Login

फॅन्टमची ताई भाग ५

महिलांची तक्रार आहे. मोबाईलने खाल्ले डोके फार.
भाग - ५

निरुपा डोळे चोळतच दार उघडते. काय झालं आई? अश्या प्रश्नार्थक नजरेने ती सासूकडे बघते. "अगं निरंजन रात्री बाहेर गेला तो आलाच नाहीये अजून...!" असं...तिला जणू काही फरकच पडला नव्हता. गुपचूप सपाट चेहर्‍याने तिने सासूकडे बघितले. आणि ती बाहेर न्हाणीघराकडे वळली. "अगं मी काय म्हणते..?"
"हो आई येतील नां तेऽ मागे दोन तीन दिवस, आपल्याला न सांगता मित्राकडे गेले होते...तसेच आताही गेले असतील. चिंता नका करु तुम्ही." तिने न्हाणीत घुसत म्हंटले. 'अरे हो, मनमौजी पोरगा. काम धंदा नको ह्याला. बायकोच्या जीवावर मौज करतो. पण मला काळजी वाटते. काही दिवसांपासून शहरातील लोक गायब होत आहेत. हा मित्रासोबत गेला असेल तर ठिक...नाहीतर काही दगाफटका झाला तर?' विचार करुनच ती जरा घाबरली. पण दुसर्‍याच क्षणी मनातील विचार झटकून ती देवाचा धावा करु लागली.

निरुपा शांतपणे घरातील कामं आटपत होती. तेवढ्यात वैशाली, साधना, बिंदू धावतच तिच्याकडे आल्या. त्यांना आलेलं बघून तिने चेहर्‍यावर प्रश्नार्थक भाव आणून, काय झाले म्हणून विचारले. तिकडून सासूबाईपण बाहेर आल्या. एवढ्या सकाळी कश्या काय आल्या ह्या मुली? तिच्याही मनात गोंधळ दाटला.

वैशाली रडत होती. बहूदा खूप वेळ रडली असावी. तिचे डोळेही सुजलेले होते. निरुपा मॅनेजर होती. ती नेहमी सहकार्‍यांशी प्रेमाने बोलायची. हवी ती मदत न मागताही करायची. म्हणून काही प्राॅब्लेम असल्यास सगळ्या तिला सांगायच्या. मात्र ही प्रेमळ असली तरी तिची 'झांबलट...' ही प्रतिमा होतीच. एकंदरीत तिच्याशी कसेही वागले तरी ती प्रतिकार करणार नाही. हे निश्चित माहित होते सगळ्यांना.

"बस झाले नां, का एवढी रडतेस. काल पर्यंत भांडण करत होतीस त्याच्या बरोबर. आणि रात्रीपासून त्याच्या आठवणीत गळा काढतेय...!" साधना तिला रागवत म्हणाली. "अगं काहीही झाले तरी माझा नवरा आहे तो. माझं त्याच्यावर प्रेम आहे. त्या फॅब ने त्याला काही केलं तर...?" कल्पनेने ती अजूनच रडू लागली.

हकीगत अशी, परवा भूषणने मोबाईल आणल्यावर, त्यारात्री पासून तो घरी परतला नाहीये. त्याचा मोबाईल बंद आहे. हा चिंतेचा विषय वाटत होता वैशालीला. आधीच सारंगपूर सारख्या छोट्या शहरात कोणतीच गोष्ट लपून राहत नव्हती. त्यात माणसे अचानक गायब व्हायला लागली. दोन चार सोडलीत तर बाकीचे अजूनही परत आले नव्हते. की त्यांचा काही मागमूसही नव्हता. परतलेली माणसे, कुणाला काही सांगत नव्हती. गुपचुप आपले काम भले आणि आपले घर भले...अशी वागत होती. तसे पाहिले तर हा सकारात्मक बदल होता. त्यांच्या घरच्यांना आवडला होता. पण जे लोकं परतली नाहीत. त्यांचे घरवाले चिंतेत होते.

त्यातच शहरात काही पत्रके भेटली.
'आपल्या सोडून दुसर्‍यांच्या आयाबहिणींची काळजी करणारे, विचारपूस करणार्‍या युवक युवतींनी आमच्याशी संपर्क साधावा...! आवड असणार्‍याला नोकरीची सुर्वण संधी!'
बिंदूने तर अगदी आनंदाने त्यातील एक पत्रक निरुपाला दाखवले "पण...मग त्यांनी तर इथे नंबर वगैरे काहीच लिहिला नाही." निरु. "हवा कशाला नंबर? फॅन्टमच्या ताई कडे जादू आहे. तिला सगळं कळतं. ती बरोबर हेरते आणि मग घेऊन जाते माणसांना!" बिंदू चित्कारत म्हणाली.

ते ऐकून वैशाली रडू लागली. तिचे बघून सासूबाई रडू लागल्या. "बाई माझ्या निरंजनच कसं? त्याला पण नेलं की काय फॅबने?"
निरुने सासूला शांत केले. वैशालीला पण शांत रहायला सांगितले. मग म्हणाली, "हे बघा असे रडून उपयोग नाही. काही लोकं गायब होतात. काही दिवसाने परत येतात. तसेच आपल्याही घरचे परत येतीलच. आणि बिंदू म्हणते तशी, 'फॅब' बद्दल...मला तर ती उपद्रवी वाटत नाही. कारण जे लोक परत येतात. ते ब्रेनवाॅश होऊनच आलेले असतात. तुमच्या लक्षात आले का? जे बिघडलेले वाटत होते. तेच लोक गायब व्हायचे!" निरुने लाॅजीक लावले.

"नाही गं असं काही नाही. ते आमचे म्हातारे बोरावणे काका..ते सुद्धा गायब झाले होते. शाम नगरातली सुनीता नाही का? तिचे बाबा, किती सिंम्पल आहेत. रिटायरमेंट नंतर आपण भले आणि आपला मोबाईल भले...नुसते गुपचूप बसलेले असतात. काहीच त्रास नाही त्यांचा घरात. ते सुद्धा गायब झाले होते...पण, परत आले लोकं तर चांगली गोष्ट आहे. नाही आले तर, फॅन्टमच्या ताईचे मन फिरले तर...? त्यांना काही केलं तर...?" बिंदू म्हणाली.

"हो बाई माझा पोरगा तीन महिने झाले परत आला नाही. काही झालं असेल का त्याला? फॅबनं मारलं असेल का त्याला? आणि आता माझा निरंजन...अरे देवा, वाचवं माझ्या निरंजनलाऽऽ" आई हंबरडा फोडत म्हणाली.

"आईऽ आईऽ शांत व्हा ! काही होणार नाही निरंजनला. येतील ते परत. दीपकचा मला फोन आला होता मागच्या महिन्यात. तो मुंबईला आहे. कामधंदा करतो. दिवाळीत येणार आहे भेटायला. तुम्हाला सांगायचे नाही म्हणाला होता. म्हणून एवढे दिवस मनातच ठेवले. तुम्ही काळजी करु नका. निरंजनही परत येईल."

क्षणभर तिच्या तडफेने बोलणार्‍या चेहर्‍याकडे चौघीही चमकून बघू लागल्या. ही आपलीच निरु...आहे का? तिच्या चेहर्‍यावर आत्मविश्वास दिसत होता. पुढल्याच क्षणी तिने सगळ्यांना नाश्ता दिला. आणि काही काळ वाट बघायचा निर्धार करुन, त्या परत गेल्या. लहान मुलगा दीपकची माहिती मिळाल्यावर सासूबाई आनंदल्या. त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद...तेवढ्याच थंड चेहर्‍याने निरुने निहारला. क्षणभर सासू सूनेची नजरानजर झाली. तयार व्हायला निरुने खोलीचे दार बंद केले. 'बापरे काय मंद पोरगी आहे रेऽ चेहर्‍यावरची रेषा सुद्धा हलत नाही हिच्या. कसा व्हायचा संसार हिचा!' काळजीने सासूबाई पुटपुटली.

खोलीत आलेल्या निरुने बेडजवळच असलेल्या तिच्या आईच्या आरामखुर्चीत अंग झोकून दिले. आईऽऽ तिचे डोळे बंद होते. नजरे समोरुन बालपण सरसरत होतं. आईच्या मागे धावणारी छोटी निरु. बाऊऽ केल्यावर खळखळून हसणारी निरु. अचानक तिकडून आलेल्या आजोबांना अडखळणारी निरु. रागाने आजोबांनी झिडकारलेले. आजीने मध्ये बोलताच आजीच्या कानशीलात मारणारे आजोबा. घाबरुन वाड्यातील दाराआड लपणारी निरु. बाबाही काही वेगळे नव्हते. पलंग कधी सोडला नाही त्यांनी. बाहेर फिरतील ते, तर नवीन 'पाखरू' शोधायला. आई काही बोलल्यास तिला घालून पाडून बोलायचे. घरातील भांडीकुंडी सुद्धा त्यांनी विकून खाल्लेली. अर्धपोटी राहणारी आई. आणि अशाच एका प्रसंगात बाबांचा मार तिच्या जिव्हारी बसला. आणि ती दगावली. पण जाताना तिच्या आईने तिच्याकडून वचन घेतले. 'अन्याय सहन करायचा नाही. शिक्षण घे...आपल्या पायावर उभी रहा. तुझा स्वतःचा परिवार प्रेमाने सांभाळ. माझ्या सारख्या अनेक स्त्रिया अत्याचार सहन करत जगत असतात. जमेल तशी मदत कर...खुप मोठी हो पोरीऽऽ' आईने प्राण सोडला. पण एक जगण्यासाठी तिच्या उरी स्वप्नं देऊन गेली.

काही दिवसाने अतिमद्यसेवनाने तिच्या बाबांचा मृत्यू झाला. वाड्यात आता एकटीच निरु होती. सोबतीला आईच्या माहेराहून काम करायला आलेली म्हातारी आजी होती. आजी कसे बसे दोघींच्या जेवणाचे बघत होती. सरकारी काही मदत तिला मिळत होती.

वाड्याच्या मागे मोठ्ठ पटांगण होतं. सारंगपूर छोट खेडं गाव होतं. पण व्यावसायीकांचे ह्या निसर्गरम्य स्थळाकडे लक्ष गेले. तिथे दोन फॅक्टरी झाल्या. काही सुधारणा झाल्या. गावाला आता शहराचे रुप प्राप्त झाले. जमीनी विकून लोकांनी बंगले बांधले. गाड्या, महागडे मोबाईल वापरु लागले. गुराढोरांच्या मागे आता मोटरसायकलने आणि महागडा मोबाईल हातात घेऊन जाऊ लागले.

पण निरुपाची परिस्थिती हलाकीची होती. लोकांची नजर वाड्यावर होती. पण आजीबाई निरुपाला कुणाही समोर येऊ देत नव्हती. कुणाला घरातच घेत नव्हती. त्यामुळे अजून तरी वाडा सुरक्षित होता.
पण आजीने गावातील जुन्या शिक्षिका मैत्रिणीला वाड्यात बोलावून, निरुचा अभ्यास सुरु ठेवला. घरुन जेवढे शिकवता येईल तेवढे ती तिला शिकवत राहिली. निरुपा जात्याच हुशार होती. शिकवलेले पटकन आत्मसात करायची.

वाड्याच्या मागच्या पटांगणात विविध क्लास व्हायचे. वेगवेगळ्या वेळात... निरुला ते बघायला खूप आवडायचे. मागच्या तुटक्या दारातून ते बघत बसायची आणि खेळ समजून घ्यायची. काही दिवसाने कराटेचे क्लासेस तेथे सुरु झाले. त्यात दोन मुलीही होत्या. निरुला आश्चर्य वाटले. त्यांचे निरीक्षण करुन ती स्वतः प्रॅक्टिस करु लागली. हळू हळू तिला जमायला लागले. जणू निरु 'एकलव्य' बनली होती. अशातच चोरी करायला आलेल्या एका चोराला तिने चांगलाच चोप दिला आणि तिचा काॅन्फीडंस वाढला. आपण कुणाचीही धुलाई करु शकतो हे तिच्या लक्षात आले.

एकदिवस अचानक आजीचा नातू तिला भेटायला आला. एवढ्या दिवसांपासून इथे राहतेस. तुझ्या जवळचे पैसे दे म्हणाला. आजीला रागच आला. पैश्यासाठी मला नवर्‍याने इकडे पाठवले. कायम मी माझे लेकरं सोडून इथे राहीली. मला माहित आहे...मी इथे कशी राहीली. तुम्ही फक्त पैश्यापुरतेच मला विचारत राहीले. पाचसहा वर्षापासून कुणीच खबर घेतली नाही. आणि आता कसा काय पैसे मागायला आलास, म्हणून आजी त्याला रागवली. तो ही अद्धातद्धा बोलून पसार झाला. आजीला ही गोष्ट जिव्हारी लागली. दुसर्‍या दिवशी आजी झोपेतून उठलीच नाही...

ह्या धक्क्याने निरु पुन्हा एकटी पडली. पण एव्हाना आजीने तिला चांगलेच तयार केले होते. जगरहाट शिकवली होती. वरुन 'झांबलट' दिसणारी, मनाने ती खंबीर होती. मग निरंजनच्या बाबाने तिच्या बाबांच्या मैत्रीची कहाणी सांगून तिला आपलेसे केले. पुढे निरंजनने तिला लग्नाचे स्वप्नं दाखवले. त्याच्यावर खरेच ती प्रेम करत होती. मनापुढे हरली होती. तिला कळत होतं..वाड्यामुळेच तिच्या जीवनात हे नाते आले होते. पण समजूनही ती अज्ञानी रहाणे पसंत करत होती.

मात्र मनात, अत्याचार करणार्‍या फसव्या पुरुषांवर रोष होताच. त्यात तिला नवे माध्यम, वाॅट्सअप, फेसबुक कळले. फ्रेंडरिक्वेस्टने ती त्रस्त झाली. मेसेंजर मधल्या मेसेजेसने परेशान झाली. सज्जन मनुष्यांचे पितळ येथे उघडे पडू लागले. समाजात सालस म्हणून वावरणारे लोकं...मेसेंजर मधून व्यक्त होऊन पातळी सोडू लागले. तेव्हा मात्र तिला प्रचंड राग आला...

मग तिने वाड्याच्या भुयाराचा वापर करायचे ठरवले. ज्या दोन मुलींना ती कराटे शिकताना बघत होती. त्यांच्या मदतीने अश्या लोकांना धडा शिकवायचे ठरवले....कारखान्यातल्या बर्‍याच मुली तिच्या मदतीला आल्या. दिवसा माहिती मिळायची. रात्री घरकामं आटोपले की, बेडरुम मधल्या कपाटातील रस्त्याने भुयारात जायची. तो रस्ता मंदिरातील गाभार्‍यात निघायचा. मैत्रिणी मागच्या दाराने वाड्यात प्रवेश करायच्या. तिच्या मैत्रिणीनेच त्यांच्यासाठी गळाबंद फॅन्टम सारखा ड्रेस शिवला होता.....

निरुपाने गालातल्या गालात हसत कपाट उघडले. तत्पुर्वी आईच्या आणि आजीच्या फोटोला नमस्कार केला. "आई, आजीऽ मोबाईलचे व्यसन वाढतच आहे. मेसेंजरचा धूमाकुळ मला कुठेतरी थांबवायचा आहे. निरंजनलाही झटका पाहिजेच होता....

ठेवते त्याला काही दिवस अंधारात, त्याच्या आवडत्या फेसबुक, इंन्स्टाग्राम, वाॅट्सअपच्या, मेसेंजरच्या सानिध्यात. म्हणजे त्याला परिवारातील त्याच्या बोलण्याची वाट बघणार्‍या बायकोची, आईवडीलांची...कदर कळेल...!"
फॅन्टमची बहिण, फॅब म्हणजेच फॅन्टमची ताई...कशी वाटली...?
००
वाचकहो, तुम्ही वागता का असे? सांभाळून रहा. आमच्या 'झांबलट...' निरुपाला कळल्यास. तुमचाही नंबर लागेल...तिच्या वाड्यातील अंधार्‍या भुयारात. यायचं का मुक्कामी?

समाप्त
०००
0

🎭 Series Post

View all