तथ्य-2

जगणं नेमकं काय असतं?
"तेच तर सांगतेय ताई.. इतके व्याप आहेत ना..काव्याची शाळा, कॉलनीतील समारंभ, सणवार, पाहुण्यांची रेलचेल... दिवसभर चालू असतं.."

"पुन्हा तेच..अगं तुम्ही त्याच त्याच वर्तुळापाशी येऊन पुन्हा थांबताय.. तुम्ही लोकांसाठी इतकं करताय, स्वतःसाठी कधी जगणार??"

रश्मीच्या मनात कितीतरी वेळ ते वाक्य घुमत होतं.. या विचारात तिने कधी सगळी भांडी घासली तिलाच कळलं नाही...

तिकडे दाजीसुद्धा केदारला म्हणत होते,

"तुही इंजिनिअर आहेस..जॉब केला असतास तर मोठं पॅकेज असतं तुला.."

"अहो दाजी मी पॅकेजइतकं कमवतोच की..हा आता थोडंफार होतं कमी जास्त..पण बरं आहे त्यातल्या त्यात.."

"तेच तर.. माझा चुलतभाऊ 50 लाखाचं पॅकेज घेतोय US ला..तिकडेच सेटल झालाय..त्याचं राहणीमान, स्टेटस सगळं बदललं..तो काहीच नव्हता रे, अगदी ढिसाळ..पण बघ किती प्रगती केली त्याने..खरंच, आयुष्य भरभरून जगतोय तो..आणि आपण, पूर्णवेळ संसार, नातेवाईक आणि घर..या चक्रातच अडकलो..पण आता मी आणि तुझ्या ताईने ठरवलं आहे..आयुष्य खऱ्या अर्थाने जगायचं..मस्तपैकी फिरायचं, हिंडायचं.. मजा करायची.."

हे ऐकून केदारच्या मनात चलबिचल झाली..आजवर स्वतःच्या व्यापात अडकलेला तो या सगळ्याचा विचारच करत नव्हता...

रात्री उशिराने ताई आणि जीजू घरी गेले. रश्मी आणि केदार मात्र त्याच विचारात अजून गुरफटलेले होते. रश्मी म्हणाली,

"आपलं खरोखरच जगायचं राहून जाईल का रे?"

"आपण उलट्या दिशेने तर जगत नाहीये ना?"

"ताई बोलल्या तेव्हा मला जाणीव झाली... काहीतरी करायला हवं.."

"ताई बरोबर बोलली...मी काय म्हणतो, एक ट्रिप काढुयात..युरोप ट्रिप.."

"खरंच??"

"हो.. एकदा फिरून येऊ...उद्या असं नको वाटायला की जगायचं राहून गेलं.."

"अहो पण खर्च.."

"काळजी करू नकोस, मी बघेन ते.."

ते ऐकून रश्मी सुखावली खरी, पण एकदम असं आपलं रुटीन सोडून फिरायला जाणं तिलाही कठीणच जात होतं..

संध्याकाळी सोसायटीच्या बायकांची मिटिंग ठरलेली..या वर्षीच्या सोसायटीच्या गणपतीसाठी कार्यक्रम आखायचे होते. दरवर्षी रश्मीच्या आयोजनाशिवाय हे सगळं होत नसे, रश्मीही मोठ्या उत्साहाने सगळं करत असायची..पण आज तिने ग्रुपवर सरळ मेसेज टाकला..

"यावर्षी मला काही नियोजन जमणार नाही..आम्ही पंधरा दिवस बाहेर चाललोय.."

असा मेसेज टाकताच तिला रिप्लाय वर रिप्लाय आले..

"अगं असं कसं चालेल? तुझ्याशिवाय जमणार आहे का आम्हाला?"

"कुठे जायचं आहे इतकं अर्जंट??"

"तू गम्मत करतेय ना?"

हे वाचून रश्मीला रागच आला..किती गृहीत धरतात लोकं आपल्याला? आपण नसलो तर इतकं का अडतय यांचं? ते काही नाही..यावेळी ट्रीपला जायचं म्हणजे जायचं..

क्रमशः


🎭 Series Post

View all