एवढं शिकून काय फायदा . भाग २

सासूसुनेची नेहमीची कथा
एवढं शिकून काय फायदा.. भाग २


"किती रे वाळलास तू? काही खातो पितोस की नाही?" गाडीतून उतरणार्‍या वृंदाताईंनी कौस्तुभला विचारले.

"काहीही हं आई.. अगं पाच किलो वजन वाढलं आहे माझं." कौस्तुभ त्यांचं सामान उतरवत म्हणाला.

"अरे, आईच्या नजरेला मूल नेहमीच रोडावलेले वाटणार. त्यात तुझ्या आईला आहे चष्मा.. मग तर विचारूच नकोस." मिस्कीलपणे प्रमोदराव म्हणाले.

"इथे बोललात ठिक आहे. सुनेसमोर बोललात तर माझीही किंमत कमी होईल आणि तुमची ही." नाकावर घसरलेला चष्मा वर करत वृंदाताई म्हणाल्या.

"आई बाबा. आपण घरी जाऊन बोलूयात का? शिवानी बिचारी वाट बघत असेल तुमची." कौस्तुभ घाई करत म्हणाला.

"बघितलंत.. लग्नाला सहा महिने नाही झाले तर बायकोची एवढी काळजी आणि तुम्ही? शिका जरा त्याच्याकडून काही." वृंदाताई म्हणाल्या. आता काहीही बोललं तरी वृंदाताईंची बोलणी ऐकावी लागतील म्हणून कौस्तुभ आणि प्रमोदराव गप्प बसले.

"घर बदललंस ना रे तू?" न राहवून प्रमोदरावांनी विचारले.

"हो बाबा.. आधी मित्रांसोबत रहात होतो. आता नवीन ठिकाणी घेतलं आहे. तुम्हाला सांगू. शिवानीने काय इंटेरियर करुन घेतलं आहे."

"हॅ.. इंटेरियर काय करायचं त्यात? दोन कपाटं, एखादा बेड ,स्वयंपाकघरात ओटा. त्यावर आणि खाली बाजारात रेडिमेड मिळतात ती कपाटं लावायची. झालं. आहे काय आणि नाही काय?"

"आई, तसं नाही गं. शिवानीचा आर्ट सेन्स मस्तच आहे. तिने तिच्या मैत्रिणीकडून काय काम करुन घेतलं आहे सांगू?"

"हो का.. मैत्रिणीकडून करुन घेतलं? मग फायदा काय हिच्या शिक्षणाचा? बाहेर सगळं छान मिळतं. हे ही माहित नसावं? नुसती उधळपट्टी पैशाची. असं जर आम्ही केलं असतं ना. तर तुझ्या शिक्षणाचे पैसे कसे भरले असते?"

"उतरा.." प्रमोदराव पटकन म्हणाले.

"काय?" वृंदाताई दचकल्या.

"गाडी थांबली. घर आलं बहुतेक. म्हणून उतरा म्हणतो आहे."

"हो.. उतरते ना." चष्मा नीट करत वृंदाताई गाडीतून उतरल्या. त्या घरी जाताच शिवानीशी कश्या बोलतील या विचारानेच कौस्तुभने कपाळावरचा घाम झटकला. ते बघून प्रमोदरावांनी रुमाल त्याच्यासमोर धरला.

"काळजी करु नकोस. बोलणी तर तुलाच खावी लागणार." प्रमोदराव निर्विकारपणे म्हणाले.

"म्हणजे?"

"बायकोच्या बाजूने बोललास तर बैल आणि आईच्या बाजूने बोललास तर मांजर. त्यापेक्षा गांधीजींचं माकड हो. विषयच संपून जाईल. ना ऐकायचे ना बोलायचे."

"बाबा घाबरवताय?"

"नाही.. वास्तवाची जाणीव करुन देतोय. चला." प्रमोदराव बिल्डींगमध्ये जात म्हणाले.

"किती वेळ दरवाजा उघडायला?" वृंदाताई बेल वाजवत म्हणाल्या.

"माझी ऑनलाईन मिटिंग सुरू होती. बेल वाजलेली ऐकू आली नाही. मी येतेच मिटिंग संपवून." शिवानी म्हणाली.

"अगं मग मिटिंग नंतर ठेवायची ना? पहिल्यांदाच येतो आहोत घरी आणि घर बंद? पटलं नाही मनाला. एवढ्या शिकलेल्या मुली तुम्ही. काय फायदा मग शिक्षणाचा?" वृंदाताई बोलेपर्यंत शिवानी आत पळाली देखील. बडबड करतच त्या सोफ्यावर बसल्या. पाचेक मिनिटातच शिवानी मिटिंग संपवून आली.

"सॉरी हं.. ते मिटिंग संपायलाच आली होती." मागून आलेल्या कौस्तुभकडे बघत शिवानी म्हणाली. त्याने डोळ्यानेच तिला खुणावले. त्याचा अर्थ समजून ती पुढे झाली. प्रमोदराव आणि वृंदाताईंच्या पाया पडली. वृंदाताई तोंडातल्या तोंडात पुटपुटल्या. प्रमोदरावांनी मात्र मनापासून आशीर्वाद दिला.

"छान हसतखेळत संसार करा."

"बाबा, तुम्ही बसा ना. मी चहा, कॉफी करु की सरबत देऊ?"

"फक्कड चहा होऊन जाऊ देत." प्रमोदराव म्हणाले.

"मला बाई लिंबूसरबत कर. काय जीव जातो आहे या उकाड्याने." वृंदाताई घाम पुसत म्हणाल्या.

"दोन मिनिटं थांबा." शिवानीने पटकन खिडकीला लावलेले वाळ्याचे पडदे सोडले आणि एसी सुरू केला. वाळ्याचा मंद सुवास पसरला.

"आयडियाची कल्पना मस्तच बरं का." प्रमोदराव म्हणाले.

"मला सरबतामध्ये साखर थोडी जास्त लागते बरं." नाक मुरडत वृंदाताई म्हणाल्या. आईबाबांचे सामान आतल्या खोलीत ठेवून कौस्तुभही बाहेर आला.

"घर बाकी छान आहे हो. आवडलं आपल्याला. दोन बेडरूम आहेत का?" प्रमोदरावांनी विचारले.

"हो बाबा. ते शिवानीच म्हणाली. कोणी आलं तर एखादी बेडरुम असू देत जास्तीची."

"छान ठेवलंय हो घर." प्रमोदरावांचे बोलणे पूर्ण होईपर्यंत शिवानी चहा सरबत घेऊन आली.

"छान झाला आहे चहा. अगदी मला हवा तसा." चहाचा घोट घेत प्रमोदराव म्हणाले. वृंदाताईंनीही सरबताचा घोट घेतला.

"अगं.. एवढं गोड?"

"तुम्हीच म्हणालात ना. साखर जास्त टाक."

"एवढी टाकायची?"

"ते स्कवॅश आहे. आधीच कॉन्स्नट्रेटेड असतं. त्यामुळे जास्त गोड वाटत असेल."

"हद्द झाली बाई.. अगं मग तसं सांगायचं ना? मला वाटलं तू ताज्या लिंबाचं सरबत करते आहेस. काय रे देवा? एवढं साधं समजेना? काय फायदा त्या शिक्षणाचा?"

"तुम्ही म्हणालात म्हणून मी टाकली. यात शिक्षणाचा काय संबंध?" न समजून शिवानीने विचारले.

"आता ते ही मीच सांगायचे.. जाऊ देत.. मी आपली गप्पच बसते."


एवढं शिकून काय फायदा? या म्हणण्याचा अर्थ समजेल का शिवानीला? बघू पुढील भागात.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all