Login

फिशटॅन्क भाग ४

फिशटॅन्क ही कथा , पात्र पूर्णतः काल्पनिक आहे. सत्य परिस्थिती शी या कथेचा काही संबंध नाही. कुठे साधर्म्य आढळल्यास केवळ योगायोग समजावा. कथेत एक आई स्वतःला व आपल्या मुलीला न्याय मिळवून देण्याकरिता मृत्यूनंतर धडपडते. व एक अनाथ म्हणवणारी मुलगी तिला कशी मुक्ती मिळवून देते यावर कथा लिहिली आहे.
फिशटॅन्क ( भाग ४ )
---_---_---_---_---_---_---_---_---_---_

सनी व एमा पूर्ण दिवस फिरून, एमाच्या संशोधनाचे काही काम करून संध्याकाळी परत येतात. पायऱ्या चढून वर जात असताना एमाची नजर खोलीवर पडते तर खोलीला कुलूप लावलेले असते. एमा कुलूप पाहून आपल्या खोलीत जाते.

पूर्ण दिवस फिरताना एमाला ती खोली व खोलीत असणारी व्यक्ती विचारातून निघत नाही. सनीला सांगू इच्छिते पण बोलणार काय ?

एमाची खोली जिन्याच्या जवळचं असते. बलविंदरच्या खोलीच्या थेट समोर. म्हणून एमाच्या खोलीच्या दरवाजात उभे राहिल्यास सहज सनीच्या बाबांची खोली दिसत असते. रात्री जेवण झाल्यानंतर सनी एमाला गावात घेऊन जातो. घरात सर्वजण नको म्हणत असताना देखील "काही होत नाही आम्ही अमेरिकेत जातो रात्रीचे बाहेर " म्हणत एमाला बाहेर घेऊन जातो.

ती रात्र पोर्णिमेची होती. गावातील रात्रीची एक वेगळी शांतता काही मोजकीच लोक बाहेर होती कुठेतरी चौकात बसलेली , काही लोकं कामानिमित्त बाहेर पडलेली ,वातावरणातील गारव्याने एमाला फार बरं वाटतं होतं. संधीचा उपयोग म्हणून सनी एमाला विचारतो " तू इतकी का घाबरली होती सकाळी ? असं काय पाहिलंस खोलीत ? " एमा प्रश्न ऐकून थबकते. तिला जोराचा ठसका लागतो. तिला सनी तिला पाणी देतो. एक - दोन घोट पाणी पिऊन एमा सनीचा हात घट्ट धरते व म्हणते " एक व्यक्ती होती ती कोण हेचं पाहायचं होतं, कारण त्या वेळी तिथे कुणी नसतचं आणि आज एक अनोळखी महिला दिसली ." सनी म्हणतो "अग त्या मावशी आहेत सफाईवाल्या. बाबांची खोली त्या मावशीचं साफ करतात." एवढं ऐकून एमा स्वतःच्या कपाळावर मारून घेते. परत दोघे फिरत फिरत घरी परततात.

पोर्णिमेचा तो पूर्ण चंद्र गारवा देत होता व त्याच्या उजेड सर्वत्र पसरला होता. त्या उजेडात एका झोपडीजवळ ती बाई किंवा तसंच काहीतरी असल्याचं एमाला जाणवत. परत तिला घाम फुटतो. एव्हाना तिला काहीतरी विचित्र घडत असल्याचं जाणवतं. थकवा आला असल्याचं कारण देत एमा भरभर घरी येते. घरातील सदस्य अंगणात बसलेले असतात. कोणाशी काहीच न बोलता एमा थेट आपल्या खोलीत जाते व झोपते. अंथरुणावर पडता क्षणी एमाला झोप लागते. घरातही सर्वजण झोपी जातात.

रात्री बाराच्या सुमारास एमा निजलेल्या खोलीच्या खिडकीतून गार वारा वाहू लागतो तो गारवा एमाला सहन होत नाही व तिचे डोळे उघडतात खिडकी बंद करून एमा वॉशरूमला जाऊन येते व नंतर तिला झोपचं लागत नाही म्हणून खोलीचे दार उघडून बाहेर येते. तर काय पाहते ? रात्रीचे सव्वा बारा वाजले होते जिन्या जवळची ती खोली उघडी होती आणि कोणीतरी आत गुणगुणत होते हे पाहून एमा त्या खोलीजवळ जाते तर आत पलंगावर एक पारंपारिक वेशभूषेत बसलेली एक बाई पलंगावरून उठते व रुममध्ये असलेल्या भल्या मोठ्या फिशटॅन्क जवळ जाते. तेथे माशांना खाऊ घालते व गर्रकन मागे वळून पाहते. एमाला म्हणते " घाबरू नको बेटा ये आत ये तुझीच वाट मी पाहात आहे इथे २० वर्षापासून." एमाचे पाय नकळत तिला खोलीत घेऊन जातात. ती बाई एमाला डोळे भरून पाहते तिला म्हणते " बाळा माझी मदत तूचं करू शकशील मला न्याय मिळवून दे व माझ्या कुसूमला ही."

एमा "काय मदत हवी आहे ?" विचारत लगोलग विचारते "तुम्ही तर सनीच्या आई आहात ना ? कधी आलात इथे आणि या ड्रेसिंगमधे तर मी पहिल्यांदा पाहते आहे तुम्हाला ?"

ती बाई म्हणते " होय मी सनीचीच आई आहे पण ती नाही जी तू पाहते ती तर माझी जुळी बहीण आहे . मी इथेच राहते. "

एमा प्रश्नार्थक नजरेने पाहते यावर ती बाई बोलू लागते " बेटा ! मी तुला नुकसान नाही पोहचवणार. फक्त मला न्याय हवा आहे. मी सनीची आई आहे सख्खी. माझी बहीण व सनीच्या बाबांनी मला धोक्याने मारलं. माझं नाव सिमर व बहिणीचं दलजीत आहे. आताची सिमर ही मूळ दलजीत आहे. माझ्याकडे आजची रात्र आहे फक्त मदत मागायला परत पुढच्या पोर्णिमेला येऊ शकेन."

एमाची भिती जाते व ती म्हणते "काय मदत करू मी ?"

यावर सिमर एक अल्बम घेऊन येते व सनी तसेच कुसूम सोबतचा शेवटचा फोटो दाखवते.

सिमर :" एमा मला मारण्यात आलं आहे कोंडून मारलं मला बलविंदरने. मेव्हणीच्या प्रेमात आंधळा झाला होता. माझा सुखी संसार हिरावून घेतला दलजीतने. ती अमेरिकेत वसली व मी वीस वर्षापासून सत्य समोर आणण्यासाठी धडपडते आहे. घरात कोणालाही माझ्या मृत्यूचं नाही माहीत ना आज पर्यंत कोणाला बलविंदरने कळू दिलं. म्हणूनचं बलविंदर येथे येण्याचं टाळतो. आला तरी आठवडा भर मुश्किलीने राहतो. आता हेचं सर्व तू जगासमोर आण."

एमाला अगदीचं बळ आल्यासारखं वाटतं व ती तयारी दाखवते. " सनी ला माहीती आहे का हे ?" एमा.

" नाही तो फक्त दोन वर्षाचा होता व कुसूम तीन वर्षाची" सिमर.

" मला हे सिद्ध करायला पुरावे हवे असतील. आधी तर दलजीत ही सिमर नाही आहे हे कसं पटवू ? " एमा.

सिमर डोक्यावरचा पदर काढत केस पुढे घेते " हे पाहा माझ्या मानेवर तीळ आहे दलजीत ज्या मानेवर नाही. दलजीत भारतात येताना हातावर स्टिकरच्या मदतीने बलविंदरचं नाव लिहते. माझ्या हातावर ते कोरलेलं आहे." म्हणत हातवरचं नाव दाखवते.

सिमर घडलेला प्रकार सविस्तर सांगू लागते " कुसुम माझी पहिली मुलगी तिच्या मानेवर देखील केसाखाली असाचं तीळ आहे. तिच्या जन्मानंतर तिच्या नशीबी या घरात नुसता तिरस्कार मिळाला कारण मोठ्या वहिनीला एका मुलीवर पुढे मुल झालं नाही. त्यांना ही पहिली मुलगीचं होती. दुसऱ्यांदा तिचा गर्भ पाडला गेला त्यावर मुल झालचं नाही. वांझोटी शिक्का बसला. मग जुगनी ; नील व अंबरची आई या घरात आली. वहिनी अतरकौरला सोड चिठ्ठी दिली गेली. पिहू तिच्या मुलीचं नाव. कुसूम नंतर सनी जन्मला मग सर्वांनी कुसूमला देखील कबूल केलं. कुसूम तीन वर्षाची होती आम्ही भारतात आलो तेव्हा सनी दोन वर्षाचा होता. त्यानंतर मी अमेरिकेत कधी गेलेच नाही गेली ती दलजीत सिमर बनून गेली."

" तुम्ही मग जिवंत नाही का आता ? मग मला कशा काय दिसलात ?" एमा.

सिमर एमा ला जवळ घेत "तू खास आहेस ना म्हणून " .
एवढं बोलून ती सावली धूसर होत जाते. एमा घड्याळाकडे पाहते तर तीन वाजले होते. एमा निमूटपणे पुन्हा आपल्या खोलीत येऊन झोपी जाते. सकाळी इथे तिथे फिरण्याच प्लॅन कॅन्सल करून ती पिहूला कॉल करते कारण तिला पिहूची आठवण येते. बोलता बोलता एमा तिला तिच्या आईच विचारते व नाव विचारते.
समोरून पिहू आपल्या आईचे नाव ' अतरकौर ' असल्याच सांगते . एमा ने तिच्या बाबांचे विचारता जसं सिमरने सांगितलं तसंच अगदी पिहूकडून ऐकायला मिळतं. एमा अवाक होते तिचा विश्वास बसत नव्हता या सर्वांवर. एमा दलजीतला भारतात बोलावण्यासाठी प्लान करते यात आजीची मदत घेते. आजी मदत करते व तसंच नाटकही सुरु करते.
पंधरा - वीस दिवसात एमा मिळेल तितकी माहिती गोळा करते. पिहूची भेट घेते तिच्याकडून थोडी फार माहिती मिळते तसेच पिहू तिला सांगते "तू ज्या घरी थांबली आहेस तेच माझ्या बाबांच घर आहे. माझे काका बलविंदर अमेरिकेत स्थायिक आहेत त्यांना दोन अपत्य आहेत कुसूम व सनी."

एमा : " कुसूम कशी दिसते मी पाहिलं नाही तिला कधी त्यांच्या घरी. जवळपास चार वर्षांपासून मी सनीच्या घरी ये जा करते तसेच एक वर्ष झालं आहे मी सनीच्याचं घरी आहे राहायला. पण मी वेगळ्या दोन खोल्या घेतल्या आहेत त्यांच्या बंगल्यात रेंटने."

पिहू : " कुसूम नाही राहात घरी ? मग कुठे असते ती ?"

एमा : " आजी म्हणत होती ती लंडनला शिक्षण घेत आहे."

पिहू :" असंच असाव मग."

एमा :" बरं कुसूम ला ओळखणार कसं तिचा एखादा फोटो असेल तर दे. बालपणीचाही चालेल. शोधतेच तिला."

पिहू : " फोटो जुन्या अल्बममधे असेल पाठवते नंतर. कुसूमच्या मानेवर डाव्या बाजूला मध्यम आकाराचा तीळ आहे लाल रंगाचा अगदी काकी सारखाचं ."

एमा : " बरं शोधते. "

( पुढे काय होणार ? एमा शोधेल का कुसूम ला? कुसूम कुठे असेल ?)

क्रमशः
---_---_---_---_---_---_---_---_---_---_
लेखिका : अहाना
0

🎭 Series Post

View all