Login

फिरुनी नवी जन्मले मी

Autobiography - Journey of my rebirth

आत्मचरित्र लिहिण्यातकी मी काही महान नाही आणि माझं जीवन सुद्धा काही फार रोमांचक वगैरे आहे अशातला भाग नाही. त्यामुळे आत्मकथन लिहिण्याची आधी टाळाटाळ केली. पण आता स्पर्धेसाठी सर्वांनीच लिहिणं भाग आहे म्हणून जीवनपट लिहायला घेतला आणि मग जाणवलं.  अरे बापरे! किती काही दडून बसलेलं असतं ना आपल्या आतमध्ये ...आणि आपण स्वतः कधी कधी त्यापासून अनभिज्ञ ...तसंच काही अंशी घडलं आहे माझ्या बाबतीत.

माझा जन्म मुंबईचा म्हणजे मी आहे पक्की BBB! अर्थात Born and Brought Up in Bombay. पण जसं पुलं देशपांडे सांगून गेलेत कि ‘मुंबईला 'बॉम्बे' म्हणू नये. अस्सल मुंबईकर मुंबईला 'मुंबई'च म्हणतो’ … तशीच मी सुद्धा … मी तर आमच्या मुंबईला कोणी बॉम्बे म्हटलेलं ऐकूनही घेत नाही!

तर ह्या मुंबईच्या वाडीया हॉस्पिटलमध्ये माझा जन्म झाला जिथे एकेकाळी अर्धी मुंबई जन्म घेत होती. माझ्या आईचं  बालपण गिरणगावात गेलं त्यामुळे जेव्हा माझ्या आईला माझ्या आगमनाची चाहूल लागली तेव्हा सर्वात पहिल्यांदा ती जवळच्या वाडिया हॉस्पिटलमध्ये आपलं मूल काढून टाकण्यासाठी गेली. कारण लग्नानंतर लगेचच बाळ तिला नको होतं. 

गिरगावातल्या चाळीत दीड खणांची छोटीशी खोली … त्यात आजी आजोबांचा पाच मुलांचा संसार. मोठ्या मुलीच लग्न होऊन ती सासरी गेली तरी घरात तीन मुलगे, एक मुलगी, एक सून आणि एक म्हातारी आई अशी आठ माणसं रहात होती.

माझी आई घरातली सर्वात मोठी सून, मग तिला एवढ्याशा घरात राहण्यापेक्षा आधी नवीन घर घेऊन मग बाळ जन्माला घालायचं होतं.

पण तिचं नशीब काही जोरावर नव्हतं, त्यात मी इतकी खट होते कि टिकून राहिले आणि मग नाईलाजाने अस्मादिकांचा जन्म झाला.

घरातल पहिलच बाळ! मग काय म्हणतात ना … पहिली बेटी धनाची पेटी … माझ्या आजी-आजोबांनी आणि त्यावेळी लग्न न झालेले माझे दोन काका आणि आत्या ह्यांनी माझे खूप लाड केले. 

पण आई मात्र आपली नोकरी सांभाळून दुसरं घर शोधण्याच्या मागे लागली होती. जे काही दिवसांनी तिला मुंबईच्या दूरच्या उपनगरात मिळालं आणि तिने वेगळं व्हायचा निर्णय घेतला. त्यानंतर आमच्या घरात जो गोंधळ माजला असेल त्याची आज फक्त कल्पनाच करू शकते. मला तेव्हा काहीच कळत नव्हतं कारण मी फक्त एक वर्षाची होते. 

“एवढ्याश्या पोरीला काय घरात एकटीला सोडून कामावर जाणार आहेस का? आणि जर नोकरीला गेलीस नाही गेलीस तर घराचे हप्ते कोण भरणार?” वैगरे वैगरे बोलून तिला तिच्या विचारांपासून परावृत्त करण्याचा खूप प्रयत्न केला गेला. अनेक दूषणं दिली गेली तरीपण ती ठाम होती त्यामुळे शेवटी मी आजी आजोबांकडे गिरगावात राहायचं आणि फक्त आई-वडिलांनी वेगळं व्हायचं हे ठरलं.

त्यानंतर माझी आजी, आजोबा, काका आणि आत्या यांनीच मला लहानाची मोठी केली. पण त्या काळात माझी आई घरफोडी आहे, ती मला एकटीला टाकून गेली हे नकळत माझ्या मनावर कुठे ना कुठे बिंबत चालल होतं.

*******

तिकडे माझ्या आई-वडिलांना दुसरी मुलगी झाली आणि तिला सांभाळायला कोणी नाही म्हणून तिच्यासाठी मात्र पूर्ण वेळ सांभाळायला घरात बाई ठेवली गेली. 

“आता तुझ्याकडे बाई ठेवली आहे तर हिला पण तिकडे घेऊन जा” आजीने पप्पांना सांगितलं पण त्यानंतर मीच घरात रडून गोंधळ घातला कारण मलाच तिकडे जायचं नव्हतं. माझे काका आणि आत्या हेच मला माझ्या आई-वडिलांसारखे वाटायला लागले होते. कारण ते सुद्धा तितक्याच प्रेमाने मला सांभाळत होते. ना मला  आई-वडिलांची गरज राहिली, ना त्यांना माझी! हेच माझ्या बालमनाला वाटत राहिलं. 

मी फक्त मोठ्या सुट्टी मध्ये त्यांच्याकडे राहायला जायचे पण मला तेही आवडायचं नाही. त्यावेळी घरी बहिणीची आया किंवा सुट्टीत भेटीला आलेली आईची आई असायची पण माझी आई मात्र माझ्या वाट्याला यायचीच नाही. आपण इतक्या लांब आलो तरी आई मात्र थोडीही सुट्टी सुद्धा घेऊन घरी थांबत नाही त्यामुळे मला तिकडे जायला आवडत नव्हतं. त्यामुळे मी मनाने आई वडिलांपासून दूर होत गेले. 

इकडे घरी येणारे पाहुणे मात्र माझ्याकडे एखादी पोरकी अनाथ मुलगी असल्यासारखं पाहत आणि हळहळत. ते सुद्धा मला सहन होत नव्हतं.

त्यानंतर काही दिवसांनी मी शाळेत जायला लागले सुरुवातीला थोडी रडले असेन कदाचित पण मला शाळा खूप खूप आवडायची. माझी पुस्तकं म्हणजे माझा जीव की प्राण होऊन गेलं. लहान मुलांना अभ्यासाचा कंटाळा असतो पण मला मात्र अभ्यास सोडून खेळायला जायचं कंटाळा यायचा. हे थोडं वेगळं वाटेल कदाचित का त्याची पण माझ्या बाबतीत हे खरं होतं. एक हुशार मुलगी म्हणून मी शिक्षकांमध्ये लोकप्रिय होत होते. 

मात्र मी अभ्यासा व्यतिरिक्त काहीच करत नाही हे पाहून माझ्या घरचे चिंतेत पडले होते. कारण मी तर खेळायला सुद्धा बाहेर जायला तयार नव्हते. अंगकाठी थोडी नाजूक असल्यामुळे मी खेळात मागे पडायची मग गल्लीतली  इतर मुलं पुन्हा पुन्हा मुद्दाम माझ्यावरच राज्य द्यायची. मला काही कोणाला पकडायला जमायचं नाही आणि मी मैदानी खेळांपासून अजूनच दूर होत गेले.

मला अभ्यासापासून वेगळं करणं अवघड वाटायला लागलं तेव्हा माझ्या आत्याने माझा गोष्टीच्या पुस्तकांशी परिचय करून दिला आणि मग तर मला एखादा खजिना गवसल्यासारखंच वाटायला लागलं. माझ्या सगळ्या व्यथांपासून दूर गोष्टींच्या जगात मी रमायला लागले. 

पण सारखं सारखं पुस्तकांमध्ये डोकं खुपसून बसल्याचा परिणाम माझ्या शरीरावर दिसायला लागला आणि मला दहाव्या वर्षीच जाड भिंगाचा चष्मा लागला. आणि इकडचे विरुद्ध तिकडचे असा संघर्ष पुन्हा पेटला. 

मी एक तर तब्येतीने अति नाजूक … त्यातून अशी ढापणी असेल तर पुढे जाऊन माझं लग्न कसं होणार ह्याची माझ्या वडिलांना जास्त चिंता वाटायला लागली. कारण त्या वेळी माझ्या आत्याच्या लग्नाचं बघत होते आणि ते काही जमत नव्हतं. त्यामुळे आपली मुलगी पण त्याच वळणावर जाते कि काय अशी त्यांना भीती वाटत होती.

त्याला कारणही तसंच होत. मी घरी सतत आत्याचा पदर पकडून असायचे. शाळेत पालकांच्या मिटिंगला किंवा काही कार्यक्रम असेल तर आत्याच यायची त्यामुळे शाळेत सगळे तिला माझी आईच समजत होते 

कितीही झालं तरी माझे आई-वडील आणि इकडचे सगळे यांच्यात एक सुप्त संघर्ष होता आणि आता त्या वादाला तोंड फुटलं होतं. पण ते समजून घेण्याची माझी तेव्हा तरी कुवत नव्हती. पप्पा माझं खरंच लग्न करणार का ह्याची भीती वाटायला लागली तेव्हा माझ्या आत्याने बाजूला घेऊन मला समजावलं. 

“तू तिकडे लक्ष देऊ नकोस. त्यापेक्षा तुझ्या अभ्यासावरती कॉन्सन्ट्रेट कर. चांगले मार्क मिळवून तुला मोठं काहीतरी बनायचं आणि मग त्यांना दाखवून द्यायचं की तू सुद्धा काही कमी नाहीस”

मोठं काहीतरी म्हणजे नक्की काय बनायचं ते मला माहित नव्हतं. आत्याला सुद्धा तेव्हा फारसं काही माहीत नसावं. 

जेव्हा मी तिला विचारलं तेव्हा तिच्या तोंडात पहिला शब्द हाच आला कि सगळी हुशार मुलं डॉक्टर किंवा इंजिनियर बनतात. मग मी सुद्धा त्यावेळी खूप अभ्यास करून डॉक्टर बनायचं आणि आपल्या पप्पांना दाखवून द्यायचं हा इरादा पक्का केला.

त्यानंतर काही दिवसानंतर ची गोष्ट मी आजोबांसोबत कुठेतरी चालले होते आम्ही बस स्टॉप वर उभे होतो आणि आजोबा अचानक चक्कर येऊन खाली कोसळले. मी रडायला लागले तशी आजूबाजूच्या लोकांनी मदत केली.  आजोबांना उपडी करून पाहिलं तेव्हा डोक्याला मार लागला होता आणि डोक्यातून रक्ताची धार!

ते पाहून मलाही चक्कर आली आणि आजोबांच्या बाजूला मीही तिथेच कोसळले.

हॉस्पिटलमध्ये जाग आली तेव्हा कळलं की आजोबांना माईल्ड अटॅक आला होता आणि मला लो बीपी डिटेक्ट झालं होतं. त्यानंतर हळूहळू लक्षात आलं की रक्त पाहिल्यानंतर माझं बीपी लगेच खाली जायचं. त्यामुळे मग मी डॉक्टर बनण्याचं स्वप्न सोडून दिलं आणि इंजिनियर व्हायचं ठरवलं. 

पण नक्की काय करायचं किंवा इंजिनिअरचं काम काय असतं काहीही माहित नव्हतं. त्यापेक्षा लेखक होणं किती सोपं! निदान ते काय लिहितात ते तरी माहित होतं मला! पुस्तकांचं जग सुद्धा खुणावत होत. आपण मोठी होऊन लेखिका बनावं आणि अशाच छान छान गोष्टी लिहाव्या असं वाटायला लागलं. त्याच वेळी मी रफ बुक मध्ये दोन -तीन गोष्टी लिहूनही ठेवल्या होत्या पण कोणाला दाखवायची हिंमत नव्हती. लोक हसतील असं वाटायचं. 

माझं मन मला सांगायला लागलं - कित्येक लेखक सुद्धा प्रसिद्ध असतातच. मला मोठं नाव कमवायचं असेल तर लेखिका झालं पाहिजे हे मनाने घेतलं. मग आत्या म्हणाली कि निबंध स्पर्धांमध्ये भाग घेत जा. 

एका स्पर्धेत विषय होता मी मोठेपणी कोण होणार?

सगळ्यांना डॉक्टर इंजिनियर वैगरे व्हायचं होतं. मी मात्र लिहिलं लेखिका होणार! 

माझा निबंध कदाचित इतका वाईट होता की परीक्षकांनी वीस पैकी फक्त पाचच मार्क दिले. आपली लायकी कळली आणि जाणवलं की … जाऊदे … इंजिनियर होणं जास्त सोप्पं आहे.

त्याच वेळी मी लेखणी सोडली. आणि ठरवलं, इंजिनियर व्हायचं आणि आई-वडिलांना दाखवून द्यायचं होतं की मी सुद्धा काही कमी नाही.

आता फक्त आपल्याला भरपूर मार्क मिळवायचेत म्हणजे इंजीनियरिंग कॉलेजला ऍडमिशन मिळेल एवढंच कळत होतं.

मी सातवीत होते तेव्हा माझ्या काकाचं लग्न जमलं. आजीला आधीचा अनुभव वाईट होता त्यामुळे दुसऱ्या लेकाच्या लग्नानंतरची सोय म्हणून घरात एक छोटासा पोटमाळा काढून घेतला होता.

पण माझीही नकळत सोय झाली कारण मी दिवसभर तिथे कोणीही डिस्टर्ब करता अभ्यास करू शकत होते.  काकाच्या लग्नानंतर मला 'रात्री तिथे का अभ्यास करता येत नाही...?' असा प्रश्न पडायचा पण तेवढं कळण्याचं वय नव्हतं … हा हा हा!

*****

एव्हाना मी हायस्कूल मध्ये आले होते आणि त्याचवेळी बाहेरच्या स्पर्धा परीक्षा सुरू झाल्या होत्या. होमी भाभा बाल वैज्ञानिक स्पर्धेला बसले आणि चक्क सिलेक्ट सुद्धा झाले. त्यानंतर आमच्या शाळेच्या प्रिंसिपॉलनी माझ्या घरच्यांना बोलावलं. तिथेही अर्थातच माझी आत्याच भेटायला गेली.

“तुला मोठी होऊन काय बनायचं आहे?” त्यांनी मला आत्या समोरच मला प्रश्न केला.

‘मला ना मोठी होऊन लेखिका बनावसं वाटतं! छान छान गोष्टी लिहिणारी लेखिका’ असं बोलायचं होतं पण निबंध स्पर्धेचा अनुभव ताजा होता त्यामुळे “इंजिनिअर बनायचं आहे” इतकंच उत्तर दिलं. 

'इंजिनीयर व्हायचं असेल तर आत्तापासूनच मोठं टार्गेट ठेव. होमी भाभा मध्ये सिलेक्शन होणं सुद्धा खायचं काम नाही. ते तिने अचिव्ह केलंय तर ती आयआयटी सुद्धा क्रॅक करू शकते. आत्तापासूनच अभ्यासाला सुरुवात करा. तुम्हाला पाहिजे तर मी शाळेतल्या शिक्षकांना तिचा जास्त अभ्यास घ्यायला सांगते. खूप मोठी स्पर्धा आहे पण हिला जर आत्तापासून नीट मार्गदर्शन मिळालं तर तुमची मुलगी आयआयटी ला जाईल!' मॅडम म्हणाल्या. 

  

“पण मॅडम आमची आर्थिक परिस्थिती बेताचीच…” आत्या आपला मुद्दा मांडत होती.  

“आम्ही बाहेरच्या क्लासेसना घालायला सांगत नाहीये. शाळेतल्याच शिक्षकांना तिचा थोडा जास्त अभ्यास घ्यायला सांगतो” असं म्हणत त्यांनी मदत केली आणि मग शाळेतच माझे एक्सट्रा क्लासेस सुरू झाले. 

आतापर्यंत जो अभ्यास आवडत होता. तो मात्र आता अती झाल्या मुळे कधी कधी नकोसा वाटायला लागला. वयाबरोबर येणारे शारीरिक आणि मानसिक बदल सुद्धा थोडेफार कारणीभूत होतेच. 

खूप वर्षं रखडलेलं आत्याचं लग्न मी दहावीत असताना जमलं. लग्नाचा आनंद होताच पण माझ्या पोटात थोडी धडकी भरली होती कारण माझी आत्याच माझा मुख्य अभ्यास घेत होती. माझी जी काही जडण घडण झालीय ती माझ्या आत्यानेच केलीय. आज मी जी काही आहे ते तिच्यामुळेच!

ती घरी नसली तर माझी दहावीची नैया कशी पार होणार ह्याची चिंता लागून राहिली होती. पण त्यावेळी आत्याच पुन्हा  धावून आली. सासरी जायच्या आधी तिने माझा सगळं अभ्यास पूर्ण करून घेतला. इतकंच नाही तर मला समजावलं देखील 

“कोणीही कोणाला आयुष्यभर पुरत नाही. आज तुला स्वतःचा अभ्यास स्वतः करावा लागत असला तरी पुढे जाऊन तुला आपल्या पायांवर उभं रहायचं आहे आणि त्यावेळी बोट पकडायला मी किंवा तुझा काका नसेल. त्यामुळे आतापासूनच स्वावलंबी हो!” आत्याने असं समजावलं ते त्यावेळी फारसं कळलं नाही तरी तेच शब्द पुढे जाऊन माझ्या आयुष्यभराची पुंजी ठरले. 

आत्याचं लग्न झालं आणि त्यानंतर धाकट्या काकाचं सुद्धा लग्नं  ठरलं. 

आजोबांना दुसरा मोठा अटॅक येऊन गेला होता. त्यांची तब्येत बिघडत चालली होती. त्यामुळे आता यापुढे या चाळीत राहणं शक्य नाही हे सर्वांनाच हळूहळू जाणवू लागलं. मग दोन्ही काकांनी उपनगरात घर घेतली. 

  

माझ्या दहावीनंतर सगळे वेगळे होणार आहेत हे जवळ जवळ ठरलेलंच होतं. त्यामुळे माझी रवानगी अर्थातच माझ्या आई-वडिलांकडे होणार होती. 

दहावीच्या वर्षी मात्र मी भरपूर अभ्यास करून नव्वद टक्के मिळवले. त्याकाळी मेरिट लिस्ट साधारण 91- 92 ला क्लोज व्हायची ती माझी अगदी थोड्याशा मार्कांसाठी हुकली होती. 

तरीही मला इतकं मोठं यश मिळेल. असं कोणालाच वाटलं नव्हतं.

अनपेक्षितरित्या आलेले यश, एक नवा आत्मविश्वास देऊन गेलं. पण हा आत्मविश्वास माझ्या नशिबात काही फारसा टिकणार नव्हता. 

माझी रवानगी माझ्या आई-वडिलांकडे झाली होती. मुलगी सासरी जाताना रडते. पण मी तर माझ्याच तिकडच्या घरी  जाताना ढसाढसा रडले होते. 

दोन्ही घरांच्या पद्धती वेगळ्या होत्या. त्यातून माझ्यावर असलेला आत्या आणि काकाचा अंमल पप्पांना अजिबात आवडत नव्हता. त्यामुळे काही दिवसातच छोट्या छोट्या गोष्टींवरून माझे आणि पप्पांचे खटके उडायला लागले. मी सुद्धा थोडीफार पप्पांसारखीच जिद्दी होते. आणि त्यामुळे त्यांचं न ऐकणारी बिघडलेली मुलगी म्हणूनच तिकडच्या चाळीत फेमस व्हायला लागले. पुढे परिस्थिती या थराला गेली की, लहानपणी कधीही कुणाचा मार न खाल्लेली मी...  माझ्यावर पप्पांनी हात उगारला, तेही लहान नाही तर चांगली सोळा वर्षाची असताना! 

एकदा तर कॉलेजमधून थेट पळून काकाच्या घरी गेले. आणि मी काही झालं तरी परत जाणार नाही. असा हट्ट धरून बसले. मग पप्पा आले, पुन्हा भांडण … पुन्हा समजावून मला त्या घरी परत पाठवण्यात आलं. 

बिघडलेल्या वातावरणाचा परिणाम. माझी तब्येत आणि अभ्यास या दोन्ही वर व्हायला लागला. त्यातून मराठी माध्यमात शिकलेल्या मला आता अकरावी पासून इंग्लिश मीडियम सुरु झालं ते प्रेशर होतंच. कॉलेज मध्ये शिकवलेलं काहीच कळत नव्हतं.

अभिनंदन.... दहावीला 90 टक्के काढणारी मुलगी अकरावीला 45 टक्क्यांपर्यंत खाली आली होती...! 

आपण आपल्या मुलीला आजोळी ठेवून चूक केली आणि ती आता आपलं कधीही ऐकणार नाही. हट्टीपणात आपल्याहि  वरचढ आहे हे पप्पांच्या लक्षात आलं होतं. संघर्ष सुरूच होता … कोणत्याही संघर्षात जो दुर्बल असतो तोच हरतो आणि मर खातो … म्हणजे अर्थात मीच! 

   

त्यानंतर मी मानसिक विकाराने त्रस्त झाले. विचित्र वागू लागले. त्याकाळी म्हणे मी रात्री अपरात्री झोपेतून जागी होऊन झपाटल्यासारखं करायचे! मला मात्र आता त्यातलं काही आठवत नाही पण मला डॉक्टर, हकीम, बुवाबाजी सगळं केलं गेलं ते स्पष्ट आठवतं.

त्या दाटलेल्या ढगांना अलगद एक सोनेरी किनार येत होती. आपल्या लेकीची अवस्था माझ्या आईला पाठवली नसावी. माझ्या आणि पप्पांच्या भांडणात ती हळू हळू माझ्या बाजूने बोलायला लागली.

पण हे दिवस फार टिकणार नव्हते. त्याच वर्षी पप्पांची फॅक्टरी बंद पडली आणि अनेक कामगारांना जबरदस्तीची व्हि आर एस दिली गेली. परिस्थितीचा परिणाम पप्पांच्या बरोबरच माझ्यावरही होत होता. सगळ्यांवरचा राग माझ्या वरच निघत होता. 

   

ट्रीटमेंट नंतर थोडी सुधारणा झाली. कसाबसा बारावीचा पेपर दिला. पण ह्या सर्वांचा परिणाम मार्कांवरही दिसला. आयआयटी तर दूरच राहिलं मुंबईतील इंजिनिअरिंग कॉलेज सुद्धा दुरापास्त झालं. बाहेरगावी ऍडमिशन मिळत असलं तरी ते घेण्याइतके पैसे नव्हते. 

आपली सगळी स्वप्नं अशी दूर निघून जाताना मी नुसती पाहत होते. काहीच करू शकत नव्हते. 

मग कोणीतरी डिप्लोमा बद्दल सांगितलं. दहावीच्या मार्कांवर तिथे ऍडमिशन घेतलं तर बारावीची दोन वर्षं फुकट जाणार होती पण मी इंजिनियर तरी बानू शकत होते. 

डिप्लोमाच्यां माझ्या मेरिट लिस्ट मध्ये माझा पहिल्या पाचात नंबर होता. मला हवं ते कॉलेज म्हणजे व्हिजेटीआय सहज मिळालं.

आता इंजिनिअरिंगच्या चार वर्षांच्या कोर्ससाठी मला सात वर्ष खर्च करायला लागणार होती. पहिली चार वर्ष डिप्लोमा आणि नंतर तीन वर्ष डिग्री. पण सध्याच्या परिस्थितीत पप्पा मला ते डिग्री कितपत करू देतील याबद्दल थोडी शंकाच होती. 

नेमकी ती खरी ठरली. कारण डिप्लोमा पूर्ण होईपर्यंत मी २१ वर्षाची झाली आणि पप्पांना अर्थातच माझ्या लग्नाची घाई! 

लहानपणी शेलाट्या बांध्याची असणारी मी, एव्हाना थोडी स्थूल प्रकृतीकडे झुकायला लागली होती. त्यातून सावळा रंग आणि डोळ्याला झाड भिंगाचा चष्मा. लग्नाच्या बाजारात मी अगदीच टाकाऊ जिन्नस होते. 

ठरवून केलेल्या लग्नात मुलगा कसाही असला तरी चालतो पण मुलगी मात्र सर्वगुणसंपन्न असावी लागते. सर्वांना गोरी, सुंदर, सुडौल आणि गृहकृत्यदक्ष वगैरे बायको हवी असते. मी तर ह्या सर्वांच्या अगदीच उलट होते. 

अधून मधून होणारे कांदे पोहे आणि त्यानंतर येणारे रिजेक्शन... जवळजवळ पाचवीलाच पुजलेले! कोणी आपल्याला रिजेक्ट केले की मनातून वाईट वाटतं हे खरं आहे. पण मला मात्र मनातून एक आसूरी आनंद व्हायचा.

कारण एव्हाना मी पप्पांच्या अपरोक्ष कॉम्प्युटरच्या पार्ट टाईम डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं होतं. पुरेसा अनुभव जमा झाल्यानंतर पुढे जाऊन पार्ट टाइम डिग्री सुद्धा करण्याचा विचार होता. 

त्यांना जेव्हा हे कळलं तेव्हा अर्थातच आवडलं नाही. आपला अर्ध्यापेक्षा जास्त पगार कॉम्प्युटर कोर्सवर खर्च करण्यापेक्षा मी लग्नासाठी दागिने करून ठेवावेत असं त्यांना वाटत होतं. त्यांच्या जागी ते अगदीच चुकीचे नव्हते. मुलीच्या जमापुंजीला सुद्धा लग्नाच्या बाजारात किंमत असते. पण ते कळण्याचं माझं वय नव्हतं. आता कोर्स केला तर पुढे जाऊन माहिती तंत्रज्ञाच्या क्षेत्रात बरंच काही करू शकते आणि आपोआप पगारवाढ सुद्धा मिळेल ह्याचा मला आत्मविश्वास होता. 

लग्नं जमलं असतं तर माझा कोर्स आणि त्यापुढची डिग्री हे सगळं करण कठीण होतं त्यामुळे रिजेक्शन येऊन सुद्धा मनातून आनंद होणारी कदाचित मी पहिलीच मुलगी असेल. 

पुढे पप्पांच्या लक्षात माझा डाव यायला लागला आणि मग परत घरात खटके ठरलेलेच! आता त्यात न जमणाऱ्या लग्नाची भर पडली होती. 

यावेळी मात्र माझा काका धावून आला. 

“लग्नं जमेपर्यंत तिला शिकू दे नां तिला! वाटल्यास लग्नं जमलं तर सोडून देईल ती” काकाच्या बोलण्यावर मी तोंड देखला होकार दिला पण मनातून मात्र मला असं काहीही करायचं नव्हतं. 

मला मुलाकडून फारशा आशा नव्हत्या. मुलगा शिकलेला, निर्व्यसनी असावा आणि लग्नानंतर माझं शिक्षण पुढे सुरू ठेवावं आणि निदान डिग्री तरी पूर्ण करु द्यावी, एवढीच अपेक्षा होती. पण कांदेपोह्यांच्या कार्यक्रमात हे थेट कसं बोलणार. 

अशावेळी ध्यानीमनी नसताना मध्येच एका मुलाचा होकार आला आणि मला धडकी भरली. मी मुद्दाम फोन करून त्याला बाहेर भेटायला बोलावलं. 

ते त्याला आवडलं नसावे किंवा त्याने ते घरी सांगितलं असावं. आधी होकार दिलेला कुटुंबाने नंतर मात्र नकार कळवला. 

ही साधारण वीस वर्षांपूर्वीची गोष्ट सांगतेय. आजच्यासारखं  मुला मुलींनी बाहेर भेटणं तेव्हा कॉमन नव्हतं. त्यामुळे मुलगी जरा जास्तच पुढारलेली आहे, असं त्यांना बहुतेक वाटलं असावं. त्यानंतर घरात पुन्हा माझं कोर्ट मार्शल ठरलेलं! 

  

कधी तर वाटायचं ह्या घरात राहण्यापेक्षा लग्नं करून गेलेलं बरं! कदाचित सासरी तरी चांगली वागणूक मिळेल अशी एक आशा वाटत होती. पण आजूबाजूच्या मैत्रिणींचे अनुभव पाहत होते, त्यानंतर सासरचे वाईट असतात. असाच पक्का समज झाला होता माझा. एकिच माझ्यासारखं पार्ट टाइम असलेलं शिक्षण बंद झालं तर दुसरीला लग्नानंतर लवकरच दिवस गेले.

अशा परिस्थितीत माझं शिक्षण किती पुढे सुरू ठेवता येईल किंवा सासरच्यांचा सुनेकडून असलेल्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करायला जमेल की नाही? अशी सुद्धा शंका होती.

*****

एक दिवस घरातला लँडलाईन फोन वाजला आणि मीच उचलला. समोरून एक मुलगा बोलत होता.

माझे काका त्याच्या घरी स्थळ घेऊन गेले होते परंतु घरात दुसरं कोणी मोठं नव्हतं म्हणून त्याने स्वतःच माझ्या वडिलांशी बोलायला फोन केला होता. आम्ही थोडफार बोललो तशी परिस्थिती माझ्या लक्षात आली.

“आपण बाहेर भेटूया का?” मी थोड चाचरतच विचारलं.

मला फारशी अपेक्षा नव्हती पण त्याने होकार दिला कारण त्यालाही हा कांदे पोह्यांचा प्रकार आवडत नव्हता.

मग आम्ही ठरवून एके ठिकाणी भेटलो आणि जवळच्याच एका उडपी रेस्टोरंट मध्ये गेलो. त्याकाळी आजच्यासारखी कॉफी शॉप्स, डेट्स वगैरे प्रकार नव्हतेच!

मी माझी परिस्थिती सांगितली. म्हणजे सगळं नाही सांगितलं पण लग्नानंतर मला शिक्षण पुढे चालू ठेवायची इच्छा आहे हे आवर्जून सांगितलं. मला माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये पुढे जायचंय आणि ह्या प्रकारच्या नोकरीत कधी बाहेरगावी  किंवा परदेशी सुद्धा जावं लागू शकतं. ह्या सगळ्या परिस्थितीची कल्पना दिली. 

माझ्या काही मैत्रिणींना संधी मिळून सुद्धा लग्नानंतर जाता आलं नव्हतं त्याची सल मनात होतीच. आणि आपल्यासोबत असं होऊ नये असं वाटत होत. मी परदेशी शिक्षण घ्यावं हि माझ्या काकाची इच्छा होती पण मागच्या काही वर्षातल्या परिस्थितीमुळे ती पूर्ण होणार नाही हे ठाऊक होत. मग शिक्षणासाठी नाही तर निदान नोकरीसाठी तरी परदेशी जाऊन तिथला अनुभव घ्यावा अशी इच्छा होती.

आणि प्रकाश चक्क हो म्हणाला… त्याला माझं पुढे शिक्षण घेणं आवडणारं होतं कारण त्याने स्वतः सुद्धा डिप्लोमा नंतर डिग्री पार्ट टाईमच केली होती. तो कॉलेजमध्ये असतानाच त्याच्या वडिलांची नोकरी गेली त्यानंतर ते गावी जाऊन शेती करू लागळे. इकडे त्याने पडेल ती कामं करून आईसोबत मिळून कसाबसा वडिलांचा चार मुलांचा संसार रेटला.

त्याने स्वतः कठीण आर्थिक परिस्थितीतून आपली डिग्री पूर्ण केली त्यामुळे तो माझी शिक्षणासाठीची तळमळ समजू शकत होता. त्याच्या सुद्धा फारशा काही अपेक्षा नव्हत्या. फक्त एकत्र कुटुंबात मिळून मिसळून राहील अशी मुलगी हवी होती आणि कारण इथे जरी फक्त त्याची आई आणि भावंडं राहत असली तरी गावी खूप मोठा एकत्र कुटुंब होतं आणि ते बघूनच अनेक मुलींचे नकार येत होते.

मग मी सुद्धा लहानपणी कशी एकत्र कुटुंबात राहत होते आणि नंतर विभक्त कुटुंबात रहावं लागलं ते सांगितलं. सगळे प्रॉब्लेम्स बोललो नाही तरी मला स्वतःला विभक्त पेक्षा एकत्र कुटुंबात राहणं जास्त आवडत होतं ते त्याला जाणवलं. 

कुठेतरी मनाच्या तारा जुळू लागल्या आणि आम्ही हे नातं पुढे न्यायचं ठरवलं. लग्न ठरवून होत असलं तरी दोघांच्याही घरची परिस्थिती काही फारशी अनुकूल नव्हती. 

मी पप्पांना न सांगता त्याला भेटायला गेले हे त्यांना आवडलं नव्हतं तर तिकडे त्याच्या घरी सुद्धा सर्वांना वाटत होतं की तो मुलीला ओळखतो म्हणजे लव मॅरेज करतोय. 

पण आम्ही दोघेही आपल्या निर्णयावर ठाम होतो आणि शेवटी एकदाच आमचं गंगेत घोडं न्हालं!

मुली सासरी जाताना रडतात ना, पण ते तर माझं आधीच झालं होतं, जेव्हा मी माझ्या आजीच्या घरातून आई-वडिलांच्या घरी राहायला गेले तेव्हा! आता सध्या घरची परिस्थिती अशी होती की मला इथून सुटतोय याचाच जास्त आनंद होता.

मी फारशी रडले नाही … पण माझ्या काकाच्या डोळ्यात पाणी तरळलेलं मी पाहिलं. आत्याच्या आणि आईच्याही डोळ्यात थोडसं होतं. मग उलट मीच त्यांची समजूत घातली.

लग्नानंतर मी चाळीतून पहिल्यांदा फ्लॅटमध्ये राहायला आले.

वन रूम किचनच्या घराच्या किचनचा बेडरूम बनवलेला आणि मध्ये पॅसेजचा छोटासा किचन!

घरी मी, प्रकाश, त्याची आई, लग्न न झालेली एक बहीण आणि एक भाऊ असे पाच जण राहत होतो. वडील आणि बाकी सगळे म्हणजे काका वैगरे एकत्र कुटुंब गावी शेती करत होतं. कोकणातल्या शेतीतून उत्पन्न जवळ जवळ शून्य त्यामुळे सर्वांची जबाबदारी मुंबईत नोकरी करणाऱ्या प्रकाश वरच होती.

लग्न झाल्यानंतर प्रत्येक मुलीला ऍडजेस्टमेंट करावीच लागते तशी माझ्याशी वाटायला होती. थोडे फार खटके उडत होते पण एका अर्थाने जे झालं ते बरंच  झालं. 

त्यामुळे आता कुठे मला माझी आई कळायला लागली. मी फ्लॅट मध्ये राहत असूनही कम्फर्टेबल नव्हते तर मग माझ्या आईने त्या गिरगावातल्या छोट्याशा दीड खणांच्या खोलीत किती सहन केलं असेल.

माझ्या आईने जेव्हा वेगळा होण्याचा निर्णय घेतला तेव्हा ती अगदीच चुकीची नव्हती. पण आजीला सुद्धा मोडलेलं घर पहावत नव्हतं तिच्या पिढीप्रमाणे ते बरोबरच होतं.

दोघी आपापल्या ठिकाणी बरोबर होत्या हे जाणवायला लागलं पण त्यामुळे मधल्या मध्ये माझं मात्र सँडविच झालं होतं आणि त्यामुळेच मी आईला आतापर्यंत वाईट समजत होते. 

माझी आई मला सोडून गेली इथं पासून माझी आई परिस्थितीची शिकार होती  अशी माझी इतिश्री झाली होती. त्यानंतर मात्र मी आईला समजून घ्यायला शिकले. 

कधी कधी सासूबाईंबरोबर खटके उडायचे. मी घराची हवी तशी जबाबदारी घेत नाही असं त्यांना वाटायचं. मी मात्र नोकरी आणि घर सांभाळून कसाबसा अभ्यास करत होते. 

पण प्रकाश ने आपलं वचन मात्र पूर्णपणे निभवलं.

माझं ग्रॅज्युएशन पूर्ण करायला तर मदत केलीच पण पोस्ट ग्रॅज्युएशनला सुद्धा ऍडमिशन घ्यायला लावलं. मला मात्र ते कठीण वाटत होतं कारण मी सुद्धा जमेल तितका एकत्र कुटुंबात स्वतःला ऍडजेस्ट करून घेत होती. हळूहळू नाती सांभाळायला शिकत होते. ह्या सगळ्याला वेळ दिला तर अभ्यास कसा होणार?

पण जितक मोठा कुटुंब तितकेच तुमची पारख करणारे जास्त लोक असतात. आणि घरातल्या मोठ्या सुनेला पारखायला फक्त कुटुंबातली नाही तर शेजार पाजारचे, चाळीतले, वाडीतले असे सगळेच गणगोत तयारीत  असतात. त्या सगळ्यांना तोंड देताना माझ्या नाकी नऊ येत होते पण प्रकाशने मला नेहमीच साथ दिली.

माझं शिक्षण घेणं कोणालाच आवडत नव्हत आणि त्यामुळेच आम्ही पाळणा लांबवतोय होते असं घरातल्या सर्वांचा समज झाला होता. पण खरं तसं काहीही नव्हतं.

देवाने आमच्यासाठी सरळ साध्या मार्गाने बाळ होणं लिहिलंच नव्हतं. आमचे बाळासाठी प्रयत्न सुरूच होते पण यश येत नव्हतं.

त्याचवेळी प्रकाशला एक संधी चालून आली.  आयआयटीमध्ये एम टेक करण्यासाठी त्याचा नंबर लागला होता. नोकरीत अर्धपगारी सुट्टी मिळणार होते. मुंबईत ऍडमिशन झालं तरीही त्याला दोन वर्ष होस्टेलला राहणं भाग होतं.

“तुझं परदेशी शिक्षणाचा स्वप्न पूर्ण होऊ शकलं नाही पण परदेशी नोकरीचं तर नक्कीच पूर्ण होऊ शकतं ना!” प्रकाश एक दिवस मला म्हणाला. 

मी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करत होते पण परदेशी नोकरीच्या काही संधी मी लग्न झाल्यानंतर स्वतःहून सोडल्या होत्या.

“तू पुन्हा प्रयत्न कर. तसं ही मी तर हॉस्टेलला राहणार तेव्हा तू इथे एकटी राहून काय करणार त्यापेक्षा तू स्वतःच्या कक्षा रुंदावल्या पाहिजेत. तुमच्या फील्डमध्ये परदेशी अनुभवाला जास्त किंमत असते त्यामुळे तू तो घ्यावा आणि अशी संधी सोडू नये असं मला तरी वाटतं.” त्याने मला धीर दिला आणि मी आमच्याच ऑफिस मध्ये ऑनसाईट जाण्यासाठी नाव नोंदवलं. 

मलाही शॉर्ट टर्म साठी परदेशी जायला मिळालं तर हवं होतं व माझा नंबर लॉन्ग टर्म (दीर्घकाळ) साठी लागला.  मी संभ्रमात होते पण प्रकाश ठाम होता. त्याने मला लॉन्ग टर्म साठी प्रोत्साहित केलं.

*******

ऑफिसमध्ये चक्र फिरायला सुरुवात झाली. पण ह्या क्षेत्रात ऑनसाईट ची काही शाश्वती नसते. हवं तेव्हा मिळत नाही आणि नको असेल तेव्हा अनेक संधी चालून येतात. तेच माझ्यासोबतही झालं. माझा व्हिसा यायला आणि नोकरी फिक्स व्हायला थोडा जास्त काळ गेला आणि तोपर्यंत प्रकाशच्या एम टेक चं  पहिल वर्ष संपत आलं होतं.

पुन्हा एकदा आता जावू की नको या गोंधळात पडले होते पण प्रकाशने मला जायचा सल्ला दिला आणि एक स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी लंडनला निघालेल्या विमानात बसले.

लंडनच्या सव्वा वर्षाच्या वास्तव्याने मला खूप काही शिकवलं. त्यापूर्वी कधी होस्टेल जीवनाची चव चाखली नव्हती की एकटी राहिलेले नव्हते. 

पण एकट राहताना खूप सांभाळून राहावं लागतं कारण आपल्या गैरफायदा घ्यायला लोक टपलेले असतात हे हळूहळू जाणवायला लागलं. आपण जेव्हा आपल्या घरच्यांसोबत असतो तेव्हा किती प्रोटेक्टेड जीवन जगत असतो. पण बाहेर पडलो कि खऱ्या अर्थाने जीवनातले टक्के-टोणपे जाणवायला लागतात. 

लंडनमध्ये राहत असतानाच ब्रिटिश लायब्ररी बद्दल कळलं. प्रत्येक कौन्सिल मध्ये (म्हणजे आपल्याकडे जसा म्युनिसिपल वॉर्ड असतो ना तसंच काहीसं) एक लायब्ररी असतेच असते. कारण ब्रिटिश माणूस मुळात फार वाचनवेडा आहे. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी तिथे मुलं प्राथमिक शाळेत असल्यापासून मुद्दाम प्रयत्न केले जातात.

लायब्ररी सर्वांना फ्री असते आणि एकावेळी आपण अनेक पुस्तके घेऊ शकतो.

माझं शिक्षण मराठी माध्यमातून झाल्यामुळे इंग्रजी वाचनाची तितकीशी गोडी नव्हती. अभ्यासाच्या पुस्तकां व्यतिरिक्त इंग्रजी अवांतर वाचन नव्हतंच. पण आता आपल्यासमोर एवढा मोठा खजिना आहे आणि तो फुकट आहे म्हटल्यावर देता किती घेशील दो करांनी अशी माझी परिस्थिती झाली पण भाषेची अडचण होती.

काय वाचायचं ते कळत नव्हतं. अशा वेळी तिथंले कौन्सिलर्स धावून आले. मी त्यांना माझी परिस्थिती सांगितली माझ्या व्हर्नाक्युलर मिडीयम शिक्षणाबद्दल सुद्धा सांगितलं. मी ज्या प्रकारचे इंग्लिश त्यांच्याशी बोलत होते त्यावरून त्यांनी माझी इंग्रजीची लेवल साधारण तिथल्या सहावी-सातवीतल्या मुलांच्या भाषेइतकी आहे असा निष्कर्ष काढला.  मग त्यांनी मला एखाद लहान मुलांचं इंटरेस्टिंग पुस्तक वाचण्याचा सल्ला दिला कारण त्यातले शब्द फार सोपे असतात. 

अशा प्रकारे हॅरी पॉटर माझ्या आयुष्यात आला आणि त्यानंतर माझा आयुष्यच बदललं. अनेक वर्ष सुप्त राहिलेली वाचनाची आणि लेखनाची आवड पुन्हा जागृत झाली. मदत करायला तिथले कौन्सिलर्स होतेच. हॅरी पॉटरची तोपर्यंत प्रकाशित झालेली सगळी सहा पुस्तक अक्षरशः आधाशासारखी वाचुन काढली. सातव पुस्तक प्रसिद्ध झालं तेव्हा मी लंडनमध्येच होते. ३१ जुलै २००७ रोजी रात्री बारा वाजता पुस्तकांच्या दुकानाबाहेर रांग लावून मी विकत घेतलेलं ते पाहिलं पुस्तक. त्याच वेळी ब्रिटिशांचं वाचनाचं वेड जाणवलं आणि त्यांनी इतकी वर्षे जगावर राज केलं तेही कळलं . 

सुरुवातीला वाचताना डिक्शनरी घेऊन बसायचे पण नंतर त्याचा कंटाळा यायला लागला. त्याऐवजी एखादा शब्द अडला तर पुढचे मागचे शब्द वाचून आपल्याला वाक्याचा अर्थ लावता येतो हे लक्षात यायला लागलं आणि माझी इंग्रजी वाचनाची आवड अधिकच बाहरली.

माझ्या त्यातल्या काही कौन्सिलर्स बरोबर चांगल्या ओळखी झाल्या होता.त्यांनी एक दिवस मला व्हॉलेंटियर होणार का म्हणून विचारलं. मग मी त्यांच्या सारखीच विकेंडला लायब्ररीत येणारे माणसांना मदत करण्याचं काम करायला लागले. इतरांना मदत करताना हळूहळू नकळतच आत्मशोध सुद्धा सुरू झाला. मला लायब्ररीच्या मॅगझीन साठी लिहायची संधी मिळाली. मी माझ्या मोडक्या तोडक्या इंग्रजीत प्री-टिन मुलांसाठी लिहू लागले. नंतर ते सुधारायला मॉडरेटर होतेच. त्यामुळे मी बिनधास्त होते. 

(प्री-टिन म्हणजे साधारण ११ ते १३ ह्या वयोगटातली मुलं. पौगंड येण्याच्या थोडं आधीची!)

आता लेखन सुरु केलं तर इंग्रजी सुधारण्यासाठी डायरी लिहायला सुरुवात केली. नवीन देशात राहताना मला अर्थातच तिथल्या संस्कृतीशी , वातावरणाशी जुळवून घ्यायला त्रास होत होता. ते सगळं माझ्या लिखाणात आपसूक उतरलं.

त्यावेळच्या अनुभवांमधूनच निर्माण झाली माझी पहिली कादंबरी “आठवणींच्या हिंदोळ्यावर

एक मध्यमवर्गीय मुलगी अचानक अमेरिकेत येऊन पडते तेव्हा तिला काय काय विचित्र अनुभव येतात याबाबतचा प्लॉट होता. त्यातले अनेक बरे-वाईट अनुभव माझे स्वतःचे किंवा माझ्या जवळचे मित्र-मैत्रिणींचे होते.

कादंबरी लिहिली तरी ती प्रकाशित मात्र करता आली नाही कारण त्यावेळी माझ्याजवळ प्लॅटफॉर्म नव्हता. 

त्याकाळी इरा किंवा प्रतिलिपीचे ॲप्स नव्हते आणि दुनिया मुठीमें देणारा स्मार्टफोन तर कोसो दूर होता.

म्हणून मग माझी कादंबरी डायरीतच राहिली. आणि नंतर खूप वर्षांनी जेव्हा प्लॅटफॉर्म मिळाला तेव्हा ती कथा मालिकेच्या स्वरूपात प्रकाशित केली.

जरी माझ्या नोट्स इंग्रजीत होत्या तरीही कादंबरी मात्र मी मुद्दाम मराठीतच लिहिली कारण मला परदेशातले ते सगळे अनुभव आपल्या मराठी माणसांपर्यंत पोहोचावं असं वाटतं होतं. 

आता ते अनुभव मी मुद्दाम इथे लिहिणार नाही. वाचायचे असतील तर कथेची लिंक नक्की देईन … हा हा हा!

इंग्लंड मधला अनुभवांचा समृद्ध खजिना घेऊन दीड वर्षांनी परत आले आणि बाळासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. अनेक वेळा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा फेल झाली. कित्येकदा वाटायचं का करतोय आपण हे सगळं? जेव्हा जेव्हा गायनॅक कडे जायचे तेव्हा तेव्हा माझ्यासारख्या ट्रीटमेंट घेणाऱ्या अनेक स्त्रिया आजूबाजूला पाहायचे. खरंच नैसर्गिक रित्या बाळ होणे इतकं कठीण का असतं? त्यापेक्षा दत्तक घेतलेलं बरं.

मनात विचार आला आणि तयारी सुरू केली. प्रकाशने सुद्धा मला मोलाची साथ दिली पण नियतीच्या मनात काही वेगळं होतं.

आता शेवटचीच असं ठरवून घेतलेली ट्रीटमेंट अचानक फळली आणि आमच्या घरी एका गोंडस परीचा जन्म झाला.

माझ्या नशिबात आईपण होतं ते मला मिळालं पण ज्यांना नाही मिळत त्यांनी काय करावं? काही सोपा उपाय नाही का? 

हे प्रश्न मनात रुंजी घालत होते आणि त्याच वेळेला डोक्यात एक वैज्ञानिक संकलप्ना डोकवली. त्यानंतर माझी दुसरी कादंबरी विज्ञानकथा बनून आकाराला येऊ लागली. पण अर्थातच ती त्यावेळी लिहिली नाही. त्यावेळी जे सुचलं ते त्यानंतर बारा वर्षांनी कागदावर … सॉरी सॉरी लॅपटॉप वर उतरवलं. 

आणि तयार झाली माझी दुसरी कादंबरी. बेटर द डेव्हील यू नो …

नायक एक गायनॅक … मानवी वंध्यत्व ह्यावर संशोधन करणारा, एका सीक्रेट परंतु चुकीच्या वैज्ञानिक प्रयोगात फसलेला. त्या प्रयोगातून असं काय निष्पन्न झालं की ज्याचं सावट प्रयोगा नंतर दहा वर्षांनी त्याच्या आणि नायिकेच्या आयुष्यावर पडू लागलं? 

ह्या कादंबरीने मात्र मला लेखिका म्हणून खरी ओळख दिली. प्रतिलिपीवरच्या सुपर लेखक चार या मोठ्या स्पर्धेत ती निवडून आली. 

स्पर्धेत नंबर आला ना, की आपोआप कॉन्फिडन्स वाढतो. माझ्या सुपीक डोक्यात आता नवनवीन कल्पना आकाराला येऊ लागल्या. अजून खूप काही लिहायचं आहे पण सध्या माझी नोकरी आणि करियर असं विचित्र आहे की वेळच मिळत नाही. मग माझ्या वृषाली गुडे ह्या मैत्रिणीने इराच्या स्पर्धेबद्दल सांगितलं आणि मग मी इथे आले. 

पुढचं सगळं तुम्हाला माहीतच आहे अजून किती लिहू … 

आवरतं घेताना एकच सांगते कि लंडन ला जाण्यापूर्वीची मी आणि आताची मी ह्यात खूप फरक आहे. 

माझ्या पूर्वायुष्यातल्या अनुभवांमुळे मी खूप घाबरत, बावरत जगात होते. पण प्रकाश आयुष्यात आल्यानंतर त्यातलं बरंच काही बदललं. माझ्या आत्मविश्वासाचा त्याने पाया रचला. पण त्यावर कळस मात्र चढला जेव्हा मी परदेशात एकटी रहायला लागले तेव्हा. 

मला वाटतं कि प्रत्येक मुलीने एकदा तरी कुटुंबाच्या परिघातून बाहेर पडून असा बाहेर एकटं राहण्याचा अनुभव घ्यायलाच हवा. आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी ते फार आवश्यक असतं. 

म्हणूनच म्हणेन कि फिरुनी नवी जन्मले मी!

0