Login

पहिली भेट भाग २३

Story of friendship cum love

       आईने सांगितल्याप्रमाणे मी पार्लरमध्ये जाऊन आले. आई आणि काकू घरातील कामे आवरण्यात मग्न होत्या. मी माझ्या रुममध्ये जाऊन श्रीराजला फोन लावला पण श्रीराजने फोन काही उचलला नाही. थोड्या वेळात श्रीराजचा मॅसेज आला," सॉरी मी खुप बिजी आहे, मी तुझा फोन घेऊ शकत नाही, हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी पेशंट चालू आहेत. काही महत्त्वाचे काम असेल तर मॅसेज कर, मी फ्री झाल्यावर तुझ्याशी बोलेल." श्रीराज आधीच त्याच्या कामात व्यस्त असल्याने मला माझ्या घरची परिस्थिती सांगून टेन्शन द्यायचे नव्हते.

       संध्याकाळ झाली, बाबा ऑफिस मधून लवकर घरी आले होते, काकाही ऑफिस मधून डायरेक्ट आमच्या घरी आले. आई व काकू माझ्या रुम मध्ये आल्या, मला ड्रेस बदलायला सांगितला, काकूने माझा हलकासा मेकअप केला, आईने व काकूने पाहुण्यांसमोर

 काय बोलायचे, कसे वागायचे ह्या सर्व इन्स्ट्रुकॅशन्स दिल्या. मला खूप जास्त टेन्शन आले होते.

        आई बाबा, काका काकू सर्व पाहुण्यांच्या स्वागतासाठी सज्ज होते. मी माझ्या रुम मध्ये एकटीच बसलेले होते. थोड्याच वेळात पाहुणे आल्याचे आवाजावरून समजले. सगळ्यांचा चहा पाणी झाला. माझी काकू मला बोलावण्यासाठी रुम मध्ये आली. काकूने सांगितले होते की पाहुण्यांकडे डोळयात डोळे घालून बोलायचे नाही, त्यांच्यासमोर खाली मान घालून बसायचे. काकूने सांगितल्याप्रमाणे मी पाहुण्यांसमोर जाऊन एका खुर्चीत खाली मन घालून बसले.

काका--- ही आमची जान्हवी, खूप गुणी मुलगी आहे, डॉ झाली तरी साधी सरळ आहे, शिक्षणाचा गर्व नाहीये. 

बाबा आणि काका व्यतिरिक्त अजून दोघेच हॉल मध्ये बसलेले जाणवले, कदाचित ते मुलाचे आई वडील होते, तसही मला त्यांना बघण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता म्हणून मी वर मान करून बघण्याचा प्रयत्नही केला नाही.

मुलाचे वडील--- जान्हवी तुला तुझ्या बाबांनी आमच्या मुलाबद्दल कल्पना दिलीच असेल तरी मी तुला सर्व माहिती देतो, तुला जर मान्य असेल तरच आपण पुढे जाऊया. आज आमच्या मुलाला त्याच्या बिजी शेड्युल मुळे यायला जमले नाही. त्याने तुझा फोटो बघितला आहे आणि त्याला तु आवडलीस सुद्धा. आमचा मुलगा MD medicine च्या शेवटच्या वर्षाला आहे. त्याला त्याचे स्वतःचे हॉस्पिटल टाकायचे आहे. माझा मुलगा एक मुलगा म्हणूनच नाही तर तो एक व्यक्ती म्हणून सुद्धा खूप चांगला आहे, सुस्वभावी आहे.

   ( मुलाचे वडील त्यांच्या मुलाच भरभरून कौतुक करत होते पण मला त्यांच बोलण ऐकण्यात काहीच इंटरेस्ट नव्हता.)

माझा मुलगा मुंबईच्या कॉलेज मध्ये शिकतोय. कदाचित तु त्याला ओळखतही असशील.

बाबा--- तुम्ही तुमच्या मुलाच नाव तर सांगा मग जान्हवीच सांगेल ती त्याला ओळखते की नाही.

मुलाचे वडील--- हो ते आहेच, माझ्या मुलाचे नाव आहे डॉ श्रीराज देशमुख.

          मी मुलाच नाव ऐकल्यावर मला दोन मिनिटांसाठी अस वाटलं की मी हे नाव कुठेतरी ऐकलेलं आहे आणि मग माझ्या लक्षात आलं की डॉ श्रीराज देशमुख म्हणजे माझा श्रीराजच. मी आश्चर्य चकित होऊन वर बघितलं तर समोर दुसरं तिसरं कोणी नसून श्रीराजचे आई बाबा बसलेले होते. मी तिथे बसलेल्या सर्वांकडे प्रश्नार्थक चेहऱ्याने बघत होते.

देशमुख काका--- जान्हवी तु ओळखते का आमच्या मुलाला?

जान्हवी--- काका काकू तुम्ही इथे कसे काय? बाबा आई तर मला म्हणाली होती की मला बघायला पाहुणे येणार आहे, मग काका काकू कसे काय आलेत?

बाबा--- जान्हवी तुझी आई बरोबर बोलली होती, श्रीराजसाठी त्याचे आई बाबा तुला मागणी घालायला आले आहे, त्यांना व श्रीराजला तु पसंत आहेस. आम्हालाही श्रीराज जावई म्हणून पसंत आहे, तुला श्रीराज सोबत लग्न करायला आवडेल का? तुझा नकार असेल तरी तो आम्हाला मान्य आहे. मी बाबांकडे आश्चर्याने पाहिलं, माझ्या डोळ्यातच पाणी आलं, बाबांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला.

बाबा--- जान्हवी बाळा तुला काय वाटलं होतं, आम्ही तुझ्या मनाविरुद्ध लग्न लावून देऊ, जान्हवी तु हिरा शोधला आहेस हिरा, तुझी निवड अगदी योग्य आहे, मला माहित आहे, तुला खूप प्रश्न पडले असतील, आम्हाला हे सर्व कसं कळलं? आम्हाला कोणी सांगितलं? मी तुला तुझ्या सर्व प्रश्नांची उत्तरे देतो, पहिले डोळ्यातील पाणी पूस.( मी डोळ्यातील पाणी पुसले, बाबांनी पुढे बोलायला सुरुवात केली)

तुला आठवत असेल किंवा श्रीराजनी तुला सांगितले असेल की मी एका मुलाची चौकशी करण्या करता श्रीराजला फोन केला होता. त्यांनंतर श्रीराज त्याच्या घरी गेला, श्रीराजने त्याच्या आई बाबांना तुम्हा दोघांबद्दल सर्व काही सांगितले, त्याने पटवून दिले की तुम्ही दोघे एकमेकांसाठी कसे पुरक आहात, त्याचे आई बाबा तुमच्या दोघांच्या लग्नासाठी तयार झाले, मग श्रीराज व त्याचे बाबा इथे आपल्या घरी आले, इथे आल्यावर श्रीराजने स्वतः तुमच्या दोघांच्या नात्याबद्दल आम्हाला कल्पना दिली त्यावेळी मला तुझा खूप राग आला होता, आमची मुलगी जान्हवी अस करूच कशी शकते हा प्रश्न डोक्यात उभा राहिला होता, शिवाय श्रीराजची व आपली जात वेगळी असताना जान्हवी श्रीराजच्या प्रेमात पडूच कशी शकते? श्रीराजने तुझ्या आईला व मला तुमचे एकमेकांवर किती प्रेम आहे हे पटवून दिले, आजपर्यंत तुम्ही दोघे एकमेकांना न भेटताही तुमचे प्रेम टिकून कसे आहे याच कल्पना दिली,श्रीराज तुझ्यासाठी किती योग्य आहे हे पटवून दिले, श्रीराजने हेही सांगितले की तुमची मुलगी तुमच्या इच्छे विरोधात जाऊन कधीच लग्न करणार नाही.

जान्हवी--- बाबा मी श्रीराज बद्दल तुम्हाला सर्व काही सांगणार होते मग श्रीराजने आधीच का सांगितलं?

बाबा--- कारण तो तुझ्यावर खूप प्रेम करतो. समजा तु जर आज येऊन मला श्रीराज बद्दल सांगितलं असत तर माझी प्रतिक्रिया खूप वाईट असती, मी बाकी गोष्टींचा विचार न करता तुला नकार दिला असता, त्याने तुला व परिणामी आम्हाला सुद्धा भावनिक व मानसिक त्रास झाला असता, या सगळ्यात आपल्यातील नाते बिघडले असते, या सगळयाचा सारासार विचार करून श्रीराजने तुझ्या आधीच या सगळ्याची आम्हाला कल्पना दिली. तु खूप काळजीत असल्याने त्याने येऊन आम्हाला तुमच्या नात्या बद्दल सांगितले. जान्हवी श्रीराज खरंच खूप चांगला मुलगा आहे.

देशमुख काका--- सुरवातीला आम्हालाही हे सगळं पचायला खूप जड गेलं पण श्रीराजने समजावून सांगितल्यामुळे सर्व काही ठीक झालं. श्रीराज सध्या खूपच बिजी आहे त्यामुळे त्याला तुला वेळ देता येत नाहीये म्हणून तो नेहमीच दुःखी असतो, हा सर्व प्लॅन श्रीराजचा आहे, त्यानेच सांगितले होते की आपण सगळे मिळून जान्हवीला सरप्राईज देऊया.

आई--- आम्ही कालपासून जे वागतोय, बोलतोय ते सर्व आमचा प्लॅन तुला कळू नये म्हणून, कशी वाटली आमची acting?

     मला काय बोलावे काहीच समजत नव्हते, मी स्वप्न बघत होते की सत्य परिस्थिती आहे हेच समजत नव्हते. मी हॉल मधून माझ्या रुम मध्ये निघून गेले. मला खूप आनंद झाला होता. मला यावेळी श्रीराजला मिठी मारण्याची इच्छा झाली होती. श्रीराजला मी खरच ओळखलं होत का? त्याने मला किती मोठ सरप्राईज दिलं याची कल्पना कोणीच करू शकत नाही. मी मोबाईल हातात घेतला व श्रीराजला मॅसेज केला," I LOVE YOU SO MUCH"

©®Dr Supriya Dighe