Login

फिरूनी येईल का नात्यात तोच गोडवा?

नात्याबद्दल सांगणारी कविता

फक्त चार भिंतीने घराला
घरपण येत नाही
घरातील माणसांनी
घर गजबजून राही

मोठे होता हरवून
गेले सारे बालपण
मोठे झाले म्हणजे
येते का शहाणपण?

वचन दिले होते
सोबत राहू निरंतर
काळानुसार वाढत
गेले नात्यातील अंतर

स्वप्न होते किती पाहिले
मनी होती दाटली प्रीती
पण नात्यांची ओंजळ
मात्र राहिली होती रिती

नात्यांतील गोडवा
कोठेतरी हरवला
दूरवर जाऊन
दुसरा गाव वसवला

उसवलेल्या मनाला
मिळे ना कधी थारा
भावभावनांचा अंतरी
होत आहे कोंडमारा

कोणी म्हणे जीवन असे
म्हणजे दोन घडीचा डाव
नियती देते असे विचित्र
अनपेक्षित कितीतरी घाव

फिरूनी येईल का पुन्हा
नात्यात तोच गोडवा ?
प्रेम, आपुलकी, जिव्हाळ्याचा
पुन्हा ऐकू येईल का मारवा?