फिटे अंधाराचे जाळे......!

स्वत:च्या दुर्दम्य इच्छाशक्ती आणि आत्मबलाच्या जोरावर कोणत्याही नैराश्यावर कशी मात करता येते

फिटे अंधाराचे जाळे।

©®राधिका कुलकर्णी.

वांबोरी फाट्यावरून सकाळची एक्सप्रेस ट्रेन धाडधाड् धाडधाड् आवाज करत वेगाने धावत होती.ते अजस्त्र धुड निमिषार्धात अंतर कापत रायाच्या समोरून येत क्षणार्धात सगळे दिसेनासे होणार ह्या कल्पनेनेच त्याने डोळे घट्ट झाकुन घेतले.

पुढे काय होणार हे कळायच्या आतच हाताला एक जोरदार हिसका बसला आणि राया बाजुला हेलपाटत पडला.गाडी आणि त्याच्यात फक्त एक हाताचे अंतर होते.काही क्षणात गाडी दिसेनासी झाली.

राया मात्र अजुनही सावरला नव्हता.कोणीतरी संपुर्ण ताकदिनिशी त्याला पटरीवरून खेचुन बाजुच्या रिकाम्या पटरीवर ढकलले होते.

डोळ्यासमोर काजवे चमकावे तसे काहिसे झाले.

कानकन कानफाटात वाजली आणि रायाच्या डोक्यात मुंग्या आल्या.

गालाला झिणझिण्या येत होत्या.

काय होतेय,का होतेय हे त्याला उमगत नव्हते.थोडे सावरत लटपटत्या पायानेच राया उठला.अजुनही तोल सावरता येत नव्हता. तो पडणार इतक्यात त्याच हातांनी पुन्हा त्याला सावरले.

"काय वं पाव्हनं,लई वर आला का जीव..पार जीव द्यायला निघालासाऽऽऽते....!"

कोणीतरी खेडुत माणुस हाताला आधार देत रायाला विचारत होता..

रायाला बसलेली त्याच्या हाताची चपराक इतकी मजबुत होती की त्या वेदनेतुन तो अजुनही सावरला नव्हता.आपण काय करायला निघालो होतो,हा माणुस नसता आला तर आत्ता ह्याच ठिकाणी आपला देह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेला दिसला असता.

नुसत्या विचारांनीच त्याला कापरं भरलं.

आता मात्र तो ढसढसा रडायला लागला.त्या माणसाने त्याला पाणी आणुन दिले.पाठिवरून हात फिरवला.पित्यासमान त्याचा कनवाळु स्पर्श रायाला मानसिक आधार देत होता.

रडुन थोडे शांत झाल्यावर पुन्हा त्या माणसाने प्रश्नार्थक नजरेने रायाकडे पाहिले.

जणु तो मघाच्या प्रश्नाच्या उत्तराची वाट पहात होता.

रायाने आपला म्लान चेहरा वर केला आणि डोळ्यातुन पुन्हा आसवं गळु लागले.

अरेऽ कोन तुऽ?कवाधरन पुसुन ऱ्हायलो काय तरी बोल…" 

"का निसतीच टिपं गाळत ऱ्हाहनार हाईस?" 

"आसं काय आक्रीत घडलं की जीव द्यायला निघालास भल्या पाहटं?"

"कोण तुम्ही बाबा?" 

"का वाचवलत मला?"

"मरू द्यायच होत;सगळे प्रश्न एका झटक्यात सुटले असते."

"अरे पोराऽऽ तुझी सुटका झाली असती पन माघारी राह्यलेल्या मानसांचे काय झाले असते, ,विचार केला का?"

 "धडधाकट दिसतोस.चांगल्या घरचा दिसतोस मग हि अवदसा का आठवली रं बाबाऽऽ…?"

त्यावर नि:शब्द होत राया भिजल्या डोळ्यांनी फक्त त्या वयस्कर माणसाकडे बघत राहिला.

काय सांगावे,कुठुन सांगावे काही सुचत नव्हते त्याला.

           ~~~~~~~~~~~

राया देशमुख. 30/35 वर्षाचा मध्यमवर्गीय कुटुंबातील तरूण मुलगा. लग्नाला दहा वर्ष झालेली.

राया तसा मनमिळाऊ,गोड स्वभावाचा मुलगा.अभ्यासात विशेष गोडी नव्हती पण इतर टेक्निकल कामात त्याला फार गती होती.कसेबसे ग्रॅज्युएशन पुर्ण करून आता काँम्प्युटर्सचा सर्टिफिकेट कोर्स करत होता.त्या कोर्समधुन विशेष प्राविण्यासह पास झाल्यावर त्याच सरांकडे पुढील कॉलेज शिकता शिकता अकाऊंट्सच्या एन्ट्रीज करायच्या पार्टटाईम जॉबला लागला.

एका एन्ट्रीला 50 पैसे असा हिशोब.अशा हजारो अकाऊंट्सच्या एन्ट्रीज तो बघता बघता जलद वेगाने करू लागला.त्याचा पैसाही बऱ्यापैकी मिळु लागला.

मग ते काम सोडुन त्याने एका कनस्ट्रक्शन फर्ममधे नौकरी धरली.तिथेही थोड्याच अवधीत आपला गोड,प्रेमळ प्रामाणिक स्वभाव आणि वक्तशिरपणाच्या आधारे त्याने सर्व वरिष्ठांची मने जिंकुन घेतली.

आता तर साहेबांनी सगळ्या महत्त्वाच्या कामांची जवाबदारी पुर्णपणे त्याच्यावर सोपवली.

लवकरच आपल्या कामातील सचोटिच्या वागणुकीने तो सगळ्यांच्या गळ्यातला ताईत बनला.

पुढे साहेबांनी आपल्या धंद्यातील सिक्रेट अकाऊंट्सचे सर्व आर्थिक व्यवहार रायावरच सोपवले.कोणाकडुन येणारी वसुली,बँक व्यवहार,साईटवरच्या कामगारांचे पगार सगळी कामे रायाच करत असे.राया असला की काम फत्ते हि जणु खात्रीच.

साहेबांचे सगळे दोन नंबरचे व्यवहार पण आता रायाच पहात होता.

लाईफ खूप मस्त चालली होती.खिशात पैसा खेळत होता.घरी एक म्हातारी आई सोडता कुठलीही जवाबदारी नव्हती.आईला सुद्धा वडिलांची पेन्शन होती.स्वत:चे वडिलोपार्जित घर होते.त्यामुळे रायाचे सगळे मजेत चालले होते.आता त्याने एक गाडीही खरेदी केली होती.

दिसायला रूबाबदार,कमावलेले शरीर,गोरा वर्ण,त्यात हसतमुख गोड बोलणे.कुणालाही भुरळ पडेल असे त्याचे व्यक्तिमत्व.

गल्लीत नविनच रहायला आलेल्या पाध्ये बिऱ्हाडातील सगळ्यात मोठी मुलगी कुसुम कॉलेजला जाता-येता तिची रायाशी नजरानजर व्हायला लागली.मग हसणे.कधीतरी काम काढुन घरी येणेजाणे सुरू झाले.कुसुम कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला पण वयाने बरेच अंतर असुनही रायाच्या राजबिंड्या रूपड्यावर भाळली.

स्वत:चे घर आहे,मुलगा चांगला कमावता आहे,घरातही माणसांचा व्याप नाही म्हणजे हे सगळे वैभव उद्या आपलेच होणार हे कुसुमच्या चाणाक्ष नजरेने हेरले आणि तिने रायावर आपल्या प्रेमाचे जाळे टाकायला सुरवात केली.कुसुमही दिसायला सुंदरच होती.गहुवर्ण, बांधेसुद,लांबसडक काळेभोर केस आणि लाघवी मधाळ बोलणे.रायाची विकेट न पडली तरच नवल होते.चुपके चुपके ह्यांचे प्रेमप्रकरण पुढे सरकत होते.चोरून भेटी,चोरटे स्पर्श त्यातुन आता एकमेकांशिवाय दोघांनाही चैन पडेनासे झाले.नको ते संबंधही घडु लागले.त्यामुळे आता त्यांना लग्नावाचुन पर्यायच नव्हता.

दोन्ही घरातील विरोधाला न जुमानता एक दिवस दोघांनी पळुन जाऊन लग्न केले.

साहेबांचा रायावर प्रचंड विश्वास आणि जीवही.त्यांनी त्या दोघांना आपल्या घरात काही काळ आश्रय दिला.पुढे दुसरे घर पाहुन संसाराला लागतील ती जुजबी भांडी-कुंडी सामान देऊन त्यांचा संसार थाटुन दिला.

दोघांच्याही घरच्यांनी सगळेच संबंध तोडले होते.कधीकधी रायाला आपल्या आईची आठवण यायची पण नव्या नवलाईचे लग्न आणि बायको बरोबरच्या सुंदर रात्री ह्यात तो काही काळातच तिला पुरता विसरला.

म्हणता म्हणता कुसुम एका मुलाची आई झाली. संसाराची जवाबदारी वाढली,खर्च वाढले.त्यात पैसा उधळायची दोघांचीही सवय त्यामुळे छान छौकीत जगण्याच्या हव्यासात नको त्या मार्गाने राया पैसा कमवायला लागला.दोन्ही हातांनी खर्च चालु पण भविष्याचे कुठलेच प्लॅनिंग नाही.

हळुहळु कमावलेला पैसा कमी पडायला लागला.आणि कुसुमची पैशासाठी किरकिर वाढु लागली.वारंवार दोघांची भांडणे व्हायला लागली.नको त्या मार्गाने लक्ष्मी आली की त्याला तशाच वाटा फुटतात.रायाच्याही बाबतीत तेच घडले.रायाला पिण्याची सवय जडली.आधी कधी कधीच पिणारा आता रोजच पिऊन यायला लागला.पिऊन कामावर जाण्यामुळे एक दोनदा क्लाएंट्सनी कम्प्लेंट केली वरिष्ठांकडे.

दोन तिनदा वॉर्निंग देऊनही रायामधे सुधारणा नव्हती.

आजकाल तर तो साहेबांनाही उलट उत्तरे करू लागला होता.त्याला सतत हेच वाटायचे की ह्यांना कोण आहे आपल्याशिवाय.झक मारत सहन करतील.पण इथेच त्याच्या ऱ्हासाला सुरवात झाली होती.

घरच्या खर्चांची वाढती डिमांड,कुसुमची कटकट तो जाम वैतागायचा.दारूच्या अति सेवनामुळे त्याचे हातपाय लटपटायचे काम करताना. अशातच साहेबांना एका अकाऊंटच्या हिशेबात घोळ लागला.सगळे नीट तपासल्यावर हि रायाचीच करामत हे त्यांच्या अनुभवी नजरेने ताडले पण त्याच्या विषयी वाटणारी माया त्यांना कठोर निर्णय घेण्यापासुन परावृत्त करत होती.त्यांनी कडक भाषेत सुचना देऊन सर्व आर्थिक व्यवहाराची कामे त्याच्याकडुन काढुन घेऊन त्याला जुजबी कामावर ठेऊन घेतले.

आता तो सगळ्यांच्या नजरेतुन उतरला होता.जो कामगार वर्ग रायाशेट रायाशेट म्हणुन अदबीने बोलायचा तेही आता मान देईनासे झाले.वरचा पैसाही बंद झाला.पैशाची तंगी आणि दारू मुळे कुसुमही सतत त्याच्याशी वाद घालायची.

पिण्याची सवय तर सुटायचे नाव घेत नव्हती.असले नसलेले सगळे पैसे हळुहळु संपत चाललेले त्यात मुलाच्या शिक्षणाचाही खर्च सुरू झाला.सर्व मित्र,नातेवाईकांकडुन उधारी घेऊन सगळ्यांचे देणे थकले होते.रस्त्याने जाताना तोंड लपवत जायची पाळी येत होती रायावर.

एक दिवस अति पिण्यामुळे तो चक्कर येऊन पडला.खूप सिरीयस अवस्थेत हॉस्पीटलला अॅडमिट केले.डॉक्टरांच्या मते अतिमद्यसेवनाने त्याचे लिव्हर डॅमेज झाले होते.बायको तर कंटाळुन केव्हाच माहेरी निघुन गेली होती.

कसाबसा त्यातुन बरा होऊन कामावर जायला तयार झाला तोच साहेबांनी फोन करून कळवले की आजपासुन कामावर यायची गरज नाही.

त्याचा पगार एका कामगारामार्फत घरपोच पोहचवुन त्याची कायमची सुट्टी केली गेली होती.

आता काय करायचे??

पुर्ण अंधार.नैराश्याने रायाला घेरले.

तो नौकरीसाठी वणवण भटकत होता पण कुठल्याही खास सर्टिफिकेट/डिग्री शिवाय नौकरी मिळणे कठिण होऊन बसले होते.

इथल्या कामाच्या तोंडी अनुभवाला ग्राह्य धरून तोंडी बोलण्यावर नौकरी मिळणे अशक्य होऊन बसले होते.तो प्रयत्न करतच होता एवढ्यात कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू झाले.

रायाला तर खोल गर्तेत बुडत चालल्या सारखे वाटु लागले.रोजच्या खाण्याची भ्रांत व्हायला लागली.भीक मागुनही जगता येत नव्हते.

सरकारच्या सर्व योजना गरीबांसाठी होत्या.रायाला मात्र ना धड गरीब ना धड श्रीमंत ह्या कॅटॅगिरीमुळे अन्नान्न दशा झाली होती.

एखाद्या खोल निराशेच्या विवरात आपण आत आत बुडत चाललोय आणि त्यातुन आपल्याला आता कोणीच बाहेर काढु शकत नाही हेच त्याच्या मनावर ठसत चालले होते.तो नैराश्याने ग्रस्त झाला होता.

शेवटी विफलता आणि नैराश्याने इतके घेरले की आज जीव द्यायला म्हणुन तो पहाटेच्या पहिल्या गाडीसमोर येऊन ऊभा राहिला.जगण्यापेक्षा मरणेच त्याला जास्त सोप्पे वाटले असावे कदाचित.

पण म्हणतात ना 'देव तारी त्याला कोण मारी'तसा अचानक हा आगंतुक अवतरला आणि त्याने रायाला वाचवले.

त्याची विमनस्क सैरभैर अवस्था बघुन बाबांनी त्याला आपल्या पाठोपाठ येण्याची खूण केली.राया निमुटपणे त्यांच्या मागे जाऊ लागला.थोडे चालुन गेल्यावर अचानक राया काहितरी आठवल्या सारखा थांबला.

बाबांनी खुणेनेच का थांबलास असे विचारले.

"बाबाऽ इकडे कुठे चाललोय आपण?माझं घर तर मागल्या बाजुला राहिले.मला जायला पाहिजे.."

बाबा तरातरा रायाजवळ आले.त्याचं बखोटं धरून त्याला मगाची तिच पटरी दाखवुन म्हणाले,"आत्ता काही मिनटापुर्वी जर मी आलो नसतो तर हिकडं तुझ्या रक्ताचा सडा पडलेला असता.आणि मग तेव्हा का नाही आला हा विचार मनात.आता कोणासाठी माघारी जाणार? गपगुमान माझ्या मागुन ये.असं समज तु मेलास त्या दुनियेसाठी अन् चाल माझ्या संगट.."

बाबांच म्हणणही खरच होतं.बायको घर सोडुन गेली,आईला आपण सोडले,नौकरी सुटली,मान सन्मान सगळे आपण आपल्या हाताने घालवले मग कुणासाठी माघारी जात होतो मी!!"

रायाचे डोकं विचारांनी भंडावुन गेले होते.

             ~~~~~~~~~~~~

काही अंतर चालत गेल्यावर एक बैलगाडी दिसली.म्हाताऱ्याने गाडीजवळच चरणाऱ्या बैलांना गाडीला जुंपले आणि रायाला खुणेनेच गाडीत बसण्याचा इशारा केला.राया निमुटपणे बैलगाडीत चढुन बसला.मनावरील प्रचंड मानसिक ताण आणि थकवा त्यात सकाळचा अंगाला लागणाऱ्या हवेतील गार वाऱ्याने त्याला ग्लानी आली.किती वेळ तो तसाच झोपला काय माहित.

जेव्हा गाडी जोरदार हिसका देऊन थांबली तेव्हा त्या धक्क्याने तो खडबडुन जागा झाला.डोळे चोळत समोर बघितले तर विस्तीर्ण हिरवागार शेतमळा चहुकडे पसरलेला.मधोमध एक आटोपशीर टुमदार घर.

आपण कुठे आलोत हेही त्याला कळेना.

बाबांनी खुणेनेच खाली उतरायचा इशारा केला त्याबरोबर रायाही संमोहित झाल्यासारखा त्यांच्या आज्ञेचे पालन करत खाली उतरला.

बाबांनी जवळच झाडाखाली बैलांना वैरण देऊन गाडी तिथेच सोडत घराकडे झपझप पावले टाकत जाऊ लागले.रायाही त्यांच्या मागोमाग निघाला.

घराच्या परसातच बसायला दगडी बांधकाम केलेला कट्टा होता.दोघेही त्या कट्ट्यावर विसावले.

बाबांनी डोक्याचं मुडासं बाजुला ठेवत जोरदार हाक मारली," जीवाऽऽ,एऽऽजीवाऽऽ पाणी आण लवकर..."

"आणतो मालक.."

दुरूनच कोणीतरी पोरगेलासा साधारण रायाच्याच आसपास वयाचा मुलगा हातात पाण्याचा पितळी लोटा घेऊन धावत येताना दिसला.

जीवा रायाकडे चकित नजरेने बघत होता.हा कोण पाव्हणा..असे प्रश्नार्थक भाव चेहऱ्यावर दिसत होते.

त्याचा चेहरा बघुन बाबांनी लगेच जीवाला सांगितले,"हा बी आजपासनं हिथचं ऱ्हानार हाय.तुझ्या संगतीनं ह्याला बी घे. "

रायाला काहीच समजत नव्हते.हा कोण कुठला,सकाळी मला वाचवतो काय आणि आता मी त्याची मिळकत असल्यागत परस्पर मला न विचारता माझ्याबद्दल निर्णय घेतो काय…!

"कोण आहे हा??"

आपण कुठल्या सापळ्यात अडकत तर नाही ना चाललोय.बरं त्या बाबाची बोलण्यातली जरब,नजरेतला हुकुमीपणा आणि अंगातली रग बघता ह्याला उघड उघड विरोध करणेही रायाला शक्य नव्हते.

थोडावेळ असाच गेला.चहा-पाणी उरकले तसे बाबांनी जीवाला दुपारच्या जेवणाची तयारी करायला सांगितले आणि पुन्हा रायाकडे येऊन बसला.एव्हाना राया जरा स्थिर झाला होता.

आता बाबांनीच पुढाकार घेऊन बोलायला सुरवात केली..

"काय पाव्हणं,काय नाव तुमचं?"

"रायाऽऽ..राया नाव माझं…"

"अरंऽऽऽ पोराऽऽ अस काय झालं म्हुन जीव देत होताऽऽ..?"

रायाचा चेहरा खिन्न झाला. पुन्हा चेहऱ्यावर तीच उदासी पसरली.

आता रायाही बोलता झाला…

"काय सांगु बाबाऽऽ माझी चित्तरकहाणी.माझी मलाच लाज वाटु लागलीय.."

"आता नीट सांगशील तर समजल न्हवं..सविस्तर सांग बघु.."

रायाने सगळी कहाणी थोडक्यात सांगितली.सांगता सांगताच त्याचे पुन्हा डोळे भरून आले.

"अरंऽऽ बाबा ह्या येवढ्याश्या कारणापायी जीव द्यायला निघाला व्हयं रं..?"

"मग आमच्या सारख्या शेतगड्यांनी काय करायचे..?"

"त्यांना तर दरसाल ह्याच विवंचना अडचणी हायेत..मंग सगळ्यांनीच अस जीव द्यायचा का संकटाला घाबरून.?"

"तुमच्यापेक्षा आम्ही शेतकरी बरे निदान संकटाला दोन हात करत लढायची तयारी तरी करतो..." 

"चल आत चल..तुला दाखवतो."

असे म्हणत बाबांनी रायाला पडवीतुन माजघरात यायचा निर्देश केला.मोठ्या प्रशस्त माजघर कम बैठक खोलीत तो प्रवेशला.बैठकीतही चारी बाजुंनी भिंतीला जोडुन छोटे बैठकवजा कट्टे बांधले होते.ज्यावर सोयीनुसार झोपताही येऊ शकेल अशी रचना होती.प्रत्येक कट्ट्यावर व्यवस्थित बिछाने अंथरलेले होते त्यावर स्वच्छ चादरी घालुन साधीच पण आटोपशीर बैठक सजवलेली होती.

बैठकीतल्या भिंतीवर बरेच सारे घरगुती फोटो लटकत होते.

त्यातल्याच एका फोटोपाशी बाबा येऊन थांबले.

"हा फोटो बघितला का?"

एका तरण्या मुलाचा फोटो तसबिरीत लटकत होता..त्यावर नुकत्याच ताज्या फुलांचा हार लटकताना दिसत होता.बाजुला एक उदबत्ती मंद जळत होती.

"हा कुणाचा फोटो बाबा?"रायाने कुतुहलानेच विचारले.

त्यावेळी बाबांचे डोळे किंचित पाणावले.

आपल्या सोग्याने डोळे टिपत खाकरून गळा साफ करत किंचित घोगऱ्या आवाजात त्यांनी सांगितले,"ह्यो माह्या ल्योक.."

एवढे बोलताच पुन्हा त्यांचा गळा दाटुन आला.

"मागल्या साली विहिरीवर काम करत असताना साप चावुन मेला माझा पोरऽऽ"

"न्हाय वाचवु शकलो रे त्यालाऽऽऽ."

"माझ्या डोळ्यादेखत तडफडत प्राण सोडला त्यानं.."

"तरणं पोर अचानक मेलं त्याची हाय खाऊन कारभारनीनं अथरून धरल.किती दवादारू केली.शहराचे दवाखाने झाले पण डाक्दर म्हनला हिला काय बी रोग नाही.मानसिक धक्का हाय.होतीन बरे.परं धक्का सहन न होऊन शेवटी माय बी सहा महिन्यात गेली.."

माझ्या हसत्या खेळत्या घराचं समश्यान होऊन गेलं रं.."

"पोरग साप चावुन मेलं तोच आजचा दिवस.."

माझा पोरं दिसला मला तुह्यात त्यावेळी."

"माझ्या लेकराला तर मी न्हायी वाचवु शकलो पन तुला वाचिवलं.आन् म्हणुन ती कानफाटात मारलीं म्यां."

"माफ कर पोराऽऽ हात उचलला मी..पन काय करू..ते दृश्य पाहुन पह्यले मला तुझे लेकरंबाळ माय डोळ्यापुढं आली.."

"अरंऽऽआईबाप जीवाची काड करून लेकरांले जन्म देतात,वाढवतात,मोठ करतात ते काय असा जीव देयला का..!!"

"त्या मायला काय वाटलं असतं तुझ गाठोड्यात गुंडाळलेलं तुकडं बघुन?"

"त्या तुझ्या लेकरानं कुणाकडं पाह्यलं असतं ह्यो विचार डोस्क्यात कसा नाय आला तुला मरण्याआधी..?"

"इतका कसा रे मतलबी तु.."

राया पुन्हा ढसढसा रडु लागला.त्याची चुक त्याला उमगली होती.हे पश्चा:त्तापाचे आश्रु होते.

बाबांनी पुन्हा रायाच्या पाठीवरून मायेने हात फिरवला.मुकपणाने त्याचे सांत्वन केले.

त्यांच्या गप्पा होईपर्यंत दुपार होत आली होती.जीवाने स्वैपाक तयार झाल्याचे सांगताच ते जेवायला बसले.

आज किती तरी दिवसांनी राया असे गरम गरम पोटभर जेवण जेवत होता.जेवण उरकुन पडवीत थोडावेळ विश्रांती झाल्यावर उन्हं कलली तशी बाबा रायाला आपल्या मळ्यात फेरफटका मारायला घेऊन गेले.

तो इतका हिरवागार मळा बघुन रायाचे डोळे तृप्त झाले.इतक्या भर उन्हाळ्यात पण हा मळा मात्र हिरवाकच्च दिसत होता.बाबांच्या मळ्यात सगळ्या भाज्या लागलेल्या होत्या.

काही आधुनिक तंत्रज्ञान वापरून ग्रीन हाऊस मधेही एक्सॉटिक भाज्या लावलेल्या होत्या.

ते सगळ दाखवत हे सगळ तंत्र मुलाने कसे विकसीत केले ते कौतुकाने सांगत होते.

पण आता ह्याची निगा कोन राखनार हिच चींता बाबांना सतावत होती.ती चींता त्यांच्या बोलण्यातुन स्वच्छ जाणवत होती रायाला.

सगळा मळा पायी तुडवुन चांगले आठ दहा कि मी. अंतर चालुन राया दमला होता.

गेल्या कित्येक दिवसांत तो साधा घराबाहेरही पडला नव्हता त्यात कोरोनाने उरली सुरली कसर भरून काढत बाहेर जायची वाटच बंद केली होती.

त्या पार्श्वभुमीवर इकडे मात्र कोरोनाचा मागमुस दिसत नव्हता.

मनातले सगळे हे विचार चालु असतानाच बाबांनी रायाची विचार श्रृंखला तोडत विचारले..

"काय मग रायाभाऊऽऽ कसा वाटला आपला मळा?"

"वाह्..खूपच छान..मी तर किती दिवसांनी आज इतकी पायपीट केली..पाय भरून आले पार चालुन चालुन.."

"अरऽऽ मर्दा..एवढा तरूण गडी न् थकला व्हय रं..!!"

"आम्ही तर अशा रोज दहा चकरा मारतो मळ्याच्या." 

राया कसनुसा हसला.पिण्यामुळं त्याची सारी ताकदच गेली होती.थोडेही श्रम त्याच्याच्याने होत नसत..त्यामुळेच इतके चालुन त्याला दमायला झाले होते.

आता ते पुन्हा घरापाशी पोहोचले होते.जीवाने गरमा गरम चहा सोबत रानातली कणसं भाजुन आणली होती..

रायाने आधी कणसावर ताव मारला. चहाही मातकट पण फक्कड झाला होता..

चहा झाला तसा बाबांनी मूळ विषयाला हात घातला..

"रायाभाऊ एक बोलु का?"

"बोला कीऽऽ" राया उत्तरला.

"नाही तुमची काही हरकत नसलं तर तुम्ही मला एक मदत कराल का?"

"बोला की.."

त्याच काय ये..आता तुम्ही पाहिलच असाल किती मोठा मळा,भाजीपाला,गुरंढोरं,..हा सगळा माल रोजचा यार्डात विकायला जातो आपला.पण माझ्याकडं मानुसबळ राहिल न्हाई.पोरगा होता चांगला हाताशी आलेला तर त्याच आसं झाल. मला ते विंग्रजी समजत न्हाय.त्या विदेशी भाजांच काय कराव समजेना झालय.बरं कुणाला नेमाव तर कोणी गावात राह्यला तयार होत नाहित.त्यात सगळी जवाबदारी मला पहावी लागती.यार्डात माल पोहोचवायचा,त्याची व्यवस्था लावायची हिशोब ठेवायचा.झेपना झालय आताशा..काय कराव काही सुचना झालय..हा जीवा,मुलासारखा ह्याला ठेऊन घेतला.हाच घरातल सगळ बघतो पण शिक्षण न्हाय त्यामुळ त्याचा बाहेरच्या हिशोबी कामात उपेग न्हाई…."

बाबा इतक बोलुन शांत झाले..

अखेरीस रायानेच प्रश्न केला..,"मग ह्यात माझी काय मदत हवीय तुम्हाला?"

एक थंड सुस्कारा सोडत बाबा म्हणाले," आपण दोघांनी ठरवले तर आपण एकमेकांची मदत करू शकतो."

आता रायाही चकीत झाला," ती कशी कायऽऽऽ?" रायाने विचारले.

"त्यांच आसं बगाऽऽ,तुमी शिकले सवरलेले,विंग्रजी जाणणारे,त्ये कम्प्युटर का काय चालवणारे,त्यात बघुन तुम्ही मला मदत करू शकता."

" त्या विदेशी भाज्यांच्या लागवडी संबंधी माहिती सांगुन तसेच माझ्या भाजीपाला,दूध डेअरी सगळ्याचा हिशेब ठेवु शकता."

"त्याबदल्यात मी तुम्हाला खाऊन पिऊन पगारी ठेऊन घेईन.."

"आधी हे समदंऽऽ माह्या ल्योक बगायचा पर आता त्यो न्हाई.तुम्ही ही मदत केली तर लई उपकार होतील बगा गरीबावर."

बाबांनी झुकल्या नजरेने हात जोडलेले पाहुन रायला कससंच झाले.

एक कोट्याधिश माणुस ज्याने आज रायाचे प्राण वाचवले होते तोच रायापुढे याचना करत होता.

रायाने घाईने पुढे होऊन त्यांचे हात आपल्या हातात घेत उद्गारला,"अहो असे हात काय जोडताय?"

"तुम्हाला अस वाटत असन की जीव वाचवल्याचा मोबदला मागतोय की काय हा म्हातारा परं तस न्हाई."

"मला खरच मदत हवीय.बगा विच्छा अासलं तर हो म्हणा नाहितर तुम्हाला जिकड जायच तिकडं म्या सोत्ता सोडुन येईन."

रायालाही क्षणभर समजेना काय उत्तर द्यावे.

त्यातल्या त्यात पैशाच्या अफरातफरीमुळे गेलेली नौकरी,त्याची पिण्याची सवय हे सगळे दुर्गुण माहित असुनही बाबा त्यालाच पुन्हा हिशेब ठेवायचे इतके जोखमीचे काम कसे काय देऊ शकतात ह्याचे त्याला कोडे पडले होते.

बाबांची ऑफर खरे पाहता वाईट नव्हती.खाऊन पिऊन निवाऱ्याला घर देऊन पुन्हा पगार पण मिळणार होता.सद्य परिस्थितीत रायाला कोरोनामुळे असेही काम मिळणे अवघडच होते त्यात जे काम मिळेल त्यात घरभाडे लाईटबील,इतर खर्च भागवण्याइतका पगार मिळण्याची शाश्वतीही नव्हती.काय करावे विचारात पडला होता राया.."हो म्हणावे का?"पण पुन्हा आपल्याला पैशाचा मोह झाला तर?"जिस थाली मे खाया उसी मे छेद किया"असे नको व्हायला.बाबांनी केवढ्या विश्वासाने ही जवाबदारी मला दिलीय त्यावर मला खरे उतरलेच पाहिजे."

"काय रायाशेटऽऽ कुठे हरवलासा!"

"अहोऽऽ अशी काय बळजबरी न्हाय बरं जर तुमच्या मनाला पटलं तरच हो म्हणा.."

"आजची रात्र रहा हिकडच.नीट विचार करा न मंग काय ते ठरवा."

"सकाळच्याला पुन्हा मला फाट्यावर जायचच असतय तव्हा तुम्हाला म्हनसाल तिकडं सोडुन देईन.."बाबा मंद स्मित चेहऱ्यावर आणुन बोलत होते.

रात्रीची जेवणं उरकली मस्त चांदण्यात बाज टाकुन निजायची व्यवस्था केली होती जीवाने.

बाजेवर अंग टाकुन मनातल्या मनात विचार करत राहिला राया…….

        ~~~~~~~~~~~~~~

अस म्हणतात की आई बापाची पुण्याई मुलांच्या वाट्याला येते.माझ्या आईकडे तर मी लग्नानंतर पुर्ण पाठ फिरवली.कधी साधे जाऊन बघितले नाही पण तिने माझ्यासाठी नक्की रोज उदंड आयुष्य मागितले असणार देवाकडे म्हणुनच तिच्या पुण्याईने देव ह्या बाबांच्या रूपात धावुन आला मला वाचवायला.

"माझ्या निराशेतुन बाहेर काढायला हाच देव माझी मदत तर करत नसेल ना???"

"आता हिच देवाची इच्छा असेल का की मी इकडे राहुन बाबांच्या उपकाराची उतराई होऊ?"

"हाच जर परमेश्वराचा कौल असेल तर देवा मी तुझी आज्ञा शिरसावंद्य मानुन इकडे रहायचा निर्णय घेतलाय फक्त मागे ज्या चुका घडल्या त्या होऊ नये ही सद्बुद्धी तु मला दे.माझ्या पाठिशी रहा."

रायाचा निर्णय ठाम झाला तसे एक समाधानाचे हसु त्याच्या चेहऱ्यावर फुलले.

"मनात विचार आला….

 खरच मी मरण्याने काय फरक पडला असता जगाला.?

जन पळभर म्हणतील हायऽ हायऽ।

मी जाता राहिल कार्य काय।।

तसे चार दिवस दु:ख करून सगळेच आपापल्या मार्गाला लागले असते.

मग ह्या अशा जगात माझ्या नैराश्याला मीच कारणीभूत असताना जगाने मदत करायची अपेक्षा तरी मी का करतोय?

नाहीऽऽऽ ह्यातुन मीच स्वत:ला बाहेर काढु शकतो.

"God helps those who helps themselves….!"

आणि तो मार्ग परमेश्वराने मला दाखवलाय.

आता मी त्या मार्गावर चालुन माझी ह्या नैराश्यमयी अंधारातुन सुटका करून प्रकाशाकडे वाटचाल करणार.आजपासुन मी माझ्या सर्व वाईट सवयींचा त्याग करण्याचा पुर्ण प्रयत्न करणार.!

बाबांना त्यांच्या कामात सचोटिने मदत करणार..!

मनातल्या सर्व सकारात्मक विचारांनी केलेल्या दृढ संकल्पाने अचानक रायाला खूप ताजेतवाने वाटु लागले.मनावरील नकारात्मक विचारांचे मळभ हटले तसे खूप हलके हलके वाटायला लागले.

शांत स्थीर मन आणि वातावरणातील थंडाव्याने रायाला पडताक्षणी झोप लागली.

कसल्याश्या स्पर्शाने राया जागा झाला.

एक शेळीच कोकरू रायाच्या पायाला चाटत होतं.

खाटेपासुन काही अंतरावर एक उमदा देशी काळाभोर कुत्रा अंग दुमडुन बसला होता.त्याला बघुन कोणीही घाबरावे इतका तो तगडा,उंचापुरा  आणि दांडगा दुंडगा होता.

राया हळुच बाजेवरून उठुन बसला त्याबरोबर तो कुत्रा रायाच्या अगदी जवळ येऊन बाजेला खेटुन बसला.रायाची पाचावर धारण बसली.एकतर तो मोकळा,बांधलेला नव्हता,त्यात आजुबाजुला कोणी माणुस दिसत नव्हतं.जर रायाने हालचाल केली आणि त्याने चावा घेतला तर..?

रायची तर नुसत्या विचारांनीच बोबडी वळली.

तो तसाच डोळे मिटुन देवाचा धावा करत मनातल्या मनात स्वामींचे नामस्मरण करत राहिला.

कोणाच्या तरी स्पर्शाने रायाने भीतभीतच डोळे उघडले तर समोर बाबा उभे.

रायाचा एकंदर भेदरलेला चेहरा बघुन त्यांच्या सर्व  प्रकार लक्षात आला तसे ते हसुन रायाला म्हणाले, "घाबरू नका रायाभाऊ,तें दिसायला जरी अजस्त्र भीतीदायक दिसत असलं तरी लई मवाळ हाय."

"माझा ल्योक असाच बाजेवर झोपायचा.त्याचा हा लाडका कुत्रा मोती,लई लाडाचा.

त्यानेच बांधावरून हे पिल्लु उचलुन आणलेले दोन वर्षापुर्वी.

त्यो गेल्यानंतर त्यानं इथं बसणच सोडलं होतं.आज पहिल्यांदा त्यो पुन्हा इथ बसलाय.त्याला बी माझ्यावाणी तुमच्यात त्याचा धनी दिसला अासल नाहितर नवख्या लोकांना जवळ बी फिरकु देत नाही.अख्खा मळा त्याच्या भरोशावर असतो राखणीला..

रायाची भीती बाबांच्या जवळ असण्यामुळे कमी झाली होती.हिंम्मत करूनच तो बाजेवरून उठुन ऊभा राहिला त्याबरोबर मोती रायाच्या भोवताली घिरट्या घालत त्याला चाटायला लागला.

ते दृश्य बघुन बाबांच्या डोळ्यात पाणी आले.तो मूका जीव पण रायाला त्याचा धनी समजत होता.

रायाला मात्र हा परमेश्वराचा दुसरा संकेत वाटत होता.

त्याचा रात्रीचा निर्णय आता अजुन जास्त पक्का झाला आणि त्याने उत्साहाने मोतीला जवळ घेऊन कुरवाळले.

त्याच्या मानेला हाताने चोळल्या बरोबर त्याने रायाच्या भोवती जोरजोरात फिरून उड्या मारून आनंद व्यक्त केला.

रायाचा हात,चेहरा सगळीकडे तो जीभेने चाटू लागला.राया ऊभा राहिला तसा ऊंच उडी मारून मोती रायाच्या खांद्यावर पंजे ठेवुन जीभ बाहेर काढुन मान वर करून ऊभा राहिला.

जीवाही हे दृश्य बघुन हैराण झाला कारण तो इतका जूना गडी,तिथे किती दिवसांचा रहात असुनही मोतीने असा लाडिकपणा त्याच्याबरोबर कधीच केला नव्हता.पण बाबांच्या मुलासारखेच मोती रायाबरोबर वागताना बघुन त्यालाही रायाबद्दल आपलेपणा वाटला जणु त्या मुक्या जनावराने रायाची इथली एन्ट्री फायनल करून त्याच्या विश्वासार्हतेवरच शिक्कामोर्तब केला होता..

               ~~~~~~~~~~~

जीवाने दिलेला आयता चहा पिऊन राया बाबांना म्हणाला, 

"बाबाऽऽऽ मला तुमचा प्रस्ताव मंजुर आहे."

"मी तयार आहे तुमची मदत करायला."

बाबाही खुष झाले.

त्यांनी रायाला लगेच मुलाची खोली उघडुन दिली.तिकडे एक कंप्युटर पण होता हे बघुन राया चकित झाला.इथे खेड्यात राहुनही ह्यांचा मुलगा कंप्युटर चालवणे जाणत होता ह्याचेच त्याला आश्चर्य वाटले.त्याने कंप्युटरच्या खुर्चीत बसुन ते स्टार्ट करून बघितले.

ते सुस्थितीत होते.फक्त वापर नसल्याने धुळ बसली होती.

त्याच्या चेहऱ्यावरचे आश्चर्य बघुन बाबांनीच सांगितले, 

"माझा पोरगा लई हुशार होता."

"त्याने शेतकीव्यवसायतले शिक्षण घेऊन डिग्री मिळवली होती.ह्यात बघुन रोज काय ना काय नवनवे प्रयोग करायचा शेतात.त्याच्या सांगण्यावरूनच हे ग्रीनहाऊस बांधले."

"खूप गुणी लेकरू हो पणऽऽऽऽ……!"

बाबांना पुढचे शब्द बोलवेना.आवंढा गिळुन त्यांनी पुन्हा आपल्या कामाविषयीची माहिती द्यायला सुरवात केली.

दुध डेअरी,भाज्यांची विक्री हे बाबांचे मुख्य व्यवसाय.दूध कुठे कुठे किती वाटप होते ह्याची त्यांनी सविस्तर माहिती दिली.एकुण कामाचा व्याप बराच होता हे प्रथमदर्शनी रायाच्या लक्षात आले.ह्या कामाचा त्याला अनुभव नव्हता परंतु बाबांनी त्याला हवी ती सर्व मदत करण्याची हमी दिली.रायाने कंम्प्युटर स्टार्ट करून बघितले तर बाबांच्या मुलाने प्रत्येक काम आणि व्यवसायाची वर्गवारी करून वेगवेगळे फोल्डर्स बनवुन सर्व माहिती व्यवस्थित संकलित करून ठेवली होती.

प्रत्येक व्यवसायातील आर्थिक व्यवहाराचे सर्व हिशोब नीट अकाउंट बनवुन नोट करून ठेवले होते त्याने.मधल्या एक वर्षाचाच खंड पडला होता त्याच्या आकस्मिक मृत्युमुळे.

सर्व व्यवहार एकदम अप-टु-डेट  होते.आता रायाला मधल्या एक वर्षाचे सर्व अकाऊंट सेटल करायचे होते.

त्याच बरोबर त्याने बाबांची मदत म्हणुन भाजी विक्रीतही मदत करायचे मनोमन ठरवले.कारण बाबांनी रायाचे सर्व दुर्गुण जाणुनही त्याच्यावर पुर्ण विश्वास टाकुन त्याला इतक्या मोठ्या कारभाराची सर्व सुत्र सोपवली होती अगदी आपल्या मुलाची जागा दिली होती.

आता रायाची टर्न होती त्यांच्या प्रेम आणि विश्वासाला खरे उतरायची.

त्याला सहज एक कल्पना सुचली तशी त्याने ती बाबांना सांगितली..सध्या कोरोनामुळे लोकांना भाज्या निर्जंतुक करण्याचे अतिरीक्त काम वाढले आहे.जर आपण भाज्या निर्जंतुक करूनच ऑर्डर घेऊन घरोघर डिलिव्हरी दिली तर!!

ही कल्पना बाबांना खूपच पसंत पडली.यार्डात भाजी विकायला कमिशन जाते पण घरपोच निर्जंतुक भाजी पोहोचवण्यात पैसाही हातोहात मिळेल आणि एकदा मालाची खात्री पटली की डिमांडही वाढेल.

आता राया ठरल्या प्रमाणे बाबांची सर्व कामे पाहु लागला.मळ्यातली शारीरिक मेहनत तसेच अकाऊंट्स मेंटेन्ड करणे अशा दुहेरी कामात रायाचा वेळ कुणीकडे जात होता त्यालाही समजत नव्हते.ठरल्याप्रमाणे भाज्या निर्जंतुकीकरणाचे त्याने प्रॉपर ज्ञान मिळवुन त्यासाठी काही स्त्रीयांची त्या कामावर नेमणुक केली.त्यांच्या कामावर तो जातीने लक्ष ठेवु लागला.बघता बघता ह्या कल्पनेला रंग चढला.आता बाबांच्या फोनवर लोक घरपोच भाज्या,दूध,फळे ह्यांच्या ऑर्डर्स बुक करू लागले.

सकाळपासुनच वितरणाच्या ह्या कामात रायाचा बराच वेळ जात असे.

बाबांच्या एका छोट्या मॅटेडोर मधे व्यवस्थित सर्व पॅकींग करून घरोघर राया स्वत: भाज्या पोहोचवु लागला.कमीत कमी पाचशेची ऑर्डर देणे अनिवार्य ठेवल्याने ह्या धंद्यात भरपुर फायदा होता.रायाचा वक्तशीरपणा आणि प्रेमळ बोलणे त्याला ह्या धंद्यात खूप कामी येत होते.बघता बघता ह्यात राया इतका परफेक्ट झाला की एका महिन्यातच त्यांना ह्यातुन खूपच फायदा झाला.बाबांनाही रायाचे कौतुक वाटत होते.

दिवसभर हे काम आणि रात्री तो सर्व अकाऊंट्सचे काम करत बसायचा.महिन्याभरातच रायाच्या तब्येतीत प्रचंड सुधार झाला होता.जो राया चार पावले चालला की दमायचा,ज्याचे हातपाय काम करताना लटपटायचे,आणि सगळ्यात महत्त्वाची बाब त्याला एका विशिष्ठ वेळी पिण्याची येणारी तलफ हे पार कुठल्या कुठे पळुन गेले होते.

त्याला तर आता आठवणही येत नव्हती पिण्याची.बाबांकडच्या निसर्गरम्य वास्तव्यात ताजे सकस आहाराने त्याच्या चेहऱ्यावर तकतकी आली होती..

एकंदरीत मन आणि तन दोन्हीनेही त्याच्यात सकारात्मक बदल घडत होता.

          ~~~~~~~~~~~

कृषी उद्योग बाजार समितीचे बाबा मेंबर असल्याने त्यांच्या ह्या निर्जंतुक घरपोच भाजी विक्रीच्या उपक्रमाची त्यांनी विशेष दखल घेतली आणि बाबांना त्यासाठी प्रशस्तीपत्रक आणि बक्षिस देऊन त्यांचा गौरव करण्याचा निर्णय घेतला.

त्यांची ह्याबाबत विशेष मुलाखत घेणारी एक टिम डिस्टंसिंगचे सर्व नियम पाळत बाबांना भेटायला आली.

बाबांनी कौतुकाने ह्याचे सर्व श्रेय रायाला दिले.मग टिव्ही चॅनेलच्या टिमने त्यांच्या सर्व कामाची माहिती घेऊन त्याची शुटिंग केली जेणेकरून सर्वच लोकांपर्यंत हि अभिनव कल्पना पोहोचावी.रायाने त्यांना भरभरून सर्व माहिती उत्साहात देत त्यांचा प्रोजेक्ट प्रात्यक्षिक रूपाने दाखवला..

आणि आज तो दिवस आला जेव्हा त्याची टिव्ही वर प्रत्यक्ष मुलाखत घेतली जात होती. टिव्हीवर लाईव्ह मुलाखत प्रसारीत झाल्याने त्याचे नातेवाईक,मित्रमंडळ,बायको,आई मुलगा सर्वांनीच त्याला बघितले.रातोरात राया हे नाव गुमनामीच्या अंध:कारातुन प्रकाशझोतात आले.

रायाला तर बाबा दत्तक घेण्याचाच विचार करत होते.त्यांनी रायाला आपला मानसपुत्रच करून टाकले.रायानेही त्यांच्या सोबत राहण्याचा निर्णय कायम केला..

आता त्याने दृकश्राव्य माध्यमांचा वापर करून आपली आपबीती-".नैराश्य आणि मी त्यावर केलेली मात " ह्यावर बोलण्यास सुरवात केली.

वाल्याचा वाल्मिकी बनण्याची ताकद आपल्यातच निर्माण करणे गरजेचे असते हे तो स्वानुभवातुन आपल्या सारख्या नैराश्यग्रस्त लोकांपर्यंत पोहोचवु लागला.अनेकांच्या शंकांना उत्तरे देवुन आत्मबल आत्मप्रगतीसाठी समुपदेशनही करू लागला..

रायाला पुन्हा आपला आत्मसन्मान आपली माणसे आणि गृहसौख्य परत मिळाले….!

आता राया रोज आपल्या समुपदेशनात एक प्रार्थना स्वत:ही म्हणतो आणि इतरांनाही म्हणायला शिकवतो……

ॐ असतों मा सद्गमय।

तमसो मा जोतिर्गमय।

मृत्योर्मामृतं गमय।

ॐ शान्ति शान्ति शन्ति:।।

म्हणजेच :-

"मला असत्याकडुन सत्याकडे ने।

(निराशामय)अंधाराकडुन  (आत्मप्रगतीच्या)प्रकाशाकडे ने।

मला मृत्युकडुन अमरत्वाकडे घेऊन चल।।"

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~समाप्त…

©®राधिका कुलकर्णी.

🎭 Series Post

View all