Login

इमोशनल ब्लॅकमेल ! कथा क्रमांक ५

.
भाग : ५

अल्ताफला दागिने देऊन एक वर्ष झाले परंतु अल्ताफने त्याचा उल्लेख पुन्हा कधी केलाच नाही. असेच एक वर्ष सरले. अल्ताफच्या मागण्या अजगरा सारख्या वाढत होत्या, रितीकाला त्याच्या मागण्यांची पूर्तता करताना नाकी नऊ होत होते. एकदा फ्रस्टेट झालेल्या रितिकाने अल्ताफला विचारलेच.

"प्लिज मला सांग माझ्या आईचे दागिने कधी सोडवून तिला सुपूर्द करणार आहेस, ती सारखी माझ्या मागे लागतेय"

रितीकाच्या या प्रश्नावर अल्ताफचा पारा वर चढला... त्याने रागाने तिच्याकडे पहिले... त्याच्या हिरव्या डोळ्यातील खुन्नस पाहून रितिकाला कापरे भरले... आपण विचारून चूक केली याचा तिला पश्चाताप होऊ लागला. तिने याचनेच्या नजरेने त्याच्याकडे पहिले... आता हा काय बोलेल या विचारांनी तिला कापरे भरले.

"रितिका !! तुझा माझ्यावर विश्वासच नाही, मी व्याज भरतोय ना? दागिने सुरक्षित आहेत, पाहिजे तर उद्या आणून देतो, पण विचार कर.... नंतर आपला संबंध राहणार नाही"... अल्ताफ आज पहिल्यांदाच रागाने तिच्यावर ओरडला.

"सॉरी सॉरी राजा! माझी चूक झाली... माझा तुझ्याशिवाय कोणावरही विश्वास नाहीये. मी आईला समजावून सांगेन, पण तू मला सोडून जाऊ नकोस" ... रितिकाच्या तोंडून हुंदकाच यायचा बाकी होता. त्याच्या शेवटच्या वाक्यातील धमकीने रितिकाला या विषयावर गप्प बसण्याशिवाय गत्यंतर नव्हते.
***********************************
काही महिन्यांचा कालावधी जातो.

रितिकाच्या बीपीओ मध्ये शिकण्यास येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बॅगेतून पैसे चोरीला जाऊ लागले. प्रथम विद्यार्थ्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले परंतु जेव्हा चोरीचे प्रमाण वाढू लागले तेव्हा सगळ्यांनी मिळून मॅनेजमेंटला लेखी तक्रार दिली.

कंपनीच्या डिरेक्टर्सना ही गोष्ट लाजिरवाणी वाटली. ही बातमी लीक झाल्यास त्यांच्या बीपीओ चे नाव खराब होणार होते. पोलिसांमध्ये तक्रार करण्या अगोदर त्यांनी सीसी टिव्हीचे फुटेज तपासले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला.. रितिका विद्यार्थ्यांच्या बॅगेतून पैसे चोरताना सीसी टिव्ही कॅमेऱ्यात कैद झालेली होती.

अल्ताफमुळे रितिकावर चोरी करण्याची पाळी आली होती. तिची इतक्या वर्षांची सर्व्हिस बघून मॅनेजमेंटने निर्णय घेतला की पोलिसात तक्रार न देता तिला कामावरून कमी करायचे. बाकी मुलांचे गेलेले पैसे कंपनीने देऊन ती केस तेथेच बंद करून टाकली.

रितिका नोकरी वाचविण्यासाठी खुप गयावया करते, विद्यार्थ्यांची माफी मागते परंतु ती पैसे का चोरत होती याचे योग्य कारण देता न आल्याने तिला नोकरी पासून हात धुवावे लागले. चोरीची बातमी संपुर्ण बीपीओ क्षेत्रात क्षणात पसरते.... आणि रितिकाचे नाव कायमचे बदनाम होते. कुठेच नोकरी मिळेनाशी होते. एकाच क्षेत्रात असल्याने रवीनाला ही बातमी लगेचच कळते, आणि रवीना काळजीने लगेचच रितिकाच्या घरी धाव घेते.

रितिकाची दयनीय अवस्था... आणि घरातील बकालपणा पाहून रविना सगळे समजून जाते की या अवस्थेला तिचे अल्ताफ वरील आंधळे प्रेम जबाबदार आहे आणि त्या चीटर प्रियकराने आपल्या मैत्रिणीला बुजगावणे बनवले आहे. रविना पोटतिडकीने तिला मदतीचा हात देण्याचा प्रयत्न करते, परंतु रितिका तिच्या मदतीला स्पष्ट नकार देत सांगते की अल्ताफ शिवाय ती कसलाच निर्णय घेत नाही. हतबल होऊन रवीेना शेवटचा प्रयत्न म्हणून आईशी संवाद साधते. आई बरोबर बोलून तिला कळते की रितिकाने आईचे दागिने चोरून त्या लुटारूला दिलेत आणि आता राहता फ्लॅट नावावर करण्यासाठी रोज भांडण करून तिला त्रास देऊ लागलीय. वृद्ध आईने हतबल होऊन आपले हात टेकले होते. रविना आईला धीर देत सगळे ठीक होईल असे उगाचच बोलत वेळ मारून नेते. पण जेव्हा आई तिला आपला निर्णय सांगते तेव्हा मात्र राविनाच्या काळजात खड्डा पडतो.

"रविना मी आता हरले ग! रितिका आता गुलाम झालेली आहे. तिला त्या अल्ताफ शिवाय काहीच दिसत नाही... काहीच सुचत नाही... त्याने तिचे असे काही ब्रेन वॉश केलेय की तिला पुन्हा पहिल्या सारखी बनवणे मला तरी शक्य नाही. हा फ्लॅट रितिकाच्या नावे करून कायमची बहिणीकडे निघून जाण्याचा निर्णय मी घेतलाय"

रविनाला वृद्ध आईची हतबलता समजते ती व्यथित मनाने दोघींचा निरोप घेऊन तेथून निघते.
**************************************
अशीच चार वर्षे निघून जातात, रवीनाला नेहमी हसऱ्या रितिकाची आठवण यायची परंतु वाईट वाटून घेण्या व्यतिरिक्त तिच्याकडे काहीच पर्याय नसतो, कारण रितिकाचा मोबाईल नंबर बदललेला असतो आणि फ्लॅट विकून टाकलेला असतो. तिला मुंबई मध्ये शोधणे म्हणजे दर्यात तीळ शोधण्यासारखे काम. तिच्या आठवणींनी हळहळ करण्या शिवाय तिच्या हातात काहीच नसते.

असेच एके दिवशी रवीना आपला नवरा आणि लहान मुलाला घेऊन मुंबई दर्शन करत महालक्ष्मीच्या दर्शना नंतर बाजूच्या हाजीआली दर्ग्याच्या समुद्र किनारी आपली कार घेऊन पोहोचते. आपल्या लाडक्या मुलाना समुद्रातील दर्गा दाखवताना अचानक तिची नजर भिकाऱ्यांच्या रांगेतील एका चेहेऱ्याकडे जाते आणि तिच्या काळजाचा ठोका चुकतो. रितिका.... नक्कीच ती रितिकाच आहे. काळ्या फाटक्या बुरख्यात गुरफटलेल्या रितिकाच्या डोळ्यातील फसवले गेल्याची उध्वस्त भावना ओळखून रविनाचे अंतर्मन आक्रोष करू लागते. नकळत ती रितिकाच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकत जाऊ लागते. इतक्यात तिचा लहान मुलगा तिचा हात पकडून बोलतो.

"मम्मा! कुठे चाललीस? ते समोर समुद्रात कसले मंदिर आहे ते दाखवत होतीस ना?...

आपल्या बछड्याच्या निरागस बोबड्या बोलण्याचे राविनाला वास्तवाचे भान येते, तीचे पाऊल अडखळते. नजर अजूनही आपल्या फसलेल्या मैत्रिणीचा चेहेऱ्यावर लागलेली असते... डोळ्यांचे काठ भरून आलेले असतात, अंगाला कंप सुटलेला असतो. इतक्यात तिचा नवरा पुढे येत तिच्या खांद्यावर हात ठेवत तिच्याकडेे पाहतो. तिच्या भरलेल्या डोळ्यांना पाहून तो नजरेने 'काय' म्हणून विचारतो. रविना आपले डोळे पुसत मानेनेच काही नाही म्हणून मान डोलावते.

रविनाचा नवरा पुढे वळून भिकाऱ्यांची रांग पाहतो आणि त्याच्या चेहेऱ्यावर आपल्या पत्नी विषयी माया उमटते. आपल्या बायकोला गरिबांची किती कणव आहे या विचारांनी तो त्वरित वॅलेट मधून दहाच्या नोटा काढून रवीनाच्या हातात देतो आणि मानेनेच दान करण्यास सांगतो. रवीना ते सगळे पैसे आपल्या मुलाच्या हातात देत त्याला कडेवर घेते आणि बुरख्यातील रितिकाच्या समोर पसरलेल्या रुमालावर टाकण्यास सांगते. शून्यात हरवलेल्या रितिकाचा चेहेरा जवळून पाहून रवीनाला भरून येते. आपली रडण्याची उर्मी दाबत ती पटकन मागे वळते आणि आपल्या नवऱ्याचा हात घट्ट धरून आपल्या गाडी कडे चालू लागते.