Login

प्रेमासाठी ( भाग १०) अंतिम भाग

प्रेमासाठी काहीपण


प्रेमासाठी (भाग १०) अंतिम भाग


अश्विनी, नुपूर ची मैत्रिण एक दिवस नुपूरला म्हणाली. " एवढे सगळे करतेस. एकदा स्वामींच्या मंदीरात जाऊन ये. "
" हूम. जाईन एकदा. या रविवारी जाऊयात. " नुपूर म्हणाली.
रविवारी नुपूर सासूबाई आणि दोन्ही मुलांना घेऊन अश्विनी बरोबर स्वामींच्या मंदीरात गेली. स्वामींच्या मुर्ती पाहुन नुपूरच्या मनात भाव दाटून आले. तिच्या डोळ्यात पाणी तरळले. मनोभावे हात जोडून तिने स्वामींना सांगितले, " स्वामी माऊली, तुमच्या कृपेने माझा रितेश बरा होऊ देत."
सासूबाई आणि मुलांनीही मनापासून हात जोडले.

थोड्या दिवसांनी नुपूरला एका फिजिओथेरपी डाॅक्टरांचा पत्ता समजला. खूप जुने जाणते आणि अनुभवी होते ते. त्यांच्याकडे रितेशला घेऊन जायचे होते. स्पेशल अॅम्ब्युलन्स करून जावे लागणार होते. रितेश, त्याचा मदतनीस, नुपूर आणि रितेशचा एक मित्र सगळे जण मिळून गेले. त्या डाॅक्टरांनी रितेशला बघितले त्याचे रिपोर्ट ही पाहिले. त्याचे अजून एक ऑपरेशन करायला हवे होते असे त्यांचे मत पडले. ते रितेशचे ऑपरेशन केलेल्या डाॅक्टरांशी देखील बोलले. परत आल्यावर ती परत रितेशचे ऑपरेशन केलेल्या डाॅक्टरांना भेटली आणि रितेशचे आणखी एक ऑपरेशन करायचे ठरले.
रितेशच्या मित्राला बरोबर घेतले म्हणून रितेशला राग आला. " काय गरज होती त्याला बरोबर घ्यायची? " रितेश म्हणाला.
"अरे, समजा काही करावे लागले तर, कुठे दुसरीकडे जावे लागले तर कुणीतरी बरोबर नको का? बाबांच वय झालयं. तुझ्याही आणि माझ्याही. मग कुणीतरी माहितीचे बरोबर असलेले चांगले नाही का? " नुपूर. काही बोलला नाही रितेश पण त्याची धुसफूस चालूच होती.

आठ दिवसात रितेशचे आणखी एक ऑपरेशन झाले. आणि चांगले झाले. दहा बारा दिवस तो दवाखान्यात होता. नंतर त्याची फिजिओथेरपी सुरू झाली. त्याच्या कमरेत थोडी संवेदना आली होती. आता त्याला होप्स वाटत होते. महिनाभर रोज एक फिजिओथेरपीस्ट येऊन रितेशचे व्यायाम घेत होता. त्याच्या शरीरात होणारा बदल तो त्याला फिल करायला लावत होता. महिन्या दीड महिन्या नंतर त्याला घेऊन नुपूर परत त्या स्पेशल फिजिओथेरपीस्ट कडे गेली.. त्यांनी महिनाभर ट्रिटमेंट घ्यावी लागेल म्हणून सांगितले. नुपूर रितेशला घेऊन एकटी परगावी राहिली. महिनाभर पूर्ण रितेशची ट्रिटमेंट चालू होती. अनेक प्रसंगांना तोंड देत नुपूर जिद्दीने रितेशच्या उपचारासाठी तिथे राहिली. महिनाभर मुलांना आजीआजोबांजवळ ठेवले होते. तीही बिचारी मुकाट्याने रहात होती. आठवड्यातून एकदा ती मुलांना भेटायला येई आणि घरातील कामे उरकून एक दिवसात परत जाई. या एक महिन्यात तिनेही रितेशला आवश्यक थेरपी शिकून घेतली. महिन्यात रितेश मध्ये खूप फरक पडला. त्याच्या पायाची हालचाल थोडी होऊ लागली. पायात संवेदना आली. त्याच्यात फरक जाणवू लागला.

