फिरोजी कलरची साडी
वैशाख ऑफिस मधून घरी आला, तेंव्हा ललना फोन वर कोणाशी तरी बोलत होती. फोन झाल्यावर तिचं वैशाख कडे लक्ष गेलं. मग चहा पाणी झाल्यावर ती म्हणाली की ज्योत्स्नाचा फोन होता. ज्योत्स्ना म्हणजे त्यांची मोठी मुलगी, जी आता दुबईला होती.
“काय म्हणते आहे? सर्व ठीक आहे ना?” – वैशाख.
“म्हणत होती की “तू लगेच ये म्हणून.” तिला आता ५ वा महिना चालू झाला आहे, आणि मागच्याच आठवड्यात सासू सासरे परत भारतात आले, तुम्हाला तर माहितीच आहे.” – ललना.
“ठीक आहे तू जा, मला प्रचंड कामं आहेत, त्यामुळे मला जमणार नाहीये. नाही तरी अश्या वेळी आईचीच जरूर असते. मी येऊन काय करणार?” – वैशाख.
“अहो, मी आज पर्यन्त कधीच एकटी कुठे गेली नाही, आणि आता एकदम परदेशात? जमेल का मला?” – ललना.
“अग इथे मी बसवून देईन, आणि तिकडे जावई बापू येतील तुला घ्यायला. बाकी काय करायचं ते मी तुला नीट समजावून सांगतो. घाबरण्याचं काहीच कारण नाही. इथे बसायचं आणि दुबईला उतरायच. आहे काय आणि नाही काय.” – वैशाख
वैशाखने ५००० रुपये भरून तिच्या मोबाइल ला इंटरनॅशनल रोमिंग करून दिलं. शरजाहला उतरल्यावर फोन कसा अॅक्टिवेट करायचा हे समजावून सांगीतलं आणि कागदावर लिहून पण दिलं. त्याच कागदावर जावयांचा आणि मुलीचा फोन नंबर पण लिहून दिला. अशी सगळी जय्यत तयारी झाली, आणि चार दिवसांनी ललना पहाटे शारजाहच्या विमानात बसली.
वैशाख सकाळ पासूनच फोन जवळ बसला होता. साधारण ८ वाजता, जावयाचा फोन येईल अशी त्याला अपेक्षा होती. सव्वा आठ वाजता फोन आला.
“आई अजून बाहेर आल्या नाहीत. तुम्ही म्हणाले होते की रोमिंग केलं आहे म्हणून, पण त्यांचा फोनही लागत नाहीये. इतका वेळ का लागावा, काही समजत नाही. मी माझा एक सहकारी एयरपोर्ट वर आहे, त्याला सांगतो बघायला.” -विनोद
पांच मिनिटांनी विनोदचा पुन्हा फोन आला. “मित्र म्हणतो की तो ओळखेल कसा? आईंनी साडी कोणची नेसली आहे?” – विनोद.
“अरे, मला कसं कळणार? ती कांजीवरम नेसली आहे की पटोला, की गढवाल, तिच्या जवळ ढीगभर साड्या आहेत. मी कसं सांगू कोणची ते? मला साड्यांचे प्रकार ओळखता येत नाही.” – वैशाख.
“अहो बाबा, ते नाही विचारत आहे मी. साडीचा रंग कोणचा ते सांगा.” – विनोद.
“अरे बापरे नाही माहीत बाबा. मरून कलर असेल. छान दिसतो हा रंग तिला.”-वैशाख
“ठीक आहे. पण नक्की ना? नाही तर माझा मित्र भलत्याच बाईला विचारायचा, आणि प्रॉब्लेम व्हायचा.” – विनोद.
तेवढ्यात वैशाख चा मुलगा वय वर्षे १० उठला होता आणि बाबा कोणाशी बोलताहेत ते बघायला हॉल मधे आला.
“अरे तुला माहीत आहे का, आईने कोणची साडी नेसली होती ते? म्हणजे कोणच्या रंगाची.” – वैशाख.
मुलाने काही न बोलता वैशाखच्या हातून फोन घेतला. विनोदनी तोच प्रश्न त्याला केला.
“फिरोजी रंगाची साडी आणि त्याला त्याच रंगाचं ब्लाऊज.” मुलाने माहिती पुरवली.
“हा कोणचा रंग आहे? लाल, नीळा, हिरवा असं काही सांग.” – विनोद
“हिरव्या रंगाची झाक असलेला नीळा रंग.” – मुलगा.
“ओके” – विनोद.
तासाभराने विनोद चा फोन आला. सगळे सुखरूप घरी पोचले होते. निरोप सांगून झाल्यावर ललनानी फोनचा ताबा घेतला.
“काय हो, मरून रंगाची साडी असं कसं सांगीतलं तुम्ही?” – ललना.
“अरे, फिरोजी रंगाची असं सांगीतलं ना.” – वैशाख.
“काही बोलू नका, माझ्याकडे लक्षच नसतं तुमचं. कायम आपलं काम काम आणि काम. दुसरं काही दिसतच नाही तुम्हाला. आणि नेहमीच तुम्हाला मरून रंग कसा आठवतो?” – ललना सॉलिड चिडली होती.
“अग काही तरीच काय? नेहमी कसं म्हणतेस?” – वैशाख.
“काही सांगू नका, त्या दिवशी आपण भाजी घ्यायला गेलो होतो बाजारात, तेंव्हा सुद्धा तुम्ही एका मरून साडी नेसलेल्या बाईच्या मागे मागे जात होता, वेळीच माझ्या लक्षात आलं म्हणून बरं.” – ललना.
“अरे काय, जुन्या गोष्टी उकरून काढतेस. सॉरी म्हणतो ना मी.” – वैशाख.
“सॉरी म्हणे, असं म्हंटलं की झालं. पुढे बोलायलाच नको.” – ललना.
“बरं ते जाऊ दे, तू विनोदला फोन का नाही केलास? तो केला असतास, तर एवढं रामायण घडलंच नसतं. तुला रोमिंग करून दिलं होतं ना, मग?” – वैशाख
“अहो काय तो तुमचा टिनपाट फोन. मी फोन चालू केला तर त्याने सांगीतलं की नेटवर्क सिलेक्ट करा.” – ललना.
“बरोबर आहे, मी सांगीतलं होतं तुला” – वैशाख.
“मी बघत होते पण लिस्ट मधे एयरटेलचं नावच नव्हतं, मग काय सिलेक्ट करणार? कपाळ? तुम्ही तरी न बघता कसे पैसे भरले? आणि ते ही ५०००. धन्य आहे.” – ललना
“अग तिथे एयरटेल नाहीये, इटी सलाट सिलेक्ट करायचं होतं. मी तुला सांगीतलं होतं आणि एका कागदावर लिहून पण दिलं होतं. तू कागद का पाहीला नाही?” – वैशाख
“कसा पाहणार? तो मी बॅग च्या वरच्या कप्प्यात ठेवला होता, चटकन सापडावा म्हणून.” – ललना.
“आणि ती बॅग लगेज मधे गेली. होय ना?” – वैशाख.
“हो.” – ललना.
“धन्य आहे मॅडम तुमची धन्य आहे.” – वैशाख.
“बरं ती ज्योत्स्ना ब्रेक फास्ट ला बोलावते आहे, आपण नंतर बोलू.” असं बोलून ललनानी फोन ठेवला.
***********
दिलीप भिडे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा