Login

एकता (भाग-२)

गैरसमज निर्माण झाले तरी एकता टिकून राहते हे सांगणारी कथा

कौटुंबिक कथा

शीर्षक:- एकता

भाग- २

श्यामराव चहा करून घेऊन आले. ते दोघे गप्पा मारत चहा पित होते तोच ऑफिस टूरसाठी गेलेला मोठा मुलगा शरद आला.

"अरे, वा! आईबाबा आज दोघे सोबत मस्त गप्पा मारत चहाचा आस्वाद घेत आहात. तेही मला सोडून. धिस इज नॉट फेअर हं, बाबा?" तो त्या दोघांची मस्करी करत हसत म्हणाला.

ते काही बोलणार तेवढ्यात मधला मुलगा सारंग वरच्या रूममधून जीना उतरत हसत म्हणाला, "ओय, दादा, तू का मीपण रांगेत आहे म्हंटलं."

"अरे,दादा, भाई, मी पण आहे हं." धनंजय गडबडीने येत तिथल्या खुर्चीवर बसत म्हणाला.

श्यामरावाने तिघांकडे एक नजर पाहत म्हणाले, "बरं झालं तुम्ही तिघे एकत्र आलात. तुम्हा सगळ्यांबरोबर थोडं बोलायचं होतं."

"काय झालं बाबा? काही सिरियस आहे का?" शरद त्यांच्याकडे पाहत म्हणाला. सावित्रीचा चेहरा उतरला होता. हे त्याच्या नजरेतून सुटलं नाही.

"म्हटलं तर आहे, म्हटलं तर नाही. आज काल  घरात काय चाललंय याकडे तुमचं लक्ष कितपत माहिती आहे कि नाही. " श्यामराव त्या तिघांकडे बघत म्हणाले.

"बाबा, तुम्हाला नक्की काय म्हणायचे ते तर सांगा." सारंग म्हणाला.

"रीना व मीना बद्दल बोलतोय मी. हल्ली खूपच वाद वाढलेत त्यांच्यात, एकमेकांचा पान उतारा करणे, टोमणे मारणे नेहमीच चालू आहे. याचा त्रास तुझ्या आईला होतं आहे. या वयात हे सहन होतं नाही. आधी छोट्या छोट्या कुरबुरी होत होत्या त्या ठीक होतं पण यात वाढ होत आहे." श्यामराव शांतपणे म्हणाले.

"बाबा, त्यात काय हो, घर म्हटलं की भांड्याला भांड लागणारच ना." धनंजय हसत म्हणाला.

"धन्या, भांड्याला भांड लागल्यावर आवाज होतो माहिती पण ते आवाज घरापर्यंत असला तर ठीक. त्याचे पडसाद आणि आवाज बाहेर गेला तर ते कितपत योग्य ते तूच सांग बरं आणि ही मस्करी नाहीये, समजलं. तेव्हा हसणं बंद करं." ते डोळे मोठे करत दरडावत धनंजयला म्हणाले.

"बाबा, काय करायचे ते सांगा. मलाही वीट आलाय. रोज घरी आलो की रोजची किटकिट चालू असते माझ्यामागे मीनाची. रीनाताई, मला अशा म्हणाल्या, तशा म्हणाल्या." सारंग वैतागत म्हणाला.

"हो ना, रीनाचीही तिच भूनभून चालू असते, त्या मीनाला सांगा, हं हल्ली खूपच चुरूचुरू बोलत असते. आधी तोंडातून एक शब्द निघत नव्हता आणि आता खूपच तोंड सोडलयं तिने." शरदही रीनाची तक्रार करत म्हणाला.

"मी इथे तुमच्या बायकांच्या तक्रारी सांगायला व ऐकायला नाही बसलो. त्यावर काय तोडगा काढायचा ते सांगा." श्यामराव त्या तिघांकडे एक नजर टाकत म्हणाले.

"साॅरी बाबा, आमचं तर डोकं चालत नाहीये. तुम्हीच उपाय सुचवा." सारंग म्हणाला.

"आधी नेमकं त्यांना कोणत्या बाबतीत गैरसमज झाला, का त्या इतकं एकमेकांना बोलतात? त्याचं कारण शोधले पाहिजे. यांच्यात फुट पडायला कोणी कारणीभूत आहे का याचा शोध घ्यावा लागेल." श्यामराव विचार करत म्हणाले.

"अहो, मला एक गोष्ट सांगायची होती. आपल्या घरातील बऱ्याच गोष्टी आजपर्यंत घराच्या बाहेर जात नव्हत्या या चार महिन्यात बाहेरच्या लोकांनाही कळतात. परवा या दोघींचं साडीवरून झालेलं भांडण. धनूला आतापर्यंत लहान भावासारखा प्रेम करणाऱ्या या त्या दिवशी दोघीही हा मध्ये पडला तर किती बोलल्या याला. ऐतखाऊ, दिवसभर ऊनाडक्या करत फिरतोस. जरा कमवायला शिक. मग बोल. तसही आमच्यामध्ये बोलण्याचा तुझा काय, संबंध? तेव्हा मी काही बोलले तर त्या  दोघीही मला तुमच्या लाडाचा परिणाम म्हणतं निघून गेल्या." सावित्री डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या.

"काय हे, आई? तू हे आता सांगतेस? आधीचं का नाही सांगितलेस?" शरद चिडत सावित्रीला म्हणाला.

"अरे, घरात उगीच भांडण नको म्हणून बोलले नाही, त्यात तुझे बाबाही गावी गेले होते. त्यात थनूही म्हणाला की आई, जाऊ दे ना. असंही त्या काय चुकीचं बोलल्या, ऐतखाऊच आहे की. दादा, भाई व बाबांना यातलं काही सांगू नकोस. उगीच माझ्यामुळे अजून वाद नको व्हायला म्हणून मग सांगितले नाही." सावित्री त्याला जवळ घेत म्हणाली. 

"धन्या, एवढी मोठी गोष्ट तुला सांगावीशी वाटली नाही. का रे? बाबांना नाही निनाद आम्हाला तरी सांगायचंस." शरद त्याला गळ्याशी लावत म्हणाला.

"हो, ना धनू, तू सांगायला हवं होतंस." सारंगही पुढे येत, त्या दोघांना बिलगत म्हणाला.

"दादा, भाई, त्यात काय एवढं. अरे, बरं झाल्या त्या बोलल्या ते. त्यामुळे तर मी नोकरीचं मनावर घेत  शोधली आणि आनंदाची गोष्ट म्हणजे चार पाच पायावाटा शोधल्या तर लगेच भेटली पण. त्यामुळे घरात काही आर्थिक हातभार लावायला मिळालं, तुम्ही तिघे किती कष्ट घेता हे कळलं मी स्वतः कष्ट करू लागल्यावर आणि राहिली गोष्ट त्या दोघींच्या रागवण्याचं तर त्या दोघी आईसारख्याच आहेत मला. त्यांचं बोलणं माझ्या भल्यासाठी होतं, मग काय मनावर घ्यायचं ना." धनंजय दोघांच्या गळ्यात पडत म्हणाला.

"धन्या खरचं मोठा झालास." सारंग व शरद कौतुकाने त्याच्याकडे पाहतं म्हणाले.

सावित्री व श्यामरावपण कौतुकाच्या नजरेने बघत त्या तिघांकडे बघत होते.

"ते ठीक आहे हो, पण त्या दोघांना कसे एकत्र आणायचे?" सारंग म्हणाला.

क्रमशः

रीना व मीना पुन्हा एकत्र येतील का? त्यांच्यातील गैरसमज दूर करण्यासाठी काय करतील ? गैरसमज कोणा तिऱ्हाईत व्यक्तिंमुळे झाला का? पुढे काय होईल जाणून घेण्यासाठी वाचा पुढील भागात..

©️ जयश्री शिंदे

अष्टपैलू लेखन स्पर्धा

🎭 Series Post

View all