फिरुनी पुन्हा नवी जन्मेन मी ( भाग १ )

ही एक कौटुंबिक कथा आहे

"तु काही माझी आई नाहीस...आणि एक.. तसं वागायचा प्रयत्नही करू नकोस..." निवा जोरात ओरडली मामीवर आणि तशीच फणकारत निघून गेली.

सुचेताच्या डोळ्यातले अश्रू काही केल्या थांबत नव्हते.
"कसं समजवावं हिला? सतत अशीच चिडचिड करत असते. घरात कुणाशीच पटत नाही."

सुचेता-स्वप्नील हे निवाचे मामा-मामी आणि तिच्याच वयाचा तिचा मामेभाऊ प्रियव्रत असा एकंदरीत गोतावळा होता. स्वप्नीलचा बिझनेस होता.. शहरात उच्चभ्रू वस्तीत त्यांचा बंगला होता.. खरंतर निवाने म्हटलं असतं तर सारी सुखं तिच्या पायाशी लोळण घेत असती..

सुचेताला नेहमी वाटत असायचं की निदान प्रियव्रत आणि निवाचं तरी एकमेकांशी नीट पटावं, एकाच वयाचे आहेत दोघे.. पण निवा?? ती नेहमी त्याच्याशी फटकून वागायची.

निवाची आई म्हणजेच सुचेताची नणंद एक अपघातात वारली. अवघ्या बारा वर्षांची होती निवा त्यावेळी.. पण आई आपल्या आयुष्यातुन निघुन जाण्याचा धक्का मात्र तिने सहन केला.. त्यानंतर निवाच्या वडिलांनी त्यांच्या आईच्या आग्रहाखातर दुसरं लग्न केलं. सावत्र आई.. अंजली ताई.. वाईट नव्हती पण सुचेताच काही महिन्यांनी निवाला आपल्या घरी घेऊन आली.

आजपर्यंत तिने प्रियव्रत आणि निवामध्ये कधी फरक केला नव्हता आणि मुळात तिला तो जमलाच नसता. पण निवाचं मन?? लहानच ते.. तिला सारखं असं वाटायचं की मामा-मामीने आपल्याला घरापासून, वडीलांपासून वेगळं केलं. आणि त्यावरूनच तिने अगदी पहिल्या दिवसापासुन मनात त्यांच्याविषयी राग, द्वेष निर्माण केला होता. आणि दिवसागणिक तो वाढवत नेला होता.. आणि आता तर निवा मोठी झाली होती.. आणि सज्ञान ही.. फॅशन डिझायनिर होती निवा. स्वतःची फर्म काढलेली.. कामंसुद्धा मिळत होती. त्यामुळे एक आत्मविश्वास आलेला तिला. अर्थात चांगलंच होतं.. पण हे फटकून वागणं, चिडचिड करणं वाढतच चाललं होतं.

विचार करुन करुन सुचेताचं डोकं दुखत होतं.. त्यामुळे तिच्या आवडत्या रिक्लायनर चेअर वर बसुन आराम करत होती.. निवाची आज एक पार्टी होती. ती बाहेरच जेऊन येणार. प्रियव्रत आणि स्वप्नील बिझनेस टूरवर गेले होते. त्यामूळे आज जास्त रात्री जास्त काही जेवण वैगरे करायचं नव्हतं. तिने फक्त वरण भाताचा कुकर लावला. वरण भात वरुन तुप आणि लिंबू... या अशा जेवणाचा थाटच काही वेगळा असतो. जेऊन बाकीची कामं आवरुन ती पुन्हा आपल्या आवडत्या जागी येऊन पुस्तक वाचत बसली.. खरंतर निवाची वाट बघत बसली होती.

रात्रीचे बारा वाजले होते निवा अजून आली नाही
"कुठे राहिली असेल पोर" ,तिच्या मनात नको नको ते विचार येऊ लागले. तिने न राहून तिला कॉल केला, पण तोही निवाने उचलला नाही. अर्थात ते अपेक्षितच होतं.. पण तरी तिचं मन तिला स्वस्थ होऊ देत नव्हतं.. शेवटी १ वाजता दारावरची बेल वाजली. सुचेतानं दार उघडलं.. पण..

पण समोर हेलकांडे खाणारी निवा पाहून तिच्या तळपायाची आग मस्तकात गेली.

"Are you drunk????"

सुचेताने तिच्या उत्तराची वाट न पाहता तिच्या कानाखाली लगावली.
सुचेताच्या हात उगरण्यामुळे निवा अजूनच चिडली.

"ए.. तुझी हिम्मतच कशी झाली मला मारण्याची? कुणी दिला अधिकार तुला?? तु.. तुच.. मला माझ्या घरापासून.. गावापासून.. माझ्या वडीलांपासून तोडलंयस. काय गरज होती मला इथे आणायची? अंजलीच्या रुपात मिळालेली आई ही हिरावलीस माझ्यापासुन?? काय मिळवलंयस एवढं सगळं करुन?? अच्छा.. हा.. तुझ्या मनात पूर्वीपासुनच असेल ना माझं आणि प्रियव्रतचं लग्न लाऊन द्यायचं??

"निऽऽ वाऽऽऽऽ" असं म्हणतच सुचेताने पुन्हा एकदा हात उगारला.. या वेळी मात्र तिने सुचेताचा हात अडवला.. आणि झटकुन दिला..

"हात नाही हा लावायचा.. तु आई तर कधी नव्हतीसच.. आता मामीचा पण हक्क गमावलायस तु" "आपलं नातं संपलंय आता" नशेतही तिचा सारा राग उफाळून येत होता. तशीच फणकारत ती आपल्या खोलीत निघुन गेली..

"निवा?" "ऐक ना माझं.." निवाचं बोलणं ऐकुन सुचेता बधिरच झाली.. जाऊदे.. सकाळी शुद्धीत आल्यावर बोलु असं म्हणत सुचेता दार बंद करुन आपल्या खोलीत गेली..

रात्र सरत आली तरी झोप नव्हती येत तिला..
सारा भूतकाळ तिच्या नजरेसमोरून सरकत होता..


सुचेता-स्वप्निलच्या लग्नाला आता दोन वर्षे पूर्ण होत होती. परवाच त्यांनी आपल्या लग्नाचा दुसरा वाढदिवस साजरा केला होता. त्याहून आनंदाची गोष्ट म्हणजे तिच्याकडे आता गुड न्युज होती.

राधा.. स्वप्नीलची मोठी बहीण आणि निवाची आई.. ती ही तेव्हा त्यांच्या सोबतच होती.. तिलाही लग्नानंतर सात वर्षांनी सुखाची नाजूक चाहूल लागली होती. त्यामुळे घरात आता आनंदाला पारावार नव्हता.

दोघींचं डोहाळजेवण सुचेताच्या सासूबाईंनी फार उत्साहाने केलं.

पण राधाला अचानकच आठव्याच महिन्यात कळा सुरु झाल्या. दोन तासांच्या अथक ऑपरेशन नंतर तिची प्रसुती झाली.. पण बाळ फार नाजुक होतं.. जन्माला आल्यावर काही तासातच राधाचं बाळ गेलं..

राधाला जबरदस्त मानसिक धक्का बसला. राधाचं सासर शहरापासून दूर गावात होतं.. त्यामुळे कधी अचानक मेडिकल इमर्जन्सी आली तर शहरात बरं या उद्देशाने स्वप्नील तिला आपल्याच घरी घेऊन आला.. शिवाय माहेरी आईच्या सानिध्यात.. सुचेतासोबत तिचं मन लवकर रमेल ही पण एक आशा होती.. मात्र यातलं काहिच घडत नव्हतं.. घरी सुद्धा राधा एकटक शून्यात नजर घालून फक्त बसलेली असायची. ना हसणं.. ना कुणाशी बोलणं.. तिची ही अवस्था कुणालाच बघवत नव्हती. विशेषतः स्वप्नील.. तो राधाविषयी फारच हळवा होता. त्यांच्या वयात दहा वर्षांचं अंतर होतं. राधाने लहानपणापासून आई होऊनच स्वप्नीलचा सांभाळ केला होता. आई जॉबला गेली की तीच सगळं करायची त्याचं.
त्यामुळे राधाला तो कधीच दुःखी बघु शकत नव्हता.

विचारांच्या गर्तेत पहाटे केव्हा तरी डोळा लागला तिचा.. सकाळी मोबाइलची रिंग वाजली आणि त्यानेच तिला जाग आली. स्वप्नीलचाच फोन होता.

"शंभर वर्ष आयुष्य आहे तुला.. कुठे आहात? परत कधी येताय? प्रियव्रत कसा आहे?" एक दमात सुचेता प्रश्नांचा भडिमार करत होती..

स्वप्नील: "अगं.. हो हो.. किती प्रश्न विचारतेस, मला बोलू तर दे. आज रात्री घरी येतोय आम्ही.. हेच सांगायला कॉल केला."

सुचेता: बरं बरं.. ठीक आहे, नीट या ...बोलुच मग. फोन वर स्वप्नीलला काही सांगणं तिला काही बरोबर वाटलं नाही..

तिने फोन ठेवला.. आणि सकाळची कामं आवरायला ती बाहेर आली.. निवाच्या खोलीचा दरवाजा बंदच होता..

"उतरलेली दिसत नाही अजुन" सुचेता जरा तिटकाऱ्यानेच बोलली.. सगळी कामं आवरुन कचरा बाहेर ठेवायला गेल्यावर सुचेताला निवाची गाडी दिसली नाही.. "अरे.. ही गेली पण?? सांगायची पण पद्धत उरली नाही??" घरात येऊन तिने निवाला फोन लावला.. मात्र फोन स्विच ऑफ येत होता.

संध्याकाळी निवा यायची वेळ टळून गेली होती तरी निवा घरी आली नव्हती.. सुचेताने पुन्हा फोन लावला. आताही लागला नाही.. आता मात्र सुचेताला काळजी वाटू लागली.. तिने अजुन दोनदा तीनदा कॉल लावले.. पण लागतच नव्हता.. सुचेता काळजीत पडली.. निवाच्या बाकी मैत्रिणी वगैरे कुणाचा नंबर पण नव्हता सुचेता कडे.. असण्याचा प्रश्नच नव्हता.. निवाने तिच्या वेगळ्या स्पेस मध्ये कुणाला जागाच दिली नव्हती.. तरी तिच्या खोलीत कुणाचा तरी नंबर मिळेल म्हणुन सुचेता निवाच्या खोलीत गेली. खरंतर निवाच्या खोलीत ती मोठी झाल्यापासुन कधी कोणी जात नव्हतं.. म्हणजे निवालाच ते आवडत नव्हतं.. त्यामुळे सुचेता ही आज कित्येक वर्षांनी ती निवाच्या खोलीत आली होती.. खोली तशी नीटनेटकी होती.. सुचेता निवाच्या डेस्क कडे गेली.. तिथे वेगवेगळी ड्रॉईंग होती.. निवाच्या assignments ची.. त्यात assignment पेक्षा वेगळी ड्रॉईंग ही होती.. एक मुलगी.. एकटीच.. एका घरापासुन लांब उभी, आकाशात एक बाई आणि तिच्याकडे हात पसरुन असलेली मुलगी, एक बाई एका माणसापासून एका मुलीला दूर घेऊन जात असलेलं एक चित्र.. अशी एक ना अनेक चित्रं होती.. ती चित्रं बघुन सुचेताला समजुन चुकलं की तिने
निवाला इकडे आणलेलं तिने मनाला किती लाऊन घेतलेलं.. त्याच डेस्क वर सुचेताला एक नोट मिळाली.. "मी निघुन जातेय.. शोध घेऊ नका" ती नोट वाचुन सुचेताच्या पायाखालची जमीनच सरकली.. निवा खरंतर रात्रीच घर सोडुन गेली होती.. आता बराच वेळ झाला होता.. ती कुठे गेली असेल.. आत्ता कशी असेल ती?? सुचेताला काहीही सुधरत नव्हतं..
(क्रमशः )