा हाच की, संघ कार्यासाठी गरजेचे असणारे गुण एकत्र कुटुंबाच्या संरचनेत दिसून येतात.


टिम अमरावती एकत्र कुटुंबाचे समर्थन करते कारण,

कोणतेही समाजजीवन व सामाजिक संरचना सतत चालू राहण्याच्या दृष्टीने जी कार्ये अटळ, अत्यावश्यक असतात ती विशेषतः एकत्र कुटुंबाकडूनच केल्या जातात.

एकत्र कुटुंबात बालकांचा सर्वांगीण विकास होतो असं बालमानसशास्त्र सांगतं . कार्पोरेट कल्चर सांगतं की एकत्र कुटुंबात बालकांच्या अंगी निर्णय क्षमता वाढीस लागते . प्रेम, आपुलकी, त्याग, संयम, सहकार्य हे भावबंध एकत्र कुटुंबातून निर्माण होवून व्यापकपणे समाज जीवनातही पाझरत जावून संस्कृतीचे वाहक बनतात .पर्यायाने एकत्र कुटुंब पद्धती ही व्यक्तीविकास तसेच देशविकासास पूरक ठरते . जिथे उद्याचा सक्षम, जबाबदार, संस्कारी नागरिक निर्माण होते.

सोलापूर जिल्हयातील माढा तालुक्यातील
रिघोऱ्याचे कोंडिबा गायकवाड यांच्यापासून १५० वर्षापासून सुरु झालेलं ४७ जणांचे एकत्र कुटुंब आजही गुण्यागोविंदाने नांदत आहे. ही बातमी ABP माझ्याने दाखवली तेव्हाही प्रकर्षाने जाणवलं की, माणसं हीच खरी संपत्ती आहे.

            एकत्र कुटुंब म्हणजे,
     जीवनातील चौथा ऋतू जिव्हाळा ,
     जाणवत नाही जिथे रणरणता उन्हाळा..


प्रिय वाचक स्नेहींनो ,
लेख आवडल्यास लाईक करा तुम्हाला विभक्त कुटुंब आवडते की एकत्र कमेन्ट करून तुमचे विचार
 कळवा .न आवडल्यास माफ करा.

धन्यवाद !
©® ऍड. नीता प्रफुल्ल कचवे .
टिम - अमरावती .