Login

जो आवडतो सर्वांना

भावपुर्ण श्रद्धांजली सर रतन टाटा यांना
रोज सकाळी स्वयंपाक करतांना युट्युब वर एखादा छानसा मोटिवेशनल व्हिडिओ ऐकणे हा माझ्या रोजच्या आयुष्याचा एक भाग आहे. ज्यामुळे काय होते ना की सकाळी सकाळी माझ्या व मुलाच्या कानावरही पडते आणि स्वयंपाक करतांना आपल्या अंतकरणात चांगल्या भावना निर्माण होतात.

आता याला योगायोग म्हणावा की काय काल सकाळी टाटा कुटुंबावर व त्यांच्या कुटूंबातील प्रत्येक सदस्याकडून कशाप्रकारे अगदी विनम्रपणे व कष्टाने टाटा इंडस्ट्रीची भरभराट झाली यावर प्रकाशझोत टाकणारा एक व्हिडिओ ऐकत होती. मनात सहज प्रश्न आला, कशा असतील त्या घरातील स्त्रिया आणि कशी असतील ती तरुण मुलं की त्यांना या जगातील झगमगाटीची अजिबात भूल पडू नये?

एकदा एखाद्या विषयावर किंवा एखाद्या व्यक्तीवर आधारित काही युट्युब वर बघितलं की ते आपल्याला त्याच प्रकारचे साहित्य सजेस्ट करतं. म्हणून की काय संध्याकाळी माझ्या फीडमध्ये रतन टाटा यांच्या खराब तब्येतीबद्दल बातम्या आल्या. ते बघून कसं तरी झालं. म्हटलं देवा जगात एखादी व्यक्ती असेल जिला अमरत्व द्यायला हवं तर ति व्यक्ती ही आहे आताच त्यांना नेऊन पोरके नको करू आम्हाला. सर्व भारतीयांच्या पित्या समान आहेत हे. इतके वय होऊनही सदैव प्रसन्नता दिसली त्यांच्या चेहऱ्यावर.

परंतु कशाचे काय, ते म्हणतात ना

'जो आवडतो सर्वांना, तोचि आवडी देवाला'

घेऊन गेला तो देव त्यांना.

सरते शेवटी काही शब्द या महामानवासाठी ज्याच्या पायाची धूळ होनेही या जन्मात तरी मला शक्य नाही.

खूप झटलात तुम्ही,
क्षण क्षण माणुसकीला दान दिला तुम्ही,
पिता म्हणजे असतो काय
याची शिकवण देऊन गेलात तुम्ही

हरी ॐ
अर्चना सोनाग्रे