Login

सणाची महती

सणांचे महत्व
सण म्ह्टले कि आनंद उत्साह, उत्सव, नवी उमेद अशा अनेक कल्पना आपल्या मनात येतात पण त्या सणाची आजच्या युगात व्याख्याच बदलून गेली.


               आता सण म्हटले कि फक्त इंजॉयमेंट इतकच लक्षात येते, पण त्यामागील त्याची महती ,त्याचे महत्त्व, त्याचे कारण याचा कोणी विचारच करत नाही

                 प्रत्येक सणाचे काहीतरी वैशिष्ट्य, काहीतरी कारण नक्कीच असते अन तेच नेमके कोणाला माहित नाही
सगळे फक्त करायचे म्हणून करतात....पण त्यामागील भूमिका कोणी समजून घेण्याचा किंवा जाणून घेण्याचा प्रयत्न करत नाही.

             आपल्या संस्कृतीमध्ये अनेक असे वेगवेगळे सण आहेत मग ते धार्मिक अन वैज्ञानिक दोन्ही बाजूंनी विचार करून आपल्या पूर्वजांनी साजरे केले.

                  अन आपणही त्यानी केले आपल्याला सोपवून दिले म्हणून आपण करतो. पण आपल्याला त्या सणाची महतीच माहिती नाही.

              आपल्या मराठी दिनदर्शिकेनुसार नव्या वर्षाची सुरुवात ही चैत्र महिन्यात होते. जरी आपण जानेवारी मध्ये नवीन वर्ष साजरे करत असलो तरी निसर्गाचे नवीन वर्ष याच महिन्यात सुरू होते. अन आपले नवे वर्ष ही

            चैत्र महिन्यात आपण गुडीपाडवा हा सण साजरा करतो.
या महिन्यात निसर्गाचे नवीन रूप पहायला भेटते. जुनी पाने गळून नवीन पालवी फुटते.
सगळीकडे नवा बहर असतो.आपल्या शरीरातील गरमी कमी व्हावी म्हणून या दिवशी कडूलिंबाच्या फुलांचे सेवन करतात व तोच प्रसाद म्हणून वाटला जातो. व त्याची पाने गुढी उभारताना त्यात लावली जातात.

       कडूलिंब हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. म्हणून त्याला आपल्या पहिल्या सणामध्ये मोलाचे स्थान दिले गेले आहे.

             श्रावण महिना हा सणांचा महिना,अन भगवान शिव शंकराच्या आराधनेचा महिना म्हणून ओळखला जातो...या महिन्यात खूप सारे सण येतात, अन  या महिन्यात भगवान शंकर या सृष्टीची पाहणी करतात अशी मान्यता आहे.अन भगवान विष्णू हे निद्रा अवस्थेत जातात.

        हा महिना शुद्ध शाकाहारी जेवन करूनच पाळला जातो.
तर वैज्ञानिक कारण यामागचे असे आहे कि या महिन्यात पावसाळी वातावरण असल्यामुळे वातावरणात रोगराई पसरलेली असते. अन त्याची बाधा होऊ नये निरोगी आरोग्यासाठी आपण शाकाहारी भोजन करणे हेच योग्य ठरते.

            या महिन्यात ला पहिला सण असतो नागपंचमी. नाग हा विषारी प्राणी आहे तरी त्याची आपल्या संस्कृतीमध्ये पूजा केली जाते.
        सापाला शेतकऱ्याचा मित्र म्हटले जाते. अन म्हणून आपल्या पूर्वजांनी त्याची पुजा केली. अन् आपल्या या मित्रांला धन्यवाद देण्यासाठी त्याची आराधना केली जाते.

         श्रावण महिन्यातील दुसरा सण असतो राखी पौर्णिमा.... म्हणजेच रक्षा बंधन. हा सण भाऊ अन बहिणीच्या नात्याला आणखी घट्ट करण्यासाठी साजरा केला जातो. या सणाला प्रत्येक भागात वेगवेगळी नावे आहेत.
         या सणाला बहिण आपल्या भावाच्या मनगटावरती राखी, दोरा, बांधून त्याच्याकडून स्वतः च्या रक्षणाचे वचन घेते. अन याने भाऊ अन बहिणीच्या नात्यात प्रेमाची वाढ होत जाते.

            गोकुळाष्टमी हा सण ही याच श्रावण महिन्यात येतो. श्री कृष्णा चा जन्म याच महिन्यात अन नक्षत्रात झाला होता ज्याने कंसाचा वध करण्यासाठी या भूलोकावरती जन्म घेतला होता. त्यांचा जन्मदिवस हा कृष्ण जन्माष्टमी म्हणून साजरा केला जातो. पहिल्या दिवशी उपवास करून दुसऱ्या दिवशी  दहीहंडी फोडली जाते... व जन्माष्टमी साजरी केली जाते.

     बैल पोळ्याने या महिन्याची सांगता होते. बैल हा शेतकऱ्याचा मित्र त्याच्या वरच त्याची शेती. शेतीची कामे अवलंबून असतात. म्हणून त्याला हे दोन दिवस पूर्ण पणे आराम दिला जातो.

त्याच्या साठी खायला पुरणपोळीचा नैवैद्य दिला जातो. त्याला मस्त सजवले जाते. व त्याची पूजा अर्चा केली जाते.
अन या सणानेच श्रावण महिना संपतो.

          नंतर येते गणेश चतुर्थी गणपती बाप्पा आपल्या घरी येतात. त्यांचे आगमन होते त्याचा दहा दिवासांचा मुक्काम असतो. तर कोणाच्या घरी दीड दिवस, तीन दिवस, अन पाच दिवस अशी त्याची पूजा केली जाते.गणेशोत्सव हा खूप मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. जागोजागी गणेश स्थापना केली जाते.त्यात रोज नवनवीन उपक्रम राबवले जातात.
            पूर्वी या गणेशोत्सवाच्या साहाय्याने जनतेत जनजागृती केली जायची.अन आता फक्त मनोरंजन केले जातेय. दहा दिवसांच्या नंतर  त्यांचे विसर्जन केले जाते.

           अश्विन महिन्यात नवरात्र येते. यात कलश स्थापना केली जाते. शेतातील माती आणून त्यात बियाची पेरणी केली जाते.
         त्या बियाची कुवत पाहिली जाते कि ती धान्य पेरणी योग्य आहेत कि नाही. म्हणून त्या बिया अगोदर त्या मातीत लावून पाहतात अन नंतर पेरणीची सुरवात करतात.

         या महिन्यात कन्येला विशेष महत्त्व दिले गेले याच महिन्यात देवी नऊ दिवस निद्रावस्थेत असते अन दहाव्या दिवशी ती महिषासुर राक्षसाचा वध करते. म्हणून या महिन्यातील या नवरात्रीच्या वेळी कन्या पुजन, उपवास केला जातो. नव रूपातील तिच्या अवताराला पुजले जाते.
              या नवरात्रीत रात्री जागरण केले जाते अन त्यासाठी दांडिया खेळला जातो. अनेक ठिकाणी रोज नवनवीन दांडिया स्पर्धा ठेवल्या जातात.

                दसऱ्याच्या दिवशी देवीने निद्रावस्थेतून उठून राक्षसाचा वध केला म्हणून सगळ्या देवगणांनी मिळून राक्षसापासून मुक्त झालेला आनंद एकमेकांना आलिंगन देऊन साजरा केला होता.
          
     आपणही हा दिवस आपल्या प्रिय जणांना आलिंगन देऊन त्या पहिल्या दिवशी पेरलेल्या धान्याचे धान किंवा आपट्याची पाने देऊन दसरा हा सण साजरा करतो.

व याच दिवशी लंकेश्वर रावणाचा वध प्रभु श्रीराम यांच्या हातून झाला. सत्याचा असत्यावर विजय झाला म्हणून रावण दहन ही केले जाते.
        दसऱ्याच्या या दिवसाला साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभ मुहूर्त म्हणून मानले जाते.या दिवशी प्रत्येक चांगल्या गोष्टी चा शुभारंभ केला जातो.
      दसऱ्याला विजयादशमी ही संबोधले जाते.

    दसऱ्यानंतर लगेच एका महिन्याने दिवाळी येते सगळ्याची आवडती दिवाळी.... दिव्यांचा सण... म्हणजे दिवाळी.

           प्रभु श्री रामचंद्र रावणाचा वध करून परत आयोध्येला पोचले तेव्हा त्यांच्या जनतेने घरोघरी दिवे लावून त्यांचे स्वागत गेले. पूर्ण आयोध्या नगरी दिव्याच्या प्रकाशाने उजळून निघाली..... तेव्हापासून दिवाळी हा सण साजरा केला जातो.
आप्तेष्टांना आमंत्रण दिले जाते.वेळात वेळ काढून एकमेकांच्या घरी जाऊन भेटी गाठी घेतल्या जातात.

          फराळीसाठी विशेष असे पदार्थ बनवले जातात. त्यात गोड, तिखट, चमचमीत असे सर्वच पदार्थ असतात.
चकली, शेव, चिवडा, लाडू, करंजी, अनारसे, सगळ्यांच्या घरची वेगवेगळी चव चाखून  मजा मस्तीने सण साजरा केला जातो. त्यात फटाके ही फोडले जातात.
दिवाळी ही सात दिवस असते. एकादशीपासून दिवाळीची सुरूवात होते.

     दुसऱ्या दिवशी गायीची पुजा केली जाते वसुबारस म्हणून गायीला दही लावले जाते म्हणजेच दह्याची अंघोळ म्हणून तिला दही लावले जाते.

  तिसऱ्या दिवशी धनत्रयोदशी  धन्वंतरी देवीची पूजा केली जाते.
आरोग्य व धनधान्य संपन्नतेची कामना केली जाते.

   नरकचतुर्दशी ही चौथ्या दिवशी साजरी केली जाते. घरातील पुरूष मंडळीना सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान घातले जाते. व त्यांना ओवाळले जाते.


   पाचव्या दिवशी लक्ष्मी पुजा केली जाते. घरातील अवजाराची, व्यवसायातील दुकानाची, नव्या सूरू होणाऱ्या व्यवहाराच्या लेखाजोखा साहित्याची पूजा केली जाते. लक्ष्मीला वंदना करून तिची स्थापना केली जाते.

सहाव्या दिवशी दिवाळी पाडवा किंवा बलिप्रतिपदा साजरा केला जातो. या दिवसालाही साडेतीन शुभ मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त मानला जातो. या दिवशी ही कामकाजाची नवी सुरूवात केली जाते. पाडव्याच्या मुहूर्तावर
पत्नी आपल्या पतीला ओवाळते त्याच्या प्रत्येक कामात यश प्राप्तीची कामना करते. अन या सणाने त्यांच्या नात्यात पाडव्याची गोडी पसरते.

      सातवा दिवस भाऊ बहिणीच्या नात्याचा भाऊबीज बहिण भावाला ओवाळते. व त्याच्या साठी मंगल कामना करते. भाऊ ही बहि साठी भेटवस्तू देतो तिच्या तिची ओवाळणी म्हणून तिला आनंदी करतो. व आपला हा सगळ्यांचा आवडता सण आनंदात साजरा केला जातो.

                 दिवाळी नंतर येतो शेतकऱ्यांचा आवडता सण दर्शवेळा अमावस्या  या सणाला शेतातल्या लक्ष्मीची पुजा केली जाते. तिच्या साठी पुरणपोळीचा नाही तर भज्जी भाकरेचा नैवेद्य केला जातो सोबतीला अंबिल व खीर केली जाते. हा सण शेतातच साजरा केला जातो.
              कणसाच्या कडब्याची किंवा उसाची कोप केली जाते त्यात मातीपासून लक्ष्मीची तांदळे (मूर्ती )बनवली जाते त्याचीच पुजा केली जाते. अन आपल्या आप्तेष्ट माणसांना जेवणाचे आमंत्रण दिले जाते .एकमेकांच्या शेतात जाऊन प्रत्येकाच्या भज्जी अन अंबिलेची चव चाखली जाते.

वेळा अमावस्येनंतर येते मकर संक्रांत हा सण सुवासिनीचा सण म्हणून ओळखला जातो.या सणात तीळ गुळ व त्या पासून बनवलेले पदार्थ वाटले जातात. एकमेकिंना बोलवून सुवासिनीचा वाण देऊन त्यांना तीळ गुळ वाटला जातो.
प्रत्येकाला तीळ गुळ देत मनातला राग बाजूला सारून होडीने एक होण्याचा संदेश दिला जातो

'तीळ गुळ घ्या गोडगोड बोला....'म्हणतच सगळ्यांना आनंदात तीळ गुळ देऊन हा सण साजरा केला जातो.

         आपल्या संस्कृतीत सर्व सण हे आनंदात व उल्हासित होऊन एकमेकांशी प्रेमाचे नाते आणखी घट्ट करण्यासाठी, मिळून मिसळून हे सण साजरे केले जातात.....

प्रत्येक सणाने मनात व घरात एक नवी सकारात्मक ऊर्जा मिळते ज्याने मनाला एक नवी चेतना भेटते.

           सण हा नात्यांचा
वसा हा संस्कृतीचा
प्रेमाने साजरा करावा
प्रत्येक सण हा आपल्या जिव्हाळ्याचा.

0