Login

फसलेली प्रेमकथा

प्रेम खरं होतं, पण नशीब खोटं ठरलं…सायलीचं हृदय तुटलं, पण ती पुन्हा स्वतःसाठी जगू लागली.
फसलेली प्रेमकथा

रात्रभर पाऊस कोसळत होता. रस्त्यांवर पाण्याचे डोह तयार झाले होते. सगळं जग झोपलं होतं, पण सायलीच्या डोळ्यांत मात्र झोप नव्हती. हातात मोबाईल, स्क्रीनवर शेवटचा मेसेज चमकत होता
“माफ कर सायली… हे नातं आता शक्य नाही.”

त्या एका वाक्याने तिचं सगळं आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं. तिला समजत नव्हते. एवढे प्रेम करून पण मी कुठे कमी पडले.

दोन वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये जेव्हा सायली आणि करण पहिल्यांदा भेटले, तेव्हा त्यांचं जगच वेगळं होतं. करण, हसरा, बोलका, सगळ्यांचा लाडका. सायली, शांत, थोडी लाजरी, पण मनाने अतिशय संवेदनशील. पहिल्या भेटीतच करणने तिच्या हसण्यात काहीतरी ओळखलं होतं. तिच्या प्रेमात पडला होता.

कॉलेजचे दिवस म्हणजे त्यांच्या प्रेमाची सुरुवात होती. एकत्र चहा पिणं, लायब्ररीत पुस्तकांच्या आडून नजरानजर करणं, पावसात भिजत रस्त्यावरून चालणं, हे सगळं क्षण क्षण तिच्या मनात कोरलं गेलं होतं.

"मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही" असं करणने एकदा हातात गुलाब देऊन सांगितलं होतं.
सायलीचं हृदय त्या क्षणी धडधड होतं होते. तिनेही विश्वासाने आपलं सर्वस्व त्याच्यावर अर्पण केलं.

पण काळ नेहमी गोड आठवणींसोबत थोडं विषही देतो.

कॉलेज संपल्यावर करण पुण्यात नोकरीसाठी गेला. सुरुवातीला दोघेही रोज बोलायचे, व्हिडिओ कॉलवर हसत बसायचे. पण काही महिन्यांनी करणचे फोन कमी झाले, मेसेज उशिरा येऊ लागले.
सायली विचारायची, “करण, सगळं ठीक ना?”
तो हसायचा, “हो ग बाळा, कामाचा ताण आहे.”

पण सायलीच्या मनाला जाणवत होतं , काहीतरी तुटतंय.

एक दिवस ती अचानक पुण्यात त्याला भेटायला गेली. ऑफिससमोर उभी राहिली. आणि तेव्हा तिला दिसलं, करण एका मुलीसोबत हातात हात घालून चालला होता. त्याच्या चेहऱ्यावर तेच हसू होतं, जे कधी तिच्यासाठी होतं.

सायलीच्या डोळ्यांत पाणी आलं. ती काहीच बोलली नाही. फक्त मागे वळून चालू लागली. तिच्या पावसात भिजलेल्या चेहऱ्यावर अश्रूंचा आणि पावसाच्या थेंबांचा फरक करणं कठीण होतं.

त्या रात्री करणचा मेसेज आला, “सायली, माझं लग्न ठरलं आहे. तुझं आणि माझं नातं सुंदर होतं, पण आता पुढे जाणं योग्य आहे.”

सायलीने फोन बंद केला. खिडकीतून बाहेर पाहिलं. पावसाचे थेंब जणू तिच्या वेदनांना समजून घेत होते.

ती स्वतःशी पुटपुटली,
“प्रेम खरं होतं... पण नशीब खोटं ठरलं.”

त्या दिवसानंतर सायलीने कोणाकडेही मागे वळून पाहिलं नाही. ती स्वतःचं आयुष्य पुन्हा घडवू लागली. चित्रकलेत, लेखनात तिने स्वतःला सापडलं.

कधी कधी जुन्या डायरीत करणचं नाव दिसलं की मनात वेदना उसळायच्या, पण आता त्या वेदनांमध्येही ताकद होती.

ती स्वतःलाच म्हणायची,
“प्रेम फसलं, पण मी नाही.
मी अजून जिवंत आहे, कारण मी प्रेम केलं होतं... फसवणूक नाही.”

आणि पावसाच्या त्या रात्रीपासून तिचं आयुष्य बदललं.
सायली पुन्हा हसली, आता स्वतःसाठी.