Login

एकमेकांना समजून घ्या ना _ भाग ३ (अंतिम)

नात्यांमध्ये एकमेकांना समजून घेणं खूप गरजेचं असतं

चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५

एकमेकांना समजून घ्या ना : भाग ३(अंतिम)


वास्तुशांती निर्विघ्नपणे पार पडली आणि शुभ्राने हुश्श केलं. तिने उठून पाय मोकळे केले. पूजेला बसल्यानंतर आलेल्या मोठ्या माणसांच्या उभयता पाया पडले. सर्वांनी शुभ्रा आणि शुभमने खूप सुरेख बंगला बांधला म्हणून त्यांचं तोंड भरून कौतुक केलं. बराच उशीर झाला होता म्हणून लगेच जेवणाची पानं घेतली. जेवण खूप छान आणि स्वादिष्ट होतं. काही पदार्थ घरी तर काही बाहेरून मागवले होते.

जेवणं झाल्यावर बरेचसे लोक निघून गेले. सुलुताई शुभ्राच्या जवळ येऊन म्हणाली,

"छान झाला कार्यक्रम. मी पण निघते आता. एकटीच जाणार. उशीर नको व्हायला." शुभ्राचं लक्ष सुलुताईच्या चेहऱ्याकडे गेले. तिला वाटलं आपण बोलल्यामुळे ताईचा चेहरा असा दिसतोय. तरीही तिने विचारले,

"ताई तुझा चेहरा असा का दिसतोय? तुला बरं वाटत नाही का? " तिला मध्येच थांबवत लीना म्हणाली,

"तुझं लक्ष आता सुलूताईच्या चेहऱ्याकडे गेलं का? आल्या आल्या तिला वाटेल तसे बोललीस. ती एकटीच आली त्याचं कारण तरी विचारायचं?"

"कायं झालं ताई?"

"अगं तुझा कार्यक्रम सुरळीत पार पडावा, रंगाचा बेरंग होऊ नये म्हणून मी तुला आधी काही बोलले नाही. सकाळपासून आमची घाई चालली होती लवकरात लवकर आवरुया, उशीर व्हायला नको त्या गडबडीत बाथरूम मधून आंघोळ करून येताना हे पाय घसरून पडले. जास्त काही लागलं नाही पण पायाने थोडं लंगडायला होतंय."

"अगं तू मला आधी तरी बोलायचं. माझ्या मनात कधीपासून तेच येत होतं मी भाऊजींची इतकी लाडकी आहे की भाऊजी यायचे राहिलेच नसते."

"एव्हढं कळतं ना तुला मग बोलताना भान ठेवायचं. तुला माहितीये का कितीतरी वेळा सुलुताई दुसऱ्या खोलीत जाऊन भाऊजींना फोन करून त्यांची चौकशी करत होती."

"ताई मला माफ कर खरंच मला काहीच माहित नव्हतं गं."

"शुभ्रा हे बघ तू माझ्यापेक्षा खूप लहान आहेस. एकच लक्षात ठेव की आपण सगळे एका जिव्हाळ्याने बांधले गेलो आहोत. आपल्या सर्वांचे एकमेकांशी नातं एवढं स्वार्थी कधीच नाहीये गं. आपल्या आजूबाजूला आपण बघतो की भावा बहिणींची तोंडे वेगवेगळ्या दिशेला असतात. काही ना काही कारणावरून त्यांच्यात दुरावा निर्माण झालेला असतो. आपण सगळेच एकमेकांना किती धरून आहोत ही खरंतर अभिमानाची गोष्ट आहे."

"ताई सकाळी मी माझ्याच आनंदात धुंद होते. तुला नाही नाही ते बोलले."

"तुला माहित आहे रमेश आणि हे साधारण एकाच
वयाचे आहेत. आपल्या घरातील कोणाचीही अडचण, संकट यावर ते दोघं मिळून
सल्लामसलत करून तोडगा काढतात. त्या दोघांमुळे आई-बाबांनंतर आपण अजूनही एकमेकांशी तितक्याच आत्मीयतेने जोडले गेलो आहोत. त्याच्याकडे पैसा आहे म्हणून हे कधीच त्याच्याकडे गेले नाहीत. उलट सर्वांपेक्षा जास्त प्रेम, लाड त्यांनी तुझे केले आहेत. तुला आम्ही नेहमी लेकीप्रमाणे वागवलं."

"हो गं ताई मी तुला उद्धटपणे बोलून खूपच दुखावलं. माझ्या मनात असा विचार यायलाच नको होता."

"शुभ्रा दुसरं म्हणजे आता आम्हा सर्वांचं वय झालं आहे. तू त्या मानाने अजून तरुण आणि चपळ आहेस. मनात किती जरी उत्साह असला तरी पूर्वीसारखं पटकन उठून कुठे निघता येत नाही. ट्रेन आणि बसची गर्दी तर आता नकोच वाटते. खाजगी वाहनांनी यायचं तरी रस्त्यावर खूपच ट्रॅफिक असतं. वयानुसार थोडीफार दुखणी चालूच असतात. हे आता ऐशीच्या घरात आहेत." शुभ्रा ताईच्या कुशीत शिरली आणि तिला रडू येऊ लागलं. सुलुताईने तिच्या पाठीवर हात फिरवत म्हटलं,

"आता यापुढे आम्हाला समजून घेत जा. आपण सगळ्यांनीच एकमेकांना समजून घ्यायला हवं. आता वयानुसार मन सुद्धा हळवं होत चाललय गं. कोणी काही बोललं की लगेच वाईट वाटतं."

"ताई थांब तू आता एकटी नको जाऊस मी आणि शुभम तुला गाडीने सोडायला येतो आणि भाऊजींना पण भेटतो. त्यांचा आशीर्वाद घेतल्याशिवाय मला चैन नाही पडणार." शुभ्राचं मन आता निरभ्र आकाशासारखं स्वच्छ झालं होतं. आता त्यांच्यापैकी कोणाच्याच मनात गैरसमजाचं सावट निर्माण होणार नव्हतं. ही मनामनांची नाती आता अशीच बहरत राहणार होती.