Login

प्रेमासाठी (भाग ८)

प्रेमासाठी काहीपण


प्रेमासाठी (भाग ८)

सात महिने पूर्ण झाल्यावर ही नुपूर कामावर जातच होती, कारण तिला नंतर बाळा बरोबर जास्त दिवस घरी थांबायचे होते. थोडा त्रास होत होता पण ती सहन करत होती. नवव्या महिन्यात ती बाळंतपणासाठी माहेरी गेली. यथावकाश नऊ महिन्यांनी नुपूरची नाॅर्मल डिलीवरी होऊन तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळ अगदी रितेश सारखे दिसत होते. तब्येत ही छान होती. बारशापर्यंत चांगले गुटगुटीत झाले होते. नुपूरच्या आईवडिलांनी अगदी थाटामाटात बारसे केले. अर्थातच त्याचे नाव मानव ठेवले. नताशा आणि मानवची अगदी छान गट्टी जमली होती. तर रितेश मानवसाठी अगदी व्याकूळ झाला होता. कधी एकदा नुपूर घरी येते असे त्याला झाले होते.
नुपूर घरी परत आल्यावर घरातले वातावरण अगदी मानव मय झाले. मानवच्या बाललींलामधे सगळे सुखावून जात होते. त्याची वाढीची प्रत्येक पायरी नुपूर आणि रितेश अनुभवत होते, मनात आणि फोटोत साठवून ठेवत होते. त्याचे रांगणे, चालणे तोंडाची अजाणता बडबड त्याचे गोड हसणे सार्यांना वेड लावत होते. त्याची रात्रीची जागरणे नुपूर आणि रितेश दोघे मिळून जागवत होते तर दिवसभर आजी आजोबांना त्याचे लाड करताना पुरत नव्हता. आजी आजोबा त्याच्यात पूर्ण रमले होते. घरात त्याला हळूहळू सगळ्या गोष्टी शिकवत होते. नुपूरच्या नोकरीमुळे आजीआजोबांच्या सवयीचा झाला होता मानव आणि आजीआजोबा देखील आनंदाने त्याचे सर्व काही करत होते. रितेश चे बाबा म्हणायचे, " आम्ही रितेशचे बालपण पुन्हा नव्याने अनुभवत आहोत. "
संध्याकाळी घरी आल्यावर मात्र कधी एकदा मानवला जवळ घेईन असे नुपूर ला वाटायचे. घरी आल्यावर एक तासभर ती फक्त मानव बरोबर घालवायची. त्याचे भरपूर लाड करायची. त्याच्याशी खेळायची. कधी कधी त्या दोघांबरोबर रितेशही असायचा. आठ पंधरा दिवसांनी नुपूर आणि रितेश त्याला नुपूरच्या आईवडिलांना भेटायला घेऊन जायचे. रितेशही आता जास्त जबाबदारीने वागत होता. स्टेशनरीच्या बिझनेस बरोबर अजून एखादा बिझनेस करायचे त्याच्या डोक्यात चालू होते.

मानवाचा शाळेत इंटरव्ह्यू होता. आता हे नवीन सुरू झाले होते. शाळेत एडमिशन घ्यायच्या आधी आईवडील आणि मुलाचा इंटरव्ह्यू घेत होते. नुपूर आणि रितेश मानवला घेऊन गेले. मानव पहिल्यांदा थोडा बुजला, पण नंतर त्याने छान ऊत्तर दिली आणि त्याची शाळेतली एडमिशन पक्की झाली. इकडे नुपूरने मानवला भावंड आणण्याची तयारी केली. मानव आता मोठा झाला होतो. सगळ्यांना आता मानवला बहीण हवी असे वाटत होते.
मानवला बहीण आली. छोटी मानसी अगदी दुसरी नुपूर होती. नाजूक कळी. रितेशला हवी तशी गोड मुलगी झाली म्हणून तो भलताच खूश होता. मानव छोट्या मानसीला बघून अगदी खुश झाला होता. मानसी नावाप्रमाणेच सगळ्यांच्या मनासारखी होती. सर्वांना आपल्या बाल्यसुलभ लिलांनी सुख देत होती.
मानवाच्या शाळेत मानसीचीही एडमिशन झाली. आणि तिची ही शाळा सुरू झाली. आता आईबाबाही थकले होते. घरात मुलांना बघायला आणि कामात मदत करायला मदतनीस आली. नवीन मोठे घर घ्यायचे प्लानिंग सुरू झाले. पण मुलांच्या शाळेजवळ मिळत नव्हते. शेवटी शेजारचा एक फ्लॅट घेतला आणि रिन्यूएशन करून घर मोठे करून घेतले.
" संसार हा सुखाचा\" असे सुरू होते सगळे. नुपूरचे आईवडील देखील थकले होते. नताशाचे लग्नाचे वय उलटून गेले पण लग्न जमत नव्हते. शेवटी तिने लग्नच न करायचे ठरवून टाकले.

मानवची स्काॅलरशीपची परीक्षा जवळ आली होती. ऑफिसातून आल्यावर स्वतः मानवाचा अभ्यास घेत होती. सगळे जेवणासाठी रितेशची वाट पहात होते. शेवटी मुले जेवण करून झोपली. आई बाबा ही जेवले, पण रितेशची वाट पहात आणि नुपूर बरोबर गप्पा मारत बसले होते. अकरा वाजून गेले तरी रितेशचा पत्ता नव्हता. काही निरोपही नव्हता. नुपूरला हाॅलमध्ये बसल्या बसल्या झोप लागली. पहाटे पाच साडेपाचला फोनच्या रिंगने तिला जाग आली तेवढ्यात बाबा ही उठून बाहेर आले. फोनवर बोलता बोलता नुपूरच्या हातातून फोन पडला आणि ती धरून खाली बसली. काय झाले बाबांनाही कळेना. बाबांनी फोन घेतला. रितेशचा रात्री मोठा अपघात झाला होता. त्याला दवाखान्यात एडमीट केले होते. तो बेशुद्ध होता. त्यामुळे त्याचा पत्ता शोधायला वेळ लागला होता. ताबडतोब नुपूर आणि बाबा दवाखान्यात गेले. त्याची ट्रिटमेंट चालू व्हायची होती. डोक्याला मार लागला होता. हातापायालाही मार लागला होता. नुपूर आणि बाबा दवाखान्यात पोचल्यावर डाॅक्टरांशी बोलून ट्रिटमेंट सुरू झाली. एम. आर. आय. झाले. एक्सरे झाले. डोक्याला आतमध्ये काही इजा झाली नव्हती. पण पाठीच्या मणक्यांचा आणि माकडहाडाजवळ जोरात मार बसला होता. अपघात होऊन आठ दिवस झाले. नुपूरचे आईवडील आणि नताशा मदतीसाठी घरी येऊन राहिले होते. सगळ्यांचे चेहरे बघून मुलगी कावरी बावरी होत होती. आठव्या दिवशी संध्याकाळी घरी आली आणि नुपूरचा धीर सुटला. ती आईच्या गळ्यात पडून खूप रडली. अजून रितेश शुद्धीवर आला नव्हता. रितेशचे बाबा आणि नुपूरचे बाबा रोज जाऊन रितेश ला बघून येत होते. दोघांच्या आईही येऊन बघून गेल्या.

दहाव्या दिवशी दुपारी रितेशने थोडी हालचाल केली. डाॅक्टरांनाही ट्रिटमेंट देताना हुरूप आला. आणि नुपूरच्या जीवात जीव आला. रितेश शुद्धीवर आला परंतु त्याला काही हालचाल करता येत नव्हती. हात सुजले होते. पाठीत कमालीच्या वेदना होत होत्या. पाय जराही हालत नव्हते. पुन्हा सिटी स्कॅन, एम. आर. आय. झाले. त्याची दोन तरी ऑपरेशन करावी लागणार होती. सलाईन मधून औषधांचा मारा चालू होता. ऑपरेशनच्या वेळी रक्ताची गरज होती. पण त्याचा बी निगेटिव्ह ग्रुप असल्याने रक्त मिळायला वेळ लागत होता. स्पेशालिस्ट डाॅक्टरांनाही दहा बारा दिवस सवड नव्हती असे करत पहिले ऑपरेशन अपघातानंतर वीस दिवसांनी झाले. ऑपरेशन चांगले झाले. रितेशच्या पाठीतील वेदना कमी झाल्या. हात थोडेफार हालत होते. ऑपरेशन नंतर आठ दिवसांनी त्याला उठून बसायला सांगितले होते पण त्याचे पाय अजिबात हलत नव्हते. फिजिओथेरपी सुरू करायची होती. पण थोडी हालचाल करताना देखील रितेशला त्रास होत होता. नुपूर आणि रितेश दोघेही नर्व्हस झाले. रितेशची चिडचिड होत होती. छोट्या छोट्या गोष्टी वरून तो नुपूरवर, इतरांवर चिडत होता.

लेकरांना बघून त्याला महिना उलटून गेला होता. त्यांच्या आठवणीने त्याच्या डोळ्यात पाणी येत होते. बाकी सगळे जण अधूनमधून येऊन भेटून जात होते. शेवटी नुपुरने धीर एकवटून एक दिवस मुलांना दवाखान्यात आणले. बाबाला बघितल्यावर मुलगी बाबाला बिलगली. रितेशला अश्रू अनावर झाले. तो रडत पाठोपाठ दोघांचे पापे घेत होता, तर छोटी मानसी म्हणते, " रडू नको रे बाबा, तू हिरो आहेस ना, पटापट मेडिसिन घे, म्हणजे बरा होशील. " रितेशही हासत रडत "हो" म्हणाला. मानव मात्र पुरता गांगरून गेला होता. "बाबाला खूप लागले आणि त्याला त्रास होतोय इतकच त्याला कळत होते". ऑपरेशन वगैरे झालेले मुलांना काहीच माहिती नव्हते. मधूनमधून नुपूर मुलांना रितेशला बघण्यासाठी घेऊन येत होती. नंतर लगेच दुसरे ऑपरेशन ही झाले. पण ते करून फारसा उपयोग झाला नाही असे रितेश आणि नुपूरला वाटत होते. कारण रितेशच्या पायाच्या स्थितीत काहीच फरक पडला नाही. त्याचे पाय जराही हालचाल करत नव्हते. पूर्ण निकामी झाले होते. आता डाॅक्टरांचे ही प्रयत्न संपले होते. एक उपाय म्हणून डाॅक्टरांनी फिजिओथेरपी देखील सुरू केली. फिजिओथेरपीने काही फरक पडतो का हे बघायचे होते. अर्थातच त्याला खूप वेळ लागणार होता. रोज नुपूर रितेशच्या पायाला हलका मसाज करत होती. फिजिओथेरपीच्या डाॅक्टरने सांगितलेले उपाय, हालचाली ही करून घेण्याचा प्रयत्न करत होती.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
0

🎭 Series Post

View all