आपण मागील भागात बघितलं, जान्हवी दिवाळीच्या सुट्टीत घरी जाऊन बाबांशी श्रीराज व तिच्या नात्याबद्दल बोलणार होती, तसेच जान्हवीच्या बाबांनी तिच्यासाठी एक मुलगा बघितला होता, जान्हवी च्या बाबांचा एकदा मुलाला भेटून घेण्याचा आग्रह होता. जान्हवी घरी जात असताना बसमध्ये तिला वृंदा ताई भेटते. वृंदा ताई स्वतःच्या अनुभवावरून तिला सांगते की काही झालं तरी आई बाबांच्या इच्छे विरुद्ध लग्न करू नकोस.
वृंदा ताईच्या बोलण्याने माझ्या मनातील गोंधळ खूपच वाढला होता. बस स्टॉप वर बस थांबल्यावर मी खाली उतरले, बाबा मला न्यायला आले होते. मला बघून बाबांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता, मी मात्र खूप विचारात होते.
बाबा--- जान्हवी बाळा प्रवासाने खूप दमली आहेस का?
जान्हवी--- नाही बाबा, अस काही नाहीये
बाबा--- मग तुझा चेहरा असा उतरलेला का दिसतोय?
जान्हवी--- प्रवासाने खूप थकायला झालंय, बाबा पहिले आपण घरी जाऊया का? उर्वरित चर्चा घरी जाऊन केली तर चालेल का?
मी काहीतरी बोलून वेळ मारून नेली. बाबा व मी घरी गेलो. आईनेही माझे हसून स्वागत केले पण माझ्या चेहऱ्यावर काही स्माईल नव्हती, मी माझ्याच विचारात हरवलेली होते. आईने बाबांना खुणावून विचारले, जान्हवीला काय झाले असेल? बाबांनी खुणेनेच तिला शांत बसायला लावले. मी फ्रेश झाले, आईने गरमागरम माझ्या आवडीचे जेवण बनवले होते. माझे जेवण करण्याकडेही लक्ष नव्हते तेव्हा आईने न राहवून मला विचारले,
आई--- जान्हवी काय झालंय?मी आल्यापासून बघतेय, तु कुठल्या तरी विचारात हरवली आहेस.
जान्हवी--- आई मला बस मध्ये वृंदा ताई भेटली होती, मला तिच्याबद्दल काहीच कल्पना नव्हती.
आई--- तिचा का विचार करतेस? तिने तिच्या आई वडिलांचा विचार नाही केला, आपण तिचा विचार का करावा?
जान्हवी--- अगं आई वृंदा ताईची आई आजारी आहे म्हणून ती त्यांना भेटायला आली आहे. वृंदा ताईशी घरातील कोणीच बोलत नाही, तिला घरात पण येऊ देत नाही.
आई--- वृंदा तिच्या घरच्यांच्या मनाविरुद्ध वागली त्याची शिक्षा तिला भेटली.
जान्हवी--- आई शिक्षा देण्यायोग्य तिने असा काय गुन्हा केला होता? स्वतःचा जोडीदार आपल्या मनासारखा असावा ही प्रत्येक मुलीची इच्छा असूच शकते ना.
बाबा--- जान्हवी मला काय वाटतंय ना, तु ह्या सगळ्याचा खूप जास्त विचार करत आहेस. ह्या विषयाच्या बाबतीत माझं मत विचारशील तर वृंदाने तिच्या आई बाबांची परमिशन भेटेपर्यंत थांबायला हवे होते, तो मुलगा तिच्यासाठी कसा योग्य आहे हे तिने आई बाबांना समजावून सांगायला हवे होते, प्रत्येक आई वडिलांची आपली मुलगी सुखात राहो हीच इच्छा असते, मुलीचे लग्न हे प्रत्येक आई वडिलांचे स्वप्न असते. जान्हवी आपण ज्या समाजात राहतो तिथे आंतरजातीय विवाह करणे मान्यच नाहीये. तुम्ही मुलं शिकले म्हणून तुम्हाला वाटतं की समाज वगैरे काही नसतो पण बाळा आम्ही याच समाजात राहतो. आपण ज्या समाजात राहतो त्याचे काही नियम व अटी असतात, त्या आपल्याला पाळाव्या लागतात. तु आता जेवण करून थोडा आराम कर, या विषयावर जास्त विचार करू नकोस.
मी गुपचूप खाली मान घालून जेवण केले व झोपण्यासाठी बेडवर पडले, आई बाबांचे आंतरजातीय लग्नाबद्दलचे मत ऐकून तर मला काहीच सुचत नव्हते. आई बाबांच्या बोलण्यावरून स्पष्ट जाणवत होते की ते माझ्या व श्रीराजच्या लग्नाला कधीच परवानगी देणार नाहीत. विचार करून डोकं जड पडलं होतं. एकीकडे वृंदा ताईचे बोलणं डोक्यात येत होते तर दुसरीकडे आई बाबांचे बोलणं कानात घुमत होते. शेवटी मी ह्या निष्कर्षापर्यंत येऊन पोहोचले, उद्या आई बाबांना श्रीराज बद्दल सर्व सांगायच आणि त्यांचा होकार येईपर्यंत वाट बघायची पण आई बाबांच्या विरोधात जाऊन काहीच करायचे नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी आईच्या आवाजाने जाग आली.
आई--- जान्हवी उठ आता, किती वेळ झोपून राहणार आहेस.
जान्हवी--- आई झोपू दे ग थोड्यावेळ, कॉलेजला असताना रोज सकाळीच उठावे लागते.
आई--- उद्या उशिरापर्यंत झोप, आज लवकर उठ. आपल्याकडे पाहुणे येणार आहेत.
पाहुण्यांचे नाव ऐकून मी झोपेतून खडबडून जागी झाले.
जान्हवी--- आई कोण पाहुणे येणार आहेत? कधी येणार आहेत?
आई--- पाहुणे संध्याकाळी येणार आहेत. उद्या धनत्रयोदशी आहे, घरातील खूप कामे करायची बाकी आहेत, फराळ बनवायचा आहे. तु लवकर उठ व आवर आणि माझ्या मदतीला ये. तुलाही सर्व करता आलं पाहिजे नाहीतर तुझी सासू म्हणेल की आईने काही शिकवलं की नाही?
जान्हवी--- आई मी उठते पण माझं लग्न आणि सासूचा विषय काढू नकोस.
आईने मला पाहुणे कोण येणार हे काही सांगितले नाही. पाहुणे कोण येणार हे एक कोडंच होतं. मी झोपेतून उठले ब्रश केला, अंघोळ केली. किचन मध्ये जाऊन चहा घेऊन हॉल मध्ये जाऊन बसले. बाबांची ऑफिसला जायची तयारी चालू होती.
जान्हवी--- बाबा आपल्याकडे संध्याकाळी पाहुणे कोण येणार आहे.
बाबा--- जान्हवी मला ऑफिसला जायची घाई आहे, तुझ्या आईला विचार ती सर्व सविस्तर सांगेल.
जान्हवी--- बाबा आईने सांगितलं असतं तर तुम्हाला का म्हणून विचारलं असतं?
बाबा माझ्या प्रश्नाच उत्तर न देता ऑफिसला निघून गेले. मला कळत नव्हते की आई बाबा मला कोण पाहुणे येणार आहेत ते सांगत का नाहीये? आई किचन मध्ये स्वयंपाक करत होती, मी आई जवळ गेले,
जान्हवी--- आई आपल्याकडे पाहुणे कोण येणार आहेत?
आई काही उत्तर देणार तेवढ्यात दरवाजाची बेल वाजली. मी दरवाजा उघडला तर माझी काकू आली होती.
काकू--- कशी आहेस जान्हवी?
जान्हवी--- काकू मी ठीक आहे पण तू एवढ्या सकाळी कशी आलीस?
काकू--- आपल्या घरी यायला वेळ बघून यावं लागतं का?
जान्हवी--- तस नाही पण तू सकाळी सकाळी कधी येत नाही म्हणून विचारलं.
काकू--- अगं आपल्याकडे आज संध्याकाळी पाहुणे येणार आहेत ना, तुझ्या आईची मदत करायला आले आहे.
जान्हवी--- काकू असे कोण विशेष पाहुणे येणार आहेत?
काकू माझ्या बोलण्याकडे दुर्लक्ष करून किचनमध्ये निघून जाते. मी तिच्या पाठोपाठ किचन मध्ये गेले.
जान्हवी--- आई आता तरी मला सांगणार आहेस का? आपल्याकडे कोण पाहुणे येणार आहेत?
आई--- तुला बघायला मुलाकडची मंडळी येणार आहे, तुझ्यासाठी मी एक ड्रेस इस्त्री करून ठेवला आहे तु आता फक्त एक काम कर, आपल्या शेजारच्या पार्लर मध्ये जा मी तिथल्या काकूंना सर्व कल्पना दिलेली आहे.
जान्हवी--- अगं आई मला बघायला पाहुणे येणार आहेत आणि ही गोष्ट मला माहित सुद्धा नाही.
काकू--- जान्हवी उगाच चिडचिड करत बसू नकोस, गुपचुप आईने जे सांगितलंय ते कर, आम्हाला भरपूर काम आहेत. माझ्या लग्नाच्या वेळी तर मी मुलाला न बघताच माझं लग्न माझ्या बाबांनी ठरवलं होतं. तुझं तस काही घडणार नाहीये तर जास्त विचार करत बसू नकोस. आज फक्त मुलाकडचे बघायला येणार आहेत लगेच तुझं लग्न काही होणार नाहीये सो डोन्ट वरी.
काकूचे बोलणे ऐकल्यावर मला काय बोलावे हेच सुचले नाही. मला जाम टेन्शन आले होते. मी गुपचुप आईने सांगितल्याप्रमाणे पार्लर मध्ये जायचा निर्णय घेतला. मी ठरवलं की पाहुणे गेल्यावर सगळं काही आई बाबांना खरं सांगून देईल, आता बोलून काहीच फायदा होणार नाही उगाच सगळे चिडतील.
©®Dr Supriya Dighe