भाग : २
भेटण्याची वेळ दिल्या नंतरचा काळ तिच्यासाठी अत्यंत कठीण होता. क्षणात हुरहूर, क्षणात हृदयात धडधड.... मन पाहू लागलेल्या स्वप्नांचा पट डोळ्यांसमोर दिसू लागला होता. मनाला सावरत दिवस कसा तरी कामात घालवून संध्याकाळी रितिका तयार झाली. आरशात स्वतःला पाहताना एक वेगळीच लज्जा तिच्या चेहेऱ्यावर विलसत होती. ती घाईतच घरातून निघाली... वेळ होईल म्हणून तिने रस्त्यावर येत रिक्षा केली आणि ठरलेल्या ठिकाणी पोहोचली. भेटण्याची वेळ अजून झालेली नव्हती. घड्याळाचे काटे पुढे सरकत होते आणि शेवटी ठरलेली ती वेळ काही क्षणात जवळ आली.... तिचा प्राण डोळ्यांमध्ये जमा झाला होता. ती रस्त्याकडे नजर लावून त्या अनामिक प्रिन्स ची व्याकुळतेने वाट पाहत होती की तिचा फोन वाजला. डिस्प्ले वर 'प्रिन्स' नाव झळकत होते.... तिने पटकन फोन रिसिव्ह केला आणि अधीर होत काय ऐकायला मिळतेय याची वाट पाहू लागली. समोरून तो बोलत होता.
"लव्ह यु मेरी जान, मुझे पता है आप मेरी राह देख रही हो, लेकीन एक प्रॉब्लेम आ गया है, बस से उतरते समय मेरा पर्स किसींने मार लिया. क्या करू समझ मे नही आ रहा है, मैने सोचा था आज अपनी पेहली मुलाकात है तो आपको किसीं बडे रेस्टॉरंट मे ट्रीट दु, लेकीन... मेरे नसीब में आज आपसे मिलना नहीं है शायद. हम आज नही मिल सकते, मैं वापस जा रहा हु. जब मेरे पास पैसे आएंगे तब मिलूंगा. प्लीज मुझे गलत मत समझना"
रितिकाला त्याचे बोल ऐकून अंगावर मोरपीस फिरल्याची भावना जाणवली, इतक्या वर्षात मित्र मैत्रिणींनी फक्त आपल्याकडून ट्रीट घेतली, आणि हा आपला राजकुमार आज आपल्याला छानशा रेस्टॉरंट मध्ये ट्रीट देणार होता, तो फक्त विचार पण तिला मोहात पाडत होता. घाबरत खूप जगलो आता मात्र स्वतःसाठी जगायचे. तिच्या मनाने निश्चय केला... चालून आलेला हा चान्स घालवायचा नाही असा विचार मनात पक्का करून तिने लगेच त्याला उत्तर दिले.
"ओहह !! मुझे बोहोत अफसोस हो रहा है की आपका पर्स किसिने मारा, आप कोई चिंता मत करो, आप आ जाओ, आज मैं आपको ट्रीट देती हु"
"नहीं नहीं जान! मुझे आपको तकलीफ में नहीं डालना है. आप मेरे लिए खर्चा करो ये मैं बर्दाश्त नहीं कर सकता, हम फिर कभी मिलेंगे. मैं आपको खुश देखना चाहता हु"... त्याने नारजीने उत्तर दिले.
तिने त्याला बरेच समजावले.. समोरून त्याने खूप आढेवेढे घेतले आणि शेवटी येण्याचे मान्य करत काही मिनिटातच रितिकाचा स्वप्नातील राजकुमार तिच्या समोर येऊन उभा राहिला.
एखाद्या मॉडेलला लाजवेल असे त्याचे पुरुषत्व होते. ती त्याच्या रूपाने आणि त्याच्या मधाळ हास्याने घायाळ झाली. शरीराने बेढब, सावळ्या, साधारण दिसणाऱ्याला रितिकाला समोर उभा असलेला देखणा पार्टनर मिळणे म्हणजे 'गुलबकावलीचे फुल' गवसल्या सारखे झाले होते. ती अवगुंठुन अंग चोरत उभी होती... काय बोलावे तिला समजत नव्हते. त्याने समोर येऊन आपला मजबूत हात तिच्या पुढे केला.
"हाय डार्लिंग मैं अल्ताफ शेख"
न्यूनगंडाने थिजलेल्या रितिकाने घाबरत आपला बुटक्या बोटांचा हात त्याच्या हातात दिला. त्याने क्षणाचाही विलंब न लावता भर रस्त्यात तिचा हात प्रेमाने कुरवाळला आणि पटकन हाताचे चुंबन घेतले. त्याच्या त्या उबदार स्पर्शाने आणि हाताच्या चुंबनाने रितिका आकाशात चालू लागली. अल्ताफने तिचा हात तसाच आपल्या हातात घेऊन तिच्या डोळ्यात आपली जादुई नजर गाडली. त्याच्या हिरवट धारदार नजरेने रितिका केव्हाच शिकार झाली होती. त्याने एक मंद स्मित करत एकदम तिच्या कमरेत हात घातला आणि समोरच असलेल्या उंची रेस्टॉरंट कडे चालू लागला. रितिकाच्या मनात जिंगल बेल वाजत होती... आणि ती हवेतच त्याच्या बरोबर रेस्टोरंट मध्ये शिरली. आलिशान हॉटेलच्या दरवाजातील दरबानने त्यांचे सुहास्य स्वागत करत दरवाजा उघडला आणि तो हंसाचा जोडा आतील थंडगार वातावरणात शिरला.
अल्ताफने अगोदरच त्यांच्यासाठी शेवटच्या कोपऱ्यातील टेबल रिझर्व करून ठेवलेला होता. त्याने राणी सारखे रितिकाला त्या टेबलवर नेवून प्रथम तिला सीटवर बसवले आणि नंतर तो बसला. अल्ताफच्या जादूने मुकी झालेली रितिका फक्त त्याला न्याहाळत होती आणि तो भरभरून बोलत होता.... त्याच्या त्या जादुई शब्दांनी ती भारावून जाऊ लागली होती. तिला वाटू लागले होते अल्ताफची साथ आणि त्याचा हात जीवनभर असाच आपल्या हातात राहावा.
अल्ताफ बोलत होता.... रितिका ऐकत होती.... तिचे साधे सौंदर्य त्याला किती आवडलेय आणि तो कसा तिचा वेडा झालाय हे सांगून अल्ताफने तिचे भाव विश्व ढवळून टाकले होते. त्याच्या गप्पा संपत नव्हत्या, रितिकाची सगळी माहिती त्याने गप्पांमधून कधी काढून घेतली हे तिला समजलेच नाही. ती त्याच्या हिरव्या डोळ्यांच्या गर्तेत खोल खोल बुडत चालली होत. त्याने मेनू कार्ड मागवून बरेच पदार्थ आणि स्वतःसाठी मद्य मागवून घेतले. या छोट्याशा सहवासात रितिका त्याच्या प्रेमात पागल होऊन गेली होती. इतक्या वर्षात रितिकाने अशी उत्कट घटिका अनुभवली नव्हती.
डिनर करूनच झाले होते. वेटरने बिल आणून दिले. अल्ताफची नजर तिच्या पर्सवरच होती. तिने आपल्या पर्स मधून डेबिट कार्ड काढले, ती वेटरकडे देणार इतक्यात त्याने ते कार्ड तिच्या हातून घेतले आणि आपल्या एक्सरे नजरेने कार्ड वरील बऱ्याच गोष्टी टिपून घेतल्या.
"मेरी जान !! आप अब भी डेबिट कार्ड यूज करती हो? कम ऑन डार्लिंग ! आपके पास क्रेडिट कार्ड तो होना ही चाहिए . आप चिंता मत करो जल्द ही मैं आपके और मेरे नाम से एक क्रेडिट कार्ड ले लूंगा"
त्याचे ते हक्काचे प्रेमळ आश्वासन ऐकून रितिका धन्य झाली. त्याने डेबिट कार्ड वेटर कडे दिले. बिल पे करून दोघे बाहेर पडले. अल्ताफने प्रेमाने तिच्या कडून घरी जाण्यासाठी पाचशे रुपये परत करण्याच्या बोलीवर मागून घेतले. अल्ताफने तिच्या कमरेत हात घालून तिला हॉटेलच्या बाहेर आणले. रात्र झाली होती. त्याने रिक्षाला हात करत थांबवली आणि रितिकाला जवळ ओढत तिच्या गालावर आपले गरम ओठ ठेवून किस केला. त्याच्या उष्ण श्वासांच्या चुंबनाने रितिका हवे पेक्षाही हल्की झाली... तिला वाटू लागले की आपण स्वर्गात विहार करतोय.... त्याने रिक्षा वाल्याला तिचा पत्ता सांगून मीटर डाऊन केले आणि तिला रिक्षात बसवले. रिक्षा चालू होताच एक फ्लाईंग किस तिच्याकडे फेकत फोन करण्याचे आश्वासन देत तिला बाय केले.
