"नागवेलीचं पान घ्या,त्यावर तांदूळ ठेवा, त्यावर सुपारी ठेवा, हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करा.."
गुरुजी इतके पटकन म्हणाले की पूजेला बसलेली निशा गोंधळली. गुरुजींचे मंत्र सुरू होते, त्यांना तरी कसं म्हणावं की परत सांगा म्हणून? जेवढं आठवलं तेवढं ती करत होती, शेजारी पूजेला बसलेला तिचा नवरा ताम्हण घेऊन मूर्तीचे जलस्नान करत होता..
"अगं आधी पान.. मग तांदूळ...अगं अगं?? आधी हळद वहायची..काय मुलगी आहे, एवढंही येत नाही"
मागे बसलेल्या सासूबाई तिच्या प्रत्येक कृतीवरून तिला बोलत होत्या.
नव्या घराची पूजा म्हणून निशा आणि महेश पूजेला बसले होते. खरं तर निशा एक शिकलेली आणि नोकरी करणारी स्त्री असल्याने तिला घरातल्या किंवा या पूजेच्या गोष्टींची फारशी माहिती नव्हती. तिच्या याच गोष्टीला तिची कमतरता समजून सासूबाई तिच्या प्रत्येक गोष्टीवर बोट ठेवत होत्या.
पूजा सुरू असताना आधीच गोंधळलेल्या तिचा आत्मविश्वास अजूनच खालावला, तिच्याकडून अजून चुका होत गेल्या आणि ती अजूनच घाबरून गेली.
गुरुजींचे मंत्र सुरूच होते..मध्ये मध्ये ते सांगत,
"आता फुल वाहा, आता अक्षता टाका.."
महेश हे सगळं करत होता, निशाने त्याच्या हाताला हात लावलेला, काही वेळाने दोघांना हात जोडायला लावले आणि पुन्हा पूजा सुरू झाली तेव्हा निशा नवऱ्याच्या हाताला हात लावायचं विसरली,
"अगं हात लाव ना त्याला...एवढही कळत नाही?"
सासूबाई मागून ओरडल्या, गुरुजींनी रागाने त्यांच्याकडे पाहिलं.
पूजेपेक्षा आपली सून कशी आणि कुठे कुठे चुकतेय हे दाखवण्यात सासूबाईंना जास्त रस होता. पूजा संपली, गुरूजींनी प्रसाद आणायला सांगितला..सासूबाईंनी किचनमध्ये जाऊन प्रसादाचं पातेलं आणून ठेवलं. निशाचे सासरे म्हणाले,
"काय छान वास येतोय प्रसादाचा.."
"येणारच, मी बनवलाय.."
"अच्छा, मला वाटलं सूनबाईने.."
"निशाने?? तिला कसला येतोय प्रसाद..अहो साधी भाजी टाकायला एक तास लावते ती. साफसफाईच्या कामातही नुसती बोंब. झाडू मारताना सोफ्याखालून झाडू मार हेही सांगायला लागतं तिला. वरण करायला लावलं तर डाळ अर्धी कच्ची, खिचडी केली तर त्यात मीठ कमी, पोळ्या केल्या तर ना धड गोल ना चौकोन, डोसे करते तर चिटकून जातात, चटण्या करते तर वाटण जमत नाही, सकाळी लवकर उठ म्हटलं तर डोळ्यावरची झोप जात नाही.."
सासूबाईंनी एका दमात सगळा पाढा वाचून दाखवला..
पूजा संपली, गुरुजी हे सगळं ऐकत होते. पूजा चालू असताना मध्ये मध्ये करून सासूबाईंनी खूप डिस्टर्ब केलं असल्याने तेही वैतागले होते, त्यात पूजेच्या या मंगलप्रसंगी सासूबाईंचं नकारात्मक बोलणं गुरुजींना अजिबात आवडलं नव्हतं. त्यांनी एक शक्कल लढवायचं ठरवलं आणि सासूबाईंच्या या स्वभावापासून त्यांच्या सुनेला आणि घराला वाचवायचं ठरवलं..
"मावशी तुम्ही या, इकडे बसा.."
गुरुजींनी आवाज दिला तसं सासूबाई त्यांच्या समोर जाऊन हात जोडून बसल्या. गुरूजी म्हणाले...
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा