फ्लाय गिझर

अद्भुत रहस्य
फ्लाय गिझर

आपण सर्वसामान्य माणसं जगातील अनेक अद्भुत रहस्यांपासून अनभिज्ञ असतो. अशी अनेक रहस्यं शास्त्रज्ञ आजतागायत उलगडू शकलेले नाहीत. आपल्यापैकी अनेकांना गुगलवर असं काही नाविन्यपूर्ण दिसलं तर ते जाणून घ्यायला खूप आवडत असतं. असंच एक अद्भुत रहस्य म्हणजे 'फ्लाय गिझर'.
फ्लाय गिझर हे नाव ऐकूनच आपल्या सर्वांना खूप आश्चर्य वाटतं ना. आपण आपल्या दैनंदिन जीवनात इलेक्ट्रिक गिझर, गॅस गिझर वापरत असतो. पण हा 'फ्लाय गिझर' काय प्रकार आहे बुवा! फ्लाय गिझर नावावरून तर असं वाटतं हे गिझर उडतात की काय. गिझर उडत नाही तर त्यामधील पाण्याचे फवारे उडत असतात. फ्लाय गिझरला 'फ्लाय रॅच गिझर' असंही संबोधलं जातं.

फ्लाय रॅंच गिझर आहे तरी काय!

हे गिझर म्हणजे गेर्लाचच्या उत्तरेस सुमारे २० मैल अंतरावर नेवाडा, अमेरिका येथील वाशो काऊंटीमधील जमिनीवर एक लहान भू-औष्णिक गिझर आहे. हा गिझर शंकू प्रकारच्या गिझर मध्ये मोडतो. गिझर आणि शंकू आकाराचा, जरा आश्चर्यच वाटते नाही का! ह्या गिझरचा उद्रेक होतो तेव्हा त्याची उंची पाच फूट आणि त्याहीपेक्षा वाढते. येथील तापमान हे ९३° सेल्सिअस इतकं असतं.

खरंतर एका शेतकऱ्याने शेतीसाठी पाणी हवे म्हणून या भागातली जमीन खूप खोल खोदली असता तिथे त्याला गरम पाणी आढळून आले. जमिनीतून इतके गरम पाणी पाहून शेतकरी घाबरला. एकतर शेतीसाठी हे गरम पाणी उपयोगाचे नव्हते म्हणून तो ते तसंच सोडून निघून गेला. शेतकऱ्यासाठी हा प्रकार भीतीदायकच होता. त्यानंतर सर्वप्रथम १९१६ मध्ये सिंचनाच्या पाण्यासाठी विहीर खोदण्यात आली त्याचवेळी पहिले फ्लाय गिझर तयार झाले. जेव्हा उकळत्या बिंदूच्या जवळ भू-तापीय पाणी सापडले तेव्हा विहीर खोदण्यात आली आणि दहा-बारा फूट कॅल्शियम कार्बोनेट शंकू तयार झाला.

१९६४ मध्ये एका भू-औष्णिक ऊर्जा ‌कंपनीने पहिल्या विहिरीजवळ दुसरी विहीर खोदली. तेव्हा त्यांना असं आढळलं की ऊर्जेसाठी लागणारं‌ पाणी पुरेसं गरम नव्हतं. दुसऱ्या विहीरीमधून निघणाऱ्या डिस्चार्ज ने इतका दाब सोडला की मूळ गिझर सुकून गेला. पाण्यात विरघळलेली खनिजे ज्यात कॅल्शियम कार्बोनेट आणि सिलिका यांचा समावेश होतो, ही नवीन गिझरभोवती जमा होतात ज्यामुळे शंकू तयार होतात. शंकू आकाराचं हेच तर रहस्य आहे. गिझर मध्ये एका ढिगाऱ्यावर अनेक शंकूच्या आकाराचे छिद्र असतात. शंकू सुमारे सहा फूट उंच असतात आणि संपूर्ण ढिगारा २५ ते ३० फूट उंच असतो.

२०१६ मध्ये 'बर्निंग मॅन' प्रकल्पाने गिझरसह ३८०० एकर फ्लाय रॅंच $६.५ दशलक्षला खरेदी केले. या गिझर मध्ये थर्मोफिलिक शैवाल असतात, जे थोडे ओलसर आणि उष्ण वातावरणात फुलणारे असतात. याचा परिणाम असा होतो की हिरव्या आणि लाल असे अनेक प्रकारचे रंग येतात. हे रंग सारखे बदलत राहतात. रंग बदलणारे पाणी बघणं म्हणजे येथील खूपच नयनरम्य नजारा असतो. या फ्लाय गिझरचे श्रेय गरम खडकाच्या खूप खोल तलावाला दिले जाते.

या गिझरचे वैशिष्ट्य असे की इथून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे तापमान ९३° सेल्सिअस पेक्षा जास्त असू शकते. कॅरोलिना मुनोझ सेझ, ज्यांना बर्निंग मॅन च्या मालकाने गिझरचा अभ्यास करण्यासाठी नियुक्त केले होते, त्यांनी असे नोंदवले आहे की गिझर मध्ये खरोखर जास्त प्रमाणात सिलिका असते. पाणी सतत सोडले जाते आणि हवेत पाच फूट उंचीपर्यंत पोहोचते. या गीझरने अनेक ट्रॅव्हर्टाइन टेरेस तयार केले आहेत. ७४ एकर क्षेत्रामध्ये ३० ते ४० पूल तयार केले आहेत.

फ्लाय रॅंच गीझर हे प्रत्येक वर्षी एप्रिल ते ऑक्टोबर या कालावधीत लहान, मार्गदर्शित तीन तासांच्या निसर्ग चालण्यासाठी खुले असतात.

©️®️ सीमा गंगाधरे