चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५
एकमेकांना समजून घ्या ना _भाग २
भाऊजी न आल्यामुळे शुभ्रा शुभमजवळ तक्रार करत होती,
"काय म्हणे त्यांना ऐकायला येत नाही. मशीन तर लावतात ना आणि इथे कोण परके होते? सगळी आपली लोकच होती ना, भाऊजीनी यायला हवं होतं. दगदग सहन होत नाही तर आपल्याकडे एक रात्र राहिले असते ना."
"अगं शुभ्रा आता नाही आले ना भाऊजी.
सुलुताईच आता सत्तरच्या पुढे गेली. भाऊजी तिच्यापेक्षा अजून मोठे. त्यांना थकल्यासारखं वाटत असेल म्हणून नसतील आले ते."
सुलुताईच आता सत्तरच्या पुढे गेली. भाऊजी तिच्यापेक्षा अजून मोठे. त्यांना थकल्यासारखं वाटत असेल म्हणून नसतील आले ते."
शुभ्रा आणि सुलुताई मध्ये जवळजवळ सोळा वर्षांचे अंतर होतं. सुलुताईच्या लग्नात ती शाळेत होती. ताईचं लग्न झालं तेव्हापासून ती अनेक वेळा तिच्याकडे राहायला जायची त्यावेळी भाऊजी तिचे खूप लाड करायचे. भाऊजी म्हणजे तिच्यासाठी एक आदर्श होते. जीवनात प्रगती कशी करायची ते त्यांनीच तिला समजावून सांगितलं होतं. कॉलेजमध्ये प्रवेश घ्यायची वेळ आली तेव्हा त्यांनीच तिला तू कॉमर्सला जा असा सल्ला दिला होता म्हणजे नोकरी मिळणे सोपे जाईल. थोडक्यात भाऊजी तिला खूपच प्रिय होते. पूजा सुरू झाली आणि ती संपेपर्यंत तेवढा वेळच शुभ्रा शांत होती. बाकी तिची धुसफूस चालूच होती. तिची बहीण, मावशी कोणीही समोर आली तरी ती पुन्हापुन्हा तेच बोलत होती.
खरंतर एरवी सुलूताईच्या चेहऱ्यावरची काळजी तिच्या पटकन नजरेत आली असती. पण आज तिने ताईचा चेहरा वाचलाच नाही. सुलुताई सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखी होती. ती थोड्या थोड्या वेळाने दुसऱ्या खोलीत जाऊन भाऊजींची चौकशी करत होती हे शुभ्राची मोठी बहीण लीनाच्या लक्षात आलं. तिने तिला विश्वासात घेऊन विचारलं,
"काय झालं ताई तुझा चेहरा एवढा गंभीर का? भाऊजीना बरं नाही का?" ताईचे डोळे पाणावले. लीनाने ताईचा हात हातात घेतला आणि तिला खरं काय ते सांगायची विनंती केली. रडवेल्या आवाजातच सुलुताई तिला म्हणाली,
"काय सांगू लीना तुला? अगं ह्यांना सुद्धा शुभ्राच्या बंगल्याच्या वास्तुशांतीला यायचं होतं. ते सकाळी उठल्यापासून माझ्या मागे लागले होते लवकर आवर उशीर नको करू. पूजेला बसण्याआधी आपला आशीर्वाद घेण्यासाठी दोघेही थांबतील."
"हो पण मग असं कायं झालं की ते आले नाहीत?
"अगं ते आंघोळ करून बाथरूम मधून बाहेर येत होते आणि त्यांचा पाय घसरला. मी आधार देऊन त्यांना उठवून बसवलं. कुठे लागले का ते बघितलं. तसं गंभीर काहीच नाही. पण चालताना जरा लंगडतात. पायाला सूज नाही याची मी खात्री करून घेतली. मी त्यांना म्हटलं आपण नको जाऊ या. एक तर सुधीर आणि सुषमा पण बाहेर गेले आहेत. त्यांना एकट्यांना ठेवून यायला माझं मन तयार होईना. त्यांनीच मला धीर दिला."
"नाही सुलू आपण नाही गेलो तर शुभ्राला खूप वाईट वाटेल. मी घरी आराम करतो तू एकटी जा. आता लवकर निघ. मी बरा आहे. उगाचच लंगडत चाललो की कार्यक्रमात सगळे माझीच विचारपूस करत बसतील. रंगाचा बेरंग व्हायला नको. तू कार्यक्रम झाल्यावर शुभ्राला सांग. म्हणजे ती रागावणार नाही."
"अगं पण मग तू हे आधीच सांगायचं ना शुभ्राला. ती तुला एवढं सगळं बोलली नसती."
"जाऊदे आता सर्वांसमोर बोलून तर झालं. एवढ्या उशिरा आले म्हणजे काहीतरी कारण असणार हे तिने समजून घ्यायला हवं होतं ना."
"जाऊदे तू वाईट वाटून घेऊ नको. पूजा झाली की मी बोलेन तिच्याशी."
(शुभ्रा वागली, बोलली ते योग्य नाही हे तिला कळेल का पाहूया पुढील भागात)
क्रमशः
©️®️ सीमा गंगाधरे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा