मागच्या भागात आपण पाहिले की, महेश पहिल्यांदाच देविकासाठी चहा नाष्टा करतो. तिच्यासाठी नवीन ड्रेस आणून तिला डेटवर नेण्याचा प्लॅन सांगतो. आता पाहूया या भागात काय घडते ते ....
" नाही. तू आधी मला सांग ... मग मी तयारी करते."
" एक मिनिट " ... म्हणतं महेश आतमध्ये गेला आणि येताना एक नवीन कपडे असलेली प्लास्टिकची पिशवी घेऊन आला. तिच्या हातावर ती कपड्यांची पिशवी ठेवत म्हणाला. " हा ड्रेस घालून चल."
" महेश, तू मला एकावर एक धक्के देतो आहेस. चक्क माझ्यासाठी तू ड्रेस आणला आहेस? तेही या वयात?
नक्की काय प्रकार आहे, आधी मला सांगचं. एवढ्या आश्चर्याची मला सवय नाही रे ..." ती केविलवाणा चेहरा करत त्याला म्हणाली.
" तू तयारी कर आधी. मग मी .... "
" प्लीज मला आधी तू सांग. तरचं मी तयारी करायला जाईन. मला उगीच भीती वाटायला लागली आहे. तू ठिक आहेस न? की मला काय झालेय? " देविका त्याचे बोलणे अर्धवट तोडतं, काकुळतीला येऊन म्हणाली.
त्याने, तिच्या हातातली कपड्याची पिशवी बाजूला ठेऊन, तिचे दोन्ही हात स्वतःच्या हातात घेतले. बराच वेळ तो तसाच हातात हात घेऊन, खाली मान घालून स्तब्ध बसला होता. तिला काहीतरी सांगायच्या प्रयत्नात, मनातल्या मनात शब्दांची जुळवाजुळव करत होता.
त्याला असे शांत खाली मान घातलेले पाहून, तिचा जीव अजूनच घाबराघुबरा झाला होता. तिने त्याच्या हातातून हात सोडवत, त्याची मान वर करून त्याच्याकडे पाहिले, त्याचे अश्रूंनी डबडबलेले डोळे पाहून, तिचे उरलेसुरले अवसान अजूनच गळून गेले.
" महेश, काय झालेय सांग लवकर? माझा जीव असा टांगणीला लावू नकोस. प्लीज मी कार्तिकला नाहीतर गौरीला फोन करून बोलावते. मला आता तुझे हे शांत बसणे सहन होत नाही." तिने उठण्याचा प्रयत्न केला, पुन्हा तिच्या कंबरेत चमकले. नकळत तिच्या तोंडातून " आई ग .." बाहेर आले.
तो तिला खाली बसवतं, " सांगतो ... बस् तू." म्हणाला. तशी ती पुन्हा बसली.
" सांग लवकर ... तुझे हे घेतलेले पॉज ... माझा जीव घेतील ...."
" तुला कोणाला बोलवायची काहीच आवश्यकता नाही देवी. मी ठिक आहे अन् तुलाही काही झालेले नाही. त्यामुळे तू निश्चिंत रहा.
मी एवढ्यासाठी शांत होतो की, मी नक्की सुरूवात कुठून अन् कशी करू मला समजत नव्हते."
" तू कुठूनही कर ... पण कर एकदाची." ती पुन्हा वैतागत म्हणाली.
" देवी, तुझ्यासाठी प्रेमाने केलेल्या गोष्टीत सुद्धा, तुला, माझी काळजी वाटते?
तुझ्या मनात, काही वाईट ऐकायला लागेलं की काय, अशी शंकेची पाल चुकचुकते?
माझ्या प्रेमळ वागण्यामागे, काहीतरी काळजी करण्यासारखे कारण असावे असे वाटते?
देवी, मी तुझ्यासाठी प्रेमाने काही करू शकतो. हे तुझ्या मनाला किती धक्कादायक होते, ते मी अनुभवतोय. अन् मला त्याचीच आता लाज वाटतेय."
तो कसेबसे बोलला अन् पुन्हा शांत झाला.
" महेश आता मी रागावेल हं. तू काय बोलतो आहेस ते मला काही ... काही समजले नाही. मला समजेल असे बोल." ती पुन्हा काही न समजून चिडून बोलली.
" देवी, मला तुला हे सांगायचे आहे की, माझे तुझ्यावर खूप खूप प्रेम आहे ... इतके दिवस .. मी ... मला बोलायला जमले नाही. आज तुला मी मनापासून सांगतो की खरंच मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. तू माझ्या आयुष्यात नसशील तर .... तर मी जगूच शकणार नाही. आज जे काही मी आहे ते केवळ तुझ्यामुळेच." त्याने आवंढा गिळत आपल्या प्रेमाची कबुली एका दमात दिली.
" तू आज असा काय वेड्यासारखा बोलत आहेस? मला काहीच कळत नाही. प्रेम आहे असे कोणी रोज उठून सांगितल्यावरच कळते का?
तुझे प्रेम, मला न बोलता कळते. तुझ्या डोळ्यात ते मला जाणवत असते. प्रत्येकाची ती व्यक्त करण्याची आणि समजण्याची पद्धत वेगळी असते.
इतके दिवस आपण प्रेमाशिवाय एकत्र राहीलो का? आता आपल्याला जावई आला, सून आली, चांगली तीन तीन नातवंडे आहेत. ती आपल्या प्रेमाचीच प्रतीक नाहीत का?" ती हसून त्याला समजावत म्हणाली.
" त्याला तू प्रेम म्हणतेस? " तो मिश्किलपणे हसला.
" किती निःस्वार्थी प्रेम करतेस तू सगळ्यांवर अन् मी?
मी आतापर्यंत घरात पगार आणून देण्यापलीकडे दुसरे काय केले आहे तुझ्यासाठी? मला तरी आठवत नाही." त्याच्या बोलण्यात उदास स्वर जाणवत होता.
" तुला नाही कळणार. तू काय केले आहेस ते? तू माझ्याशी कधी भांडला नाहीस की मुले वाईट वळणावर जातील असे तुझे वर्तन ठेवले नाहीस. याचे संसारात किती महत्त्व आहे ते एक स्त्रीचं सांगू शकते.
तुला नसेल जमले शब्दात किंवा कृतीतून व्यक्त व्हायला. म्हणून तुझे माझ्यावर प्रेमच नाही असे होऊ शकत नाही न? अव्यक्त प्रेम करत असतोस तू माझ्यावर, तुझ्या मुलांवर .. अन् तुझ्या कुटुंबावरही. मला तुझे ते अबोल प्रेम जाणवते."
" खरचं तरी मी तुझ्यासाठी काही केले नाही हेच खरे. "
.
.
.
.
.
.
.
देवकीने घरासाठी घेतलेल्या त्रासाची महेशला जाणीव झाली आहे. त्यासाठी आता तो नक्की काय करणार आहे ?
.
.
.
.
.
.
पाहूया पुढील भागात. ....
©® विद्या थोरात काळे "विजू"
============================
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा