तथ्य-4 अंतिम

मराठी कथा
केदारने वळून पाहिलं. त्याने आठवायचा प्रयत्न केला आणि त्याला आठवलं..हा तर दाजींचा चुलतभाऊ..

"अरे सुयश...तू? व्हॉट अ सरप्राईज.."

"फिरायला आलात वाटतं.."

"हो..आठ दिवसांनी ट्रिप काढलीये..जाऊ अजून 2-3 दिवसात घरी.."

"माझं घर इथून जवळच आहे..मी काहीएक ऐकणार नाही, तुम्ही जेवण झालं की या घरी.."

"अहो, कशाला.."

"अहो फार मुश्किलीने माझी माणसं मला इथे भेटली, मी असाच थोडी जाऊ देईन?"

"बरं ठीक आहे, आमचं झालं की येतो आम्ही.."

"मी पुढे होतो, लवकर भेटला असता तर जेवायला घरीच आला असता.."

"हरकत नाही, भेटणं महत्वाचं..तुम्ही व्हा पुढे.."

सुयश गेल्यावर केदार रश्मीला म्हणाला,

"दाजी फार कौतुक करत होते याचं.. पन्नास लाखाचं पॅकेज घेतो म्हणे..दिसतंच ते त्याच्या राहणीमानवरून..."

जेवण आटोपून तिघे सुयशच्या घरी गेले. त्याच्या बायकोने आनंदाने तिघांचं स्वागत केलं..त्यांना पाहून तिच्या डोळ्यात पाणीच आलं..

"भारतातलं कुणी आलं ना, असं वाटतं की माहेरहूनच कुणीतरी आलंय.."

सुयशचं घर नुसतं बघत राहावं असं होतं, त्याच्या श्रीमंतीचं दर्शन त्यातून होत होतंच. त्यांच्या गप्पा सुरु झाल्या, इकडचे तिकडचे विषय सुरू असतानाच सुयश म्हणाला,

"खरंच...असं वाटतं ना ही नोकरी सोडून द्यावी आणि मस्तपैकी मायदेशात परत यावं..नोकरी ती नोकरीच, कितिही पैसा असला तरी हमालीच एक प्रकारे, असं वाटतं स्वतःचा छोटासा का होईना बिझनेस असावा..पैसे कमी असले चालतील पण मनाला समाधान असावं, स्वतःच स्वतःचा बॉस असावं...केदारभाऊ, तुमचा हेवा वाटतो मला खरंच.."

तिकडे सुयशची बायको रश्मीजवळ मन मोकळं करत होती, कितीतरी दिवसानी तिला असं कुणीतरी मोकळं बोलायला भेटलं होतं..

"वहिनी, तुम्हाला कंटाळा आला तर सांगा हा..मला आज किती बोलू अन किती नको असं झालंय.. मन मोकळं करायला कुणीच नसतं हो, शेजारी पाजारी सगळे परदेशी, त्यांना स्वतःच्याच घरचे जड होतात...आणि नवरा रात्रंदिवस कामात अडकलेला..मी भारतात होते ना, आमच्या सोसायटीत कार्यक्रम व्हायचे..कितीतरी सणवार एकत्र व्हायचे..किती धमाल असायची..माणसांचा गोतावळा असायचा, नातेवाईकांची रेलचेल असायची..इथे मी सुखी नाही असं नाही..पण ते सगळं बघून वाटतं की ते खरं "जगणं" होतं.."

हे ऐकून रश्मीच्या मनात अजूनच चलबिचल वाढली.

पुढील 2-3 दिवस ट्रिप पूर्ण केली आणि परतीच्या प्रवासासाठी तिघेही विमानात बसले. केदार आणि रश्मी दोघेही शांत होते. गाढ विचारात बुडाले होते. तेवढ्यात रश्मी म्हणाली,

"सोसायटीत गणपतीच्या कार्यक्रमाची धावपळ चालू असेल, मागच्या वेळी मातीची आरास ठरलं होतं, काय केलं बायकांनी यावेळी काय माहित.."

"आणि माझे मित्र, क्लाएंट फोन करून थकले असतील..एका बिझनेस समीट साठी बोलवत होते..एक तर मी सांगितलंही नाही त्यांना ट्रिप बद्दल.."

दोघेही एकमेकांकडे बघू लागले,

"आपण 'जगायचं' म्हणून बाहेर पडलो ना? पण मन मात्र आपल्या विश्वातच अडकलं आहे.."

"खरंच जगलो का हो आपण?"

या प्रश्नाने केदार विचारात पडला..आणि म्हणाला,

"सुयश आणि त्याच्या बायकोचं बोलणं ऐकलंस ना? त्या दोघांचं 'स्वप्न' हे आपलं खऱ्या आयुष्यातलं 'जगणं' आहे हे लक्षात आलं का तुझ्या?"

"बरोबर..ते दोघे जे स्वप्न बघत होते..ते आयुष्य आपण प्रत्यक्षात जगतोय..मग आपण कोणतं असं वेगळं 'जगणं' शोधत होतो?"

दोघांनाही कळून चुकलं..की आपण जे जगतोय, आपण जे विश्व आपल्या आजूबाजूला निर्माण केलंय तेच खरं जगणं आहे...आपण जे जगतोय ते कुणाचं तरी 'स्वप्न' आहे..मग 'जगायचं राहून जातं' याचा अर्थ तरी काय? आता आपल्या दोघांना चुकल्यासारखं वाटतंय, काहीतरी निसटतंय असं वाटतंय.. घरी गेल्यावर आपल्या व्यापात आपण पुन्हा अडकलो की समाधान वाटेल..तेच खरं 'जगणं' असावं का?

विचार करण्यासारखी गोष्ट आहे मैत्रिणींनो,

बऱ्याचदा आपण तक्रार करत असतो की कुटुंब, संसार, मुलं यांच्यामध्ये स्वतःचं जगणं राहून गेलं, या शब्दातच काही तथ्य नाही असं मला वाटतं.. हे 'जगणं' असं वेगळं काय असतं?

बाहेर हिंडणं, फिरणं, आवडत्या गोष्टी करणं, हवे तसे कपडे घालणं ही सगळी क्षणिक सुखं आहेत..क्षणात सुख आणि क्षणात त्याचा विसरही पडतो..त्या क्षणांना 'अनुभव' म्हणता येईल, 'जगणं' नाही...

आपण जे आयुष्य जगतो ते कितीतरी लोकांचं स्वप्न असतं. आपण जे मिळालंय त्याच्याकडे सर्रास दुर्लक्ष करून जे आपल्याकडे नाही त्यामागे धावतो. आपल्या परिस्थितीनुसार आपण जे विश्व तयार केलं आहे त्यात रममाण होणं हेच तर खरं जगणं आहे..मग आपण कोणत्या नसत्या काल्पनिक जगाकडे वाहवत जातो?

'जगणं' कधीच राहून जात नाही, त्यातला 'आनंद' शोधण्याचं तेवढं राहून जातं...

समाप्त


🎭 Series Post

View all