एवढं शिकून काय फायदा.. अंतिम भाग

सासूसुनेची नेहमीची कथा
एवढं शिकून काय फायदा.. भाग ३


"झाला का गं चहा?" वृंदाताईंनी सकाळी आवाज दिला. त्यांचा आवाज ऐकून कौस्तुभ डोळे चोळत बाहेर आला.

"काय झालं गं आई? एवढ्या पहाटे का हाक मारली?"

"पहाटे? अरे सकाळचे आठ वाजले आहेत." वृंदाताई वैतागून म्हणाल्या.

"अगं रविवारी सकाळी आठ म्हणजे पहाटेच वाटणार ना मला.. त्यात रात्री उशिरापर्यंत आमची मिटिंग सुरू होती."

"बाई.. बाई.. मग चहा नाश्त्याचे काय?"

"आम्ही अश्यावेळेस ब्रंच करतो. ऐक ना.. तू घेतेस का चहा करून? तिथे सगळं आहे बघ."

"घेतलं असतं रे.. पण नवीन घर. कुठे शोधत बसायचे?"

"आई, तू फक्त चहा कर. नाश्त्याला मी खालून इडल्या आणतो. मस्त, लुसलुशीत. पण फक्त अर्धा तास झोपू देत." वृंदाताईंना बोलण्याची संधी न देता कौस्तुभ आत गेला ही.

"घरीसुद्धा करा.. आणि इथेही करा. फायदा काय या सुनांचा?" तणतणत वृंदाताई स्वयंपाकघरात गेल्या. चहासाखरेचे डबे सापडतील की नाही अशी त्यांना शंका होती. पण शिवानीने स्वयंपाकघर व्यवस्थित ठेवले होते. कपाट उघडताच चहासाखरेचे डबे समोर दिसले. तेवढ्यातल्या तेवढ्यात त्यांनी घरावर नजर फिरवली. घरातल्या वस्तू जागच्याजागी असल्या तरी अधूनमधून जाळीजळमटं डोकावत होती. त्यांनी हातासरशी सगळ्यांसाठीच चहा ठेवला. तोपर्यंत शिवानी पण उठून आली होती.

"सॉरी हं आई.. तुम्हाला चहा ठेवायला लागला. पण आमच्या ऑफशोअर मिटिंग कधीही असतात." शिवानी अपराधी स्वरात म्हणाली.

"ते असू देत गं. पण तुझं घरात लक्ष असतं की नाही? ते बघ जाळीजळमटं लोंबत आहेत. कधीतरी मारावा हात." शिवानीला समजावत वृंदाताई म्हणाल्या.

"आई, मी बारा बारा तास काम करते. उरलेल्या वेळात स्वयंपाकपाणी बघते. जेवढं जमेल तेवढं नक्कीच करते." शिवानीने बाजू मांडायचा प्रयत्न केला.

"बाई, बाई.. अगं मी फक्त म्हटलं की घरावर बाईचा हात फिरावा नाहीतर उपयोग काय शिक्षणाचा आणि पैशांचा?"

"आई.. मला पण चहा.." बाहेरून कौस्तुभ ओरडला.

"झोपतो म्हणाला होता. उठला बरा हा? चहा घे. मी त्याला देऊन येते." वृंदाताई लगबगीने बाहेर गेल्या. शिवानी मात्र चहाच्या कपाकडे बघत विचार करत होती. ठरल्याप्रमाणे दुपारचे जेवण बाहेरच झाले. जेवण झाल्यावर डुलकी काढायला म्हणून वृंदाताई गेल्या. त्यांना जाग आली तिच घुंगरांच्या आवाजाने.

"काय रे.. कोण एवढे दणादण पाय आपटतं आहे?" टीव्ही बघत बसलेल्या लेकाला त्यांनी विचारले.

"अगं शिवानी करते आहे. ती भरतनाट्यम शिकली आहे. आणि तिच्या कंपनीत तिचा कार्यक्रम आहे."

"हे बरं आहे.. सकाळी फक्त जाळीजळमटं काढ म्हटलं तर मला ऐकवलं की एवढा वेळ काम करतो आणि तेवढा वेळ काम करतो. हे करायला बरा वेळ मिळतो?"

"आई, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे? मी फक्त कामंच करत रहायचे? आपल्या आवडीच्या गोष्टी करायच्याच नाहीत का?" सराव संपवून बाहेर आलेल्या शिवानीने घाम पुसत विचारले. ते ऐकून वृंदाताई चपापल्या.

"मी कुठे असं म्हटलं? माझं एवढंच म्हणणं आहे की घरातल्या बाईने घरातही लक्ष ठेवावे. आम्ही नव्हतो का, नोकरी घर सांभाळत?"

"तुम्ही केलं म्हणून मी ही तेच करावं अशी अपेक्षा का? आणि हे जे काही तुम्हाला मला सांगावेसे वाटले, तेच तुम्ही तुमच्या मुलाला का नाही सांगितले? जेवढा वेळ तो ऑफिसला जातो, तेवढाच वेळ मी ही जाते. तेवढाच किंबहुना त्याच्यापेक्षा थोडा जास्त पगार कमावते. घरात थोडंफार का होईना स्वयंपाकपाणी करते. आणि हो.. आमच्याकडे मावशी येतात. तुम्हाला वाईट वाटायला नको म्हणून त्यांना सुट्टी दिली आहे. ऑफिसमधून आल्यावर कौस्तुभ मोबाईल खेळत बसतो आणि मी विरंगुळा म्हणून भरतनाट्यम करते. यात माझं काय चुकलं?" शिवानी बोलत होती.

"चुकलं तुझं नाही.. आमचं चुकलं." प्रमोदराव म्हणाले.

"बाबा.. मला कोणाला दोष द्यायचा नव्हता. फक्त माझी बाजू मांडायची होती." शिवानी म्हणाली.

"जी मला पुरेपूर पटली आहे. कसं असतं ना.. आपण कितीही पुढारलो तरी मुलांनी घरकाम करणं हे आपण कमीपणाचे मानतो. त्याचवेळेस मुलींनी मात्र बाहेरही करायलाच हवं ही अपेक्षा करतो. हा दुजाभाव खरंतर संपवायला हवा. त्याची सुरुवात आपल्या घरात आजपासून माझ्याकडून.."

"बाबा.."

"अहो.. करणार काय तुम्ही?" वृंदाताईंनी आश्चर्याने विचारले.

"आज संध्याकाळचा स्वयंपाक माझ्याकडून. आणि माझा मदतनीस असेल कौस्तुभ.. तुम्ही दोघी वाटल्यास फिरुन या किंवा गाणी ऐका." प्रमोदरावांनी हुकूम सोडला. "चालेल ना?"

"इश्शय.. काहीही काय.. मी करते स्वयंपाक. तुम्ही जर स्वयंपाक केला तर तुमच्या इतक्या शिक्षणाचा फायदा तरी.."

"वृंदा, आतातरी प्रत्येक गोष्टीत फायदा तोटा बघायचं सोडून दे. काही गोष्टींचा आनंदही घे." प्रमोदराव म्हणाले.

"प्रयत्न करून बघते.. नाहीतर.."

"इतकं शिकून फायदा तरी काय?" कौस्तुभ आणि शिवानी एकत्र म्हणाले आणि सगळेच हसू लागले.


कितीही शिकलेली, नोकरी करणारी सून असली तरी तिने घरातही सगळं बघावं अशी बऱ्याचदा अपेक्षा केली जाते. योग्य की अयोग्य हे तुम्ही सांगालच.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all