चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
एकमेकांना समजून घ्या ना _ भाग १
आज शुभ्रधवल "बिल्वदल" बंगल्यात खूपच लगबग दिसत होती. बंगल्याची मालकीण शुभ्रा इथून तिथून तोऱ्यात फिरत होती. तिच्या गौर वर्णावर गुलबक्षी रंगाची पैठणी खुलून दिसत होती. मुळातच देखणी असलेल्या शुभ्रावर आज एक आगळंच तेज चमकत होतं. शुभ्रा बँकेत नोकरीला होती आणि शुभमचा स्वतःचा सीए चा व्यवसाय होता. तिचे आणि शुभमचे कधीपासूनचं एक स्वप्न होतं की शहरापासून जवळच असलेल्या गावात एक छोटासा टुमदार शुभ्र बंगला असावा. आज ते स्वप्नं अखेर सत्यात उतरलं होतं. शुभ्रा आणि शुभमच्या बंगल्याची वास्तुशांती होती. सर्व अगदी जवळचे नातेवाईक आले होते.
शुभ्राच्या माहेरची फॅमिली खूप मोठी होती. आई वडील देवाघरी जाऊन काही वर्ष झाली होती. त्या एकूण चार बहिणी आणि एकुलता एक भाऊ. शुभ्रा सगळ्यात लहान त्यामुळे तिच्या मोठ्या बहिणींची कुटुंब विस्तारली होती. त्यांना नातवंड सुद्धा झाली होती. तिच्या दोन बहिणी मधुरा आणि लीना दोघी आदल्या दिवसापासून तिच्या मदतीसाठी आल्या होत्या. तिचे कुटुंबीय, शुभमचे कुटुंबीय असे सर्व एकेक करून येत होते. तिने जास्त कोणाला आमंत्रण दिलं नव्हतं मोजकेच नातेवाईक जमले होते. आता फक्त सुलूताई आणि भाऊजी यायची ती वाट बघत होती. इतक्यात तिने पाहिलं बंगल्यासमोर रिक्षातून एकटी सुलुताईच उतरत आहे. शुभ्राने तिच्या लेकाला सुलुताईच्या हातातलं सामान घ्यायला पाठवलं. खरंतर सुलूताईला एकटीला बघून तिचं मन खट्टू झालं होतं. शुभ्रा सगळ्यात लहान असल्यामुळे भाऊजींची खूप लाडकी होती. भाऊजी येतीलच ह्याची तिला खात्री होती. सुलूताई बंगल्याच्या पायऱ्या चढल्याबरोबर शुभ्राने तिच्यावर प्रश्नांचा भडीमार केला.
"हे काय सुलुताई तू एकटीच आलीस पूजेला! भाऊजी नाही आले का? आज मी आणि शुभमने एकत्र पाहिलेलं एक स्वप्न खूप वर्षांनी पूर्ण झालं आहे. आमच्या आनंदात त्यांनी सामील व्हायला नको का? थांब मी भाऊजींना फोन करते येतीलच ते."
"अगं नाही शुभ्रा ते नाही येणार. हल्ली ते जास्त कुठे जातच नाहीत. तब्येत नरमगरम असते ना."
"सुलुताई हे बरं आहे तुझं. आम्ही आपले सगळीकडे अगदी सकाळपासून असतो. आम्हाला पण त्रास होतच असतो ना."
"तुला माहितीये ना आता त्यांचं वय झालंय. त्यांना ऐकायला पण कमी येतं. चारचौघात हसं होतं म्हणून ते सहसा कुठे जात नाहीत."
"दादाकडे बरे सगळ्या कार्यक्रमाला जात असतात. तिथे पण बाहेरचे लोक असतातच. बरोबर आहे त्याच्याकडे खूप पैसा आहे ना."
"असं काहीच नाहीये शुभ्रा. तो ऐकतच नाही म्हणतो मी घ्यायला येतो. त्यामुळे त्यांचा नाईलाज होतो."
"एक तर तू एकटीच आलीस आणि ते पण किती उशिरा आलीस मी तुला आदल्या दिवशीच बोलवलं होतं. ट्रेन रिक्षा करत कशाला आलीस एखादं वाहन करून दोघांनी एकत्र यायचं ना."
"शुभ्रा बरोबर आहे तुझं. आता ते आले नाही तर तू पूर्ण कार्यक्रम नाराज राहणार आहेस का? "
खरं तर सुलुताईचे पती सुरेश न येण्याचं खरं कारण काही वेगळंच होतं आणि सुलु कार्यक्रम झाल्याशिवाय ते कोणाला सांगणारच नव्हती.
(सुरेश म्हणजेच शुभ्राचे भाऊजी न येण्याचं खरं कारण काय असेल पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा