एवढं शिकून काय फायदा मग.. भाग १

सासू सुनेची नेहमीची कथा
एवढं शिकून काय फायदा मग??


विषय :नाती सांभाळताना


"शिवानी, ऐकलंस का? आई आणि बाबा येणार आहेत पुढच्या आठवड्यात.." कौस्तुभ फोन ठेवत आनंदाने ओरडला.

"कसं ऐकणार? माझी डान्सची प्रॅक्टिस सुरू होती ना? माझ्या पायाच्या आवाजात गाणी ऐकू येत नाहीत. तुझा आवाज कसा ऐकू येईल?" डान्स करून दमलेली शिवानी घाम पुसत सोफ्यावर बसत म्हणाली.

"ऐक ना सोने.. आता काही दिवस हे टोमणे नको ना.." लाडीगोडी लावत कौस्तुभ म्हणाला.

"मी टोमणे देते?? तूच म्हणालास ना ऐकलंस का? आता तुझा फोन सुरू असताना माझी प्रॅक्टिस सुरू होती. मग मी कसं ऐकणार?" लगेच डोळ्यात पाणी आणत शिवानी म्हणाली.

"अगं ए राणी.. रडतेस काय अशी? अगं ती पद्धत असते ना म्हणायची..ऐकलंस का? बरं ते सोड. आता मुद्द्याचं ऐक ना.. आईबाबा येणार आहेत पुढच्या आठवड्यात." कौस्तुभने परत एकदा सांगितलं.

"अरे व्वा.. छानच.. की.." पायातले घुंगरू काढत शिवानी म्हणाली.

"छान आहेच.. पण मी काय म्हणतो.. ते येणार आहेत तर तू जरा सुनेसारखी वागशील का गं?" कौस्तुभ हळूच म्हणाला. ते ऐकून शिवानीचे घुंगरू सोडणारे हात जागीच थांबले. कौस्तुभच्या लक्षात येताच त्याने पुस्ती जोडली.
"अगं म्हणजे तू तशी चांगली वागतेसच गं. पण थोडीशी.. म्हणजे बघ हं.. आता डान्स करताना कसा तू ड्रेस घातलास.. तसाच.. आईबाबा आल्यावर शाॅर्ट आणि टीशर्ट ऐवजी घातलास तर?"

"मी ड्रेस घालेन.. मग तू पण हे अर्ध्या चड्डीत फिरण्याऐवजी फुलपँट घालून फिरशील?" शिवानीचा प्रश्न येताच कौस्तुभ गडबडला. पण त्याला फार गडबडून चालणार नव्हतं. काहीही झालं तरी त्याला आईबाबांना खुश करायचे होते. त्याचा आणि शिवानीचा प्रेमविवाह. त्याच्या आईला हे लग्न अजिबात मान्य नव्हतं. पण फक्त आणि फक्त कौस्तुभसाठी त्यांनी होकार दिला होता. नाराजी मात्र गेली नव्हती. कौस्तुभने खूपच आग्रह केला म्हणून कौस्तुभच्या लग्नानंतर चार महिन्यांनी ते त्याच्या घरी येणार होते. आईबाबांचा रुसवा काढायची ही संधी त्याला सोडायची नव्हती. म्हणून तो शिवानीला मस्का मारत होता. कारण त्याच्या आईने त्याच्यासाठी निवडलेली मुलगी ही घरात ड्रेस घालणारी, स्वयंपाक करणारी आणि खूप काही होती आणि शिवानी? घरात तिला शर्ट आणि शॉर्ट्सवर तिला 'कम्फर्टेबल' वाटायचे. स्वयंपाक म्हणजे मॅगी, पास्ता आणि जास्तीत जास्त चहा.. बस्स. दिसायला अगदी राजकन्येसारखी असलेली शिवानी खऱ्या आयुष्यात पण राजकन्येसारखीच रहात होती. घरच्या कामांची अजिबात सवय नाही. 'एक्सट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटी मध्ये' जास्त रस असलेली. अनेक पुरोगामी मते असलेली. अशी ही शिवानी आपल्या आईला मनापासून आवडावी हेच त्याला वाटत होते.
लग्नाच्या आधीपासून कौस्तुभ कामानिमित्ताने वेगळ्या शहरात रहात असल्याने त्याच्या आईला फक्त शिवानी खूप शिकलेली आहे आणि कामाला जाते एवढंच माहित होतं. लग्न आणि हनिमून यातच दोघांच्या सुट्ट्या संपल्याने शिवानीचं सासरी राहणं झालंच नव्हतं. त्यामुळेच ही भेट कौस्तुभसाठी खूपच महत्त्वाची होती. शिवानीला कौस्तुभच्या आईचा, वृंदाताईंचा आपल्या लग्नाला मनापासून होकार नाही याचा अंदाज आला होता. पण तिने ती गोष्ट मनावर घेतली नव्हती. आता त्या येणार म्हटल्यावर नाही म्हटलं तरी तिला थोडं टेन्शन आलं होतं.


जुळेल का सासूसुनेचं नातं की उडतील ठिणग्या? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.


सदर कथेचा वापर व्हिडिओ बनवण्यासाठी केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई

🎭 Series Post

View all