Login

प्रत्येक मनाची, स्वतःची वाट

त्या दिवशी योजना लगेच मंजूर झाली नाही. पण माधव जिंकलाच—आपला अट्टहास हरवून, समजूतदारपणा मिळवून.आणि वडाच्या झाडाखाली बसलेली माणसंही…पहिल्यांदाच त्याला खरंच ऐकू लागली होती
कथेचे शीर्षक : प्रत्येक मनाची स्वतःची वाट...लेखक सुनिल पुणेTM

गावाच्या मध्यभागी असलेल्या जुन्या वडाच्या झाडाखाली दर संध्याकाळी काही माणसं जमत. कुणी दिवसाचा थकवा उतरवायला, कुणी गप्पा मारायला, तर कुणी फक्त शांत बसायला तर त्याच गटात एक व्यक्ती होती माधव.
माधव हुशार होता, अभ्यासू होता, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्याकडे नेहमी काही ना काही कल्पना असायच्या. गावाचा विकास, शेतकऱ्यांचे प्रश्न, तरुणांचं भविष्य सगळ्यावर त्याचं ठाम मत असायचं. त्याला वाटायचं, “मी जे विचार करतोय ते योग्यच आहेत. मग सगळ्यांनी ते मान्य का करू नयेत?”

एके दिवशी त्याने गावासाठी एक योजना मांडली. नवीन सहकारी संस्था काढायची, सगळ्यांनी मिळून काम करायचं, नफा समान वाटायचा. माधव मोठ्या उत्साहाने बोलत होता. पण समोर बसलेले सगळे तितक्याच उत्साहाने ऐकत नव्हते. कोणी मान डोलावली, कोणी जमिनीकडे पाहिलं, तर कोणी हलकंसं हसून विषय बदलला.

माधव चिडला,
“तुम्हाला काहीच कळत नाही का? मी तुमच्याच भल्यासाठी बोलतोय!” तो मोठ्या आवाजात म्हणाला.
त्या वडाच्या झाडाखाली नेहमी शांत बसणारे आजोबा रघुनाथ काका हळूच उठले. त्यांच्या चेहऱ्यावर अनुभवाचं शांत हास्य होतं. ते म्हणाले, “माधवा, तुझी कल्पना वाईट नाही. पण एक लक्षात ठेव. जसं सगळ्या बोटांची लांबी सारखी नसते, तसं सगळ्या माणसांचे विचारही सारखे नसतात.” माधव गप्प झाला.
रघुनाथ काका पुढे म्हणाले,
“एखाद्याला आजचं पोट भरणं महत्त्वाचं वाटतं, तर कुणाला उद्याचं स्वप्न. कुणी बदलासाठी तयार असतं, तर कुणी सुरक्षिततेला धरून बसलेलं असतं. तू तुझं म्हणणं मांडलंस, ते पुरेसं आहे. पण सगळ्यांनी तेच मान्य करावं, हा अट्टहास नको.”

त्या रात्री माधव घरी गेला, पण झोप त्याला लागेना. रघुनाथ काकांचे शब्द त्याच्या मनात घोळत राहिले. त्याला जाणवलं आपण चांगले ऐकवायचं तर खूप बोलतो, पण समोरच्याचं ऐकून घ्यायचं विसरतो.

काही दिवसांनी तो पुन्हा वडाच्या झाडाखाली बसला. यावेळी त्याने बोलण्याआधी विचारलं, “तुम्हाला काय वाटतं? तुमच्या अडचणी काय आहेत?”
हळूहळू गप्पा रंगू लागल्या. कुणी भीती सांगितली, कुणी अनुभव, कुणी अपयश. माधव शांतपणे ऐकत राहिला. त्याला कळलं कल्पना तेव्हाच स्वीकारल्या जातात, जेव्हा त्या माणसांच्या स्वभावाला, गरजेला आणि वेळेला समजून घेतात.
त्या दिवशी योजना लगेच मंजूर झाली नाही. पण माधव जिंकलाच आपला अट्टहास हरवून, समजूतदारपणा मिळवून. आणि वडाच्या झाडाखाली बसलेली माणसंही…पहिल्यांदाच त्याला खरंच ऐकू लागली होती....

सुनिल पुणेTM 93598 50065
0