महिनाभर राहून नुपूर रितेशला घेऊन परत आली. तेव्हा रितेशचे डाॅक्टर देखील खूप खूश झाले. त्याच्यात झालेला बदल खूप कौतुकास्पद होता. रितेशही मनापासून प्रयत्न करत होता. त्याला स्वतःचे स्वतः उठून बसायला जमायला लागले होते. त्याचा मदतनीस त्याच्याकडून रोज व्यायाम करून घेत होता. नुपूर देखील न चुकता त्याला थेरपी देत होती. हळूहळू प्रगती दिसून येत होती. पायात जीव आल्यामुळे रितेशला नवीन आभाळ गवसल्या सारखे वाटत होते. पण त्याचा आत्मविश्वास हरवला होता. तो परत आणणे गरजेचे होते. त्यासाठी नुपूर त्याच्याशी सतत पाॅझिटीव्ह बोलत होती. शिवाय एका काॅऊनसीलरची मदत ही तिने घ्यायचे ठरवले. त्याप्रमाणे ती त्याला घेऊन गेली. नेहमी प्रमाणे रितेशने त्रागा केला. त्याला अजिबात जायचे नव्हते. पण तिकडे जाऊन आल्यावर त्याला पटले. व तो देखील आता पाॅझिटीव्ह विचार करू लागला.

सहा महिन्यांच्या अथक परिश्रमानंतर रितेशची व्हील चेअर सुटली. आणि तो साध्या खुर्चीतही जरा वेळ बसू लागला. मोजून चार पावले का होईना पण चालू लागला. आता नुपूरने त्याला स्टेशनरीचे दुकान काढून द्यायचे ठरवले. त्यासाठी दुकान घराजवळच हवे होते. त्यासाठी तिला रितेशच्या मित्रांनी मदत केली. व तात्पुरते भाडेतत्त्वावर दुकान घेऊन रितेशचे स्टेशनरीचे दुकान सुरू झाले. त्यासाठी मदतीला म्हणून रितेशच्या मदतनीसाला तिने कायमचे ठेऊन घेतले. तो मदतनीस ही नुपूर आणि इतरांच्या वागणुकीमुळे त्यांच्या घरच्या सारखाच झाला होता. त्यालाही कायमचे एकाच ठिकाणी काम मिळाले म्हणून आनंद झाला. रितेशचा बिझनेस पुन्हा नव्याने सुरू झाला. तसा त्यालाही हुरूप आला. तो आनंदी राहू लागला.

इकडे रितेशच्या प्रकृतीत सुधारणा होऊ लागली पण नुपूरला मात्र मोनोपाॅजचा त्रास होतच होता. सारे करून करून तिचा जीवही शिणला होता. तिची अवस्था बघून सगळ्यांचा जीव कळवळत होता. रितेशला देखील तिचा त्रास पाहवत नव्हता. " कशाला करतेस इतके सहन? किती करशील सगळ्यांसाठी? " रितेश म्हणाला.
" सगळे आपलेच आहेत की अरे. आणि मी करते ते तुझ्यासाठी आणि मुलांसाठीच करतीय. थोडा त्रास होतो पण तो आपल्यासाठी. " नुपूर.
" पण बास आता. खूप त्रास दिला मी तुला. सुखात ठेवीन म्हणालो पण काहीच सुख देऊ शकलो नाही. प्रेमाच्या आणाभाका घेतल्या पण निभावली तू एकटीने. माझा स्वभाव इतका चिडचिडा झाला होता. मी वाटेल ते बोलत होतो. वाटेल तसा वागत होतो. तरी तू मला समजून घेत होतीस. कधीच तू माझी साथ सोडली नाहीस. कसं सहन केले सगळं? आणि फक्त माझेच नाही, माझ्या बरोबर माझ्या आईवडिलांचे आणि मुलांचे पण केलेस. " रितेश.

" अरे त्यात काय एवढे? मी कुणासाठी केल? माझ्या प्रेमासाठी. मी मनापासून प्रेम केले तुझ्यावर त्यासाठी. त्याचा असा हिशोब नसतो करायचा. " नुपूर म्हणाली. रितेशच्या बोलण्याने नुपूर भरून पावली. अत्यंत प्रेमाने ती रितेशच्या मिठीत शिरली. आयुष्यभर ज्याच्यासाठी ती तरसली होती. ते रितेशचे प्रेम तिला मिळाले होते.

नुपूर चे सुख पाहून अश्विनी सुद्धा खूप खूश झाली. " ही स्वामींची कृपा. " तिचे मन म्हणाले.
अश्विनीने नुपूर ला स्वामींच्या मंदिरात जाण्यासाठी सांगितले. नुपूरही सासूबाई आणि मुलांना घेऊन स्वामींच्या मंदीरात गेली. जगात सर्वसमावेशक अशी शक्ती आहे ही तिची श्रद्धा होती. त्याचे प्रत्यंतर तिला आले होते. तिचाही आता विश्वास बसला होता. त्या परमेश्वरी शक्ती पुढे ती नतमस्तक झाली होती.

समाप्त.

सौ. हर्षाली प्रसन्न कर्वे
मिरज

0

🎭 Series Post

View all