भाग : १
'पल पल दिल के पास तुम रेहती हो....
जीवन मिठी प्यास ये केहती हो....
जीवन मिठी प्यास ये केहती हो....
सकाळी सकाळी फेसबुक ओपन करून अपडेट्स बघताना आपल्या वॉल वर 'प्रिन्स' या आयडी वरून आलेला हा प्रेमाने ओथंबलेला संदेश रितिकाला गोड गुदगुल्या करून गेला... तिने भराभर ती प्रोफाइल ओपन केली आणि माहिती तपासून फोटों गॅलरीवर क्लिक केले... एक एक फोटो लोड होता होता आणि रितिकाचा श्वास वाढत होता. अगदी शेवटी वॉटर रिसॉर्ट मधील त्याचा उघड्या देखण्या देहाचा फोटो तिच्या अंतर्मनाला हुरहूर लावत होता. त्या मोहमयी प्रिन्सला पाहून तिचे हात आणि मन स्तब्ध झाले होते. जणू ती श्वास घ्यायला विसरली असावी.... अपडेट्स बघून झाल्यावर मांडीवर लॅपटॉप घेऊन बराच वेळ ती शून्यात हरवून बसली होती.
"रितू !! रितू!!! अग किती हाका मारायच्या? सुट्टीच्या दिवशी एक तर उशिरा उठायचे आणि उठल्या बरोबर मोबाईल नाहीतर लॅपटॉप घेऊन बसायचे, दुसरे काही विश्वच उरले नाही या पोरांचे. अग कुठे हरवली आहेस? चल लवकर आटपून घे, आज पाणी जाणार आहे आणि हो! एक आनंदाची बातमी आहे.. म्हणजे तुला बघायला येणार आहेत"....
आईच्या कर्कश्य आवाजाने भानावर आलेल्या रितिकाने लॅपटॉप बेडवर आपटला.
"आई !! तु हे सगळे चांगल्या पद्धतीने ही बोलू शकत होतीस. का तू नेहमीच माझा मूड खराब करायला येतेस?. मला आताशी वाटू लागलेय की सरळ बँगलोरला जॉब बघावा आणि निघून जावे तिकडे कायमचे".. रितिका उशी बाजूला फेकत बेडवरुन उठत बोलली.
"अग मी काय तुझी दुश्मन आहे.. आमच्या वेळी आम्ही मुली सुट्टीच्या दिवशीही सकाळी उठून आपले आवरून आईला मदत करायला स्वयंपाक घरात हजर असायचो. तुला तर त्याचीही आवड नाही. बाहेरचे खाऊन वजन वाढवून घेतले आहेस. अंगाला व्यायाम नाही, सगळे आयते हातात पाहिजे. अग आता बत्तीस वय झालेय तुझे, तुझ्या या वजनदार असण्याने सगळी स्थळे तुला नापसंत करतात. तुझ्या मावशीने कसेतरी आजचे स्थळ जुळवून आणलेय. तेव्हा आता जास्त वेळ लावू नकोस आणि लगेच आटपून तयार हो. बाकीची तयारी मी सुरु केलीय" ... आईने आपल्या शिक्षिकेच्या स्टाईल मध्ये रितिकाला दम भरला.
"मी बाहेरचे खाते म्हणून माझे वजन वाढलेय असे तू नेहमीच बोलते. सगळेच बाहेरचे खातात त्यात फक्त माझेच वजन वाढते यात माझा दोष तो काय? तुझे मन राखण्यासाठी वजन कमी करण्याचे कितीतरी अघोरी प्रयत्न करून झालेय मी, पण काहीच उपयोग झाला नाही. माझा पिंडच तसा आहे, तरी तू मलाच दोष देतेस. कधीतरी माझ्या मनाचा विचार केलास का?. सारखे लग्न लग्न आणि लग्न... मी तर आता ठरवलेय की लग्न नाही झाले तरी चालेल.. राहीन मी एकटी आणि ऐक! मी काही स्वतःला सजवून चहाचे प्याले घेऊन नवरेवाल्यां समोर स्वतःचे प्रदर्शन करणार नाही. तेव्हा तू मावशीला सांगून टाक कुणाला घेऊन येऊ नकोस"... रितिकाचा संताप तिच्या शब्दांमधून बाहेर येत होता.
"रितिका!! किती वाह्यात झाली आहेस. तुझ्या काळजीनेच मी आणि तुझी मावशी दिवस रात्र चिंतत असतो.. माझे पण आता वय झालेय. घरात माझ्या शिवाय दुसरे कोणीही तुझी काळजी घ्यायला नाही म्हणून वाटते की मी जिवंत आहे तो पर्यंत तरी तुझे हात पिवळे व्हावेत म्हणजे मी सुखाने डोळे झाकेन"... आईने डोळ्याला पदर लावला.
"डोळ्यातून पाणी काढून मला इमोशनल ब्लॅकमेल करायचे अस्त्र आता माझ्यावर काहीच काम करणार नाही, मी आज नाही म्हटले म्हणजे नाहीच तयार होणार"..
असे बोलत रितिकाने दारात उभ्या आईच्या तोंडावर बेडरूमचे दार आपटून बंद केले आणि बेडवरील उशीत तोंड खुपसून अश्रूंना वाट करून दिली.. रितिका बराच वेळ अश्रू गाळत होती. मनात ना ना विचार येत होते.
"हे जाडजूड शरीर, सावळा वर्ण आणि सुमार सौंदर्य... शाळेत असल्यापासून आपल्याला 'अप्पू' हे बिरुद लावले गेले. कालानुरूप आपल्याला दिलेल्या उपमा फक्त बदलल्या परंतु त्यामागील उपहास मात्र तोच होता. कॉलेजमध्ये ही आपण फक्त विनोदासाठी वापरले जायचो... कधी एखाद्या मुलाकडे पहिले तर त्याचे हसे केले जायचे. नियतीने फक्त आपल्याच बरोबर का असा दुष्टपणा केला. जेथे तेथे अपमानच सहन करायचा. लग्नाच्या बाजारात तर स्वतःहून लोकांना बोलावून वजन आणि दिसण्यावरून नकार ऐकून स्वतःची अवहेलना करून घ्यायची... सगळ्या मैत्रिणीची लग्ने होऊन त्यांना चिल्लीपिल्ली झालीत आणि आपण अजूनही कुमारीका, साधा बॉयफ्रेंड पण आपल्या नशिबात नाही. किती सहन करायचे?"
रडत, विचार करून रितिकाला डोळा लागला... कितीतरी वेळ ती तशीच बेडवर पडून होती. खिडक्यांमधून आलेल्या उन्हांनी तिला भान आले. दचकून उठून तिने घड्याळात पहिले, दुपारचे तीन वाजले होते. डोके किंचित ठणकत होते. तिने भराभर बेडरूम आवरले आणि अंघोळीला गेली. गार पाण्याच्या शॉवरने डोक्याचा ठणका थोडा सौम्य झाला. कपडे बदलून तिने दरवाजा उघडला आणि किचन गाठले. जेवण तयार होते. गॅसच्या शेगडीला कागदाची चिट्ठी चिकटवलेली होती.
"रितिका, येथून पुढे मी तुला काहीच विचारणार नाही, तू आणि तुझे नशीब... जेवण तयार आहे जेवून घे. मी देवळात जातेय, संध्याकाळी येईल"
आपण आईला खूप त्रास दिला याची रितिकाला बोच लागून राहिली. हा जन्मच व्यर्थ आहे आपला... तिने ताटात एक चपाती भाजी घेतली आणि टेबल वर बसून एक घास तोंडात टाकला. दुसऱ्याच क्षणी घास कडू लागायला लागला... जेवणावरची इच्छाच उडाली. तिने सगळे ताट डस्टबिन मध्ये ओतून ताट धुवून ठेवले आणि पुन्हा आपल्या बेडरूम मध्ये जाऊन पडली. मन सैरभैर झाले होते. मनाला स्थिर करण्यासाठी तिने गाणी ऐकली पण त्यातही रस वाटेना, इतक्यात तिला फेसबुकची आठवण झाली आणि हृदयात धडधड होऊ लागली... क्षणात आनंद वाटू लागला. तिने पटकन लॅपटॉप ऑन करून फेसबुक लॉगिन केले. 'प्रिन्स' आयडी वरून आलेला तो संदेश पुन्हा पुन्हा वाचून आणि त्या मॉडेल तरुणाचे आकर्षक फोटो पाहून रितिका स्वप्नांच्या दुनियेत पोहोचली. त्याला रिप्लाय देण्याची जबरदस्त इच्छा मनात सारखी उफाळून येत होती. परंतु विवेक, संस्कार आडवे येत होते परंतु शरीर मन पेटून उठले होते. इतक्या वर्षात कुणीतरी आपल्याला साद घालतेय आणि आपण संस्कार आणि विवेकाच्या जोखडात अडकून बसलोय. मन बंड करत होते परंतु तिला हिम्मत होत नव्हती.
संध्याकाळी आई उशिराच घरी आली. आल्यापासून ती गप्प गप्पच होती. तिने आपले आवरले आणि पुन्हा आपल्या नामस्मरणात आणि वाचनात व्यस्त झाली. रितिकाने तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला परंतु आईने जुजबी उत्तरे देऊन तिला टाळले. मनात दुःखद भावना घेऊन रितिका पुन्हा आपल्या कोषात बंदिस्त झाली. आईला त्रास नको म्हणून तिने दुपारचा वरण भात खाल्ला आणि किचन आवरून आपल्या बेडरूम मध्ये आली. समोर ठेवलेला लॅपटॉप सारखा खुणावू लागला होता ... त्या तरुणाला उत्तर देण्यासाठी मन अनेक रिप्लाय बनवत होते पुसत होते... नेमका काय रिप्लाय द्यावा या विचारात रितिकाला रात्रभर झोपच आली नव्हती.
सकाळी उठल्यावर पुन्हा आयबी मध्ये लाल जर्द गुलाबांचा गुच्छ आणि खाली मेसेज...
'हमें मालूम है आप रात भर सोयी नहीं... हम भी कहा सोये है... इस लिए सुबह ही आपके लिए गुलाब लेकर आया हु.... बस यह तोहफा कबूल करो मेरी जान, गुड मॉर्निंग'
त्याच्या मॅसेज मध्ये एक चुंबकीय जादू होती... रितिका त्या जादूने भारावली.... असे वाटत होते की हृदय आता बाहेर येईल... तिचे हात पाय थरथर कापू लागले होते... भावनांचे एक वादळ तिच्या भोवती पिंगा घालत तिच्या विवेकाला धडाका देत होते... आता मात्र रितिकाला राहवत नव्हते. काहीतरी होते जे तिला कंट्रोल करू लागले होते. नकळत तिचे हात रिप्लाय देण्यासाठी मोबाईलच्या की पॅडवर फिरू लागले. सर्वांग कंप पावत होते पण हृदयात मात्र एक गोड भावना झीरपत सर्वांगात पसरत होती. त्या भारल्या पणातच तिने रिप्लाय बनवून पोस्ट केला... त्यात तिने आपला नंबरही लिहिला होता. संदेश पोहोचला होता... आणि रितिका धडधडत्या हृदयाने फोनची वाट पाहू लागली.
काही क्षणातच फोन वाजू लागला, डिस्प्ले वर तेच जादुई नाव चमकत होते 'प्रिन्स' कॉलिंग' थरथरत्या हातांनी रितिकाने फोन घेतला.
"हाय मेरी जान! और कितना तडपाओगी, जब से आपको फेसबुक पर देखा है, मैं अपना दिल खो चुका हु. आपके दीदार को दिल तरस रहा है"
प्रिन्सच्या भरदार मादक आवाजाने रितिका पाणी पाणी झाली. उत्तर काय द्यावे? घशाला कोरड पडली होती. एखाद्या देखण्या तरुणाबरोबर बोलण्याची हि तिची पहिलीच वेळ होती. तिने धडधडत्या हृदयाने संवाद साधून लगेच संध्याकाळी भेटण्याची वेळ देऊन टाकली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा