Login

सोनियाचा उंबरा ...भाग- २

A woman trapped in a wealthy family battles for happiness and respect amid her husband and in-laws' indifference.
नवऱ्याच्या व्यसनाधीनतेला कंटाळून एकदोन वेळा तिने राधाताईंना सांगून बघितले पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही कारण तो आई, बाबा दोघांनाही जुमानत नसे, त्याला कोणाची फिकीर नसे. ती पहात होती, घरात त्याच्या समोर कोणाचे काही चालत नाही.
मोठे दोन दीर त्यांची शेती आणि व्यवसाय उत्तम रितीने सांभाळत होते. पण धाकटा मुलगा वैभव पुर्ण हाताबाहेर गेला होता.त्याच्या आईबाबांनीही त्याला वाढवताना चूक केली होती. धाकटा मुलगा म्हणून त्याचे खूप लाड केले, वाटेल त्या मागण्या पुरवल्या त्यामुळे तो उद्दाम झाला , हातात खेळणारा पैसा त्याला बेफिकीर आणि व्यसनाधीन बनवत गेला होता. त्याच्या आईबाबांना याची जाणीव झाली पण तोपर्यंत फार उशीर झाला होता. मुलगा पुरता हाताबाहेर गेला होता.
सारे वैभव दिमतीला असूनही सुमा उदास होती. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला लाडावलेला बाळ वैभव तिच्या पदरी पडला होता. त्याच्या व्यसनाधीनतेमुळे त्याला कोणी मुलगी द्यायला तयार नव्हते म्हणून गरीब घरातील सुमाला मागणी घातली आणि गरीब गाय सुमा अशी कसायाच्या दावणीला बांधली गेली होती.
नित्यनेमाने सकाळी लवकर उठणे,स्वयंपाक पाणी करणे अशी कामे सुमा करत होती त्यात कधी खंड पडला नव्हता. ती मनातून पार उदास होती पण उदासी दाखवून तरी काय करणार?..चांगली शिकली सवरलेली मुलगी अशा घरात पडली होती तिथून ती काहीच करू शकत नव्हती. भरजरी वस्र लेवून दागदागिण्यांनी मढले म्हणजे सुख असते का?...
सुमाला सतत वाटे एखाद्या गरीबाचा संसार मी चांगला फुलवला असता. शिक्षण पूर्ण करुन नोकरी केली असती पण परिस्थिती पुढे वडिलांना झुकावे लागले आणि घरचा, भावंडांचा विचार करून सुमाने वैभवच्या स्थळाला होकार दिला होता.

तिला तो दिवस आठवला ज्या दिवशी तिला वैभवचे स्थळ आले होते. मध्यस्थी बाबांना बोलत होता "शामराव पाटलांच्या धाकट्या मुलाचे स्थळ आहे, मुलगी एकदम सुखात राहिल. मुलाने मुलगी बघितली आहे त्याला बघताच पसंत पडली,म्हणून मला पाटलांनी त्यांच्या मुलासाठी तुमच्या मुलीचा हात मागण्यासाठी पाठवले आहे. श्रीमंता घरी पोरगी पडतेय, जन्मभराची ददाद मिटेल बघ तुझी", तेवढ्यात सुमाची आई बोलली, "पोरीच शिक्षणाच एक वरीस राहिल आहे बाकी, तेवढं पुरं होऊ द्या मग बघू."

तेव्हा मध्यस्थी बोलला होता, शिक्षण काय लग्नानंतर पण होईल, चांगलं स्थळ हातचं घालवू नका वैनी, बघा विचार करा.
सुमाच्या बाबंनीही विचार केला चांगल्या खात्या पित्या घरात पोरगी पडतेय, नाहीतरी माझ्या घरात हातातोंडाची मिळवणी होता होता नाकीनऊ येतेय, एक खाणारं तोंड बी कमी होईल घरातलं,आणि खर्चाची झंझट पण नाही आणि सुमाच्या बाबांनी सुमाला आणि तिच्या आईला समजावून वैभवच्या स्थळाला होकार दिला होता.
पुढे सुमाचे काय होते पाहूया पुढील भागात
क्रमश:
३०/४/२०२४