तथ्य-3

मराठी कथा
केदारला त्याचे क्लाएंट फोनवर फोन करत. बरेचसे बिनकामाचे, केवळ हालहवाल विचारण्यासाठी.. केदारने शेवटी फोन बंद केला आणि मनाशीच म्हणाला,

"मी काय पूर्णवेळ रिकामा वाटलो काय यांना?? जो तो येतो आणि माझ्याकडे मोकळं होतोय..मलाही स्वतःचं काही आयुष्य आहे की नाही?"

रश्मी आणि केदारने शेवटी युरोप ट्रिप फायनल केली आणि त्या बेताने तयारी सुरू केली. उत्सुकता होतीच पण सोबतच धाकधूकसुदधा होती मनात. रोजच्यापेक्षा वेगळं जीवन जगणार होते दोघेही..

प्रवासाला जायच्या आदल्या दिवशी दोघांनी बॅग पॅक केल्या, सगळी तयारी केली..रात्री त्यांना काही झोप येईना, ते गप्पा मारू लागले..

"आता खरं आपण स्वतःसाठी जगतोय असं वाटतंय.."

"खरंच??"

रश्मीने प्रश्न केला तसा केदारही विचारात पडला.. ताई आणि दाजींनी सांगीतल्याप्रमाणे दोघांनीही फिरायचा प्लॅन केला खरा पण मनावर वेगळंच दडपण होतं.. नक्की काय ते दोघांनाही कळत नव्हतं..

"अहो..मी सोसायटीच्या बायकांना यावेळी सरळ नाही म्हणून बोलले..योग्य केलं ना?"

"हो मग, मीही माझ्या मित्रांचे फोन घेतले नाहीत आज..बरं झालं ना?"

दोघांनाही याच गोष्टींचं वाईट वाटत होतं पण मन मान्य करायला तयार नव्हतं..

अखेर दुसरा दिवस उजाडला, रश्मी, केदार आणि काव्या एअरपोर्ट वर गेले..तिथे बराच वेळ लागणार होता..इतका वेळ स्वस्थ बसून राहायची सवय नसल्याने दोघेही चांगलेच वैतागले. अखेर बऱ्याच प्रतीक्षेनंतर दोघेही विमानात बसले आणि प्रवासाला सुरवात झाली.

काव्याला मजा वाटत होती, रश्मी आणि केदारलाही हा नवीन अनुभव सुखावह वाटू लागलेला. एका एजंटने त्यांची उतरण्याची, राहण्याची सगळी व्यवस्था करून ठेवली होती.

रश्मी आणि केदार या प्रवासात "जगणं" शोधत होते...

विमान लँड झाले. तिघेही एका हॉटेलमध्ये थांबले. दुसऱ्या दिवशी एक ड्राइव्हर त्यांना पर्यटनस्थळी नेणार होता. एक दिवस आराम करून दुसऱ्या दिवशी तिघेही फिरण्यासाठी तयार झाले.

रश्मीने तिने कित्येक वर्षांपासून कपाटात मागे कोंबलेला वनपीस घातला होता. तिला वेगळंच वाटत होतं..कॉलनीत असं काही घालून फिरणं शक्य नव्हतं.. आता मस्त घालून फिरता येतंय तर त्यात आनंद सापडतच नव्हता..तरीही ती त्यात "जगणं" शोधत होती..

दोन दिवस झाले, बऱ्यापैकी ठिकाणं पाहून झाली. युरोपचं ते आधुनिक रूप, प्रशस्त घरं, अद्ययावत सुविधा हे बघून त्यांचं मन हरखून गेलं. प्रत्येकवेळी नवीन अनुभव येत असायचा..

चार दिवस झाले..आता मात्र त्यांना खरोखर कंटाळा येऊ लागलेला..नावीन्य नावीन्य म्हणतात ते संपत आलेलं..रश्मीलाही वातावरणाशी समरस म्हणून रोजच्या रोज आधुनिक कपडे आणि चेहऱ्यावर मेकप चढवण्याचा कंटाळा आला. केदारला मित्रांची आठवण येऊ लागलेली.

दिवसभर फिरून झाल्यावर तिघेही एका हॉटेलमध्ये जेवायला थांबले. तेवढ्यात त्यांच्याजवळ एक माणूस आला..

"हॅलो मिस्टर केदार.."

क्रमशः

🎭 Series Post

View all