Login

प्रेमासाठी ( भाग ५)

प्रेमासाठी काहीपण


प्रेमासाठी (भाग ५)


रितेश आई आणि बाबा रविवार साप्ताहिक सुट्टी पकडून नुपूरच्या घरी आले. नुपूरने लेमन कलरचा पंजाबी ड्रेस घातला होता. केसांची सैल वेणी. वेशीवर मोगर्याचे गजरे, त्याचा मोहक, धुंद सुवास पसरला होता. रितेशच्या आई बाबांनी नुपूरला रितसर मागणी घातली. " तुमची नुपूर आम्हांला द्या. तुम्हाला तिची काळजी वाटणे साहजिक आहे, पण मी तुम्हांला वचन देतो. मी तिला कधी काहीही कमी पडू देणार नाही. जरी रितेशने आणि ठरवले असले तरी आधीपासूनच आम्ही नुपूरला आपली मानले आहे. आमच्या जिवात जीव असेपर्यंत आम्ही कधीही तिला अंतर देणार नाही. आमच्यावर विश्वास ठेवा. " रितेश चे बाबा म्हणाले.

" तुमच्यावर तर विश्वास आहेच, पण रितेशवरही आमचा पूर्ण विश्वास आहे. हे दोघेजण सुखाने संसार करतील. " नुपूरचे बाबा म्हणाले.

"पुढच्या आठवड्यात आपण साखरपुडा करू आणि साधारण महिनाभराने लग्न. माझे आणि नेत्राताईंचे बोलणे झाले आहे. आम्ही साधारण तारखा ही पाहून ठेवल्या आहेत. " रितेशची आई म्हणाली.

" आम्ही लग्न अगदी व्यवस्थित करून देऊ. " नुपूरचे बाबा.

" आम्ही? आम्ही नाही बाबा आपण, आपण दोघे मिळून लग्न व्यवस्थित करू. सगळे कार्यक्रम यथायोग्य पद्धतीने करू. फक्त एकच इच्छा आहे, साखरपुडा आम्ही आमच्या गावात करतो. म्हणजे आमच्या गावातल्या चार माणसांना बोलवता येईल. आमचा एकुलता एक मुलगा आहे, एकच सून मुलगी म्हणून आमच्या घरी येणार आहे. तिचे थोडे कोड कौतुक आम्हालाही करू दे. " रितेशचे बाबा म्हणाले आणि रितेशच्या आईने होकार भरला.

साखरपुडा आणि लग्नाची तारीख ठरली. त्याचदिवशी रितेश आणि नुपूरच्या अंगठीची खरेदी झाली. दिपीका साखरपुडा म्हणून नताशा जाम खूश झाली. तो दिवस सगळ्यांच्या आयुष्यात खूप आनंद घेऊन आला होता. दोन्हीही घरची मंडळी आनंदात होती. नुपूरचे आणि रितेशचे डोळ्यांनीच इशारे चालले होते. शेवटी नुपूरच्या बाबांनीच दोघांना जरा बाहेर फिरायला पाठवले. नुपूर लाजून आईकडे बघत होती. आईने डोळ्यांनीच जा म्हणून खुणावले आणि दोघे बाहेर गेले. जरी नुपूर आणि रितेशचे प्रेम होते तरी त्यांनी कोणत्याच मर्यादा ओलांडल्या नव्हत्या. त्यांच्यातली ओढ अजून वाढत होती.

समारंभ होता तिथे एंट्रन्सवर दोन्ही बाजुला फुलांचे डेकोरेशन केले होते. मेनडोअर पासून स्टेज पर्यंत लाल गुलाबाच्या पाकळ्यांच्या पायघड्या घातल्या होत्या. सर्वोत्तम अत्तराच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित झाले होते.

नुपूरची फॅमिली आल्यावर आधी रितेशच्या फॅमिलीतील महिलांनी नुपूरसह इतरांना ओवाळून आत घेतले. त्यांची चहापाण्याची व्यवस्था बघितली. रितेश व त्याचे आईवडील आल्यावर नुपूरच्या आई व इतर महिलांनी रितेश व त्याच्या आईवडिलांना ओवाळून आत घेतले व त्यांचे यथायोग्य स्वागत केले. रितेशच्या आत्याला आधी नुपूरला ओवाळून आत घेतल्याचा खूप राग आला. तिने रितेशची आई आल्यावर तिला चांगलेच सुनावले. रितेशच्या आईने तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. पण जुन्या मतांची माणसं आपल्या मतांना चिकटून असतात. नातेवाईक व आप्त स्वकीयांच्या उपस्थितीत कार्यक्रमाला सुरुवात झाली.

नुपूर मरून कलरची हिरव्या काठाची कांजीवरम नेसली होती. हलकासा मेकअप आणि साजेशी हेअरस्टाईल केली होती. तिने घातलेल्या नाजूक दागिन्यांनी तिचे सौंदर्य आणखी उठून दिसत होते. रितेशने तिला मॅचिंग मरून कलरचा कुर्ता आणि ऑफ व्हाईट सलवार घातली होती. गुरुजींनी विधी करून झाल्यानंतर दोघांनी एकमेकांना अंगठ्या घातल्या. अंगठी घालायच्या आधी रितेशने गुडघ्यावर बसून नुपूरला प्रपोज केले, आणि तिच्या होकारानंतरच रितेशने नुपूरला अंगठी घातली. नंतर रितेशच्या वडीलांनी माईक हातात घेऊन बोलायला सुरुवात केली. " मंडळी आज ह्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या बद्दल खूप आभार. आज रितेशच्या आयुष्यातील खूप महत्वाचा दिवस आहे. मी वैयक्तिक नुपूरचा खूप आभारी आहे. नुपूरने रितेशला साथ दिली, त्याला साथ दिली. जी खूप महत्वाची होती. तिच्यामुळेच आज तो आयुष्यात उभे राहू शकला, स्वतःच्या पायावर उभे राहू शकला. नुपूरच्या आईवडिलांनी देखील त्याची साथ दिली म्हणून हे शक्य झाले." डोळे पुसत त्यांनी माईक ठेऊन दिला.
सहभोजनानंतर कार्यक्रम संपला. मग नुपूरला आणि रितेशला जरा वेळ मिळाला. रितेशने नुपूरचा हात हातात घेतला, म्हणाला " Thank you. खूप खूप मनापासून Thank you. तू मला स्विकारलेस , मला होकार दिलास, माझे आयुष्यच बदलून गेले. तू माझी झालीस बास, मला आता आयुष्यात काही नको. फक्त तू माझी आहेस आणि मी तुझा. " हे बोलताना देखील रितेशच्या डोळ्यात पाणी तरळले. नुपूरने त्याच्या हातावर हात ठेवला आणि फक्त डोळ्यांनीच त्याला आश्वासन दिले, " मी तुझीच आहे रे, फक्त तुझीच. "

आता नुपूर आणि रितेश हक्काने भेटू लागले. आठवड्यातून एक दिवस दोघांनाही वेळ मिळायचा. जेवढा वेळ मिळायचा तेवढा ते एकमेकांच्या सहवासात घालवायचे. आता लग्नाची तयारी जोरात सुरू होती. सगळे काही एकमेकांच्या पसंतीने चालू होते. लग्नाचा दिवस जसाजसा जवळ येत होता तसे नुपूरचे आईवडील खूप अस्वस्थ होत होते. त्याची लाडकी नुपूर त्यांच्यापासून दूर जाणार होती ना. नताशाला ही वाईट वाटत होते.

घरच्या केळवणापासून सगळे नातेवाईक जमले होते. रितेशच्या घरची मंडळी म्हणत होती, " रितेशनी चांगलीच पोरगी पटवली, नशीब चांगले आहे रितेशचे"
तर अगदी उलट इकडे नुपूरच्या घरी चालले होते. नुपूर चे नातेवाईक रितेशवर खूश नव्हते. नुपूरला यापेक्षा खूप चांगला नवरा मिळाला असता असे त्यांना वाटत होते. कसेही असले तरी नातेवाईक मंडळीचे नवरा मुलगा व नवरी मुली बद्दल काहितरी मत बनते, जे ऐकवल्या शिवाय त्यांना गप्प बसवत नाही. पण यासार्यातही लग्नकार्यात मनापासून मजा घेणारी मंडळी असतातच जे कार्याची मजा वाढवतात आणि घरच्या मंडळींचा उत्साहही वाढवतात.

रितेशला आणि नुपूरला मोकळेपणाने फोनवर बोलताना येत नव्हते. मेसेज ही करणे अवघड होते. इतक्या पाहुण्यांमध्ये कसे करणार. तरी रात्री रितेशचा मेसेज आलाच. " Love you Nupur. मी खूप खूप वाट बघतोय तुझी. लवकर ये माझ्याकडे. " रितेश.

"Love you. झाले आता दोनच दिवस. उद्या भेटूच की आपण. " नुपूर
" किती वाट बघताय जीजू, तुमचीच होणारे की आता. तुमची साली हो. नताशा नाही. इशा. "
रितेशने परत मेसेज केलाच नाही. आधी बुजलेली रितेश त्यात सालीचा आगाऊपणा.

रितेश संध्याकाळची वाट पहात होता. संध्याकाळी त्याला नुपूर दिसणार होती आणि उद्यापासून कायमची त्याची होणार होती. लग्नानंतरची स्वप्न दोघेही दिवसाही पहात होते तर सगळे भाऊबहिणी त्यांना चिडवून सतावत होते. आणि दोन्ही घरात आनंदाचे पाट वहात होते.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
0

🎭 Series Post

View all