पहिली भेट भाग १३
मोबाईल रिपेअर होऊन आल्यावर श्रीराजशी मॅसेजवर बोलणे व्हायचे. श्रीराजला भेटण्याची किती छान संधी चालून आली होती पण पायाच्या दुखण्यामुळे तीपण गेली. घरी एका जागेवर बसून खूप कंटाळा आला होता, माझी खूप जास्त चिडचिड होत होती. अभ्यास करण्याची इच्छा होत नव्हती. कॉलेजची, तिथल्या मैत्रिणींची सगळ्यांचीच खूप आठवण यायची. श्रीराज मी फ्रेश रहावे म्हणून मला रोज जोक्स पाठवायचा.
जवळजवळ दीड महिन्याने माझ्या पायाचे प्लास्टर निघाले, पाय पूर्ण बरा झाला असला तरी नॉर्मल हालचाल करायला त्रास होत होता. प्लास्टर निघाल्यानंतर एका आठवड्याने डॉक्टरांनी मला कॉलेजला परत जायची परवानगी दिली.मला कॉलेजला कधी जाईल असे झाले होते कारण मला श्रीराजने दिलेले गिफ्ट बघायचे होते.
बाबांनी मला होस्टेलला नेऊन सोडले. पुजाला व प्रियाला इतक्या दिवसांनी भेटून खूप आनंद झाला होता. मी पुजाकडे श्रीराजने दिलेले गिफ्ट मागितले.
जान्हवी---- पुजा श्रीराजने दिलेले गिफ्ट दे.
पुजा---- जान्हवी श्रीराज खूप भारी आहे ग. तो खूप मस्त बोलतो, त्याच्यात खूप मॅनर्स आहेत.
जान्हवी---- श्रीराज हा माझा मित्र आहे सो मला चांगलं माहीत आहे की तो कसा आहे?
तु सांगण्याची गरज नाहीये, पहिले मला त्याने आणलेले गिफ्ट दे.
पुजा---- जान्हवी एवढी चिडचिड का करत आहेस?
जान्हवी---- अगं एका जागेवर बसून माझा स्वभाव खूप चिडचिडा झाला आहे.
पुजा---- आता रूटीन सुरू झाले की सगळं नॉर्मल होईल, हे घे श्रीराजनी आणलेले गिफ्ट, लवकर ओपन कर, मला पण बघायची उत्सुकता लागली आहे.
मी पुजाकडून गिफ्टचा बॉक्स घेते व तो ओपन करते, त्या बॉक्समध्ये एक छान घड्याळ असते, तस बघायला गेलं तर घड्याळ एकदम साधं होत पण आकर्षक दिसत होते. मला श्रीराजची चॉईस खूप आवडली होती. पुजालाही घड्याळ आवडले होते. घड्याळासोबत एक ग्रीटिंग कार्ड व एक चिठ्ठी होती. चिठ्ठीत लिहिलेला मजकूर खालील प्रमाणे:
हाय जान्हवी,
मी आशा व्यक्त करतो की मी दिलेले घड्याळ तुला आवडले असेल. मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच अस कोणा मुलीसाठी गिफ्ट घेतलय. तुझ्यासाठी गिफ्ट घेताना खूप जास्त विचार करावा लागला. मी अशी चिठ्ठी पण पहिल्यांदाच लिहितोय, लिहिण्यात जर काही चुक झाली तर समजून घे.मी दिलेले घड्याळ रोज हातात घालत जा म्हणजे जेव्हा तु घड्याळात वेळ बघशील तेव्हा तुला माझी आठवण येईल हाच हेतू तुला घड्याळ गिफ्ट करण्यामागचा आहे. मी माझ्या स्वतःच्या कामातून मिळालेल्या पैशांनी हे घड्याळ विकत घेतले आहे. तु विचार करत असशील की हा कुठे कामाला जातो? आपल्याला इंटर्नशिपला असताना स्टायपेंड मिळतो त्यातूनच तुला घड्याळ घेतलंय. तुझ्या रूपाने माझ्या आयुष्यात खूप छान अशी मैत्रीण आली आहे. तुझ्याशी बोलताना माझ्या मनावर कुठल्याही प्रकारचे दडपण येत नाही. आपल्यातील मैत्री खूप खास आहे. जर आयुष्यात पुढे जाऊन कामामुळे किंवा इतर काही कारणांमुळे आपल्यातील संवाद जरी कमी झाला तरी आपली मैत्री अशीच राहील याची मी ग्वाही देतो.
"मैत्री म्हणजे थोडं घेणं, मैत्री म्हणजे खूप देणं, मैत्री म्हणजे देता देता, समोरच्याच होऊन जाणं"
श्रीराजने दिलेले घड्याळ छानच होते पण त्यासोबत चिठ्ठीत लिहिलेला मजकूर तर अधिकच छान होता. घड्याळ व चिठ्ठीसोबत एक ग्रिटींग कार्ड पण होते, त्या ग्रिटींग कार्ड मध्ये मैत्री बद्दलचे 2 मॅसेज होते,
"मैत्री म्हणजे काय?
मैत्रीचे स्पष्टीकरण देणे ही सर्वात कठीण गोष्ट आहे, मैत्रीचा अर्थ आपल्याला शाळेत शिकवत नाही परंतु मैत्रीचा अर्थ काय आहे हे जर आपल्याला कळले नसेल तर आपण काहीच शिकलो नाही असे म्हणावे लागेल, मैत्री हा आपल्या जीवनाचा एक चांगला भाग आहे."
" Friendship is a blessing that can make you the happiest and most successful person in the world, no matter what your status. "
श्रीराजने दिलेले सर्वच गिफ्ट्स मला आवडले होते. गिफ्ट्स बघून झाल्यावर मी लगेच श्रीराजला फोन लावला.
जान्हवी---- हॅलो श्रीराज, कसा आहेस?
श्रीराज---- आज जान्हवी मॅडमला आमची कशी काय आठवण झाली? खूपच आरामात बोलत आहेस, घरी एकटीच आहेस का?
जान्हवी ---- तुला सांगायचंच राहून गेलं, मी होस्टेलला आली आहे.
श्रीराज---- हो का, आता तुझी तब्येत बरी आहे ना.
जान्हवी---- एवढे दिवस झाले पायाची काहीच हालचाल नसल्याने आता पायाची हालचाल करायला जड जाते आहे, डॉक्टर म्हणाले की हळूहळू पूर्ण बरे वाटेल.
श्रीराज---- मी दिलेलं गिफ्ट मिळाले का?
जान्हवी---- हो मिळाले ना, तेच सांगायला फोन केला होता.
श्रीराज---- माझी चॉईस आवडली का?
जान्हवी---- हो खूप छान घड्याळ आहे, ग्रिटींग कार्ड पण छान आहे, आणि सोबत असलेल्या चिठ्ठीतला मजकूर पण मस्त आहे. मला तू दिलेले गिफ्ट्स खूप आवडलेत. Thank you so much.
श्रीराज---- Its my pleasure.
जान्हवी---- मलाही तुला काहीतरी गिफ्ट द्यायचे होते पण मध्येच हा अपघात होऊन बसला, आपल्याला भेटण्याची चांगली संधी चालून आली होती पण सगळाच प्लॅन बिघडला.
श्रीराज---- Its ok, पुन्हा अशी एखादी संधी नक्की येईल आणि जर समजा आलीच नाही तर आपण शोधून काढू.
जान्हवी---- श्रीराज मला अभ्यासाचं खूप टेन्शन आले आहे, खूप दिवस वाया गेल्यासारखे वाट आहेत.
श्रीराज---- जान्हवी टेन्शन घेण्याची काही गरज नाहीये, आता न टाईमपास करता अभ्यासाला लाग, सगळं ठीक होईल.
जान्हवी---- किती टेन्शन घेतलं तरी अभ्यास मलाच करावा लागणार आहे. श्रीराज आपण नंतर बोलूयात, मला रुम मधला पसारा आवरायचा आहे.
श्रीराज---- हो चालेल, स्वतःची काळजी घे. बाय.
श्रीराजशी बोलून झाल्यावर मी रुम मधला पसारा आवरला. उद्या पासून परत रूटीन सुरू होणार होते. फायनल एक्साम 2 ते 3 महिन्यावर येऊन ठेपली होती. आता अभ्यासाला लागावे लागणार होते, टाईमपास करून चालणार नव्हते. पाय फ्रॅक्चर झाल्यामुळे या वेळेस annual function मध्ये सहभाग घेता आला नव्हता.
©® Dr Supriya Dighe