मागच्या भागात आपण पाहिले की, महेशने देविकासाठी पूर्ण दिवस बाहेर जाण्याचा प्लॅन बनवला होता ... आता पुढे काय होते ते पाहूया या भागात ....
" एकदम झकास आहे." देवकीच्या मनात बिन बुडाच्या आलेल्या शंका दूर झाल्या होत्या.
गेल्या आठवड्यात, कार्तिक आणि त्याच्या बायको मुलांच्या जाण्याने ती उदास तर झालीच होती. पण इतक्या दिवसात कामाने आलेला शीणही तिला आता जाणवू लागला होता. तिला बदलाची खूप आवश्यकता होती.
" तुझ्यासारखेच, माझ्याही मनात खूप वेळा यायचे, आता तू रिटायर झाला आहेस तर, तुझ्यासोबत मनोसोक्त वेळ घालवावा. सगळ्या जबाबदारीतून मुक्त व्हावे. बाहेर कुठेतरी फिरायला जावे.
पण ते तेवढ्या पुरतेच. एकादी जबाबदारी पुढे आ वासून उभी राहिली की याचा विसर पडायचा.
परंतु आज मी अगदी खूष आहे. तू अगदी माझ्या मनातले बोललास. तू नेशील तिथे मी यायला तयार आहे."
" हो ना ! तुलाही तसेच वाटतेय न? "
" हो. अगदीच. परंतु तुला आजच हे सगळे का करावेसे वाटले?" तिने त्याला मोठ्या उत्साहात विचारले.
" खरं सांगू? माझ्या हे बरेच दिवस मनात घोळत होते. रिटायर झाल्यानंतर, दुसऱ्या दिवसापासून मी सर्व करायचे ठरवले होते.
परंतु मुलांना नाताळच्या सुट्ट्या पडल्या म्हणून, गौरी माहेराला आली अन् तू त्यांचे करण्यात बिझी झालीस. मग काय तू माझे काही ऐकशील असे मला वाटत नव्हते.
ती निघून गेल्यानंतर मात्र, काही न काही कारणाने आज उद्या करतं, माझ्याकडूनच चालढकल होत गेली.
दोन तीन दिवसांपूर्वी, तुझी एवढी कंबर दुखत असताना, तुला मी आरशासमोर नाचताना पाहिले अन् मला खूप वाईट वाटले. किती तल्लीन होऊन तू नाचत होतीस! या वयातही तुझे त्या म्युझिकच्या रिदमनुसार छान अंग हालत होते.
" तू पडद्यामागे उभा राहून पाहत होतास का? मला मध्येच भास झाला होता. पण म्हंटले तू कशाला लपून बघशील? चांगला गाढ झोपला असशील म्हणून मी नाचत राहीले."
" मी तुला डान्स करताना पाहतो, असे तुझ्या लक्षात आले असते तर, तू डान्स करता करता थांबली असतीस. म्हणूनच मी तुला पाहतो आहे, हे तुला कळू दिले नव्हते."
" हो. तेही खरेच. तसेच झाले असते."
" म्हणूनच त्याचं वेळी मी निर्णय घेतला की, आता जास्त उशीर करून चालणार नाही अन् दुसऱ्याच दिवशी मी आपल्या जवळच्याच क्लबची मेंबरशीप घेतली. तिथे वरचेवर काही न काही कल्चरल ॲक्टिव्हिटीज् होत असतात. तुला त्यात भाग घेता येईल.
" अरे व्वा! किती छान ! "
" एवढेच नाहीतर, आपल्या जवळच्याच फिट अन् ट्रिम जिममध्ये संध्याकाळचा, प्रौढांसाठी डान्स क्लास सुद्धा असतो. तोही तू जॉईन करावा म्हणून तिथे चौकशी करून आलो.
आता लवकरच तू डान्सही करायला सुरुवात करशील अन् मला जमले तर मीही तुझ्यासोबत डान्स करेन."
" खरं की काय? मला तर अगदी मी तरुण झाल्यासारखी वाटायला लागली आहे अन् नव्याने तुझ्या प्रेमात पडली आहे."
" थँक्यू डियर, इसका मतलब आग दोन्हो तरफसे लगी हैं! तो अभी देर किस बात की? जावो जल्दिसे तैयार हो जावो."
ती आत जायला निघाली तेवढ्यात, लॅंडलाईनचा फोन वाजला. देवकी तो उचलणार, इतक्यात महेशने तिला थांबवत, स्वतः चं उचलला.
" हॅलो .." पलीकडून गौरी बोलत होती.
" हॅलो बेटा, बोल कसा काय फोन केलास तू? "
" बाबा आईकडे फोन द्या नं, आईकडे थोडं अर्जंट काम आहे."
"अग कसले काम आहे? ते मला सांग. ती उठली की मी तिला सांगतो." त्याने बोलताना हळूच देविकाला डोळा मारला.
" म्हणजे? आई अजून झोपली आहे की काय? का? काय झाले? तिची तब्बेत बरी नाही का?"
" हो बेटा. ... तिची कंबर खूप दुखतेय. तिला जरा सुद्धा बसायला होत नाही. अंगात कणकणही आहे. थोड्या वेळाने तिला डॉक्टरकडे घेऊन जाईन मी."
" मग तुमचे जेवण वैगरे? "
" जेवणही हल्ली बाहेरूनच मागवत आहोत. बरं तुझे देवकीकडे काय काम होते? "
" काही नाही तेचं .... मला चार दिवस माझ्या मैत्रिणी बरोबर पिकनिकला जायचे होते. म्हणून तन्मय चिन्मयला सांभाळण्यासाठी तिला माझ्याकडे बोलवायचे होते."
"अग तुझ्या सासूबाई नाहीत का घरी?"
" नाही न? नेमक्या त्या त्यांच्या सिनियर सिटीझन ग्रुपसोबत यात्रेला गेल्या आहेत. "
" अग पण आई कशी येणार? तिला तर उभे राहायला सुद्धा नीट जमत नाही. तापही आहे अंगात."
" शी ... नेमकी आई पण आत्ताच आजारी पडली. ठिक आहे बाबा. मी बघते काय करायचे ते. तुम्ही तिची काळजी घ्या. सांगा मी विचारले होते म्हणून मी. ठेवू मी? जरा बिझी आहे."
" हरकत नाही. ठेव बेटा. काळजी घे."
" बाय "
" बाय बेटा. "
देवकी तिची तयारी करता करता, महेशचे फोनवरचे बोलणे ऐकून मनातल्या मनात हसत होती. त्याने घेतलेला निर्णय तिला मनापासून आवडला होता.
आज तिला नव्याने पंख फुटल्याचा भास होत होता. महेशला तिच्या कष्टाची जाणीव आहे. तो तिची काळजी घेतो पाहून तिला खूप समाधान वाटले होते. त्याने आज त्याचे, तिच्यावरील प्रेम शब्दांत व्यक्त केले होते.
आता तिला तिची स्वप्ने जगायला मिळणार होती ते केवळ त्याच्यामुळेच. ती पुन्हा त्याच्या प्रेमात पडली होती.
लग्नानंतर पहिल्यांदाच देवकीला ड्रेसमध्ये पाहून, महेश एकदम तिच्यावर मोहित झाला होता. त्याने इतका वेळ खिशात ठेवलेला मोगऱ्याचा गजरा काढला अन् आरशात बघून कपाळावर टिकली लावतं, पाठमोरी असलेल्या तिच्या केसात माळला.
ती लाजली. तिने त्याला आरशात बघून लाजतचं "थँक्यू" आणि "आय लव्ह यू" म्हंटले. तसे त्यानेही तिला "आय लव्ह यू" म्हणतं मिठीत घेतले.
आयुष्याच्या शेवटच्या वळणावर, त्या दोघांनी, सर्व जबाबदाऱ्यांतून मुक्त होतं, एकमेकांसाठी वेळ द्यायचे ठरवले होते. उरलेले आयुष्य भरभरून जगताना, एकमेकांच्या संगतीत हसत खेळत आणि मजेत घालवण्याचा निश्चय त्यांनी केला होता.
त्याचाचं भाग म्हणून ते आता युरोप टूरवर होते. स्वित्झर्लंडच्या बर्फात एकमेकांवर बर्फ फेकत निखळ आनंद घेत होते.
©® विद्या थोरात काळे "विजू"
============================
समाप्त
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा