फाशी (Tenali Rama Story In Marathi)

Tenali Rama Story In Marathi
फाशी

रामाने पळून जाताना कोतवाल, तथाचार्य आणि गोपण्णा यांना तुरुंगात बंद केलं होतं. त्याने तिथे केलेल्या धुरामुळे कोणालाही काही कळायच्या आतच तो बाहेर पडला होता आणि कुलूप लावलं होतं. जाताना रामाने आचार्यला पत्र लिहीत रहा असा निरोप दिला आणि तो पळून गेला होता. आत मधून ते तिथे कुलूप उघड म्हणून ओरडत होते पण त्याने काहीही न ऐकता तिथून काढता पाय घेतला. धनी मणी जेव्हा आत आले तेव्हा त्या दोघांनी त्या तिघांना आत बघितले. धुरामुळे त्यांचे तोंड काळे झाले होते.

“महाराजांनी तातडीने तुम्हाला बोलवलं आहे.” धनी म्हणाला.

“लवकर दार उघडा.” आचार्य म्हणाला.

“चावी मिळाली तर उघडू ना!” असं म्हणून मणीने हळूच चावी पायाने मागे ढकलली आणि ते दोघे मजा घेऊ लागले.
***********************************
रामा राजाच्या तुरुंगातून पळून गेल्याने राजाने तातडीची सभा बोलावली होती. सर्व दरबारी दरबारात हजर झाले होते. राजा रागात होता.

“मी तर त्या पंडितला एक संधी देण्याचा विचार करत होतो. सगळ्यांनी त्याला अपराधी ठरवलं होतं पण माझं मन मानत नव्हतं. आज पहिल्यांदा मी माणूस ओळखायला चुकलो तिम्मानासू जी! पण कारागृहातून पळून जाऊन त्यानेच सिद्ध केलं तो एक अपराधीच आहे.” राजा म्हणाला.

“ज्याचा त्याचा दृष्टीकोन महाराज. किंमत संधीची नाही तर त्याचा फायदा करून घेणाऱ्यांची असते आणि असं आम्ही नाही तर शास्त्र सांगते.” महामंत्री म्हणाले.

“आम्हाला कळतंय तुम्ही काय सांगू पाहत आहात पण त्याने आमच्या कारागृहातून पळून जाण्याचे धाडस केले आहे आणि त्याची त्याला शिक्षा….” राजा बोलत होता इतक्यात दारातून आवाज आला; “महाराज!” आणि खोकल्याचा आवाज आला.

“हे कोण येतंय दरबारात?” राजाने विचारलं.

“ओळखलं नाहीत का महाराज? मी तुमचा प्रिय तथाचार्य.”

“आणि मी नगर कोतवाल महाराज.”

“हे बघा त्या पंडितने आमची काय अवस्था केली. ही तर आमच्या अपमानाची परिसिमाच झाली. राजपुरोहिताचे तोंड काळं करून गेला.” आचार्य म्हणाला.

“कोळश्याला काळा टित लावला आहे फक्त.” धनी हळूच कुजबुजला.

“बरोबर आहे.” मणी हसू दाबत म्हणाला.

“हिंमत बघा महाराज त्याची तो तुमच्या कारागृहातून पळू गेला. तुमच्या! राजा कृष्णदेवराय यांच्या कारागृहातून. मी तर आधीच सांगत होतो याला जन्मठेप नाही तर मृत्यू दंडाची शिक्षा द्यायला हवी.” तो रागाने म्हणाला.

“माफ करा आचार्य पण तुम्ही कारागृहात काय करत होतात?” महामंत्री तिम्मानासू यांनी विचारलं.

त्यांच्या बोलण्याने आचार्य चपापला पण सावरून घेत बोलू लागला; “मी तर त्याला समजवायला गेलो होतो. जर त्याने सुधारण्याची तयारी दाखवली तर मी स्वतः महाराजांशी बोलून त्याची शिक्षा माफ करायला सांगेन असं सांगायला गेलो होतो पण कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच. संधी साधू होता संधी साधून पळून गेला. राजा कृष्णदेवराय यांच्या विजयनगर मधील विजयाला ठेंगा दाखवून पळून गेला.”

त्याने असे म्हणताच राजा आणखी चिडला.

“महामंत्री जी!” राजा गरजला.

“जी महाराज!”

“संपूर्ण नगरातील कानाकोपरा शोधा. आकाश पाताळ एक करा पण त्या पंडित रामाकृष्णाला इथे हजर करा.” राजाने हुकूम दिला.

“जो कुठे गेलाच नाहीये त्याला शोधायची काय गरज महाराज. मी इथेच आहे.” रामा गर्दीतून बाहेर येत म्हणाला.

रामाला बघून सगळेच चकित झाले.

“हा तर निर्लज्जपणाचा कळस झाला महाराज. एवढं सगळं होऊनही याने तुमच्या समोर येण्याची हिम्मत केली. याला लगेचच बंदी करून फाशीची शिक्षा देण्यात यावी महाराज.” आचार्य म्हणाला.

“मी तर इथे स्वतःच माझे प्राण महाराजांच्या चरणावर अर्पण करायला आलो आहे महाराज. ज्या राज्यात न्याय आणि अन्याय मधला फरक करणारे कोणी नाही, दोष आणि दोषी मधला फरक जाणणारे नाहीत सत्याचा आवाज ऐकणारे कोणी नाही अश्या राज्यात कोण कितीवेळ जिवंत राहू शकेल महाराज?” रामा हात जोडून म्हणाला.

“तुझी एवढी हिम्मत? शिपाई पुढे या! आत्ताच्या आत्ता याचा जीव घ्या.” आचार्य रागाने गरजला.

“शांत व्हा मुनीवर.” राजाने हात उंचावून त्याला शांत केलं.

“तू! तुला असं वाटतंय इथे न्याय नाही मिळत? खऱ्या माणसावर अन्याय होतो? त्याचं ऐकून घेणारे कोणी नाही? आमच्या राज्यात?” राजा रागाने म्हणाला.

“क्षमा करा महाराज कडू आहे पण हेच सत्य आहे. जर असं नसतं तर मला माझे काहीही ऐकून न घेता असा आजीवन कारावास दिला गेला नसता. माझं सत्य ऐकून न घेता…” रामा राजाच्या डोळ्यात डोळे घालून हात जोडून बोलत होता त्याला तोडत राजा म्हणाला; “काय सत्य आहे तुझं?” राजा रागाने म्हणाला.

“सत्य तर हे आहे महाराज मी मल्लुदेवा नाही. मी तुमच्याच राज्याच्या एका लहान तेनाली गावातून आलोय. नाव पंडित रामाकृष्णा. आपल्या पोशिंद्या राजाला एकदा तरी पाहता यावं म्हणून मी इथे आलो पण मला तर तुमच्या समोर एक अपराधी म्हणून उभे करण्यात आले.” रामा म्हणाला.

“म्हणजे तुला म्हणायचं आहे तू निर्दोष आहेस.” राजा म्हणाला.

“होय महाराज. मी निर्दोष आहे.” रामा ठामपणे म्हणाला.

“ठीक आहे. तीन दिवसांचा वेळ देतो आम्ही तुला. तीन दिवसाच्या आत खऱ्या अपराध्याला आमच्या समोर आणून दाखव आणि सिद्ध कर तू निर्दोष आहेस. नाहीतर आजपासून बरोबर चौथ्या दिवशी तुझी फाशी निश्चित. सभा समाप्त.” राजा म्हणाला.

रामा राजवाड्यातून बाहेर पडत होता. त्याला राजाचे शब्द आठवत होते. इतक्यात समोरून आचार्य आला आणि त्याला अडवले.

“ए पंडित! तुझे माप काय आहे?” त्याने विचारलं.

“मी काही समजलो नाही आचार्य.” रामा म्हणाला.

“तू दुसऱ्या गावचा आहेस. आमचा अतिथी आहेस. तुला फाशी दिल्यावर तुझे अंतिम संस्कार तर मलाच करावे लागतील ना. त्यासाठी विचारलं.” आचार्य म्हणाला.

“आशावादी असणं काही वाईट नाही. प्रबळ आशावादी असणंही ठीक पण कल्पना आणि आशा यात फरक न करणे एक वेडेपणा आहे. माझा सल्ला ऐका आचार्य एका चांगल्या वैद्यांना दाखवून घ्या.” रामा म्हणाला.

“काय करशील तू? असे… असे…. निघून जातील तीन दिवस.” आचार्य म्हणाला.

“संकल्प चांगला आणि दृढ असेल तर एक क्षणही पुरेसा असतो इथे तर तीन दिवस आहेत. थोडी वाट बघा. अजून झटके खायचे बाकी आहेत. काय आहे ना खूप जिद्दी आहे हा रामा एकदा चिकटला की लवकर पाठ सोडत नाही. आज्ञा द्या.” रामा म्हणाला आणि तिथून निघाला.
************************************
रामा एका धर्मशाळेत आला होता. विचार करत करत एकदम हळू हळू चालत तो एके ठिकाणी थांबला.

“काय झालं रामा? काळजीत का आहेस?” बंधूने विचारलं.

“जोशात आचार्य सोबत पैज तर लावली पण विचार करतोय की एवढ्या कमी दिवसात मल्लूदेवाला कसं शोधू?” रामा म्हणाला.

“त्याचं जेव्हा जे व्हायचं ते होईल पण आत्ता समोर बघ. तुझं कुटुंब. किती त्रासात आहे.” बंधू म्हणाली.

रामाने समोर पाहिलं. शारदा आणि अम्मा पाठमोऱ्या डोक्याला हात लावून बसलेल्या त्याला दिसल्या. त्याच्या कुटुंबाकडे खायला देखील काही नव्हते. अगदी गप्प आणि त्रस्त ते बसले होते.

‘मला माफ कर देवा आज माझ्यामुळे माझ्या शारदा आणि अम्माला उपाशी असं धर्मशाळेत बसून राहावं लागतंय.’ रामा मनात म्हणाला आणि मागच्या मागे निघून गेला.

त्याने बाजारात जाऊन स्वतःची अंगठी देऊन खाण्यासाठी काहीतरी घेतले.

“अम्मा…” त्याने मागून हाक मारली.

रामाचा आवाज ऐकून शारदा आणि अम्माने मागे पाहिले. रामाला पाहून त्यांना खूप आनंद झाला होता. त्या दोघी रडत होत्या.

“बास बास आता आलोय ना! आता बास तुमचं हे रडणं.” रामा म्हणाला.

“उचला! अम्मा एक दोरी उचलून यांना बांधून ठेवा. यांच्या पायाला तर भिंगरी लागली आहे. एका जागी टिकतच नाहीत. तसं तुम्ही कसे सुटलात?” शारदा म्हणाली.

“महाराजांनी मला सोडलं.” रामा म्हणाला.

“महाराजांनी सोडलं? खोटारडा.” बंधू म्हणाली.

“गप्प बस.” रामा म्हणाला.

“बघा अम्मा मी काही बोलले नाही तोवर गप्प करतायत.” शारदा म्हणाली.

“अगं तुला नाही. हिला सांगत होतो.” रामा डोक्याकडे हात करून म्हणाला.

“हिला कोणाला?” शारदा म्हणाली.

“सोड! मी हे म्हणत होतो महाराजांनी मला फक्त सोडलं नाही तर एक महत्त्वाची जबाबदारी पण दिली आहे.” रामा म्हणाला.

“परत खोटे. सांगत का नाहीस फक्त तीन दिवसाचे जीवनदान मिळाले आहे.” बंधू म्हणाली.

“सांगितलं ना तोंड बंद ठेव.” रामा म्हणाला.

“अम्मा!” तुला नाही बोलत आहे.

अम्माने लगेच खुणेने मला का? असं विचारलं.

“तुलाही नाही. थांब.” रामा म्हणाला आणि त्याने त्याच्या शेंडीला एक गाठ मारली.

“तर मी म्हणत होतो महाराजांनी एका महत्त्वाच्या कामाची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे.” तो म्हणाला.

अम्मा लगेच खुणा करून सांगू लागली आणि ती काय सांगू पाहतेय हे शारदा बोलू लागली; “या असं म्हणतायत महराजांनी एका अपराधाच्या आरोपाखाली तुला बंदी केलं आणि नाही केवळ एका दिवसात सोडलं तर तुझ्यावर महत्त्वाच्या कामाची जबाबदारी पण टाकली? विश्वास नाही वाटत.”

“तेच तर! विश्वास असतो कुठे हीचा माझ्यावर?” रामा म्हणाला.

“मला विश्वास नाहीये. हा चमत्कार झाला कसा?” शारदा म्हणाली.

रामाची आता चांगलीच भंबेरी उडाली होती. त्याचे तत पप होत होते इतक्यात गुंडप्पा बाहेरून आला.

“काई चमतकाल वगैले नाही दाला. सगल ऐतून आलोय बाजालातून. याला तीन दिवसाची मुदत दिली आहे. जल हा त्या तोलाला नाही घेऊन गेला तल याला फासीची तिक्षा देनाल आहेत.” गुंडप्पा म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून शारदा आणि अम्मा दोघी रडू लागल्या.

“अले अदून आहे. सगल ऐकून एकदम रला. माहितेय याला तीक्षा का केली? बंदी ग्लूहातून पलून गेला हा निललज्ज आणि महालाजांसमोल जाऊन नुत्य प्लदलशन केलं याने.” गुंडप्पा म्हणाला.

“काय केलं?” शारदाने विचारलं.

“नुत्य प्लदलशन” गुंडप्पा पुन्हा म्हणाला.

त्याचं बोलणं ऐकून अम्मा खूपच रागावली आणि खाणाखुणा करू लागली.

“ओ हो.. काय झालं हिला? का इतकी भडकली आहे?” रामाने विचारलं.

शारदा त्या खुणांचा अर्थ सांगू लागली; “त्या म्हणतायत, वेड लागलं होतं का? आधीच कारागृहातून पळून गेला आणि महाराजांसमोर जाऊन नाचलात? अश्याने महाराज चिडणार नाहीतर काय”

“कोण नाचलं?” रामा म्हणाला.

“गुंडप्पा काय म्हणतोय?” शारदाने विचारलं.

“आत्म समर्पण आत्म समर्पण. गुंडप्पे नृत्य प्रदर्शन नाही आत्म समर्पण.” रामा म्हणाला.

“हा तेच.” गुंडप्पा म्हणाला.

“अम्मा काठी उचला आणि विचारा यांना काय गरज होती हे सगळं करायची? कारागृहात कमीत कमी जिवंत तरी राहिले असते. तिथून पळून स्वतःच्या मृत्युला आमंत्रण देण्याची काय गरज होती?” शारदा म्हणाली.

“अरे! मग अजून काय करणार होतो? आयुष्यभर काय त्या कारागृहात सडत राहिलो असतो का? काहीही न करण्यापेक्षा बरं माणूस काहीतरी करेल. तर केलं. शिक्षा तर मिळाली पण एक संधीही मिळाली ना स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची. तर सांग हिला विश्वास ठेव माझ्यावर. मला काहीही होणार नाही.” रामा म्हणाला.

“स्वतःच सांगा. मौनव्रत घेतलं आहे. बहिऱ्या नाही झाल्यात.” शारदा म्हणाली.

“हे पण ठीक आहे.” रामा म्हणाला.

आणि त्याने अम्माच्या खांद्यावर हात ठेवून फक्त मान हलवली. अम्माने देखील मान हलवली.

“बरं सोडा ते सगळं चला आता जेवू. किती दिवस झाले आपण एकत्र बसून जेवलो नाही.” रामा म्हणाला.

सगळे जेवायला बसले. रामाने अम्माचे आवडते लाडू आणले होते. सगळे खायला बसले.
*********************************
इथे आचार्य मस्त लोळत पडून लाडू खात होता पण त्याच्या शिष्यांना मात्र काहीही देत नव्हता. त्याच्या बाजूने बोलल्यावर शिष्याला एक लाडू दिला आणि तो पुन्हा काहीतरी वाकडं बोलला की तो लाडू काढून घ्यायचा. खाता खाता त्याच्या लक्षात आलं रामावर नजर ठेवायला हवी. जर त्याने त्या चोराला पकडलं आणि निर्दोष सुटला तर त्याचे काही खरे नव्हते. आजवर आचार्यचे असणारे वर्चस्व संपुष्टात आले असते.
**********************************
इथे रामाच्या कुटुंबीयांचे खाऊन झाले होते. अम्मा पडली होती आणि गुंडप्पा तिला वारे घालत होता. शारदा रामाच्या हातावर पाणी घालत होती तेव्हा ती म्हणाली; “आता काय करायचं?”

“माहित नाही शारदा पण एक गोष्ट शिकलोय मी; एका राजाचा अहंकार त्याच्या न्यायापेक्षा जास्त असतो. मग तो राजा कितीही न्यायप्रिय किंवा दयाळू असू दे.”

“ते सगळं ठीक आहे पण तीन दिवसात आपण त्या चोराला कसे पकडणार? तेही एवढ्या मोठ्या नगरात?” शारदाने विचारलं.

“शारदा कोणी निपुण नसतं. काही ना काही त्रुटी या सगळ्यांच्यात असतात. त्या चोरात देखील असतील. त्याने नक्कीच काहीतरी धागे मागे सोडले असतील ज्याचा मी उपयोग करून घेऊ शकतो. बास! मला आता फक्त ते शोधायचं आहे. मग तो चोर या रामाच्या हातून वाचत नाही.” रामा म्हणाला.

“हे पाणी उचलून शपथ घ्या; तुम्ही त्या चोराला पकडाल आणि नंतर सदैव आमच्या सोबत राहाल.” शारदा म्हणाली.

“मी वचन देतो. मी सदैव तुझ्यासोबत राहीन. तुला सोडून कुठेच जाणार नाही.” रामा तिच्या डोक्यावर हात ठेवून म्हणाला.

क्रमशः……

Credit:- Sony SAB Tenali Rama serial.

🎭 Series Post

View all