फिरुनी मी तुझ्या प्रेमात (भाग-३)

Love In Second Inning Of Life
मागच्या भागात आपण पाहिले की महेशला, देवकीने लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून काढलेल्या त्रासाची जाणीव होते.  आता पाहूया पुढे काय होते ते या भागात ...


" ऑफिसमध्ये काय मजा मारायाला तर जात नव्हतास न तू?  तिथे तू दिवसभर राबतच होतास न?  उलट मलाच तुझ्यासाठी कधी वेळ देता आला नाही.  त्याची मला नेहमी खंत वाटत असते." 

त्याची अशी अवस्था बघून, तिला खूप वाईट वाटत होते.

" किती भोळी आहेस ग तू?  अन् तुझ्या याच भोळेपणाचा मी, माझ्या घरच्यांनी अन् आपल्या मुलांनी सुद्धा तुझा फायदा घेतला.  तू सर्वांवर मनापासून प्रेम करतेस.  त्यांचे हवे नको ते बघतेस, तेही निःस्वार्थ भावनेने. 

या घरात लग्न करून आल्यापासून नुसती राब राब राबतेस.  कधी स्वतःच्या सुखाचा विचार म्हणून केला नाहीस की एकादी गोष्ट मिळाली नाही तर, त्याच्यासाठी भांडत बसली नाहीस.  मी जर आज व्यवस्थित आहे तर, त्याला खरी जबाबदार तूचं आहेस."

" आता काय तेव्हापासूनचं डोक्यात घेऊन बसला आहेस का तू ?"  तिने कपाळावर आट्या पाडत त्याला विचारले.

" हो.  अगदी पहिल्या दिवसापासूनचे मला सगळे सगळे लक्षात आहे.  बेडवर खिळून असलेल्या माझ्या आईला, मरण्यापूर्वी सूनमुख बघायचे म्हणून आपले घाईघाईत लग्न उरकले अन् तू दुसऱ्या दिवसापासून तिच्या दिमतीला लागलीस. 

डॉक्टरांनी जेमतेम सहा महिने तिची शाश्वती दिली होती.  ती तुझ्या पायागुणाने म्हणं नाहीतर तुझ्या अविरत केलेल्या सुश्रुषाने म्हण.  तिने चांगली दोन वर्षे तुझ्या हातून सेवा करून घेतली अन् नंतर नातवाचे तोंड बघूनच सुखाने गेली. 

नवी नवरी म्हणून, अगदी सुरुवातीच्या दिवसात सुद्धा न तुझे कोणी कौतुक केले की लाड केले.   तू आलीस अन् आईची कधीतरी सेवा करायला येणाऱ्या, माझ्या बहिणींनी स्वतःची कायमची सुटका करून घेतली. 

तू नवीन नवरी म्हणून, तुझ्या काही आशा, अपेक्षा असतील, स्वप्न असतील याचा सुद्धा त्यांनी विचार केला नाही.  एका स्त्रीचं मन, दुसरी स्त्रीचं समजू शकते.  हे कुठेतरी वाचले होते.  पण ते माझ्या दृष्टीने साफ खोटे ठरले होते.  मीही आईच्या प्रेमात, तुझ्यावर खूप अन्याय केला हे तुला वेगळं सांगायला नको.

आपला हनिमून सुद्धा घरातच झाला होता.  सुरवातीच्या काळात, तुला माहेरी जायला सुद्धा कधी जमले नव्हते.  तुझे आईवडीलच, तुला कधीतरी नाईलाजाने भेटायला यायचे.  त्यावेळी त्यांच्या डोळ्यात, तुला या घरात होणारा त्रास मला जाणवायचा.  पण मी काही करू शकलो नव्हतो. 

या घराची अन् घरातल्या माणसांची काळजी घ्यायला, हक्काची बायको म्हणून की नोकर म्हणून तुला घरात आणले मला माझेच कळत नव्हते.

नव्या नवरीचे, नवलाईचे नऊ दिवस सुद्धा तुझ्या वाट्याला आले नाहीत.  त्या दोन वर्षात तुला कुठे फारसे नेता आले नाही की तुला कुठली हौसमौज करता आली नाही.  फार फार तर आपण लग्नानंतर देवदर्शन करायला गेलो असेल तेवढेच.  

बोनस म्हणून आयुष्य मिळालेल्या आईने, तिची नातवाची इच्छा बोलून दाखवली अन् मी आईच्या इच्छेसाठी, मागचा पुढचा विचार न करता, तेही तुझ्यावर लादले.  लग्नानंतर एक दीड वर्षाच्या आत तू एका मुलाची आई झालीस.

तू कार्तिकमध्ये अडकलीस.  कार्तिक तीन वर्षाचा नाही झाला नाही तोच, गौरीचा जन्म झाला अन् तू पुरती त्या रहाटगाड्याला जुंपून  गेलीस.  मला या सर्वाची जाणीव व्हायची.  पण फक्त जाणीवचं. 

तू लग्न ठरले तेव्हा, तुझी नोकरी करण्याची इच्छा बोलून दाखवली होतीस.  तुला भरपूर फिरायला आवडते.  नाटक सिनेमा पाहायला आवडते.  कधी तुला संधी मिळाली तर नाटकात काम सुद्धा करायला आवडेल.  तुला डान्सची तर आवड होतीचं.  असे तू त्यावेळी मला सांगितले होते.  पण लग्नानंतर तू फक्त माझ्या घरच्या एकामागून एक आलेल्या जबाबदारीत गुंतत गेलीस.  त्या पार पाडण्यात धन्यता मानत गेलीस.  हे सर्व करताना, तू स्वतःच्या आशा आकांक्षा पूर्णपणे गुंडाळून ठेवल्यास.

आई गेली.  बाबा गेले.  आपली दोन्ही मुले मोठी होत गेली,  तसे त्यांची शाळा, अभ्यास, त्यांचे प्रोजेक्ट्स, महिन्याच्या मीटिंग्ज, त्यांचे आजारपण, त्यांना काही हवे नको, सर्वकाही तूच बघत होतीस.  मी फक्त त्यासाठी लागणारा पैसा पुरवत होतो.  कर्त्यव्य बजावल्याची, स्वतः ची पाठ स्वतःच थोपटत होतो.

तू घरीच आहे.  म्हणून माझ्या दोन्ही बहिणी, सुट्टीच्या दिवशी मुलांना घेऊन, तुझ्या जीवावर आरामात येऊन रहायच्या.  आईच्या नंतर तू त्यांचे माहेरपण, सण, देणंघेणं वैगरे सगळं सगळं पाहत आलीस.  या सगळ्यात मी कुठे कुठेच नव्हतो.  अगदी औषधालाही नव्हतो."

पण तू कधी कोणत्याच बाबतीत तक्रार केली नाहीस.  सगळे काही निमूटपणे करत राहिलीस.  स्वतःला होणारा त्रासही कधी कोणाला जाणवू दिला नाहीस." महेश तिने केलेल्या कर्त्याव्याचा पाढा वाचताना, स्वतःच्या केलेल्या चुका बोलून दाखवत होता.

" तू कुठेच नव्हता असे कसे तू म्हणू शकतोस?   तू दिवसभर ऑफिसमध्ये राबत होतास.  म्हणूनच आपण सर्व हे विनासायास पार पाडू शकत होतो.  हे विसरून कसे चालेल? 

बरेच वेळा तू, आठवड्याची असलेली सुट्टी न घेता, ओव्हर टाईम सुद्धा करायचास.  कोणाला कधी कोणत्या गोष्टीची कमी पडू दिले नाहीस.  ती जबाबदारी तूच तर पाडलीस. "  तिने त्याला त्याच्या कर्तव्यपूर्तीची आठवण करून दिली.

.
.
.
.

भूतकाळातल्या आठवणींनी महेश भावूक झाला होता.  त्यावर देवकी त्याची कशी समजूत काढते?  .....

.
.
.

पाहूया पुढच्या भागात

©® विद्या थोरात काळे "विजू"

============================

क्रमशः

🎭 Series Post

View all