Login

प्रेमासाठी ( भाग ९)

प्रेमासाठी काहीपण


प्रेमासाठी (भाग ९)

आता दवाखान्यातून रितेशला घरी घेऊन जा असे सांगण्यात आले. घरी नेण्याआधी त्याच्यासाठी सोयी करणे आवश्यक होते. त्याच्यासाठी हाॅस्पिटल सारखा बेड, व्हीलचेअर सगळे घेणे गरजेचे होते. त्याच्यासाठी स्वतंत्र मदतनीस ( एक चांगला सेवक) शोधणे आवश्यक होते. हे सगळे बघून मगच त्याला घरी न्यायचे होते. पाण्यासारखा पैसा खर्च झाला. रितेशच्या बिझनेस मधला सगळा पैसा आणि नुपूरच्या मेडिकलचे मिळून सगळे पैसे भागवले. अपघातानंतर दिड महिन्यांनी रितेश घरी आला आणि नुपूरची सत्व परीक्षा सुरू झाली.

रितश घरी आला तो पूर्णपणे बेडरिडन होऊनच. त्याचे पाय हालत नाहीयेत हे आत्तापर्यंत सर्वांना ठाऊक झाले होते. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी त्याला दुसऱ्यावर अवलंबून रहावे लागत होते. त्याच्यासाठी सकाळी आठ ते रात्री आठ पूर्णवेळ एक माणूस ठेवला होता. तो अगदी ट्रेंड होता. सगळे व्यवस्थित करत होता, पण तरी रितेशचे कुठेतरी काहीतरी बिनसत होते. हे बिनसणे देखील अर्थातच मानसिक होते हे सगळ्यांना समजत होते. त्याचा बिझनेस बंद पडला, तो बायकोवर पूर्णपणे अवलंबून झाला ह्याचे त्याला वाईट वाटत होतेच. पण आपण एक ओझे होऊन जगतो आहोत असे त्याला वाटू लागले. आणि त्याला डिप्रेशन येऊ लागले. प्रत्येक जण रितेशला समजून घ्यायचा, सांभाळून घ्यायचा पुरेपूर प्रयत्न करत होते. नुपूरला नोकरीवर जाणे आता आवश्यक होते. तिची रजा दोन महिन्यापेक्षा जास्त झाली होती. ऑफिसमधून सारखी विचारणा होत होती. तिने ऑफिसला जायला सुरुवात केली. दिवसभर आईबाबा आणि तो मदतनीस मिळून रितेशकडे बघत होते. मुलांना बघायला आणि घरचे पहायला एक मदतनीस आधीपासून होतीच.

मुले बिचारी लहान होती. त्यांची शाळा वगैरे रुटीन चालू होते, पण त्यांचा बाबा त्यांच्या बरोबर हसत खेळत नव्हता. त्यामुळे मुलेही आणखी बिचारी झाली होती. घरातील आनंदच कोणीतरी हिरावून घेतल्या सारखे झाले होते. रितेशला घरी येऊन आता चार पाच महिने झाले होते, त्याचे रूटीन बसले होते.
जसजसे दिवस जात होते, तसतसे रितेशच्या वागण्यात फरक पडत होता.कधी स्वयंपाक आणि झालाय म्हणून तक्रार करायचा. तर कधी खूप मसालेदार झालाय म्हणून खायचाच नाही. मुलांशी कधी खूप छान खेळायचा. आणि एखाद्या दिवशी जरा दंगा केला तरी मुलांवर ओरडायचा. खरेतर त्याची चिडचिड का होते हे सगळ्यांना कळत होते. पण काही इलाज ही नव्हता. रितेश थोडा उठून बसू शकत असता तरी काहीतरी करता आले असते. नुपूरच्या ऑफिसमधून कुणाचा फोन आला की त्याचे कान त्या फोनकडेच असत. मग तो मैत्रिणीचा असला तरी. नुपूरला ऑफिसमधून यायला उशीर झाला तरी त्याचा जीव कासावीस होत असे. तिला सारखे प्रश्न विचारत असे. आणि खूप चिडचिड वाढली होती.
नुपूरला ऑफिसमधून यायला आठ वाजून गेले. माणसाच्या शाळेतील प्राॅजेक्ट पूर्ण करण्यासाठी ती आईची वाट बघत होती. मानवला त्याच्या अभ्यासात आईची मदत हवी होती. नुपूर आल्या आल्या रितेश तिच्यावर ओरडला, " किती उशीर? काय काम होते एवढे? की एंजॉय करत होतीस. "

" अरे असे काय विचारतोस? काम असल्याशिवाय उशीर होईल का? तुम्हाला सोडून मी काय एंजॉय करणार? " नुपूर काकुळतीने म्हणाली.

" काय माहित, काम करतेस की आणि काही. " रितेश

काही न बोलता नुपुर आत गेली. भराभर सगळे आवरले. मुलांना बरोबर घेऊन त्यांचा अभ्यास आणि प्रोजेक्ट पूर्ण केले. मानव शहाण्या मुलासारखा आजीआजोबा बरोबर झोपत होता. मानसीला सोबत घेऊन रितेशच्या खोलीत झोपत होती. रितेशला झोप लागली, इतक्यात नुपूरचा फोन वाजला. फोन तिच्या मैत्रिणीचा अश्विनीचा होता. रितेशला झोप लागली असे वाटून ती रडत बोलत होती. " खूप त्रास देतोय ग तो खन्ना, अगदी त्रास होतो आहे. सगळे त्याच्या मनासारखे करून घेतो. हं तो युनीट इंनचार्ज असल्यामुळे त्याच्या ऑर्डर पाळाव्या लागतात. "

तिचे सगळे बोलणे रितेशला ऐकू आले. आपण चुकीचे वागलो हे त्यांचे त्यालाच कळले. तो मनात म्हणाला, " किती त्रास सोसते बिचारी, घरात माझा आणि ऑफिसमध्ये बाॅसचा. आपणच बोलताना थोडा विचार करायला हवा. दुखावले मी तिला. "
दुसऱ्या दिवशी झोपायच्या आधी त्याने तिच्याशी बोलायचे ठरवले आणि त्याप्रमाणे बोललाही. त्याने प्रेमाने तिचे हात हातात घेतले आणि विचारले " कोण आहे हा बाॅस? आणि का त्रास देतो आहे.? "

" तो युनीट इंनचार्ज म्हणून बदलून आलाय. दोन महिनेच झालेत पण सगळ्यांना त्रास देतो. खोटी वाॅवचर्स पास करायला लावतो. नाही पास केली तर सगळ्या स्टाफ समोर वेडेवाकडे बोलतो. आता दोन माणसांना काॅन्ट्रॅक्ट बेसीस वर घ्यायचे आहे. त्यातही तो त्याच्या वशिल्याच्या माणसांना घेऊ पाहतो आहे. पण ज्यांना साधे वाॅवचर्स लिहायचे माहिती नाही, एन्ट्री कशा करायच्या हे माहिती नाही. त्यांना कसे घ्यायचे? " नुपूर
" जाऊ दे ना मग. तू सोडून का नाही देत नोकरी? " रितेश.
" हूम. आणि काय करू. मानू आणि मनू दोघांना मोठे करायचे आहे. तुझे स्वप्न पूर्ण करायचे आहे. आणि आपल्या प्रेमासाठी करते ना. " त्याच्या गालावर हात ठेवत नुपूर म्हणाली.

तिचे आवरून ती ऑफिसला निघाली. रितेशने हसून तिला बाय केले. कालचा रितेश हाच का असा बघणार्याला प्रश्न पडला असता. नुपूर ऑफिसला गेली आणि तिच्या बाॅसशी डायरेक्ट बोलली. " तुम्ही हे चुकीचे करता आहात. आणि हे मी करू शकत नाही. अयोग्य माणसांना मी अशी कामावर ठेऊ शकत नाही. तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे, नाहीतर मला वरती बोलावे लागेल. "
इतके स्पष्ट बोलल्यावर तो खन्ना थोडा वरमाला. पण त्याचा राग त्याने दुसऱ्या कामावरून काढला. काही माणसे ही दुसर्याला त्रास देण्यासाठीच असतात.
एक दिवस परत नुपूरला उशीर झाला ऑफिसमधून यायला. रितेशने काहीच न बोलता फक्त रागाने बघितले. रात्री झोपताना नुपूरने सगळे सांगून त्याची समजूत काढली. " अरे आज स्टाॅक टेकिंग होते. खरतरं मला थांबायची गरजही नव्हती. पण मी त्याची माणस नोकरीवर घेतली नाही. मग त्यानेही मुद्दामहून मला थांबायला लावले. आणि नुसते नाही, वरूनच ऑर्डर आली. मग थांबावे लागले. " नुपूर.
" नक्की का बसला होतात मैत्रिणी गप्पा मारत. इथे काय होतेच आहे सगळे निवांत. " रितेश अजूनही रागात होता. रितेशचे रागवणे तिला छळत होते. ती रितेशला समजून घेत होती तसेच त्यानेही तिला समजून घ्यावे असे तिला वाटत होते. रितेशचा तिला राग आला पण त्याला आवर घालून ती गप्प बसली. कारण बोलण्याने फक्त वाद वाढणार हे तिला माहित होते. आणि घरात वाद झाले की घरातले वातावरण बिघडायचे, मुले अगदी कावरी बावरी होऊन जायची. रितेशच्या आई बाबांची मात्र तिला चांगली साथ होती. ते दोघेही तिला समजून घेत होते. काही झाले की ते मुलांना घेऊन बाहेर जायचे आणि मजा करूनच घरी परत आणायचे.
.

क्रमशः

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज
0

🎭 Series Post

View all