कौटुंबिक कथा
शीर्षक:- एकता
भाग:- ३ (अंतिम)
"त्यांच वागणं या चार महिन्यात बदलत गेलं असे आपल्या सर्वांना वाटतंय, म्हणजे या दरम्यानच त्या दोघांना कोणी नवीन भेटलं का? कारण त्यामुळे बदल स्वाभाविक आहे." सारंग विचार करत म्हणाला.
"कांता, आपल्याकडे काम करायला आली तेव्हापासून हे घडत आलाय अस मला वाटतं, कारण खूप वेळा ती त्या दोघांच्या रूममध्ये जाऊन आली की मग या दोघीत वाजलंच हे पाहिलं आहे मी." सावित्री कांताचं वागणं व बोलणं आठवत म्हणाली.
"म्हणजे आई याचा अर्थ असा की या दोघींच्या वादाचं मुळं ती कांता आहे असं तुला म्हणायचं आहे का? " शरद म्हणाला.
"एक काम करूया, त्या दोघींना विचारू या की, त्या दोघीबद्दलच्या गोष्टी त्यांना कोण देत होतं? शरद तू रीनाला व सारंग तू मीनाला बोलावं आणि धनू तू कांताला फोन लावून लगेच ये म्हणून बोलवून घे. ती आली तरी आमचं बोलणं होईपर्यंत तिला आत येऊ देऊ नकोस." श्यामराव आधी शरदला व नंतर सारंगला म्हणाले व धनंजयला सूचना देत म्हणाले.
शरद व सारंग श्यामरावाच्या म्हणण्यानुसार रीना व मीना यांना रूममध्ये बोलावून आणले.
श्यामराव त्या दोघीकडे बघत म्हणाले, "मोठ्या व धाकल्या सूनबाई, आम्हांला असं कळलं की तुम्हा दोघींत आजकाल फारच वाद होत आहेत. खरं आहे का ते?"
"नाही, मामांजी. मी तर दिवसभर घरात नसते, ऑफिसमध्ये असते. तर ही म्हणते कि मी तिथे काय फक्त कँम्प्युटरची बटन दाबून येते, घरी आल्यावर हिच्यावर रूबाब दाखवत चहा करायला सांगते. म्हणजे मी काय तिथे तेवढंच काम करते का? येताना मंडई घेऊन येते, लाईटबील, केबलबील मीच भरते ना. मला जमेल तसं मी घरात मदत करतेच की. ही म्हणते की मी फक्त बसून असते घरी असले की." रीना मीनाकडे बघत तोंड मुरडत म्हणाली.
"नाही, मामांजी मी असे काही म्हणाले नाही, उलट याच मला म्हणतात की मी फक्त घरी बसून असते, घरातल्या कामाकडे माझं लक्ष नसतं, सतत मोबाईलवर रिल्स बघत असते, नाहीतर वाचत लिहित बसते. पण मी घरातलं सगळं काम व्यवस्थित करते, सर्वांच्या आवडी निवडी जपते, लवकर उठून चहा, नाष्टा व सर्वांचे डबे बनवून देते, बँकेचे व्यवहार व्यवस्थित पार पाडते. सासूबाई व तुम्हाला दवाखान्यात कोणत्या तारखेला जायचे यांची आठवण या तिघापैंकी एकाला करून देते. हा, उरलेल्या वेळी माझं आवडं जोपासते, लिहिणं वाचणं. मग यात गैर काय सांगा बरं, तर या म्हणतात की मी रिकाम टेकडी आहे." मीना गाल फुगवत म्हणाली.
"नाही तर मी कधी म्हणाले असे, तू का खोटे बोलतेस, मीना?" रीना मीनाच्या समोर येत म्हणाली.
"एक मिनिट थांबा तुम्ही दोघीही. तुम्ही दोघी हे समोरासमोर बोलले का?" श्यामराव दोघींकडे बघत म्हणाले.
दोघीही नाही मध्ये माना हालवल्या.
"मग कशावरून तुम्ही हे एकमेकांविषयी बोलत आहात?" श्यामराव प्रश्नार्थक नजरेने पाहत म्हणाले.
"ते आम्हाला कांताने सांगितले." दोघी एकदमच म्हणाल्या व चमकून एकमेकांकडे पाहू लागल्या.
"अरे, देवा! म्हणजे माझा संशय खरा होता. त्या कांताने तुम्हां दोघींमध्ये गैरसमज निर्माण केला आणि तुम्ही दोघी मुर्ख तिच्या बोलण्यात येऊन एकमेकांशी असे मांजरासारखे भांडत होतात. त्या भांडणाला ना आड ना बूड आहे." सावित्री त्या दोघींना पाहत म्हणाल्या.
तेवढ्यात दारावरची बेल वाजली. धनंजयने दार उघडले, कांता दारात उभी होती. तिला त्याने आत येण्याचा इशारा केला.
रीना तिला बघताच म्हणाली, "कांता तूच म्हणालीस ना की मीना तुझ्याशी माझ्या विषयी बोलायची ना तुला? "
आता मीनाही कांताचा दंड पकडत म्हणाली,"कांता, तुच मला म्हणाली होतीस ना की रीनाताई, माझ्याविषयी तुझ्याजवळ बोलली. खरं खरं सांग."
"कांता, खरं सांग. नाही तर मी तुला पोलिसांच्या ताब्यात देईन. त्या दिवशी तुला धनूच्या खिशातून पैसे काढताना पाहिले होते; पण मी आले की ते पैसे खाली पाडलेस व मला म्हणालीस की पैसे खाली पडले होते. दरडावून विचारल्यावर चूक झाली माफ करा म्हणालीस म्हणून तुला सोडले पण आता आमच्या सुखी संसारात कलह निर्माण करण्याचा प्रयत्न केलास तू. तेव्हा बऱ्या बोलाने सांग." श्यामराव कांताला दाब देत म्हणाले.
"माफ करा, साहेब. मला तुमचा राग होता आणि त्याचबरोबर ह्या दोघी इतकं प्रेमाने राहत होत्या की मला बघवलं नाही. या अख्ख्या पंचक्रोशीत तुमच्या कुटुंबाचे गोडवे गायले जातात. म्हणून मग मीच यात दोघींचे एकमेकांविषयी कान भरले आणि बाहेरही घरातले वाद सांगत होते. माफ करा मला." कांता खाली मान करून हात जोडत म्हणाली.
रीना व मीना एकमेकांकडे बघून हसू लागल्या.
"मामांजी, सासूबाई माफ करा आम्हांला आणि धनूभावजी तुमचीपण माफी मागतो. खरं तर आम्हाला माहिती होतं हा सगळं. आम्ही मुद्दामून भांडत होतो. तिला कळण्यासाठी तिच्यासमोर. कारण ती घरात जरी नसली तरी तिचे कान आपल्याच घराकडे असायचे. ते म्हणतात ना भिंतीलापण कान असतात. अखेर आज खरं बाहेर आलं. चल कांता इथून बाहेर पड. आमच्यात जसं फुट पाडण्याचा प्रयत्न केलास तसे करू नकोसं. कारण आमची एकी होती ती कायम राहणार. गैरसमजाने किंवा कोणाच्या कान फुंकण्याने आमची एकता तुटणार नाही." रीना मीनाला हसत कवेत घेत म्हणाली.
नंतर त्या दोघींनी मिळून कांताला घराबाहेरचा रस्ता दाखवला.
समाप्त:-
नात्यांत एकता व अतूट विश्वास असला की नाते कोणत्याही गैरसमजाने तुटत नसते.
©️ जयश्री शिंदे
अष्टपैलू लेखन स्पर्धा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा