Login

फिरुनी मी तुझ्या प्रेमात (भाग-४)

Love In Second Inning Of Life
मागच्या भागात आपण पाहिले की महेश भूतकाळातल्या आठवणींनी भावूक झाला होता.  आता पाहूया या भागात .....


" तू म्हणते ते खरे आहे.  मी करत होतो ओव्हर टाईम.  चार पैसे मिळतील म्हणून नाही तर,  मला घरच्या जबाबदारीपेक्षा, ती जबाबदारी सोपी आणि सोयीची वाटत होती.  म्हणून मी ओव्हर टाईमसाठी जात होतो. 

परंतु घरी आल्यावर मला पुरेशी झोप मिळत होती.  मी आराम करत होतो.  तुला मात्र घरी असूनही, तुझा दिवस सर्वांच्या आधी सुरू व्हायचा आणि सर्वांच्या नंतर संपायचा.  आजही काही वेगळी परिस्थिती नाही.  निवांतपणा असा कधी तुला लाभलाच नाही."

" असू दे.  मला त्याचे काही वाटत नाही.  सवय झाली आहे मला.  हवे तर तो माझा जॉब होता, आहे असे समज."

" हो.  तुझा जॉबच.  ट्वेंटी फोर बाय सेव्हन डेज.  बिनपगारी, थँकलेस जॉब.  कधीही रजा नाही ते वेगळेच.

आपली मुले मोठी झाली.  त्यांची लग्ने झाली. त्यांना मुले झाली पण तुझी जबाबदारी काल परवापर्यंत तसूभरही कमी झाली नाही. 

गौरी लग्न करून गेली.  मुलगी म्हणून तिचे पाहिले बाळंतपण तूच केलेस अन् सुनेला इथे सोयीचे होते म्हणून, तिचेही बाळंतपण तूच केलेस.  ती ऑफिसला जायला लागल्यानंतर, तिची जुळी मुलेही तूच सांभाळलीस. 

अन् आता थोडी मोठी झाली नाही तर, त्यांच्या भविष्याचा विचार करून, कार्तिक बायकोला अन् त्यांना अमेरिकेत घेऊन गेला.  तुझ्या भावनांची त्याने काडीचीही किंमत केली नाही. 

मला वाटले होते, गौरी तुला चार दिवस कधीतरी हौसेने म्हणून, तिच्या घरी ठेवून घेईन.  पण तीही, तुला फक्त तिच्या गरजेलाच बोलावत राहिली.

यात मीच कुठेतरी चुकत होतो.  नक्की कुठे ते समजत नव्हते.  त्यामुळे मुलेही माझ्याच पावलावर पावले ठेवत गेली.  मी तुला कधी कोणत्या कामात मदत केली नाही किंवा मुलांना त्यांच्यासाठी तू करत असलेल्या कामाची जाणीव करून दिली नाही.  त्यामुळे तू जे करत होतीस, ते तुझे कामच होते.  असे त्यांनीही गृहीत धरले."

" पण आता हे सगळे तू काढून, कशाला वाईट वाटून घेतोस?  आपण आपले कर्तव्य केले आणि मार्गी लावले.  त्यांनी काय करायचे ते त्यांना ठरवू दे.  मला नाही त्याचे कधी वाईट वाटले."  देवकी त्याला समजावत म्हणाली.

" नाही .. मला बोलू दे.  आपण आपली कर्तव्य करायची अन् मुलांची, आपल्या प्रती काहीच कर्तव्य नाहीत का?  म्हणूनच तुला मी भोळी म्हणतो."

" अरे, आता आधीसारखे दिवस राहिले नाहीत.   त्यांना त्यांचे एवढे व्याप असतात की विचारू नकोस.  बिचारी ही मुले जीवघेण्या स्पर्धेतून आपले आयुष्य जगत असतात.  मी घरी होते म्हणून सगळे आपले सुरळीत पार पडत होते.  तसे आपल्या मुलीचेही नाही अन् सुनेचेही नाही.  त्या ऑफिसला जातात.  त्यामुळे आपण त्यांना समजून घेतले पाहिजे."

" तुझा हाच स्वभाव मला, तुझ्या प्रेमात पाडत राहतो.  नेहमी दुसऱ्यांचा विचार करतेस.  स्वतःला कितीही त्रास झाला तरी, तू त्याच्याकडे दुर्लक्ष करतेस.

आता मी तुझा विचार करणार आहे.  तुला तुझ्या सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त करणार आहे.  आता तू तुला हवे तेच करायचे आहे."

" म्हणजे?  मी नक्की काय करायचे आहे? "

" तेच.‌  लग्नाच्या आधी तुला आवडणाऱ्या सर्व गोष्टी.  मनोसोक्त फिरणं, नाटक, सिनेमाला जाणं , डान्स करणं .... सगळं काही .... जे जे करणे तुला शक्य आहे ते सारे ...."

" अरे आता कसे शक्य होणार आहे ते?  तू माझा एवढा विचार करतोस त्यातच मी भरून पावले.  माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या असे मी समजेन."

" पण मला ते समजता येणार नाही.   म्हणूनच आज मी तुला डेट वर नेणार आहे.  अन् लवकरच म्हणजे येत्या दोन महिन्यातच आपण युरोपच्या टूरवर जातोय.  मी कालच एका नामवंत ट्रॅव्हल एजंटशी बोललो आहे.  ते व्हिजा वैगरे सगळं काही करून देणार आहेत."

" खरं की काय? "

" अगदी शंभर टक्के खरे!   मी माझे हे रिटायरमेंट नंतरचे आयुष्य तुझ्यासोबत, तुझ्यासाठी घालवणार आहे. 

उद्यापासून मी आपल्यासाठी घरगुती डब्याची सोय केली आहे.  आता तू फक्त आराम करायचा.  तुझ्या आरोग्याची काळजी घ्यायची.  भरपूर फिरायचे अन् तुझ्या शक्य असतील तेवढ्या सर्व राहिलेल्या इच्छा पूर्ण करायच्या.  त्यासाठी जी काही मदत लागेल ती मी करेन.   इथून पुढचे माझे आयुष्य हे फक्त तुझ्यासोबत आनंदाने दिवस घालवण्यासाठी असेल. 

ही बघ जिमची पावती.  मी तुझी एका वर्षासाठी मेंबरशीप फी भरली आहे. 

तुझ्या वाढलेल्या वजनामुळे आणि नियमित व्यायाम न करत असल्यामुळे तुझी कंबर सतत दुखत असते.   उद्यापासूनच तुला जिम जॉईन करायची आहे.  त्यासाठी आज तुला जिमसाठी लागणारे कपडे घ्यायला जायचे आहे. 

आज दुपारी आपण बाहेरच जेवू.  तुला हवे असलेले शॉपिंग करू आणि संध्याकाळी चार वाजाताचे एकादे नाटक पाहू अन् पुन्हा काहीतरी खाऊन घरी येऊ.  कसा वाटला माझा प्लॅन? "

.
.
.
.

महेशने देविकासाठी पूर्ण दिवस बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला.  देविका तयार होईल का त्याच्या प्लॅन प्रमाणे त्याला साथ द्यायला? ...

.
.
.
.

पाहूया पुढच्या आणि अंतिम भागात ...

©® विद्या थोरात काळे "विजू "