Login

फॅन्टमची ताई कथामालिका भाग ३

महिलांची तक्रार आहे. मोबाईलने खाल्ले डोके फार.
भाग - ३

निरुपा कारखान्याच्या गेटवर आली. वाॅचमन मोबाईलवर अगदी व्यस्त होता. त्याने एक नजर दोघींकडे बघितले. हसून पुन्हा, मोबाईल मध्ये काहीतरी बघू लागला. 'वा रे वा वाॅचमन. मोबाईलने पार वेड लावलं लोकांना!' पुटपुटत बिंदू आणि नंतर निरुपा आत गेली. निरुपाने लगेच कामकाज बघायला सुरुवात केली. ती तिचं व्यक्तीमत्व विसरुन कामात गर्क असायची. क्षणभर, आपण ओळखतो ती हीच का? असे सुद्धा बिंदूला वाटले. तसेही अधून मधून ही चमत्कारीक वागतेच बाईऽऽ गालातल्या गालात हसून तिनेही कामाला सुरुवात केली.

साबण, फेसवाॅश बनवण्याची प्रक्रिया सुरु होती. २०/२५ स्त्रिया नेमून दिलेली कामे करत होती. कोण काय करतय, निरुपा त्यांच्या जवळ जावून माहिती घेत होती, बघत होती. तेवढ्यात तिचे लक्ष वैशालीच्या टेंगूळ आलेल्या कपाळाकडे गेले. "काय गं काय झाले? पडलीस का?कसं टेंगूळ आलं तुला?" काळजीने तिने विचारले.

"काही नाही ताई, ते असचं लागलं." पुढे काही न बोलता ती आपलं काम करु लागली. तिच्या डोळ्यांत टचकन आलेलं पाणी तिने शिताफीने दडवले. पण निरुपाच्या नजरेतून सुटले नाही. तेव्हढ्यात वैशालीची मैत्रिण साधना म्हणाली. "हो गं काही नाही म्हणे, निरुपाताई तिच्या नवर्‍याने तिला मारले. वरुन तिचे जमवलेले पैसेही घेऊन गेला होता काल." "पण काय गं, तो तर दारु पित नाही. मग, काय केले त्याने पैसे?" निरुपाने विचारले. "ताई त्याला नवीन मोबाईल घ्यायचा होता. १८ हजारांचा. ही नाही म्हणत होती त्याला. ते रिल्स वगैरे बनवायचे होते. काम धंदा न करता, घरी बसून संसार चालवायचा त्याचा विचार होता..." वैशालीच्या वतीने साधना सांगत होती.

"अगं पण मोबाईल तर मी बघितला होता भूषण जवळ. मग नवीनच का पाहीजे होता?" आश्चर्याने निरुपा म्हणाली. "अहो ताई, त्याचा मोबाईल मधून मधून बेशुद्ध पडायचा...नेमका कुणाचा काॅल आला किंवा एखादा ॲप उघडायचा असेल तर, लवकर ओपन होत नसे. मग थापडा मारुन मारुन त्याला शुद्धीवर आणायचा प्रयत्न करायचा. नाही सुरु झाला की चिडायचा...काल पुन्हा असेच झाले. खुप चिडला, मला मारले, लोटले आणि कपाटातील साडीत लपवून ठेवलेले पैसे शोधून, घेऊन गेला. आणि मोबाईल घेऊन आला..!"
वैशालीला हुंदका दाटून आला होता.

'काय पण माणूस आहे हां. इतका गरीब स्वभावाचा, हिला नेहमी जपणारा. मोबाईल घ्यायसाठी, रिल्स बनवायसाठी...बायकोला मारतो...' निरुपा विचार करु लागली.

"अगं पण किती सज्जन आहे गं तो. नम्रतेने बोलतो. देवळात जातो. भक्ती करतो. मग कसं काय?" निरुपा विचारमग्नं झाली होती.
"आता तोंडावरच बोलते. तो त्याचा जुना मोबाईल होता नां तेव्हाच त्याने मला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली होती. इथल्या सगळ्याच महिलांचे नंबर आहेत त्याच्या जवळ. सगळ्या त्याच्या फ्रेंडलिस्ट मध्ये आहेत...सारखा काही नां काही मेसेंजर मध्ये मेसेज पाठवत राहतो. भारीच रिकामटेकडा आहे ताई तो..."पाणी प्यायला गेलेल्या वैशालीकडे बघत हळू आवाजात साधना, निरुपाला सांगत होती.

निरुपाने चमकून तिच्याकडे बघितले, "काय म्हणतेस? खरेच का?"
"हो नां ताई, खोटे वाटत असेल तर, बाकीच्यांना पण विचारा. वैशालीचा नवरा आहे म्हणून आम्ही काही म्हणत नाही. जमेल तसे देतो उत्तर...!" एवढे बोलून साधना चुप झाली. तिने येणार्‍या वैशालीकडे नजरेनेच इशारा केला. निरुपाने मग काहीच विचारले नाही.

बिंदूने पण त्यांचे संभाषण ऐकले होते. ती निरुपाला म्हणाली. "थांब आता ह्या वैशालीच्या नवर्‍याचा बंदोबस्तच करते. त्या फॅन्टमच्या बहिणीला सांगते त्याचे नाव..."
"हो, जसे काही ती तुझ्या ओळखीचीच आहे. पण हो गं, सांग तू तिला भेटून. पण साधना म्हणते ते, खरे आहे का? तो तसा वाटत नाही गं...मला तर खूपच सालस वाटतो."
"सालस म्हणे, मलाही फ्रेंड रिक्वेस्ट आली होती त्याची. वैशालीचा नवरा म्हणून  ॲक्सेप्ट केली. पण, गुड माॅर्निंग गुडआफ्टरनून आणि सार्‍या जमान्या भर्‍याचे नुसते मेसेज पाठवत असतो. घरी कधी बायको, मुलांना त्याने, नजरे समोर असून, गुडमाॅर्निंग म्हंटले नसेल. पण फेसबुकवर तो ॲक्टीव आहे. आणि आता तर रिल्स बनवून सारखा पाठवत राहतो. मला तर त्याचा खूप राग आला आहे. मी 'फॅबला' निरोपच पाठवते." तावाने बिंदू बोलत होती.
"आता हे 'फॅब...' काय, कोण?"
"अगं, फॅन्टमची बहिण...'फॅब...' हाहाहा!" दोघीही मोठ्ठ्याने हसल्या.

"अच्छा, तिचा पत्ता मला पण दे मग. अस कुणी असेल तर त्याच्या विषयीही तक्रार करते मग...!" आणि दोघीही खळखळून हसल्या.
"हो आधी तर तुझ्या नवर्‍याचाच दे पत्ता तिला...तो ही त्यातलाच...!"
हसता हसता जणू ब्रेक लागला निरुच्या हसण्याला. तिने थंडपणे बिंदूकडे बघितले..."अगं गंमत गं...हाहाहा" बिंदू मोठ्ठ्यांने हसली.
क्रमशः
प्रश्नं पडला असेल नां! ही 'फॅब...' कोण आहे...?
वाचा मग पुढील भाग!
०००
0

🎭 Series Post

View all