रितिकानेही आपल्या नुकत्याच झालेल्या बॉयफ्रेंडला फ्लाईंग किस दिला. रिक्षा सुरु झाली. ती मुग्ध नजरेने बाहेर बघत गालातल्या गालात हसत होती. इतक्यात तिला जाणीव झाली की रिक्षावाला आरशा मधून तिलाच न्याहाळतोय. इतर वेळेला घाबरणाऱ्या रितिकाने बेफिकिरीने एक तुच्छ कटाक्ष आरशात बघणाऱ्या ड्राइव्हरवर टाकला आणि मान मागे टेकवून मस्त रिलॅक्स होऊन डोळे मिटून घेतले. अल्ताफच्या क्षणिक सहवासाने रितिकाला बोल्ड आणि निडर बनवले होते. तिच्या मनात आनंदाचे कारंजे थुईथुई नाचत होते.
"लोकं किती जळतात नाही? हा ड्राइव्हर नक्कीच माझ्यावर जळू लागला असेल. माझ्या सारख्या सुमार दिसणाऱ्या लठ्ठंभारतीचा इतका आकर्षक बॉयफ्रेंड बघून आणि त्याचे माझ्याप्रती प्रेम बघून हा माझी असूया करत असणार. मी आता कुणाचीही फिकीर करणार नाही. इतकी वर्षे कुणी माझ्या भावनांचा विचार केला का? फक्त माझ्या लठ्ठपणावर विनोद केले आणि माझी हिणवनी केली. मी पण आता फक्त माझ्यासाठी आणि माझ्या राजकुमारासाठी जगणार" ... रितिकाच्या मनात विचार पळत होते.
रितिका तरंगतच घरी आली. तिला आज वाजवी पेक्षा जास्तच उशीर झाला होता. तिने गृहीत धरले होतेच की आई दारातच उभी राहून तिला लेट का झाले याचा जाब विचारणार. झालेही तसेच, परंतु नेहमी आईला पटवून देणारी रितिका आज पूर्ण बदलली होती. तिने आईने विचारलेल्या प्रश्नांना उडवून लावले आणि सरळ आपल्या बेडरूम मध्ये शिरली.
शिक्षिका आईचा कडक स्वभाव तिला नेहमीच आपल्या स्वातंत्र्यावर अंकुश वाटत असल्याने कालांतराने त्यांच्यातील संवाद हरवून गेला होता. बोरिवली येथील एका शांत सोसायटीत त्यांचा वन बीएचकेचा फ्लॅट होता. वडिल स्वर्गवासी झाल्या नंतर आईनेही रिटायरमेंट घेऊन आपले मन भक्तिमार्गत गुंतवले होते. रितिकाच्या स्वभावामुळे आईने तिच्या कडून अपेक्षा करणे सोडून दिले होते. रितिकाचे लग्न उरकून आपले शेवटचे कर्तव्य पार पाडून तीर्थ यात्रेला जायचा तिचा मानस होता.
रितिकाची रात्र रंगीत स्वप्नात हरवली होती, अल्ताफ स्वप्नात येऊन तिला स्वर्गीय सुखाची अनुभूती देत होता, आणि रितिका प्रणयाच्या प्रत्येक आवर्तनात तृप्तीने नाहून निघत होती. रात्रभर झालेल्या स्वप्नदोषाने रितिका एकदम मरगळलेल्या अवस्थेत सकाळ पर्यंत जागीच होती. हे सगळे तिच्यासाठी नविन आणि आनंदाच्या अत्युच्य बिंदूवर पोहोचल्या सारखे होते. अगदी पहाटे पहाटे तिला डोळा लागला आणि जेव्हा जाग आली तेव्हा दुपार झाली होती. आज कामाचा खाडा झालाच होता.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा