Login

सुटका : भयकथा भाग २

A Haunted Story Of A Couple
इतक्यात वीज गेली. सगळीकडे अंधार झाला. सायली घाबरली. तेवढ्यात तिचा कोणीतरी हात धरला. ती अस्फुट किंचाळली.

तिच्या कानाशी अभी हळूच म्हणाला, " ए वेडाबाई! अगं मी आहे. मी धरलाय तुझा हात. आणि तोही, अगदी पुढच्या सात जन्मांकरिता". ती लाजली, शहारली. त्याचा पहिला स्पर्श, अंधार, पावसाचं रोमॅंटिक वातावरण! तेवढ्यात वीज परत आली. पटकन तिने दोन्ही हातांनी स्वतःचा चेहरा झाकला. तिच्याही नकळत तिच्या श्वासांची गती वाढली होती. अभीने तिचे हात तिच्या चेहऱ्यावरून हळूच बाजूला केले आणि खिशातून एक सुंदर गिफ्ट काढलं. ती हरखून बघतच राहिली.

"बघतेस काय अशी? नाजूकशी हिऱ्याची अंगठी आहे ह्यात. खास आमच्या राणी सरकारांसाठी बरं"! तो मिश्किल हसत म्हणाला. मग फिल्मी स्टाईलने गुडघ्यावर बसून त्याने तिच्यापुढे ती अंगठी धरली.

इतक्यात परत वीज गेली आणि बाहेर विजा कडाडल्याचा प्रचंड आवाज आला. पुन्हा कोणीतरी तिचा हात धरला. अगदी जोरात. जणू काही हात धरणारा त्याची बोटं तिच्या मनगटात रुतवत होता. त्या स्पर्शाने तिला एकदम किळस आली. तिला जोरात किंचाळायचं होतं, अभीला हाका मारायच्या होत्या, पण आवाजच फुटत नव्हता. तिला असं वाटत होतं की ती बर्फाच्या एक गार लादीवर उभी आहे . आणि त्यात ती बुडत चाललीये. कसलासा उग्र दर्प पसरत चालला होता. उलटी होईल असा, सडका, कुजका. माणसाचं मांस जळाल्यासारखा. परत मगाचचाच अनुभव येत होता. तिला कोणीतरी हाक मारतंय असं वाटत होतं. कोणीतरी गळा आवळतंय असं वाटत होतं. ती गुदमरत होती. थंडी वाढत चालली होती. तिला श्वासही घेता येत नव्हता. तिचे डोळे प्रचंड दुखत होते. भाजल्यासारखी त्यांची आग आग होत होती. सुटकेची प्रचंड धडपड करून सुद्धा तिला सुटता येत नव्हतं. आणि एक क्षणी ती बेशुद्ध झाली.

शुद्धीवर आली तेव्हा अजूनही अंधारच होता. आपण कुठं आहोत हेच तिच्या लक्षात येईना. दोन पाच मिनिटांनी ती थोडी त्या अंधाराला आणि अजूनही असलेल्या त्या वासाला, थंडीला सरावली. तिने उठायचा प्रयत्न केला. क्षणभर चक्कर आली तिला. परत प्रयत्न केल्यावर तिला उठून बसता आलं. आणि आजूबाजूला जे दिसलं त्याने ती जोरात किंचाळली.

काय दिसलं सायलीला? कुठे होती ती? का असं अभद्र जाणवलं तिला? पुढे काय वाढून ठेवलं होतं तिच्या? ह्याची उत्तरं उद्याच्या भागात.
0

🎭 Series Post

View all