रात्री जेवण झाल्यावर श्रीराजचा फोन आला,
श्रीराज--- हॅलो जान्हवी, जेवण झालं का?
जान्हवी--- हो, फोन का केलास?
श्रीराज--- तुझ्या बाबांना फोन केला होता?
जान्हवी--- काय म्हणाले बाबा
श्रीराज--- मला खोटं बोलण्याची गरजच नाही पडली
जान्हवी--- का?
श्रीराज--- तुझी व त्या मुलाची पत्रिका जुळली नाही म्हणून तुझ्या बाबांनी पुढे जायची गरज नाही असे सांगितले.
जान्हवी--- सुंठेवाचुन खोकला गेला.
श्रीराज--- हो ना, सध्या पुरते तरी टेन्शन गेले आहे.
जान्हवी--- श्रीराज मी विचार करत होते की दिवाळीच्या सुट्टीत घरी गेल्यावर आई बाबांना आपल्या बद्दल सांगून द्यावे.
श्रीराज--- माझाही तोच विचार चालू होता. मीपण त्यावेळीच घरी आपल्या बद्दल सांगतो मग बघू पुढे काय होईल त्याला सामोरे जाऊ.
जान्हवी--- हो चालेल. गुड नाईट बाय.
श्रीराज--- गुड नाईट, बाय.
पुढचे काही दिवस सर्व सुरळीत चालू होते. एक दिवस बाबांचा फोन आला,
बाबा--- हॅलो जान्हवी, तुझ्याशी थोडं महत्त्वाचे बोलायचे होते, तुझ्याकडे वेळ आहे का?
जान्हवी--- हो बाबा, बोला ना, काय झालं काय महत्त्वाचे बोलायचे होते?
बाबा--- जान्हवी तुझ्यासाठी एक मुलगा बघितलाय.
जान्हवी--- बाबा म्हणजे तुम्ही माझ्या लग्नाचा विचार करत आहात का?
बाबा--- हो
जान्हवी--- बाबा इतकी घाई कशासाठी? इंटर्नशिप पूर्ण होऊ देत, मग बघुयात.
बाबा--- मला तुझं म्हणणं पटतंय, पण स्थळ खूप चांगलं आहे, मुलगा डॉक्टर आहे, घरची परिस्थिती चांगली आहे.
जान्हवी--- बाबा ते सगळं ठीक आहे पण इतकी घाई कशाला?
बाबा--- चांगलं स्थळ हातातून गेलं तर नंतर पश्चाताप करण्याची वेळ येऊ शकते.
जान्हवी--- बाबा आपण दिवाळीच्या वेळी मी घरी आल्यावर या विषयावर बोलूयात.
बाबा--- ठीक आहे जशी तुझी ईच्छा, मला असं वाटतंय जान्हवी दिवाळीच्या सुट्टीत मुलाला व मुलाच्या घरच्यांना भेटलीस तर बरे होईल.
जान्हवी--- बाबा पण
बाबा--- तुझ्या इच्छे विरुद्ध तुझं लग्न नाही होणार, एकदा भेटायला काय जातंय.
जान्हवी--- बाबा तुम्हाला जे पटतंय ते करा.
मी रागात फोन कट केला आणि श्रीराजला फोन करून इतंभूत स्टोरी सांगितली.
श्रीराज--- जान्हवी तु त्या मुलाला भेटायचे ठरवले आहे का?
जान्हवी--- बाबा ऐकतच नाहीये मग काय करू?
श्रीराज--- अगं पण त्या मुलाला व त्यांच्या घरच्यांना तु आवडली तर काय करायचं?
जान्हवी--- मी नकार देईल, घरी गेल्यावर बाबांना आपल्या बद्दल कल्पना देईल.
श्रीराज--- बरं ठीक आहे.
जान्हवी--- श्रीराज मला खूप टेन्शन आलं आहे रे.
श्रीराज--- टेन्शन नको घेऊस, जे होईल त्याचा मिळून सामना करूया.
जान्हवी--- हो चालेल
मला खरंच खूप टेन्शन आले होते, मी बाबांना श्रीराज बद्दल कस सांगणार होते काय माहीत? बाबांची काय प्रतिक्रिया असेल याची भीती वाटत होती. दिवाळी जशी जवळ जवळ येत होती तस मनावरच दडपण वाढायला लागले होते. श्रीराजची एक्साम असल्याने त्याच्या सोबत फोनवर बोलता येत नव्हते.
घरी जाण्यासाठी सामानाची आवराआवर करायला घेतली होती, मी कपड्यांच्या घड्या घालत असताना विचारात पडले होते, मला असं बघून पुजाने विचारले,
पुजा--- जान्हवी कुठे हरवली आहेस?
जान्हवी--- कुठे नाही, इथेच तर आहे.
पुजा--- अगं मी केव्हाची बघतेय, तु एकाच टॉपची घडी पाचव्यांदा घालत आहेस.
जान्हवी--- पुजा मला खूप टेन्शन आलय ग, बाबा श्रीराज बद्दल ऐकल्यावर काय प्रतिक्रिया देतील याची मला भीती वाटत आहे.
पुजा--- जान्हवी टेन्शन घेऊन काही होणार आहे का?
जान्हवी--- बाबा नाही म्हणाले तर, बाबांनी मला परत कॉलेजला येऊच दिले नाही तर, बाबांनी मला श्रीराजशी बोलूच दिले नाही तर.
पुजा--- बस जान्हवी, किती नकारात्मक विचार करशील, जरा असाही विचार करून बघ ना की बाबा हो म्हणाले तर. सुरवातीला बाबा नाही म्हणतील पण त्यांना सर्व समजावून सांगण्याचा प्रयत्न कर, मग हळूहळू बाबा तयार होतील.
जान्हवी--- सकारात्मक विचार डोक्यात येतच नाहीयेत, डोकं सुन्न झालंय.
पुजा--- अति विचार करशील तर असच होईल. शांत डोकं ठेवून बाबांशी बोल मग सगळं ठीक होईल, एकदा श्रीराजशी बोलून बघते का?
जान्हवी--- श्रीराजची एक्साम असल्याने तो अभ्यासात बिजी आहे, त्याने मला सांगितलंय की थोड्या दिवस मला फोन करू नको.
पुजा--- ओके, तस त्याचंही म्हणणं बरोबर आहे, एक्साम, अभ्यास महत्त्वाचा आहेच. तु घरी जा, मोकळा वेळ बघून बाबांशी बोल, उगाच घाई गडबड करू नकोस.
जान्हवी--- हो, चल मी बॅग आवरते नाहीतर उद्या बसची वेळ होईल तरी माझी बॅग काही भरून होणार नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी मी बसची वाट बघत बस स्टॉप वर थांबले होते, थोडयाच वेळात बस आली, मी बसमध्ये बसले. यावेळी पहिल्यांदा अस झालं होतं की मला घरी जाताना खूप भीती वाटत होती. पुढच्या स्टॉप वर आमच्या कॉलनीत राहणारी वृंदा ताई बसमध्ये चढली व माझ्या शेजारी येऊन बसली.
जान्हवी--- हाय वृंदा ताई ओळ्खलस का?
वृंदा ताई--- हो ओळखलं ना.
जान्हवी--- तु घरीच चालली आहेस ना, आपण किती दिवसांनी भेटत आहोत.
वृंदा ताई--- आईची तब्येत बिघडली आहे म्हणून आईला भेटायला चालले आहे. तु कुठून आलीस?
जान्हवी--- मी धुळ्याच्या मेडिकल कॉलेजात शिकते, दिवाळीसाठी घरी चालली आहे. तु खूपच काळजीत दिसत आहेस, काकूंची तब्येत खूप बिघडली आहे का?
वृंदा ताई--- नाही ग, मला आईला भेटू देतील का? हा प्रश्न पडलाय, बाबा मला घरात घेतील का?
जान्हवी--- अस का म्हणतेस? तुझ्या घरात तुला का घेणार नाहीत, तुमच्यात भांडण झालय का?
वृंदा ताई--- तु इकडे राहत नसल्याने तुला कल्पना नसेल, मी बाबांच्या इच्छेविरुद्ध लग्न केले म्हणून बाबा माझ्यावर रागावले आहे, आई बाबा दोघेही माझ्याशी बोलत नाहीत. मी माझ्या निर्णयावर ठाम होते, माझा माझ्या निवडीवर पूर्ण विश्वास होता त्यामुळे मी बाबांचे ऐकले नाही. मुलाची फक्त जात वेगळी होती म्हणून बाबा लग्नाला तयार नाही झाले.
जान्हवी--- तु काकांना समजवण्याचा प्रयत्न नाही केला का?
वृंदा ताई--- खूप प्रयत्न केला पण बाबा काही ऐकायला तयार नव्हते, आमच खूप प्रेम होतं एकमेकांवर, मी त्याच्या शिवाय लग्न करण्यासाठी दुसऱ्या मुलाचा विचारच करू शकत नव्हते, शेवटी निर्णय घेतला व बाबांच्या मनाविरुद्ध त्याच्याशी लग्न केले, बाबांनी घरातून बाहेर काढले व सांगितले की पुन्हा या घराची पायरी चढायची नाही.
जान्हवी--- तुझ्याशी घरातील कोणीच बोलत नाही का?
वृंदा ताई--- नाही ना, माझ्या घरा शेजारी माझी एक मैत्रीण राहते, तिच्या कडूनच आई आजारी असल्याच कळलं.
जान्हवी--- ताई तु सुखी आहेस ना.
वृंदा ताई--- हो मी सुखी आहे पण घरच्या सगळ्यांची खूप आठवण येते. जान्हवी एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं तरी आई बाबांच्या मनाविरुद्ध कधीच लग्न करू नकोस.
जान्हवी--- का ग ताई, अस का बोलत आहेस?
वृंदा ताई--- तु म्हणशील का हिने तर केलंय आणि तुला सांगतेय करू नको म्हणून, आई बाबा आपल्यासाठी खूप करतात ग, सुरवातीला मला वाटलं होतं की माझं आई बाबांशिवाय काही अडणार नाही पण हळूहळू जसे दिवस जात होते तशी आई बाबांची कमी जास्त प्रमाणात जाणवू लागली, मला माझा नवरा सुखात ठेवतो, कसलीही कमी पडू देत नाही पण आई बाबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. आईच्या हातच्या जेवणाची तर खूप आठवण येते.
जान्हवी--- तु काका काकूंशी बोलण्याचा प्रयत्न नाही केला का?
वृंदा ताई--- माझा आवाज ऐकून फोन कट केला जायचा. बोलता बोलता आपला स्टॉप पण आला.
जान्हवी--- हो ना, बाबा घ्यायला आले असतील, आपण सोबतच जाऊया.
वृंदा ताई--- नाही नको, तुझ्या बाबांना नाही आवडणार, मी भेटल्याचे त्यांना सांगू नकोस.
वृंदा ताई स्कार्फ बांधून माझ्या समोरून निघून गेली, वृंदा ताईचे बोलण ऐकून माझ्या मनातील गोंधळ अजूनच वाढला होता.
©®Dr Supriya Dighe
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा