Login

एकत्र कुटुंबपद्धती गरजेची-१

वादविवाद

राज्यस्तरिय करंडक वादविवाद
पहिला संघ - एकत्र कुटूंब-१
टीम - अमरावती


माझा शाळेत जाणारा चौथ्या वर्गातला स्मित नाराज होऊन मुसमुसत बसलेला होता.

"आई, आपल्या घरी का नाही आहेत गं आजी-आजोबा, काका, आत्या, काकू....??

तो माझा मित्र रियान बघ किती लकी आहे. आई बाबा शाळेत घ्यायला आले नाही तरी त्याला कधीच वाट बघत रहावी लागत नाही किंवा माझ्यासारखं रिक्षाने यावे लागत नाही. त्याचा काका, दादा नाहीतर ताई येतात आणि तो पटकन भुर्रर्र होतो. किती मस्त ना.

त्याला खेळायला घरातच भाऊ बहिणी आहेत म्हणे चार चार....आणि आईबाबा कामाला गेल्यावर घरात त्याला माझ्यासारखं एकटं कधीच रहावं लागत नाही....मला का रहावं लागतं एकटं?आपल्याकडे आण ना आजी आजोबा, काका काकू...."

त्याचा "एकटेपणा" एकदम जाणवून मी सुद्धा विचार करू लागली की....

एकत्र कुटुंब पद्धती हवी की नोकरीनिमित्ताने झालेली आमच्यासारखी विभक्त??

खरंतर असा प्रश्न निर्माण होणे हे या आधुनिक जगाचे, आधुनिक(?) विचारसरणीचे अपयशच म्हणावे लागेल.

आधुनिकता आणि व्यक्तिगत स्वातंत्र्य या नावाखाली कुटुंबपद्धतीला विभक्त केल्या गेले हे आपले दुर्दैव.

पण नक्कीच, आजच्या ढासळलेल्या नितीमूल्य आणि हरवलेल्या संस्काराच्या काळात एकत्र कुटुंबपद्धतीचं मोल कितीतरी पटीने वाढतंय आणि पटतंय.

एकत्र कुटुंबपद्धती हीच योग्य आहे आणि विभक्त पध्दतीपेक्षा श्रेष्ठ सुद्धा आहे.

एकत्र कुटुंब म्हणजे फक्त खूप सारी माणसे एकत्र राहतात असं नाही तर ती सगळी माणसं मनाने एकमेकांशी जोडल्या गेलेली असतात, एकमेकांच्या भावना आणि व्यवहारात समरस झालेली असतात.
सुखाचे क्षण जितक्या उत्साहाने साजरे होतात तितक्याचं आवेशाने दुःख वाटायची ताकद पण असते ती फक्त एकत्र कुटुंबात!

जशी नखात गेलेली फास आणि डोळ्यांत गेलेला कण काढण्यासाठी दुसराच माणूस लागतो तसेच जीवनातील सुख-दुःखाचे क्षण वाटून घ्यायला कुटुंबात माणसे असावीच लागतात.

स्वातंत्र्य, करिअर, नोकरी अश्या कारणांमुळे विभक्त झालेल्या कुटुंबात आज काय उरते आहे? तर, घरातली इनमिन दोन किंवा तीन माणसे बाहेर गेली की फक्त डेकोरेटिव्ह भिंती आणि दारावर एक कुलूप.

एकत्र कुटुंबात मात्र अशी परिस्थिती कधीच उद्भवत नाही, घराला कुलूप लागत नाही. घराला तसेच घरातल्यांना सांभाळण्यास जेष्ठ सदस्य म्हणजे भरभक्कम आधार असतो.

जगामध्ये भारतीय आणि ग्रीक संस्कृती सर्वांत पुरातन समजली जायची. कालौघात ग्रीक संस्कृती लयाला गेली पण भारतीय संस्कृती टिकून राहिली कारण ती एकत्र कुटुंबपद्धतीच्या पायावर मजबूतपणे उभारल्या गेली आहे.

अमेरिका, ब्रिटनमध्ये सगळ्या वंशाची लोकं राहतात पण भारतीय वंशाची लोकं ही सगळ्यात समाधानी, बुद्धिमान, मानसिकदृष्ट्या संतुलित असल्याचे आढळून आले. याची कारणमीमांसा जेव्हा झाली तेव्हा यामागे आपली एकत्र कुटुंबपद्धती हे मूळ आहे असा निष्कर्ष निघाला.

एकत्र कुटुंबात एका मुलाचे अनेक पालक असतात. विविध वयोगटातील मुलं एकत्र वाढतात, त्यांच्यातील प्रेम, जिव्हाळा तर असतोच पण एकमेकांसाठी करावी लागणारी तडजोड (स्वखुशीने), एक तीळ सात जणांमध्ये वाटून खाण्याची असलेली सवय, समूहात राहल्याने वाढत जाणारी सहकार्याची भावना आणि यामुळे वाढत जाणारं समाधान आणि मानसिक स्थैर्य.

विभक्त कुटुंबपद्धतीत म्हणणे ऐकून घ्यायला, मतं समजून घ्यायला, मानसिक आधार द्यायला माणसेच नसतात त्यामुळे भावनांचा योग्य निचरा होत नाही आणि त्यातून लहान वयातच मुलांमध्ये वाढत चाललेले नैराश्य, वाढणाऱ्या आत्महत्या, आत्मकेंद्रीपणा या समस्या बिकट होत आहेत.

(सं)वाद साधण्यासाठी माणसेच कुटुंबात नाही त्यामुळे नवरा-बायकोत होणारे वाद वाढून घटस्फोटाचे प्रमाण सुद्धा वाढते आहे.
या अश्या कित्येक सामाजिक समस्यांचा विचार केला तर एकत्र कुटुंबाचं महत्त्व निश्चितच ठळकपणे जाणवतं.

एकत्र कुटुंब का चांगले किंवा काय फायदे आहेत या कुटुंबपद्धतीचे? तर, फायदे तर अगणित आहेत.

भांडण करायला शेजाऱ्याची गरज लागत नाही?,
खूप सारी गिफ्ट्स मिळतात?, एकाच व्यक्तीला सगळी कामं करावी लागत नाहीत....यातील गमतीचा भाग सोडला तर एकाचवेळी इतक्या साऱ्या लोकांचं प्रेम मिळतं, महत्त्वाचे निर्णय घेताना जेष्ठ सदस्यांचा आधार लाभतो, खर्च करताना वाटून घेतल्या जातो त्यामुळे एकावरचं लोड येत नाही.

मनुष्य हा तसाही समूहात रमणारा प्राणी आहे. आणि हा समूह जर त्याला त्याच्या आपल्या माणसांत, आपल्या कुटुंबातच मिळत असेल तर मग "सोने पे सुहागा!"

एकत्र कुटुंबात जो भक्कम मानसिक आधार मिळतो त्याला तोड नाही. माणसांच्या उबेमुळे भावनिक आणि मानसिक आधाराची पोकळी नैसर्गिकरित्या सहजपणे भरून येते. एकत्र कुटुंबात राहताना वेगळा व्यक्तिमत्त्व विकास क्लास लावण्याची गरज उरत नाही, संस्कारवर्गांची कमतरता भासत नाही.

एकत्र कुटुंब म्हणजे नैसर्गिक मानसोपचाराचे एक चालतेबोलते समुपदेशन केंद्र!

व्यावहारिक जीवनातले खाचखळगे आपोआप आत्मसात करीत, एकमेकांना सांभाळून आनंदी आणि समाधानी जीवन जगणे ही एकत्र कुटुंबीपद्धतीची देण आहे तर दुर्दैवाने वाढते वृद्धाश्रम आणि पाळणाघरे ही विभक्त कुटुंबपद्धतीची देण!

एकत्र कुटुंबाचा पाया असेल तर सर्वांगीण विकास होऊन जीवनात यशाचे सर्वोच्च शिखर नक्कीच गाठता येईल.

                    "मजा, मस्ती, धमाल आहे

                     जेव्हा कुटुंब असतं एकत्र

                    सुख- समाधान भरभरून वाहे

                      यश परिमल दरवळेल सर्वत्र!"


धन्यवाद!


© डॉ समृद्धी रायबागकर, अमरावती