लघुकथा -
फॉल बिडिंग - माझं काय चुकलं?
फॉल बिडिंग - माझं काय चुकलं?
रविवारच्या निवांत सकाळी सुमेधा आणि सुमित गरमागरम इडली सांबरच्या नाश्त्याचा आस्वाद घेत होते. इतक्यात सुमेधाचा फोन वाजला. मोबाईलवर अस्मिताचं नाव दिसताच स्वारी खुश झाली. दोघी जिवाभावाच्या मैत्रिणी. सुमेधाचा नवरा सुमित पुटपुटला, "आता तासाभराची निश्चिंती. सांबार गार होईल तुझं."
"तू खाऊन घे मी नंतर खाते." सुमेधाने लागलीच फोन उचलला,
"हाय अस्मि आज कसा काय एकदम सकाळीच फोन केलास."
"अगं खास बातमी आहे. आपल्या तनयाचं लग्न ठरलंय. प्रत्यक्ष यायला वेळ नाहीये म्हणून फोन केलाय आणि व्हाट्सअप वर पत्रिका पाठवते तू आणि सुमितने नक्की यायचं."
"खूप खूप अभिनंदन! अगं यायचं म्हणजे काय मला नुसती मुहूर्ताची वेळ आणि ठिकाण कळलं तरी मी एका पायावर उड्या मारत येणार बघ. खूप छान झालं."
अस्मिता फोनवर जावयाबद्दल, सासरबद्दल भरभरून बोलत होती. दोघींच्या इतरही बऱ्याच गप्पा झाल्या. सुमित बोलल्याप्रमाणे तासभर दोघी अगदी तल्लीन होऊन गप्पा मारत होत्या. फोन ठेवल्यावर सुमेधा सुमितला म्हणाली,
"अरे तनयाचं लग्न आहे पुढच्या दहा तारखेला. आपल्याला दोघांनाही आग्रहाचे आमंत्रण आहे तेव्हा तू तुझ्या ऑफिसमध्ये आधीच रजा टाकून ठेव."
"अगं मी फोनवर ऐकलं सगळं. आपण नक्की जाऊया."
सुमेधाच्या उत्साहाला उधाण आलं होतं. तिने व्हाट्सअप वर लग्नपत्रिका पाहिली आणि सुमितला म्हणाली,
"पत्रिकेत स्पष्ट म्हटलंय 'कृपया आहेर आणू नये' पण आपण अगदी छान व्यवस्थित आहेर करूया माझ्या जिवाभावाच्या सखीला."
"तू म्हणशील तसं. तू तुझ्या मनाप्रमाणे सर्व खरेदी कर."
सुमेधाने अस्मिताच्या आवडीच्या जांभळ्या रंगाची महागातली बनारस सिल्क घेतली. तिच्या मिस्टरांसाठी सिल्क कुर्ता आणि पायजमा घेतला. तनयासाठी तिने सुंदरसं पंजाबी ड्रेस मटेरियल घेतलं. दुकानदाराने फॉल बिडिंग आणि पॉलिश करून देण्याचे विचारलं तेव्हा आधी तीने नकोच म्हटलं. नंतर तिने विचार केला की हल्ली फॉल बिडिंग आणि पॉलिश खूपच महाग झालंय तर आपण करून घेऊया. लग्नाच्या आदल्या दिवशीच सुमेधा आणि सुमित अस्मिताच्या घरी गेले. त्यांचं खूपच छान स्वागत झालं. दुपारी हळदीचा कार्यक्रम होता. जेवण आटोपल्यावर सुमेधाने त्या तिघांना पाटावर बसवलं. हळद कुंकू लावून त्यांना सर्वांना आणलेला आहेर दोघांनी जोडीने केला. आहेर आणल्याबद्दल अस्मिता सुमेधाला लटकंच रागावली.
लग्न थाटामाटात पार पडल्यानंतर थोडं शांत निवांत झाल्यावर अस्मिताने आलेला आहेर पाहण्यास सुरुवात केली. तिने सुमेधाने दिलेली बनारस सिल्कची साडी उघडली तिला फारच आवडली तिच्या आवडीचा रंग सुमेधाने घेतला होता. पण साडी पाहिल्यावर तिच्या लक्षात आलं की साडीला फॉल बिडिंग केलेलं आहे. कोणाला देताना आपण साडीला फॉल बिडिंग करून देत नाही हा काय प्रकार असंच तीच्या मनात आलं. कदाचित सुमेधाला कोणीतरी दिलेली साडी किंवा तिला न आवडलेली साडी तिने आपल्याला दिली की काय असा गैरसमज अस्मिताच्या मनात निर्माण झाला. तिला एकंदरीत फॉल बिडिंग करून दिलेली साडी मनाला रुचलीच नाही.
नंतर काही दिवसांनी सुमेधा आणि अस्मिताची एक कॉमन मैत्रीण अस्मिताकडे आली होती तेव्हा बोलता बोलता अस्मिताने तिला सुमेधाने दिलेल्या साडी बद्दल सांगितलं. ती मैत्रीण अस्मिताला म्हणाली,
"अगं सुमेधा तुझी एवढी जवळची मैत्रीण ती असं नाही करणार. तिने तुझ्यासाठी नक्कीच नवीन साडी विकत घेतली असणार." अस्मिताने ही गोष्ट सुमेधाला सांगू नकोस असं तिला बजावलं. पण स्त्रियांच्या पोटात काही गुपित राहू शकत नाही हेच खरं. तिने लगेचच फोन करून सुमेधाला सांगितलं की तू अस्मिताला फॉल बिडिंग केलेली साडी दिली ते तिला काही आवडलं नाही. सुमेधा म्हणाली,
"अगं हल्ली मोठ्या शोरूममधून आपण साड्या घेतो तेव्हा महागाच्या साड्यांना ते फॉल बिडिंग आणि पॉलिश करून देतातच. एरव्ही इतरांना देताना आपण तसं करत नाही. मी विचार केला अस्मिताला परत तो खर्च येऊ नये आणि आपली मैत्रीणच आहे म्हणून मी तसं केलं त्यात माझं काही चुकलं का." गैरसमजामुळे आपली मैत्री तुटायला नको म्हणून सुमेधाने लगेचच अस्मिताला फोन केला.
"अस्मि अगं आपण आपल्या अगदी जवळच्या, घरातल्या लोकांसाठी साड्या घेताना फॉल बिडिंग करतो ना. मी तुझ्याकडे त्याच नजरेने बघते म्हणून मी तुला फाॅल बिडिंग केलेली साडी दिली. तू गैरसमज करून घेऊ नकोस."
"सुमेधा तुला कळलं पण! अगं माझी चूक झाली मी तुझ्याबद्दल असा विचार करायला नको होता. पटकन फॉल बिडिंग केलेली साडी पाहून मला विचित्र वाटलं. मला माफ कर."
"अगं कोणत्याही प्रकारचा संशय मैत्रीमध्ये नेहमीच दरी निर्माण करतो. प्लीज तू तो काढून टाक."
"अगं आपली मैत्री एव्हढी तकलादू नक्कीच नाही. मी खरं म्हणजे तुला सांगणारच नव्हते."
"एका अर्थी कळलं ते बरं झालं गैरसमज दूर झाला ना." दोघींनी मनमोकळ हसत एकमेकींचा निरोप घेतला.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा